You are hereबारावे पाऊल / बारावे पाऊल

बारावे पाऊल


बारावे पाऊल

    “उच्च कल्पनाविलासाला आता शक्ती राहिली नव्हती, अवसर नव्हता. एखादे चक्र जसे समतोल गतीने पुढे जावे, अगदी त्याप्रमाणे माझी वासना, माझी इच्छाशक्ती एकाच गतीने पुढे पुढे सरकू लागली.
    “एका भव्य भक्तिभावाचा उदय झाला. त्याच भक्तिभावाने, प्रेमसामर्थ्याने सूर्य आणि तारका यांना गती मिळते!”
- डॅन्टे
--------------
    तो ॐ चा ध्वनी अन्तराळात विरला. श्रीगुरुदेवांचे शब्द कानी आले. मी डोळे उघडले. श्रीगुरुदेव माझ्या निकट उभे होते. ईशान्येकडे ते अङ्गुलिनिर्देश करीत होते. आम्हाला ते काहीतरी दाखवीत होते.
    ती दिशा, तो प्रान्त एका कुठल्यातरी अन्धुक प्रकाशाने उजळला होता. आम्ही जेथे उभे होतो, त्या स्थानावर चांगला झगझगीत प्रकाश पडला होता.
    त्या अन्धुक प्रकाशांत मला एवढे मात्र स्पष्ट दिसले. आमच्या पर्वताच्या पायथ्यापासून क्षितिजाशी भिडलेले ते एक वैराण वाळवंट होते आणि एक प्रकाश-लेखा त्या वाळवंटाचा मधोमध विच्छेद करीत होती.
    ‘मोठे नवल आहे!’, माझ्या मनात आले, ‘तेथील ती प्रकाश-लेखा मोठ्या विलक्षण गतीने मागेपुढे होत आहे. शिवाय तिची लकाकीदेखील काही निराळीच आहे.’
    “शम्बालाचा मार्ग तो हाच असेल काय?”, मी श्रीगुरुदेवांना विचारले.
    “होय”, ते उत्तरले, “हा दीप्तिमय मार्ग, प्रकाशमार्ग शम्बालाकडे जातो. तू नीट निरखून पाहा. तिकडे जाणार्‍या यात्रिकांच्या डोक्यावर झगझगणार्‍या मशाली आहेत. तू लक्ष दिलेस, तर त्या यात्रिकांचे संगीतही तुला ऐकू येईल. ते गात गात पावले टाकीत आहेत.”
    “मला तर वाटते, तो मुरलीनाद आहे. प्रत्येक यात्रिक मुरली वाजवीत आहे.”
    “अगदी बरोबर.” श्रीगुरुदेव म्हणाले, “ते धवल-गिरीवरील शम्बालाला उद्देशून प्रार्थनागीते गात आहेत. सर्वांच्या मुरलीनादांचा अर्थ एकच आहे.”
    “तुम्ही मला प्रकाशाचा मार्ग दाखविला. आता माझी इच्छा, माझी शक्ती, माझे श्रम यांचा आपण स्वीकार करा. आपली दृष्टी अहर्निश माझ्यावर आहेच. हे परमात्मन्, आपला वरद-हस्त मला दिसू द्या. अंधार घनदाट आहे. मी तुमच्या मागून येत आहे.”
    आमच्या हृदयाचे ठोके अधिकच जलद पडू लागले. आदरयुक्त भीतीने मन व्यापून गेले. मोठ्या आशेने आम्ही पुनश्च तीच प्रार्थना म्हटली. त्या धवलगिरीवर असंख्य जीवात्मे होते. सर्वांनी आपले सूर आमच्या प्रार्थना-गीतांत मिळविले.
    श्रीगुरुदेव म्हणाले, “आता पुन्हा पहा. उजळलेल्या मार्गाच्या सीमेवर, क्षितिजावर काय दिसते ते पहा.”
