You are hereअकरावे पाऊल / अकरावे पाऊल

अकरावे पाऊल


“हे श्रीसूर्यदेवा, हे चन्द्रा,
हे अनन्तयुगसाक्षी तारकांनो!
हे व्याध-तारके आणि देवगुरो बृहस्पते,
शुभास्ते पन्थान:! शुभास्ते पन्थान:!!

“आपण त्वरित पुढे चला,
माझ्या धमन्यांतले रक्त पेटले आहे.

“आत्मदेवा, दूर चला!
रुतलेला नांगर वर उपटून घ्या.
तुमचे शीडन् शीड हवेत फडफडू द्या!

“आपण येथे वृक्षांसारखे कितीतरी वेळ
स्थिर होऊन बसलो आहोत.
येथे आपण कितीतरी वेळ थिजून राहिलो आहो!
केवळ पशूप्रमाणे खाऊन आणि पिऊन आपण
असा किती काल कंठणार?

“जहाजे हाकारा, खोल खोल पाण्यात चला.
“आत्मदेवा, स्वच्छन्दाने, स्वैरतेने मी आणि तुम्ही संशोधन करू या.
आपण यापुढे हेच करू. आजपर्यंत एकाही नाविकाला धीर झाला नसेल. तेथे, त्या किनार्‍याला आपल्याला जावयाचे आहे.
“ही नौका आणि आपले सर्वस्व आज आपण पणाला लावू.
“धीरोदात्त आत्मदेवा! आपण आपली नौका दूर, सुदूर वल्हवू.
“हे आनन्दा, धीरतेत जन्मलेल्या आनन्दा,
येथे भीती कसली? आपण सुरक्षित आहोत.
हे सारे माझ्या सागर-स्वरूप देवबाप्पाचे साम्राज्य आहे.”
- ‘पॅसेज टु इंडिया’, ‘लीव्हज् ऑफ ग्रास’ वॉल्ट व्हिटमन्‌
---------------------------
“इंद्र-धनुष्याचे स्मरण ठेव”, मी स्वत:ला बजावले. तो देखावा नजरेआड झाला होता. बर्फाने आच्छादलेले प्रचंड पर्वत माझ्यासमोर उभे होते. विश्वाच्या सीमेवरची एक अजस्र भिंतच ती!
आमचा धवलगिरी! त्याच्या माथ्यावर आम्हाला जावयाचे होते. त्याचे शिखर नीलाकाशांत घुसलेले दिसत होते.
मी एक दीर्घ श्वास सोडला आणि माझ्या सहयात्रिकांकडे पाहिले. त्यांच्या डोळ्यांत अजून ते भव्य दृश्य रेंगाळत होते.
“ते सर्व खरे होते काय?”, मी कुजबुजले.
“होय, ते सर्व खरे होते.”
“पण”, दलदल-दोस्त म्हणाला, “पण, मी त्याच्यासारखा - कृष्णासारखा - ख्राइस्टसारखा होणे कधीही शक्य नाही.”
मी त्याला उत्तर दिले, “मला जर काही पटले असेल, तर हे की, आकाशवाणीचा शब्दन् शब्द अगदी खरा असतो; मला - आपल्याला ती गोष्ट कितीही अशक्य वाटो.
“ ‘कधीही’ या शब्दाचा अर्थ तुला माहीत आहे काय?”, माझी नजर दलदल-दोस्ताकडे फिरवून मी विचारले.
श्रीगुरुदेव म्हणाले, “तुम्हा सर्वांचे भवितव्य - भविष्यकालच्या मानवाचे देखील - इष्ट-ध्येय हेच आहे, श्रीकृष्ण-ख्रिस्तत्व! प्रत्येक मानव - कालचा व उद्याचा - शंकराकडे, धवलगिरीकडे, ख्रिस्तत्वाकडे व कृष्णत्वाकडे प्रवास करीत आहे.”
मी उलट विचारले, “पण ती अनंत-ता आपल्याला, आपणासारख्या सान्त, मर्यादित जीवांना कशी लाभेल?”
