You are hereतुरीय अवस्था / तुरीय अवस्था

तुरीय अवस्था


चवथीची चंद्रकोर म्हणजे मानवी मनाची चौथी `तुरीय' अवस्था.
जागृत, स्वप्न व सुषुप्ती या तिन्ही अवस्थेतून निराळी अशी कोणती अवस्था आहे?
स्थळ काळादिकांचे बंध तिला नसणार.
कारण, उपरण किंवा अंत:करण, कर्मेंद्रिये किंवा ज्ञानेंद्रिये, अहंकार किंवा अहंकाराची जाणीव ह्या सर्वांचा अभाव `तुरीय' अवस्थेत क्रमप्राप्त्च आहे.
तिला `अवस्था' ही संज्ञाही अयुक्त आहे.
काही अतींद्रिय अनुभव, त्यांच्या प्रत्यक्षतेनंतर, इंद्रियांच्या चौकटीत पुन: बसू शकतात. उदाहरणार्थ संप्रज्ञात समाधी, भूत-प्रेतांचे (प्र + इत = येथून गेलेले) किंवा देवादिकांचे काही व्यक्ती मध्ये होणारे संचार, काही उन्मनस्क अवस्था इत्यादी.
तुरीय अवस्थेची शब्दमूर्ती म्हणजे ॐ कार.
प्रणव किंवा ॐ कार या शब्दाला व्याकरणातील कोणतीही तिमकि - तिकार किंवा वृद्धिसंस्कार होऊ शकत नाही. या शब्दाला कोणताही एकमात्र `वाच्य' अर्थ नाही व त्यामुळे `लक्ष्य' अर्थ असंख्य आहेत.
ॐ कार चे तीन अवयव (अ + उ + म) हे सर्व उपलब्ध त्रिपूटीचे वाचन करू शकतात.
सर्व वाच्य त्रिपूटीच्या पलीकडचा व सर्व वैगुण्यविशिष्ट अनुभवांचे अतीत असा जो निस्त्रैगुण्य अनुभव त्याची यथार्थ लक्षणा म्हणून ॐ कार किंवा प्रणव यांची उपयोजना विहीत समजली जाते.
सर्व देवता या देहेंद्रियांचे ठिकाणी असलेल्या शक्ती होत.
देवतांची विविध रूपे व रूपके म्हणजे या विविध इंद्रियांचे ठिकाणी झालेल्या आदिसत्तेची प्रतीके आहेत.
आदिसत्ता ही कुठल्याही एका रूपांत, देवतेत किंवा प्रतीकांत पूर्णत: अभिव्यक्त होत नाही.
सर्व समुदायांत देखील ती सत्ता पूर्णांशाने अवतरू शकत नाही.
सर्व देवतांचे, म्हणजे आदिशक्तिंच्या वा आदिसत्तेच्या अनेकाविध प्रतीकांचे, एकमात्र लक्षण असणाऱ्या व एकंकाराचे वाचन करणा‍या संज्ञेचे नाव ॐकार.
देहस्थित सर्व देवतांची समन्वित शक्ती व देवतातीत आदिसत्ता यांचा एकंकार म्हणजे साकारलेला प्रणव किंवा शुंडाविशिष्ट मंगलमूर्ती श्रीगजानन. या ॐ मधील शृंग स्पष्टच आहे.
श्रीमंगलमूर्तीचा अधिवास मनुष्यमात्रांच्या नेत्र-तेजांत आहे. हे गाणपत्य शास्त्रांतले एक तंत्र रहस्य आहे.
आद्य जगत्गुरू श्री शंकराचार्य यांच्या अखंड परंपरेतील परमाचार्य भास्करराय भारती यांनी केलेल्या गणेश सहस्त्र नामावरील `खद्योत' नावाच्या श्लोकबद्ध संस्कृत टिकेत `सर्व नेत्राधिवासक:।' असे गणपतीचे विशेष नाम सांगण्यात आले आहे.
प्रत्येक व्यक्तीच्या नेत्र-बिंदूत महामांगल्य स्वयंसिद्ध आहे.
ॐ गम् या बीज मंत्राच्या यथाशास्त्र उच्चाराने व प्रत्येक दिवशी सहस्त्रौक (१०००१) या जपाने नेत्र बिंदूत हे मांगल्य उपजविता येते.
स्वत:चे भोवती मंगल वलय व वातावरण निर्माण करण्यास ॐ कार युक्त, म्हणजे साक्षात मंगलमूर्तीचे वाचन करणाऱ्या प्रणवसहित, गं बीजाचा प्रत्यही सहस्त्रैक जप ही एक अद्भूत उपासना आहे.
ईश्वर तत्त्वाचा वाचक प्रणव आहे. असे भगवान पतंजलींचे सूत्र आहे - तस्य वाचक: प्रणव:।
प्रणव शब्दाची निरूक्ती - प्रकर्षेण (विशेषत्वाने) जयेत् (स्तविण्ण जातो।) इति प्रणव:।।
ॐ कार हे परमेश्वराचे परमोत्कृष्ट स्तोत्र आहे.

