(रोहिणी-फेब्रुवारी १९४९)
पातंजल योगशास्त्रांत `प्रातिभ' नावाच्या एका भूमिकेचा उल्लेख आहे.
प्रातिभ म्हणजे चैतन्याचा एक अवस्थाविशेष आहे. या अवस्थेचा सर्वज्ञत्त्व हा स्वभाव होय.
मानवी बुद्धी पराकोटीला पोहोचली तरी तिला काही गहन अर्थांची ज्ञेयांची, विषयांची प्रतीती होत नाही.
असल्या अर्थांना परम अर्थ, परमार्थ असे म्हणतात.
लौकिक अर्थांचे `प्रत्यक्ष' इंद्रियोन्मुख व विषयोन्मुख बुद्धीला होते.
अलौकिक अर्थांचे `प्रत्यक्ष' आत्मोन्मुख बुद्धीलाच शक्य असते.
बुद्धी हेच अर्थज्ञानाचे व परमार्थ ज्ञानाचे साधन आहे, मात्र अर्थ-ज्ञ बुद्धी ज्ञानेंद्रियांचे सहाय्य घेते.