प्रकाशित साहित्य

सुप्त मी असता हा, ’सुधामधुर’ श्वास
चुंबूनि गेलास, सख्या दूर
जागृतीची माझ्या, एवढी ही भीति
वागते का चित्ती, सख्या, सांग
छ्द्मनिद्रा माझी, असतेच नेहमी
फसवित्ये तुला मी, न तू मला

निराश युवका ते, तुझे प्रणयस्वप्न

चालणे हे माझे, तुला प्रदक्षिणा
बोलणॆ प्रार्थना, तुझीच की
कार्य माझे जे जे, ते तुझे पूजन
तुझेच दर्शन, दृष्य-सृष्टी

कितीदा सांगूनी, पाहिले मी तुला
अर्थ नाही झाला, तरी स्पष्ट
ह्रययी जे वसे, दर्शवू ते कसे
सांगताना हसे, होई देवा

कशाला आलीस, नेत्र ध्यानी अंध
कसे दृष्टिबंध, तुला घालू
गीतशब्दे माझ्या, बधिरले हे कान
तुझे प्रीतिगान, कसे ऐकू
निराळे स्थंडिल, नुरे व्यक्तित्वाचे
पूज्यपूजकांचे, ऐक्य झाले

चित्त माझे हेच, तुझे क्रीडाशैल
येथ तू फिरशील, चिरंतन

निशा मेघ गळला, शुभ्र चंद्रिकेंत।
अंतरिक्ष-क्षेत्र, पिका आलें।
अनंत धान्यें हीं, तारकांच्या रुपें।
कोणत्या मीं मापे, मोजणार।

नको मला देव, नको मला मीही
मागणे न काही, कुणापाशी
विश्वप्रेमाच्या ह्या, बेभान धुंदीत

इतरांचे वैभव, पाहवेना जिला
दृष्टि ही कशाला, मला व्हावी
आंधळा भिकारी, उभा दारी आहे
नेत्र देऊ का हे, तयाला मी

कोठल्या ह्र्दयात, साठविसी रूप
कुठल्या देशी भूप, देव-देवा
प्रभाताच्या पोटी, रजनीच्या की पाठी
आकाशाच्या काठी, दडेलास

एकदाच हास, दिशांना झुलवीत
ता‍यांना फुलवीत, नभामध्ये
वा‍यांना हालवीत, पक्षांना फिरवीत
लतांना डुलवीत, वनामध्ये
ढगांना खुलवीत, शैलांना रिझवीत
ह्रदयांना भुलवीत, हास देवा

इतुक्यात ही लता, कुणाला लाजरी
लाज ही राहिली, पुष्परूपे

धैर्य हेचि ज्ञान, भीति हे अज्ञान
उदात्त जीवन, धैर्यशाली
भीतीने होतसे, पापसिध्दी मनी
अभयता वर्तनी, नीति हीच

पाथेय गीतांचें, सवें घेऊनी यां
मार्ग चालावया, लागलों मीं
परीं हे वाढते, गीतांचें वैभव
आणि आत्म-देव, असंतुष्ट

तुला हा नैवेद्य, विद्वत्तेचा दिला
जिज्ञासेचा मला, नुरे छंद
विचारांची फौज, होती या डोक्यात
तिचा केला घात, एकदाचा
उपपत्ति अन तर्क, यांची जन्मजोडी
मला आता सोडी, एकलाच
बाळा मुखी दुधू, घाली आता आई
करू दे अंगाई, तुझ्या अंकी

पाण्यात बुडाले, अग्नीत जळाले
वा‍यात पळाले, आत्मतत्व
ता‍यांत लकाके, डोंगरांत ठाके
लतेसंगे वाके, आत्मतत्व
हास्यात ते फुले, पिकात ते डुले
प्रेमात ते खुले, आत्मतत्व

प्रतिभेची नाचे, अन्तरात दीप्ती
प्रकाश सांडती, तियेचे हे

तरंगू लागला, काळोख भवताली
अंतरात आली, एक इच्छा
गीततेजे माझ्या, आकाश उजळावे
तेजगीते यावे, मनी माझ्या
मनात चांदणे, नभामध्ये गीते
असे दृश्य दिसते, किती रम्य!

उगाच फिरताना, दमले माझे पाय
वनी फिरे गाय, एकली ही

Syndicate content