    प्रथम आम्हाला कोणतेच दृश्य दिसले नाही. आकाशाचा घुमट पूर्ण रिता होता. एक भव्य-सुंदर मेघ मात्र तेथे दिसत होता. त्या मेघावर सूर्यप्रकाश परावर्तित झाला होता. अङ्गुलि-निर्देश करून श्रीगुरुदेव तोच तेजाळ मेघ आम्हाला दाखवीत होते. मी तो मेघ जरा निरखून पाहिला. त्याचे धगधगीत अन्तस्तेज मला विशेष आकर्षक वाटले. त्या मेघाचे ते तेज स्वयंसिद्ध असावे, असा मला भास झाला.
    “असला तेजोमेघ मी पूर्वी कधीच पाहिला नव्हता.” मी स्वत:शीच पुटपुटले. त्याच्या तळांतून अग्निज्वाला निघत होत्या. ती विद्युत् तर नसावी? सुवर्ण-कोन्दणांत बसविलेल्या हिरे, माणके, पाचू या रत्नांची प्रभा फाकावी, तसे काहीसे ते तेज दिसत होते.
    “छे! हा मेघ तर निश्चित नाही.” मी माझा विचार प्रकट केला.
    नंतर माझ्या लक्षात आले, तटबंदी असलेल्या एकाद्या शहराप्रमाणे आता ती आकृती दिसत होती. महाद्वारालगत मोठमोठे संरक्षक बुरूज होते. झगमगणारी मेघडंबरी होती आणि गोल घुमटही होते. तो आभास विलक्षण होता.
    साबूचे मोठमोठे फुगे, बुडबुडे असतात ना, तसे हे गोल-घुमट दिसत होते. ते हवेत, भू-पृष्ठाच्या बरेचसे वर तरंगत आहेत, असे वाटे.
    “तुम्हाला ते दृश्य दिसते ना?”, मी सहयात्रिकांना विचारले.
    “होय. तेथेच आमची दृष्टी खिळली आहे. आम्हाला वाटते ती पुण्यनगरी असावी.”
    इतक्यात आकाशवाणीचा दूरध्वनी ऐकू आला. आमची अंत:करणे आनन्दाने उचंबळली.
    आम्ही पुण्यनगरीचे दर्शन घेतले. ही नगरी स्वर्गांतून त्या पर्वतीजवळ अवतरली असावी. पुण्यनगरी ही साक्षात् सरस्वती आहे, विद्याधरांची वैजयन्ती आहे. ज्ञानगंगेची गंगोत्री व भक्ति-यमुनेची जम्नोत्री येथेच आहे. कर्मयोगाच्या केसरीची गुहाही या पुण्यनगरीत आहे.
    “ही पुण्यनगरी शम्बाला तर नव्हे?”, श्वास रोधीत मी गुरुदेवांना विचारले. त्यांच्या अर्थपूर्ण स्मिताने मला उत्तर मिळाले.
    “आपण तिकडेच जात आहोत काय?”, मी विचारले.
    “होय. पण योग्य वेळ आल्यावर! नीट निरखून पाहा. तो उजळलेला मार्ग पायथ्याकडून पर्वताच्या शिखराकडे जात आहे. नीट पाहिलास का?”
    पर्वताच्या पायथ्याशी सर्व अन्धार होता. क्षितिजाकडे दिसणार्‍या त्या सुंदर सुरनगरीवरून मोठ्या कष्टाने मी माझी दृष्टी बाजूला वळवली. प्रथम मला काहीच दिसेना. एका शोकगीताचा ध्वनी माझ्या कानी आला.
    माझा थरकाप झाला. मी विचारले, “हे काय असावे? सारी सृष्टी एखाद्या गूढ व्यथेने कण्हत असावी काय? दु:खमग्न मानवजातीचा तर हा आक्रन्द नसेल?”
    माझी दृष्टी स्वच्छ होऊ लागली. मला खालचे भू-पृष्ठ दिसू लागले.