श्रीगुरुदेवांनी उत्तर दिले, “आपले जे मूळ स्वरूप असेल, ते आपल्याला मिळणारच. अनन्त जन्मांचे अनुभव घेऊन आपण सूक्ष्म शक्ती जागृत केलेल्या असतात. बाल्यातून आपण क्रमाने वृद्धावस्थेत येतो. हा नियम अटळ आहे. ईश्वराच्या सान्निध्याची सवय ठेवली की, पूर्णतेचे परिमाण आपणास गाठता येते. आपण कृष्णरूप होतो. आपल्या प्रेमाच्या कक्षेत सारे विश्व सामावून जाते. ‘अवघे विश्वचि माझे घर’ ही श्रीज्ञानेश्वरांची श्रुती यथार्थत: सिद्ध होते. खरोखर, ते प्रेम - त्या प्रेमाचा वर्षाव आपणांमधून ईश्वर करीत असतो. मात्र, आपण ते प्रेम स्वत:मध्ये, स्वत:पुरतेच अडवून धरू नये, एवढेच.”
“मला वाटते, मला आता थोडे समजू लागले आहे. रामप्रभू व ख्रिस्त हे दु:खी जीव होते. त्यांनी अनंत यातना भोगल्या, त्या याचसाठी का? मानवी अनुभवांमधून आपण गेले पाहिजे. नंतरच विकसित होणार्‍या दुसर्‍या जीवांना आपण आधार देऊ शकतो. प्रत्येक जिवन्त चैतन्यमय व्यक्तीमध्ये असलेल्या आत्मतत्त्वाचा विकास अव्याहत सुरू असतो. त्या विकासक्षम चैतन्यकेन्द्राला ज्ञानाचा, प्रेमाचा, सहानुभूतीचा आधार देत राहणे, हे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे.”
“अगदी बरोबर”, श्रीगुरुदेव म्हणाले, “आणि मी तुम्हाला आता नव्या युगाचा मन्त्र देणार आहे. ज्या युगात आपण राहत आहोत, ते युग देवाच्या नव्या अवताराचे आहे.”
“ओ हो!” आम्ही सर्वजण एकदम उद्गारलो. एवढ्यात आमच्या कानांवर पुनश्च ती आकाशवाणी आदळली:
“आकाशातल्या ढगांतून एका नव्या मानवाचा, देवाचा अवतार होईल. त्याची शक्ती दिव्य असेल, त्याचे वैभव भव्य असेल.”
“होय” गुरुदेव त्या वचनावर भाष्य करू लागले, “तो ढगावर बसून येईल आणि तो नेत्रानेत्राला दिसेल. मात्र कितीजण त्याला ओळखू शकतील, हा महत्त्वाचा प्रश्न आहे!”
“पण त्याला ओळखण्याचे साधन काय? खूणगाठ कोणती?”, मी विचारले.
“त्याला हृदयाने ओळखायचे असते! अन्तरांत नि:स्वार्थी अन् सर्वस्पर्शी प्रेम अवतरले की, त्या देवाला जाणणारे हृदय, त्याला पाहणारा नेत्र आपल्याला मिळतो. काही मानवांनी पूर्वी त्याला पाहिलेले आहे. पुन्हा त्याने अवतार घेतला की, आजचे व उद्याचे काही मानव त्याला ओळखतील.”
“तो देव लवकर अवतरावा, यासाठी आपण काय करावे? आपण तयारी कशी करावी?”, दलदल-दोस्ताने एक समुचित प्रश्न केला.
श्रीगुरुदेव म्हणाले, “एका मोठ्या संघात, समुदायात आज तुम्ही सामील झाला आहात. एका भव्य आवाजाने हा समुदाय कित्येक युगे घोषणा करीत आला आहे.
“महेश्वर येत आहे! त्याच्या स्वागताची सिद्धता करा!”
“पण लोकांना हे शब्द ऐकू येतील काय? त्यांच्या स्वार्थी, वैयक्तिक हालचालींच्या पलीकडे संचरणारा तो आवाज, त्या लोकांना ऐकू येईल का?”, मी विचारले.