पुस्तकाचे चॅप्टर्स

संपूर्ण पुस्तक वाचण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा.

You may keep up to date with our updates by subscribing to RSS feed of this website. RSS Feed is available at www.maharshivinod.org/rss.xml

श्रीगुरुपादुकोदयस्तोत्रम्


आज मुहूर्तवूं या एक नित्योत्सव।
अद्वैत आमोदें, जेणे फुलेल हें विश्व।
क्षणोक्षण प्रभातेल नवोनव महापर्व।
प्रसादचिन्ह श्री-श्री-श्रीविद्येचें।।१।।

परा, परापरा, अपरा।
श्रीगुरूपुजा ही त्रिशिरा।
विमर्शा माऊलीची ही स्तनदुग्धधारा।
ओष्ठविण्याचा समय हा।।२।।

‘अपरा’ आराधनेंत भेद-ग्रह-स्थिती।
‘परापरा’ अवस्थेंत भेद-अग्रह-वृत्ती।
‘परा’ अवस्थानांत अभेद-स्फूर्ती।
श्रीगुरूपुजेची पादुका ही।।३।।

आदिभान हें परात्परगुरुबीज।
विमर्शशक्ती श्रीशिवा गुरूविद्येची गुह्यशेज।
जीवूजीवूचा पहिला परिव्राज।
गुरूपादुकेचें आलोचन ।।४।।

एक उफराटे अ-कुल ब्रह्मपद्म।
तेथ निष्कलेचे निजशक्तीधाम।
निर्झरले व्यापिनीचे श्यामव्योम।
अमृतमेघ वोसंडला।।५।।

चतुष्कोणी देवतात्म्यांचे उगमस्थान।
बिंदुस्थली अमृतसिद्धीचें अनुभावन।
यथाक्रम आंतर अनुभवांचें अनुस्थापन।
श्रीगुरूविद्येचा सहजाचार हा।।६।।

‘विमर्श’ म्हणजे आदिभानस्थित चित्शक्ती।
पादुकोदय म्हणजे शिवशिवेची साम्यरसस्थिती।
गुरूकृपयैव या भाग्यश्रीची समवाप्ती।
‘गुरूकृपा’ ये नामें जीवू जीवूचें निरवस्थान।।७।।

‘चार’ म्हणजे सोपचार आराधन।
‘राव’ म्हणजे विमर्शशक्तीचें उपयोजन।
‘चरू’ म्हणजे द्रव्यगुणांचे संयोगीकरण।
‘मुद्रा’ या नांवे प्रतीकाचा प्रत्यंगभाव।।८।।

चित्गगन-चंद्रिकेची फेसाळली जान्हवी।
श्रीगुरूकृपेची वेल्हाळली की पान्हवी।
प्रकटली वा नीलाब्जाची श्रीसुषमा अभिनवी।
श्रीपादुकोदय स्तोत्र हें ।।९।।

श्रीनवशुक्तिकांचा सम्यक् समुल्लेख।
येथ दशोपनिषद्रहस्याचे महावार्तिक।
आदिकृपेचा जणुं संतताभिषेक।
श्रीगुरूपादुकोदयस्तोत्रम्।।१०।।

।।इति श्री गुरूपादुकोदय स्तोत्रम्।।
------------------------------