मुंग्यांचे थवेच्या थवे सरकत असावे, तसे पीत, शुभ्र, कृष्ण ठिपके या भूपृष्ठावर मला दिसू लागले. हे जीवाणू संख्येने कोट्यवधी होते. ते इतस्तत: भटकत होते.
    माझ्या या स्थानावरून मला एवढे कळून आले की, त्या सर्व जीवाणूंचा प्रवास त्या गौर पर्वताकडे, धवलगिरीच्या शिखराकडे चालला आहे. त्यांची चाल वेडीवाकडी, अहेतुक अशी काही काल दिसे. पण अखेरीस सर्वांचे उद्दिष्ट धवलगिरीचे उच्च-उत्तुंग शिखर हेच आहे, हे स्पष्ट होत होते.
    माझ्या मनात आले, ‘हे बिचारे आन्धळे कष्टत आहेत, धडपडत आहेत. त्यांना आशेचा एक तरी किरण दिसत असेल काय?
    ‘मानवाजवळ, त्यांच्या स्वत:च्या हृदयात, ईश्वराचे निवासस्थान आहे, हे या बिचार्‍यांना कधी उमगेल का?’
    शेवटी मी गुरुदेवांना स्पष्टच विचारले, “यांच्यापैकी कोणालाही हे ज्ञान नाही का? मानवी देह हे देवाचे देऊळ आहे, याची एकालाही कल्पना नसेल का?”
    श्रीगुरुदेव गंभीरपणे बोलले, “होय. काहीजणांना ही कल्पना अवश्य असते. तिकडे तू नीट निरखून पाहा. खाली तुला काही प्रकाश-बिन्दू दिसतील. काही थोडी जागा प्रकाशात आलेलीही तुला दिसेल. ते पहा, काही ठिकाणी मोठाले प्रकाश-पुंज आहेत. त्यातला एक प्रकाश-बिन्दू सर्वोत्तम आहे.”
    “हो, हो; दिसले. एका सूर्याभोवती जसे अनेक ग्रह फिरावेत, गिरक्या घेत राहावेत, तसे हे दृश्य दिसते.” मी उद्गारले.
    “तुझा दृष्टान्त अगदी यथार्थ आहे.”
    श्रीगुरुदेव पुढे म्हणाले, “ते प्रकाशपुंज म्हणजे ज्यांना परमसत्याचे, परमात्म्याचे ओझरते दर्शन झाले आहे, असे जीवात्मे आहेत.
    “सत्यदर्शन झाल्यावर मागून येणार्‍या साधकांना, यात्रिकांना मार्ग दिसावा, म्हणून ते पुन्हा मागे परतून येतात. दुसर्‍यासाठी कष्टणार्‍या जीवांना प्रकाश आपोआप लाधतो; पण अशा व्यक्ती फारच तुरळक, सहस्रांत एखादी असते.”
    इतक्यात आम्हाला एक महामंत्र ऐकू आला. त्या दैदिप्यमान व्यक्ती संथपणे तो मंत्रोच्चार करीत होत्या. हे विभूति-मंडल त्या निर्झरासन्निध असलेल्या हरित वर्तुळाच्या केन्द्रस्थानी बसले होते.
    तो मंत्र असा होता:
    “परमेश्वराच्या हृदयात एक प्रकाश-केन्द्र आहे. त्या केंद्रातून मानवांच्या हृदयांत सदैव प्रकाशकिरण यावेत व भूतलावर ईश्वरी प्रकाशकिरण पसरावेत.
    परमेश्वराच्या हृदयात एक प्रेम-केंद्र आहे. त्या केंद्रातून मानवाच्या हृदयात प्रेम-किरण पाझरावेत. परमेश्वराने पुनश्च पृथ्वीवर यावे.
    “ज्यामध्ये ईश्वरी-इच्छा प्रकटली आहे; असे एक इच्छाकेन्द्र आहे. मानवाच्या क्षुद्र आकांक्षांना, त्या दिव्य इच्छा-केन्द्राचे, त्या दैवी हेतूचे, मार्गदर्शन लाभावे.