श्रीगुरुदेव उत्तरले, “हा आवाज, हा शब्द बाहेरच्या कानांनी ऐकावयाचा नसतो. तो आत्मतत्त्वाचा आवाज आहे. आत्मतत्त्वाने देहावर पूर्ण विजय मिळविल्यानंतरचा तो आवाज आहे. तो नि:शब्द असतो. अन्त:श्रुती जागी असली की, तो नि:शब्द नाद ऐकू येतो.”
“आत्मतत्त्वाचे आनन्दगीतच ते”, मी पुटपुटले.
श्रीगुरुदेव म्हणाले, “अगदी बरोबर. पण तुझ्या आत्मतत्त्वाची हाक अत्यन्त स्पष्ट असली पाहिजे. जागी हो, वेळ जवळ आली! अतिसमीपम्, सावधान।
“तुझे आन्तरिक जीवन असेल, तसेच, त्याच जातीचे तुझ्या नादाचे स्वरूप, गुणवत्ता राहील. तू जशी असशील, तशीच तुझ्या आत्म-तत्त्वाची खणखण, तुझा नाद असणार.
“जीवाजीवामध्ये दैवी स्पर्श होत असतो. एका जीवाची जाती दुसर्‍या जीवाच्या जातीला जागी करते. दोन जीवांमध्ये एक नादातीत एकता असते. तुमचे साधन, तुमचा देह, तुमचे उपकरण अधिकाधिक पूर्णावस्थेला जात राहील. नंतर तुम्ही गाणारी गोपुरे होऊन जाल. तुमच्यामधून भगवन्ताचे गीत अखंडतेने स्रवू लागेल. या गीतानेच भगवन्ताच्या आगमनाच्या मार्गाची व स्वागताची सिद्धता होईल.
“हे एक दिव्य गीत ऐका:
“परमेश्वर प्रेममय, भक्तिमय आहे. मी त्याची भक्ती केली. या भक्तीमुळे इतर सर्व भगवद्भक्तांशीही मी साहजिकच एकरूप झाले.
“तसल्या भक्तिमान् व्यक्तींचे जीवन, भक्तिप्रेमांत व्यतीत होत असते. विशुद्ध भावाने ते देवाची सेवा करीत असतात. त्यांच्या जीवनाशी मी माझ्या जीवनाचे सूत्र ओवून दिले आहे.
“मी श्रीशंकराला, श्रीकृष्णाला, श्रीख्रिस्ताला, श्रीबुद्धाला, त्यांच्या भविष्यकालीन देवळांना व अनुयायांना माझे जीवनसर्वस्व निवेदन करीत आहे.
“माझा वर्तमान आणि भविष्यकाल त्यांच्या, अर्थात् श्रीगुरुदेवांच्या सम-चरण-सरोजावर मी अर्पण करीत आहे.
“अशा तर्‍हेचे जीवन कालप्रवाहात असूनदेखील तेच चिरंजीवपदाचा अनुभव देते. अशा प्रकारचे प्रेम हेच कृष्णामधले व ख्रिस्तामधले जीवन होय.
“अशा प्रकारची सेवा करणे, हेच कृष्णमय होणे, ख्रिस्तमय असणे!”
श्रीगुरुदेवांनी सांगितलेले दिव्य गीत येथे संपले. ते पुढे म्हणाले, “शम्बालाकडे जाण्याचा हाच प्रकाशमय मार्ग!”
“शम्बाला!”, मी पुटपुटले, “तेथे आपल्याला जावयाचे आहे काय?”
“होय. पण तुमची तयारी झाल्यानंतर”, श्रीगुरुदेवांचे उद्गार.
“कोठे आहे तो शम्बाला?”, माझा प्रश्न.
“पलीकडे. डोंगराच्या पलीकडे.”
“आपल्या या पर्वताच्या पलीकडे काही असू शकेल काय?”, माझी चिंता.
“होय. ‘पलीकडे’ हे नेहमी असणारच”, गुरुदेव.
“शम्बाला! ख्रिस्ताचा जन्म झाला त्या वेळी आले होते, ते तीन द्रष्टे, ज्ञाते - पूर्वेकडचे तीन महात्मे - ते शम्बालाहून आले होते काय?”
