अभंग

एक एकला तो तुझा अंतरात्मा। पावतो आरामा अभंगांनी।

शकुंतला दुसरी वृत्ति झाली माझी।

देव मूर्ती गुंजी करी येथें ॥

वारला न येई - भुंगा त्या मूर्तीचा।

आत्मा दुष्यंताचा ठाव नाहीं ॥

येथ तिची आहे अशा अवेळी या।

प्रिय वंदा सया - काव्य देवी ॥२५॥

 

पाय माल झाली आशांची दौलत।

आली ही हातांत - राख काळी ॥

चिता प्रेमांची त्या धडाडली भव्य।

सव्य वा अपसव्य - नुरे जगतीं ॥

सर्वस्वाचे भस्म सर्वांगी चर्चिले।

नंतरी अर्चिले देव देवा ॥२६॥

 

पिंडीला लागला - अजाणता पाय।

प्रायश्चित काय सांग घेऊ ॥

प्राप्त् तूं होशील वाटले हें मला।

सांतता विसरला - जीव माझा ॥२७॥

 

भवानी - पूजेला आणिले भांडार / भंडार।

वासनांना ठार करुनीया ॥

मेलेल्या इच्छांनी रक्ताळलें चित्त।

संपादिलें वित्त - विरक्तीचे ॥

सखे अनंतते असला जीवात्मा हा।

तुझ्या पायी वहावा - हीच इच्छा ॥२८॥

 

आंतडीं तुटतात - तट तटां आंतली ।

वेदनांची झाली येथे वृष्टि ॥

सुचेना रुचेना जगींचे हें प्रेम।

दिव्य आत्माराम - ? ॥

बंधु भगिनी सर्व पूजेचे विषय की।

हृदय हें न टाकी प्रेम तेथे ॥

प्रेम आणि पूजा तुलाच वाहणे।

तुला गीत गाणे अनंतते ॥२९॥

 

उरींच फुटण्याची वेळ आतां आली।

येत ना माउली - कांही केल्या ॥

गीत पुण्याई ती आजवरी होती।

ती हि माझी शक्ति - नुरे आता ॥

आशा सुद्धा आली होत अस्तंगत।

नाहीं का संपत - जीवन चि हें ॥३०॥

 

अखेर भेट ही तुझी माझी विश्वा।

घेतल्या सर्वस्वा दिले तुज ना? ॥

इंद्रियांचा ग्राम पंचतत्वें सारी।

परत मीं माघारी तुला दिधली ॥

विश्व बाळा तुझ्या - निटिलाला चुंबनी।

मीं शुन्य निर्वाणी - जात आहे ॥३१॥

 

फुला फत्तरांत एवढा हा फरक ।

फुलाला ठाउक कोमेजणे ॥

हेंच माझे भाग्य मरणार मी आहे ।

म्हणुनि चित्तीं राहे शांतता ही ॥३२॥

 

दिलाच्या दगडाला भक्तीची गोंफण ।

देत भिरकावून - तुझ्या पायीं ॥

तुझ्या हृदयावरी दगडतो लागूं दे ।

आणि प्रेमझरी वाहूं लागो ॥३३॥

 

संसाराच्या बिड्या हाती पायी आल्या।

नाड्या या जखडल्या बंधनांनी ॥

स्वातंत्र्य संपले - भक्तीच्या गुंगीत।

गुंगता न येत - मुळी आतां ॥

देवाचे वेड जें जीवानें घेतले।

करु ते लागले मनी बंड ॥३४॥

तयाला सोडिले पाहिजे मीं

फुलोरा भक्तीचा चित्तांत दरवळे।

सुगंध हा पळे सृष्टिमध्ये ॥

एक एकला तो तुझा अंतरात्मा।

पावतो आरामा अभंगांनी ॥३५॥

२९-१०-५८

आमचा पत्ता

Dr. Samprasad and Dr. Mrs. Rujuta Vinod Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth, Vijayanagar Col. Behind S. P. college Pune - 411030 

दूरध्वनी क्रमांक

+91-20-24338120

+91-20-24330661

+91 90227 10632

Copyright 2022. Maharshi Nyaya-Ratna Vinod by Web Wide It

Search