अभंग

सदां माझ्या मनीं एकला हा नाद। काढि जे पडसाद वेळवेळी।

स्वातंत्र्य सिद्धीला जें जें आवश्यक।

तेंच बेलाशक आचरावे ॥

माय देशासाठी तुरुंगी जाऊनी।

आंनदे राहूनी मरूं तेथें ॥

नको जेथे तेथें पाहणे अनुभविणे।

अपमान भोगणे - हिंदुतेचा ॥११॥

 

दिव्य तेजस्विता तुझ्या त्या नेत्रांत।

मनाच्या क्षेत्रांत काव्य बीज ॥

मनांतले काव्य नेत्रिंचें ते तेज।

जिवाला या सहज - वेड लावी ॥

उजाळे हे अंतर - नेत्रिंच्या तेजाने।

मनींच्या काव्याने - फुले जीव ॥१२॥

 

तामसी वृत्तींचा सापळा हे चित्त।

मदोन्मत्त त्यांत जीव सर्व ॥

सर्पाची दुष्टता व्याघ्राची क्रूरता।

सिंहाची हिस्त्रता मनीं माझ्या ॥

बुद्धिचीही जोड पशुत्त्वाला झाली।

नीचतेला आली, शक्तिमत्ता ॥१३॥

 

आईला विचारी लाडका बालक।

‘जगाचा पालक असे कोण’ ॥

आभाळाच्या मागें देवबाप्पा आहे।

काळजी तो वाहे (जगन्नाथ) जगाची या ॥

‘देवाचे अस्तित्व सिद्ध करुनी या।

कोण दाखवाया असे योग्य’ ॥

शंका ती ऐकता आईस ये शिंक।

‘सत्यम्’ म्हणे ऐक - ‘असे देव’ ॥

तर्कटी पोराला शिंकेने उत्तर।

मिळूनी ईश्वर - सिद्ध झाला ॥१४॥

 

आत्म्याला (जीवाला?) विटाळ शरीर प्रेमाचा।

कसा व्हावयाचा मला सांगा ॥

ज्ञानगंगेवरी करुनी तीर्थस्नान।

शुचिर्भूत मन जाहले जें ॥

तया आकर्षील प्रीतियुक्त वाणी।

दिव्य अशरीरिणी आध्यात्मिक ॥१५॥

 

पक्ष्यांनी उडावे नभामध्ये स्वैर।

उधळीत चौफेर - गीत नाद ॥

माझिया अंतरी तत्वांनी नाचावे।

आणि या गुंगावे - अभंगांना ॥१६॥

 

सदां माझ्या मनीं एकला हा नाद।

काढि जे पडसाद वेळवेळी॥

गाउनी मीं त्यांना ठेवी अभंगांत।

तुझ्या ते चित्तांत - वावरू दे ॥

नाच तो तयांचा सुरु व्हावा तेथे।

हाच अनंतते - (तुझा मोद मनीं हेतु) ॥१७॥

 

तुझ्या त्या वाक्यांस ऐकू दे जीवाला।

चुंबू दे वाणीला - तत्त्व तेजां ॥

मुरवी जे थरारे क्षणोक्षणीं हास्य।

तयाचेच लास्य अंतरीं या ॥१८॥

 

समुद्रांत नाचे लाटांची हा (ही?) रांग ।

पीठ हे अथांग - जल पृष्ट ॥

टांगले हे छत वरी आभाळाचे।

वाजतें काळाचे - शांति वाद्य ॥

गोपींची रासक्रिडा चाले अशी या।

देव तारे झाले पाहण्याजी ॥१९॥ (सर्व तारे आले)

 

भयाण रात्रींच्या मनामध्ये जाऊं।

धीरतेनें गाऊ - आत्म - गीत ॥

काळया काळया जगा भ्यावयाचे नाहीं।

तुला हीच ताई - विज्ञापना ॥

चार चौघांचे जे चौफेर होतील।

वार ते सोशील - तुझा जीव ॥

ध्येय पूजनाची तयारी करण्यास।

आपुल्या आत्म्यास - असे शक्ति ॥२०॥

३-११-५८

आमचा पत्ता

Dr. Samprasad and Dr. Mrs. Rujuta Vinod Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth, Vijayanagar Col. Behind S. P. college Pune - 411030 

दूरध्वनी क्रमांक

+91-20-24338120

+91-20-24330661

+91 90227 10632

Copyright 2022. Maharshi Nyaya-Ratna Vinod by Web Wide It

Search