“होय”, श्रीगुरुदेव म्हणाले, “ते तिघे द्रष्टे त्याचे दूत होते. ते शम्बालाहून आले होते. शम्बाला म्हणजेच परमात्मा.”
“पण ‘त्याचे’ म्हणजे कोणाचे?”, आदराने व आश्चर्याने मी विचारले.
“त्याला ‘विश्वनाथ’ असेही म्हणतात. आमच्या या ग्रहगोलांचा तो स्वामी आहे. या पृथ्वीवर त्याची आध्यात्मिक सत्ता आहे. तो परमात्म-तत्त्वाचा एक प्रतिनिधी आहे. ज्या चैतन्य-तत्त्वामध्ये आम्ही राहतो, वावरतो, हालचाल करतो; ज्यामध्ये आमच्या अस्तित्वाची धारणा आहे, त्या तत्त्वाचा शंबाला, तो विश्वनाथ एक प्रतीक आहे, एक प्रतिनिधी आहे.”
“शम्बालाचे दर्शन आम्हाला घडेल काय?”, मी विचारले.
श्रीसद्गुरु म्हणाले, “होय. तुमच्या ठिकाणी पात्रता आली की, तुम्हालाही त्याचे दर्शन होईल. त्याच्यासमोर उभे रहावयाचे म्हणजे एक दिव्यच आहे. त्याच्या वैभवाने दृष्टी अगदी दिपून जाते.
“तुमच्या ठिकाणी देवाच्या भक्तांशी व विशुद्ध सेवकांशी प्रज्ञानपूर्वक सहकार्य करण्याचे सामर्थ्य आले पाहिजे.”
“पण ते सामर्थ्य येणार कसे?”, मी विचारले.
श्रीगुरुदेव उत्तरले, “सर्व मानवांसाठी शम्बालाची, विश्वनाथाची, श्रीमहेश्वराची एक विशाल योजना आहे. त्या योजनेची थोडी माहिती, थोडे ज्ञान तुम्हाला असले पाहिजे. हे ज्ञान झाले की, विशुद्ध हेतूने सेवा करणार्‍या कार्यकर्त्यांशी सहकार्य करण्याची प्रेरणा होते व सन्धी मिळते.”
“पण या योजनेचे स्थूल स्वरूप काय आहे?”, दलदल-दोस्ताने जिज्ञासापूर्वक विचारले.
“विकास-क्रमातील, उत्क्रांतीतील पुढचे पाऊल जितके जलद टाकता येईल तितके टाकणे”, श्रीगुरुदेव उत्तरले.
“मानवाने अतिमानव झाले पाहिजे. आध्यात्मिक विश्वात प्रवेश केला पाहिजे. थोडक्यात म्हणजे, जड मानवाचे देवात स्थित्यंतर झाले पाहिजे. खनिज, उद्भिज्ज, प्राणी - या सर्व सृष्टीचा विकास मानवाबरोबर होतो.”, श्रीगुरुदेव पुढे म्हणाले, “ध्यानात ठेवा. प्राणी, वनस्पती, खनिज पदार्थदेखील आपले ‘बन्धू’ आहेत. याचा अर्थ, एकाच आत्मसूत्राने, एकाच बंधनाने, आपण सर्व बांधलेले आहोत, म्हणून आपण बन्धू! सर्व बंधूंच्या विकासाचे दायित्व प्रत्येकाकडे आहे. आपल्या जीवनाची जी गुणवत्ता, दर्जा, श्रेणी असेल; तशाच तर्‍हेचे परिणाम, प्रतिक्रिया इतर सृष्टीवर होत असतात.” श्रीगुरुदेव क्षणभर थांबले.
“हे कसे काय होत असेल?”, मी विचारले.