    “हा उदात्त हेतू महात्म्यांना, महापुरुषांना अवगत असतो. त्या हेतूसाठी, त्या ध्येयसिद्धीसाठी हे महात्मे सदैव झटत असतात. ते सदैव सेवाप्रवण असतात.
    “मानववंश हेदेखील एक केन्द्र आहे. त्या केन्द्राकडून प्रेममय आणि प्रकाशमय योजना सिद्ध व्हाव्यात.
    “प्रकाश, प्रेम आणि सामर्थ्य यांच्या त्रि-दल शक्तीमुळे भूतलावर दैवी योजना मूर्त व्हावी, प्रकट व्हावी!”
    “अय्या!”, मी उद्गारले, “ती दैवी योजना! खरंच, ती साकार करण्यासाठी आम्हीसुद्धा हातभार लावला पाहिजे. त्या योजनेतले आमचे दायित्व, कर्तव्य आम्ही शेवटास न्यायला हवे. आता आपल्याला तयारीला लागले पाहिजे. श्रीकृष्ण आणि त्याची उगवती द्वारका, जीझस आणि त्याचे उमलते चर्च, यांचे स्वागत करायला आपण समर्थ झाले पाहिजे. आता मला परतले पाहिजे.”
    त्या योजनेचा अर्थ आता माझ्या ध्यानात आला. माझे अन्त:करण या वेळी आनंदाने काठोकाठ भरले होते. फेस भराभर उसळत होता, माझ्या अन्त:करणाने त्या भव्य प्रतिज्ञेचा पुनश्च नि:शब्द उच्चार केला.
    “मी केव्हाही वैयक्तिक मोक्ष शोधणार नाही व स्वीकारणार नाही. अंतिम व चिरकालीन शान्तीचा उपभोग मी एकटी कधीही घेणार नाही.
    “सर्वत्र आणि सर्वदा मी केवळ एका ध्येयासाठी जगेन.
    “पृथ्वीवरील प्रत्येक व्यक्तीचा, सर्वांचा मोक्ष!” त्या महावाक्याचा खरा अर्थ माझ्या लक्षात आला. त्या द्रष्ट्याच्या मनात काय हेतू असावा, त्याची मला आता कल्पना आली.
    “पेला काठोकाठ भरला आहे.” हे वाक्य आता मला समजले. “भगवन्ताच्या राउळात मी अनंतकाल राहीन.” या वाक्याचाही अर्थ मला कळला. ‘प्रत्येक ठिकाणी देवाचेच देऊळ आहे, - ‘यत्र यत्र मनो याति तत्र तत्र समाधय:।’ आद्य श्रीशंकराचार्यांच्या या वाक्याचा अर्थ आज मला कळला.
    एक भक्त असे म्हटल्याचे मला आठवते, “मी वरती स्वर्गात गेले, तू तेथे आहेस. मी खाली नरकात पडले, तरी तेथेही तू आहेस.”
    आपण कोठेही असलो, तरी तेथे देवाचे देऊळच असते. आपण एखाद्या उदयगिरीवर, एखाद्या पुण्यनगरीत किंवा एखाद्या काळ्याकभिन्न अरण्यात असलो, तरी तेथे देवाचे देऊळ असतेच.
    “आपण आता त्वरा करू या.” मी म्हटले, “भगवान कृष्ण, ख्रिस्त माझी वाट पाहत आहेत. त्यांचा अवतार कसा होईल? अवतार झाला, तरी ओळख पटेल, अशी श्रेष्ठ माणसे हवीत ना?”
    या क्षणी दलदल-दोस्त म्हणाला, “जगाला ही गोष्ट ठाऊक नाही. देव येथून कधीच दूर गेला नाही. तो सदासर्वदा येथे आहे, हे तुम्हाला माहीत आहे?”
