अभंग

अप्रकाशित अभंग मार्च १९६०

 

लहान रोपटीं - समुद्राच्या कांठीं।

चार दिवसांसाठी - सुखे डुलतीं ॥

क्षणांत नष्ट तो - समुद्राचा फेस।

तरी हा उल्हास - तया वाटे ॥

तुला मात्र जीवा - वेड अमरत्वाचें।

लागुनी सदाचें - मिळे दु:ख ॥१॥

 

चिमण्यांची चिंवचिंव - दाण्यापाण्यासाठी।

तशी तुझ्यासाठी - वृत्तीची ह्या ॥

भुरूभुरू हिंडती - येथ ना ह्या अशा।

तशा माझ्या आशा - मनामध्ये ॥

उडोत त्या कुठें - घरट्याकडे चित्त।

तयांचे लागत - सदाकाळीं ॥

शी माझी दृष्टि - तुझ्या स्थानाकडे।

जन्मजन्मीं हिंडे - जीव स्वैर ॥२॥

 

नदीच्या कांठाला - रांग ही पक्षांची।

घडी पापणीची - तुझ्या नेत्रीं ॥

उन्हाळयांत पात्र - नदीचे आटेल।

अश्रू न सरतील - तुझ्या नेत्रीं ॥

सये - कां चालतो - अखंड हा पूर।

जरा जातां दूर - एक जन्मीं ॥३॥

 

दिलाच्या दर्यात - मारूचीया बुडी।

सदाची का दडी - दिली येथ ॥

नीघ कांठावरीं - पुरे झाले स्नान।

कंटाळले मन - सये तुजला ॥४॥

 

वारुळाचा रस्ता - मुंगीला ठाऊक।

हळूं हळूं एक - पाय टाकी ॥

केव्हां तरी तिला - जाणे इष्ट स्थळीं।

दुपारी सकाळीं - मध्यरात्री ॥

मीहि जन्मांतरी - माझिया वारूळां।

जाईन राऊळां - अनन्तेच्या ॥५॥

 

समजाया लागले - ज्या क्षणापासोनी।

दुजी इच्छा मनी - आली नाही ॥

जीविताचें व्हावें - लहानसे फूल।

तुझें तें पाऊल - सजविण्याला ॥६॥

 

रखरखीत ऊन - कोठे न सावली।

लागते पावली जणूं आग ॥

मनाचा सन्ताप - होऊनी निर्दय।

चित्त पोळूनि ये - तसे आंत ॥

सोसतो हा त्रास - नव्हे प्रेमासाठी।

जीव माझा हट्टी - जन्मतोच ॥

आचरावें जें जें - केले अंगीकृत।

म्हणूनी भोगित - कष्ट सारे ॥७॥

 

प्रकाशांची संख्या - असंख्य आधीच।

वाढवूनी उगिच - काय लाभ? ॥

आकाशा कन्दिलीं - झाडावरी एका।

मिणमिणा दिवा कां - लावियेला? ॥

दरिद्री शब्द, मी - कशाला हे गावे।

व्यर्थ का मिरवावे - क्षुद्र तेज ॥८॥

 

ध्वनिमया भव्य ही - विश्ववीणा भासे।

अभंग हे उसासे - तियेचेच ॥

पक्षी समुद्र हे - तसे वेडे वारे।

गुंगती ना सारे - गीत गातां ॥

तसाच गातों मी - मला कां हसता?।

नसे माझी सत्ता - इथे कांहीं ॥९॥

 

इतुक्यांत ही लता - कुणाला लाजली।

लाजही राहिली - पुष्परुपें ॥

नाचतांना वास - थबकला जो येथें।

तयाला कां लते - लाजलीस? ॥१०॥

 

८ मार्च १९६०

आमचा पत्ता

Dr. Samprasad and Dr. Mrs. Rujuta Vinod Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth, Vijayanagar Col. Behind S. P. college Pune - 411030 

दूरध्वनी क्रमांक

+91-20-24338120

+91-20-24330661

+91 90227 10632

Copyright 2022. Maharshi Nyaya-Ratna Vinod by Web Wide It

Search