श्रीगुरुदेव उत्तरले, “असे होणारच. त्यात नवल काय? सर्व जडचेतन व्यक्ती, ही एकाच जीवनाची, एकाच जीवनतत्त्वाची निदर्शने व प्रकटने आहेत. तुला ते वाक्य आठवते ना? ‘सारी सृष्टी या क्षणापर्यंत एकाच वेदनेने कण्हत आहे, एकाच दु:खाची यातना अनुभवीत आहे.’ विकास-वेदना! वेदनेशिवाय कधी नवजीवन, विकास होतो का? त्याच पद्धतीने सारी सृष्टी एकाच सुखाने, एकाच आनन्दाने हसू लागते. मानवाचा जेव्हा नवजन्म होतो, त्याच्याठायी बीजत्वाने असलेले देवत्व फूलून येते, तेव्हा सारी सृष्टी आनन्दाने हसू लागते. देव-तत्त्वाच्या या आगमनामुळे, मानवांतले देवत्व दु:खाच्या मेघांतून प्रकट झाल्यामुळे, सौंदर्य आणि सुगंध, तेज आणि चैतन्य यांनी सर्व सृष्टी जणू काही बहरून येते.” श्रीगुरुदेव स्तब्ध झाले.
“पावित्र्याचा सौरभ म्हणतात, तो याच अवस्थेत दरवळू लागतो का?”, माझी एक कल्पना!
श्रीगुरुदेव हसले. माझ्या कल्पनेचे त्यांनी स्वागत केले.
एक दूरध्वनी, आकाशवाणी पुन्हा ऐकू येऊ लागली. प्रत्यक्ष धवल-गिरी एक सामगीत गात आहे, असे मला वाटले.
“हे पृथ्विमातर्, देवाची एक भूपाळी म्हण;
हे द्युलोका, तू आनन्दित हो!
भू-लोकदेखील आनन्दित होत आहे.
समुद्रदेवा, तुमची गर्जना चालू द्या.
तुमचे हृदय, तुमचा आनन्द तुडुम्ब भरलेला असू द्या!
हे क्षेत्रांनो, तुम्ही आनन्दित व्हा.
तुमचे अणुरेणूदेखील आनन्दाने पुलकित होतील.
अरण्यांतील वृक्षराजींनो, तुम्हीही महेश्वरापुढे आनन्दाची लयलूट करा!”
आम्ही सर्वजण मंत्रमुग्ध झालो होतो. ह्या आनन्दमय आकाशवाणीने आम्हाला ‘झपूर्झा’ अवस्थेत नेले होते. वस्तुत: ही अवस्था निमिषमात्र टिकली होती. पण ती दीर्घ-प्रदीर्घ, सहस्र वर्षांची असावी, असे मला वाटले.
कालप्रवाहात असतानाच कालातीततेचा, चिरन्तनत्वाचा, सनातनत्वाचा अनुभव येतो म्हणतात, तो असाच असेल!
“काही मुमुक्षूंच्या जीवनांत असा एक क्षण येतो ... ”, श्रीगुरुदेव एकदम उद्गारले. आमची आनन्द समाधी त्यांच्या तीक्ष्ण आवाजाने भंग पावली.
“असा एक क्षण येतो की, त्या क्षणी तो मुमुक्षू बद्धांचा सेवक होऊ इच्छितो, बोधिसत्त्व होतो. तो विश्वसेवक होऊन राहतो.
“त्याला हा मार्ग आवडला, तर तो वैयक्तिक मोक्षाची पर्वा करीत नाही. वैयक्तिक मोक्ष त्याला सुतराम् शक्य असतो; पण त्याचा तो स्वीकार करीत नाही. अज्ञानात गुरफटलेल्या जीवांसाठी तो बोधिसत्त्व एक प्रतिज्ञा करतो. सेवा-व्रताचा तिलक लावून तो आनन्दाने मागे फिरतो. अज्ञ व अंध, बद्ध व पतित अशा बांधवांना साहाय्य-हस्त देण्यासाठी स्वत:च्या मोक्षावर लाथ मारून तो सेवाप्रवण होतो.
“जे आज निराश असतील, त्यांना उत्साह देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. ज्यांची हृदये भग्न झाली असतील, त्यांना आम्ही धीर देऊ. जे गुलाम असतील त्यांना स्वतंत्र करू. जे कारावासात असतील, त्यांना बन्धमुक्त करू.