    थोडे थांबून तो पुढे म्हणाला, “त्या बिचार्‍या जीवांना जरादेखील कल्पना नाही की, त्यांच्यामध्ये एक दिव्य स्फुल्लिंग आहे; प्रत्येकजण सन्तांच्या मान्दीआळीतला एक महापुरुष आहे. कितीतरी महन्त आणि महानुभाव सारखी चिंता करीत असतात. त्यांना वाटते, ‘आमचे हे समाधि-धन कोणी घेईल का? हे सिद्धान्त, ही उच्च तत्त्वे आम्ही कोणाला सांगू?’
    “शिकविण्याला योग्य, म्हणजे शिष्य होण्यास पात्र, असे नवमानव तयार व्हावेत, ही त्यांची तळमळ आहे.”
    “चला लवकर”, मी माझ्या सहचरांना म्हटले, “आपणास आता सरळ जावयाचे आहे.
    “अज्ञानाच्या अरण्यात वाट चुकलेल्या अभाग्यांना आपण थोडी मदत करू या. आता या मार्गाची आपल्याला ओळख झाली आहे. त्यांना आपण आता आधार देऊ या. मध्यरात्री वादळात सापडलेल्या जहाजांना दीपस्तंभाचे प्रकाश-किरण धीर देतात, मार्ग दर्शवितात. तसे कार्य करण्याची ही संधी आहे. आपण देवाची भक्तिगीते गाणारी गोपुरे होऊ. रात्रं-दिवस आपण भक्ति-गीते गाऊ. ज्यांना दृष्टी असेल ते दीपस्तंभ पाहतील, ज्यांना श्रुती असेल, ते आपली भक्तिगीते ऐकतील.”
    दलदल-दोस्त म्हणाला, “अर्थात्. आपण मागे गेलेच पाहिजे.” सर्वांकडे पाहत तो पुढे म्हणाला, “तुम्हाला कसे वाटते? ठीक आहे ना?”
    सर्वांच्या नेत्रांत एकच तेज चमकले.
    सर्वांच्या वाणींतून ॐ हा एकच अनुमति-दर्शक उद्गार बाहेर पडला. अन्य उत्तराची शक्यताच नव्हती.
    “दूर दूर, दक्षिण-मार्गावर अगदी दूर, काही विस्तीर्ण भाग आहेत, तेथे घनदाट अंधार आहे. प्रकाशाचा एकही किरण तेथे नाही. आपण तिकडे जाऊ या. कदाचित् तिथले प्रकाशरेणू अगदीच लहान असतील. वाट चुकलेल्यांसाठी, मागच्यांसाठी, त्या अल्प-ज्ञ जीवांसाठी आपण तिकडे जाऊ या!”
    .. आणि आम्ही तयारी केली. मागे जाण्यासाठी आम्ही आमचे पंख पालवले.
श्रीगुरुदेवांनी आपले वरद-हस्त उंचावले. आमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव केला. त्यांना कित्ती कित्ती आनंद झाला. अज्ञ जीवांसाठी मोक्षाच्या महाद्वारातून परतण्याचा आमचा हा निश्चय त्यांना इतका आवडला! - त्यांची मुद्रा, निरभ्र आकाशातल्या माध्यान्हीच्या सूर्यासारखी, एकदम लकाकू लागली.
    ... आणि नंतर, आम्ही दुसरी आकाशवाणी ऐकली. त्या क्षणी अनेकांची आत्मगीते, मुरलीनाद त्या आवाजाला साथ देत आहेत, असा आम्हाला भास झाला. ती आकाशवाणी अशी होती -
    “येथे एक राजमार्ग आहे, एक मुक्तिमार्ग आहे.
    “त्याला ‘पुण्यपन्था’ किंवा ‘ब्रह्मण: पन्था:’ असे म्हणतात.
    “महेश्वराचे मानकरी, या मार्गावर मोक्षद्वारापासून पुन्हा परत येतात.
    “देवी अनन्ततेला वाहिलेली अभंग-गीते त्यांच्या हृदयांत उमलत असतात.”

