‘याज्ञवल्क्य’ हे भारतीय तत्त्वज्ञानाचे ‘पितृ-तीर्थ’ आहे.
‘अहं ब्रह्मास्मि’ या वैदिक महावाक्याचे द्रष्टे, शुक्ल युजर्वेदाचे व शतपथ ब्राह्मणाचे प्रणेते आणि यज्ञसंस्थेचे संशोधक याज्ञवल्क्य, यांच्या तत्त्व-स्थण्डिलावर भारतीय वैदिक संस्कृति सु-स्थिरलेली आहे.
याज्ञवल्क्यांच्या तत्त्वशास्त्रातला मेरुमणि म्हणजे आत्मतत्व.
आत्मतत्वाचे संशोधक म्हणूनच त्यांना भारतीय तत्त्वज्ञानाच्या इतिहासात अग्रस्थान आहे. अर्थात त्यांच्यापूर्वी ऋग्वेदकालीन द्रष्ट्यांनीही आत्मतत्वाचा साक्षात्कार, उच्चार, विचार व प्रचार केला आहे. परंतु याज्ञवल्क्यांनी आत्मतत्त्वाला तत्त्वशास्त्रीय संदर्भात प्रतिष्ठित केले.