“हीच ती बोधिसत्त्वाची प्रतिज्ञा. या प्रतिज्ञेचा अर्थ नीट समजावून घ्या. तुमच्यावरही ती वेळ येणार आहे. एकटे मुक्त होऊन जायचे की, अ-मुक्तांची सेवा करायची, यांतली निवड तुम्हालाही करावी लागेल.
“मी वैयक्तिक मोक्ष केव्हाही साधणार नाही.
“अन्तिम शान्ती मी एकटा केव्हाही अनुभवणार नाही.
“विश्वांतल्या, जातमात्राच्या मुक्तीसाठी, स्वातंत्र्यासाठी मी सदैव, सर्वत्र झगडेन. त्यासाठीच मी जगेन.”
श्रीगुरुदेव पुढे म्हणाले, “तुम्ही बोधिसत्त्वाच्या अवस्थेपर्यंत पोहोचल्यावर तुम्हाला अनेक मार्ग दिसतील. त्यातला कोणताही मार्ग तुम्हाला स्वेच्छेने निवडता येईल.”
निखार्‍याच्या अक्षरांनी प्रतिज्ञेतला शब्दन् शब्द माझ्या हृदय-पटावर कोरला गेला. बोधिसत्त्व-प्रतिज्ञेचा अर्थ माझ्या ध्यानात येताक्षणीच माझा निर्णय होऊन चुकला. मी प्रतिज्ञेच्या गंभीरतेने बोलले, “वैयक्तिक मोक्ष, स्वत:पुरती शान्ती कशी शक्य आहे? अनन्त जीव दु:खात असताना मुक्ती व शान्ती कोणाला लाभणार? बोधिसत्त्वाच्या प्रतिज्ञेत, शपथविधीत हाच अर्थ अभिप्रेत आहे. माझे सर्व काही... जशी मी आज आहे, पुढे होईन - ते सर्व श्रीशंकराला, ख्रिस्ताला, कृष्णाला निवेदीत आहे. त्याचे एक नवे देऊळ पृथ्वीवर तयार होत आहे. त्याच्यासाठी माझ्या अणुरेणूचा उपयोग व्हावा!
“हे दिव्य प्रेम स्वत:चा पूर्ण विसर पाडते. अखिल जीवनाचे केन्द्र श्रीशिव, श्रीकृष्ण, श्रीराम, श्रीख्रिस्त हेच झालेले असते. सेवेमुळे, ध्येय-चिंतनामुळे ख्रिस्तासारखे अन् कृष्णासारखे आपलेही जीवन निर्मल, पवित्र होते. नन्तर ‘शम्बाला’ या स्थानाकडे जाणार्‍या तेजोमार्गावरून आपण चालू लागतो. त्या मार्गावरून चालणार्‍या साधकांच्या अन्त:स्तेजामुळे तो मार्ग प्रकाशित होत राहतो; तो मार्ग पुन: पुन: तयारही होत असतो.”
माझ्या मनांत हे विचार येत होते. ते बरोबर आहेत की नाही, याचा अन्दाज घेण्यासाठी मी श्रीगुरुदेवांकडे दृष्टी टाकली. पण ते तेथे होतेच कुठे! ते केव्हाच अंतर्धान पावले होते. इथे उरला होता आम्हा यात्रिकांचा लहानसा समूह! सभोवार विस्तीर्ण बर्फाच्छादित प्रदेश, वरती अथांग आकाश आणि तो धवल-गिरी! जणू क्षितिजाजवळची एक भिंतच! विश्वाची ही सीमा तर नसेल? पण छे! श्रीगुरुदेव म्हणाले होते की,
“प्रत्येक सीमेच्या ‘पलीकडे’ पुनश्च प्रदेश असतो. त्या प्रदेशाला पुनश्च सीमा, त्या सीमेला पुन: एक ‘पलीकडे’! या पैल-कडांना, पैलतीरांना, या ‘पलीकडे’ ला केव्हाही अंत नसतो.”