------------------
ध्यान-बीज (१२)
न कामयेऽहं गतिमीश्वरात् पराम्।
अष्ट-ऋद्धि-युक्तां, अपुनर्भवं वा।।
आर्ति प्रपद्ये, अखिलदेहभाजाम्।
अन्त:स्थितो येन भवन्ति अदु:खा:।।
                    - रन्तिदेव, श्रीमद्भागवत, ९-२१-१२

भावार्थ:

   आठ प्रकारच्या ऋद्धि-सिद्धी, साक्षात् मोक्ष, किंवा ईश्वराहूनही श्रेष्ठतर अशी सत्ता, यांपैकी कशाचीही मला वासना नाही.
   सर्व देहधारी व्यक्तींची दु:खे व व्यथा मी एकट्याने भोगाव्यात व ते सर्व सुखी व्हावेत, ही माझ्या हृदयाची आंतरिक तळमळ आहे.
   त्यांच्या व्यथित हृदयांशी माझे हृदय, माझे जीवतत्त्व, एकरूप व्हावे, समरस व्हावे, ही माझी अंतिम आकांक्षा व प्रार्थना आहे.
   माझे हृदय, त्यांच्या व्यथित हृदयांशी एकरूप झाले, समरस झाले, तरच मी त्यांची सर्व दु:खे भोगू शकेन.
   त्यांची व्यथित, दु:खित हृदये, माझ्या ठिकाणी आल्यावर अर्थात् ते जीव संपूर्ण सुख, अखंड आनंद उपभोगू शकतील.

पुस्तकाचे चॅप्टर्स

संपूर्ण पुस्तक वाचण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा.

You may keep up to date with our updates by subscribing to RSS feed of this website. RSS Feed is available at www.maharshivinod.org/rss.xml

श्रीगुरुपादुकोदयस्तोत्रम्


आज मुहूर्तवूं या एक नित्योत्सव।
अद्वैत आमोदें, जेणे फुलेल हें विश्व।
क्षणोक्षण प्रभातेल नवोनव महापर्व।
प्रसादचिन्ह श्री-श्री-श्रीविद्येचें।।१।।

परा, परापरा, अपरा।
श्रीगुरूपुजा ही त्रिशिरा।
विमर्शा माऊलीची ही स्तनदुग्धधारा।
ओष्ठविण्याचा समय हा।।२।।

‘अपरा’ आराधनेंत भेद-ग्रह-स्थिती।
‘परापरा’ अवस्थेंत भेद-अग्रह-वृत्ती।
‘परा’ अवस्थानांत अभेद-स्फूर्ती।
श्रीगुरूपुजेची पादुका ही।।३।।

आदिभान हें परात्परगुरुबीज।
विमर्शशक्ती श्रीशिवा गुरूविद्येची गुह्यशेज।
जीवूजीवूचा पहिला परिव्राज।
गुरूपादुकेचें आलोचन ।।४।।

एक उफराटे अ-कुल ब्रह्मपद्म।
तेथ निष्कलेचे निजशक्तीधाम।
निर्झरले व्यापिनीचे श्यामव्योम।
अमृतमेघ वोसंडला।।५।।

चतुष्कोणी देवतात्म्यांचे उगमस्थान।
बिंदुस्थली अमृतसिद्धीचें अनुभावन।
यथाक्रम आंतर अनुभवांचें अनुस्थापन।
श्रीगुरूविद्येचा सहजाचार हा।।६।।

‘विमर्श’ म्हणजे आदिभानस्थित चित्शक्ती।
पादुकोदय म्हणजे शिवशिवेची साम्यरसस्थिती।
गुरूकृपयैव या भाग्यश्रीची समवाप्ती।
‘गुरूकृपा’ ये नामें जीवू जीवूचें निरवस्थान।।७।।

‘चार’ म्हणजे सोपचार आराधन।
‘राव’ म्हणजे विमर्शशक्तीचें उपयोजन।
‘चरू’ म्हणजे द्रव्यगुणांचे संयोगीकरण।
‘मुद्रा’ या नांवे प्रतीकाचा प्रत्यंगभाव।।८।।

चित्गगन-चंद्रिकेची फेसाळली जान्हवी।
श्रीगुरूकृपेची वेल्हाळली की पान्हवी।
प्रकटली वा नीलाब्जाची श्रीसुषमा अभिनवी।
श्रीपादुकोदय स्तोत्र हें ।।९।।

श्रीनवशुक्तिकांचा सम्यक् समुल्लेख।
येथ दशोपनिषद्रहस्याचे महावार्तिक।
आदिकृपेचा जणुं संतताभिषेक।
श्रीगुरूपादुकोदयस्तोत्रम्।।१०।।

।।इति श्री गुरूपादुकोदय स्तोत्रम्।।
------------------------------