माझ्या सहयात्रिकांकडे मी पाहिले. तेदेखील पुनश्च भानावर आले होते. त्यांनीदेखील एक प्रदीर्घ प्रवास केला होता. हा प्रवास ‘प्रज्ञाना’त होता, कालप्रवाहात होता, की काही वेगळाच होता? हा प्रवास माझा जसा होता, तसाच त्यांचाही असणार.
यानंतर मी स्वत:च शांततेचा भंग केला. “तुम्हाला कसे वाटते? खूप वेळ झाला. पुढच्या प्रवासाला निघावे, नाही का? धवल-गिरीचे शिखर आता आपणास चांगले दिसत आहे. एकदा ढग जमले, म्हणजे ते दिसेनासे होईल.”
“खरेच की!”, दलदल-दोस्त म्हणाला आणि एकदम उठलाच की तो! आळस झाडून निघालीसुद्धा स्वारी. “शिखर खूप दूर आहे खरे. पण मला कसं अगदी हलकं, हलकं वाटतंय! अंगात जोमही पुष्कळ आहे. जाड्य, मंदपणा बिलकूल नाही. मला मुळी वजनच नाही. एक उडी घेतली की, थेट तिथं पोहोचेन.” तो म्हणाला.
“अर्थात, पोहोचणारच. का नाही?” मी बोलले. मीही उभी राहिले होते. मनात विचार आला, इच्छाशक्तीने त्या विचाराला गती दिली... आणि काय नवल, मी एकदम उभी! उभी राहण्याचा प्रयत्न असा मी केलाच नाही. मी पुढे म्हटले, “आपल्या ठिकाणचे सर्व जडत्व त्या भगदाडाच्या पलीकडे आपण ठेवले आहे. शिवाय आता आपण उडू शकतो, आपले पंख पालवू शकतो.”
आम्ही सर्वजण उभे होतो. आमच्या प्रवासाचा हा शेवटचा टप्पा. इतक्यात शुभ्र राजहंसांचा एक थवा धवलगिरीच्या शिखराकडे उडत गेला.
माझ्या सहयात्रिकांना मी तो थवा दाखविला आणि म्हटले, “खरंच का ते राजहंस आहेत? कदाचित आपल्यासारखे यात्रिकही असतील. घरट्याकडे जाण्याची सहजप्रवृत्ती त्यांना धवल-गिरीकडे खेचीत असेल. आपणही तसेच नाही का खेचले जात आहोत?”
“तसेच असले पाहिजे.” दलदल-दोस्त उद्गारला. “ते पहा. सर्वच बाजूंनी राजहंसांचे थवे शिखराकडे जात आहेत. धवलगिरी हे सर्वांचेच उद्दिष्ट असावे, असे वाटते. जरा नीट पहा; ते आता अगदी जवळ गेले”, मी म्हटले.
धवलगिरीकडून प्रकाशाचा झोत आमच्याकडे येत होता. माझे डोळे दिपले. धवलगिरीच्या जवळ ते राजहंस गेले. एकाद्या अदृश्य सीमेवर ते धडक देत आहेत, असे मला वाटले. अगदी निकट गेल्यावर ते राजहंस अधिक पुढे न जाता गिरिशिखराला प्रदक्षिणा घालीत होते. त्यांच्या शुभ्र पंखांतून सूर्यकिरणांतील सप्तरंग पुन्हा दिसू लागले होते.
“जणू धवलगिरीच्या स्कंधावर विराजणारे इन्द्रधनुष्यच! घरट्याकडे परतलेल्या जीवांचे इन्द्रधनुष्य!”, एक सह-यात्रिक बोलला.
एवढ्यात माझे पाय बर्फावर ठरेनासे झाले. धवलगिरीच्या शिखरावर पोचण्याची इच्छा तीव्र झाली, अत्युत्कट झाली! एकाद्या चुंबकासारखे मला ते शिखर आकृष्ट करू लागले.
“तुम्हाला हे आकर्षण जाणवते का?”, मी माझ्या सह-यात्रिकांना विचारले.
“धवलगिरीकडे आम्हालाही ती दुर्दम्य शक्ती जोराने खेचीत आहे!”, सर्व सह-यात्रिक एकदम म्हणाले. “खरे ना”, मी उद्गारले, “मला तर आता क्षणभर देखील येथे थांबवत नाही.”
“पण आपण थांबायचे कशाला? निघू या आता”, दलदल-दोस्त बोलू लागला,
“पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूतांशी आपण एवढा काल झगडलो, ते केवळ धवल-गिरी गाठण्यासाठी.”
दलदल-दोस्ताचे हे भाषण ऐकून मी म्हटले, “अजून आपल्याला बरोबर कल्पना आली नाही; पण, प्रवासाच्या या शेवटच्या टप्प्यात, आपल्याला एक गूढ रहस्य उलगडणार आहे. ज्याला आपण ईथर-आकाश म्हणतो ना, त्या तत्त्वाचे पुरेपूर ज्ञान, आपणास या टप्प्यात होईल.
“ ‘ईथर’ म्हणजे हवा असेल, की हे काही निराळेच तत्त्व आहे?”, मी प्रश्न केला.
दलदल-दोस्त उत्तरला, “येथे आहे तरी कोण? कोणीच नाही. आपल्या शंकेचे समाधान आपणच केले पाहिजे आणि तेही स्वानुभवाने. ज्ञान-प्राप्तीचा तो एकच मार्ग आहे. काहीही समजावून घ्यावयाचे तर ते फक्त स्वानुभवाने घेता येते.
“शिखराभोवती ते राजहंस प्रदक्षिणा करीत आहेत ना, तेथपर्यंत आपण निश्चित जाऊ शकू. कोठे उतरावे, कोठे टेकावे, काय करावे याची त्यांना अडचण भासत आहे. पण वेळ आल्यावर आपणास सर्व काही समजेल.”
“आता आपल्याला झेप घ्यावयाची आहे. गिरिशिखरावर आरूढ होण्याची आपली अन्त:करणातील इच्छा तीव्रतम, अत्यंत उत्कट झाली पाहिजे. धवलगिरीचीही, आपणास तेथे खेचण्याची, एक प्रकारची इच्छा, आग्रहणशक्ती या क्षणी प्रकट झाली पाहिजे.”
“घ्यायची उडी?”, दलदल-दोस्त अधीरतेने उद्गारला.
“होय, होय.” आम्ही सर्वजण ओरडलो.
“आपले हात कसे ठेवायचे? पाण्यात ठेवले होते तसे का?”, मी विचारले.
दलदल-दोस्त म्हणाला, “या मूल-तत्त्वामधून जाण्यास तशा तर्‍हेने हात वापरण्याची जरूरी वाटत नाही; शिवाय, आता आपल्याला अनुभवही पुष्कळ आला आहे. परस्परांत सामरस्य, एकतानता, एकता चांगली निर्माण झाली आहे. मला तर निश्चित वाटते की, आपली एकात्मता फार छान साधली आहे. आपण कितीतरी दिव्यांतून बरोबरच पार पडलो, नाही का?”
नंतर आम्ही एकमेकांजवळ उभे राहिलो. घोड्याचा नाल असतो ना, तशा आकारात उभे राहिलो.
आम्हा सर्वांची अन्त:करणे, लक्ष धवलगिरीच्या शिखराकडे होते. सर्वांचे एकैव लक्ष्य, एकमात्र हेतु, एकच एक ध्येय - ते धवलगिरीचे शिखर!
“तयार आहा तुम्ही?”, दलदल-दोस्ताने विचारले.
“तय्यार!” आम्हा सर्वांचा एकच उद्गार!
आणि काय चमत्कार! जराही अडचण नाही, थोडाही त्रास नाही. आमच्या ध्यानांतदेखील पुरेसे आले नाही ... आम्ही गिरिशिखराकडे उडू लागलो. प्रकाशकिरणावरून जणू काय आमचा प्रवास सुरू झाला.
“का आम्ही सर्व मिळून केवळ एक किरण होऊन गेलो आहोत?”, मी स्वत:ला विचारले.
“प्रकाश ही काय वस्तू आहे? तिचे खरेखुरे ज्ञान कोणाला आहे?”, माझा दुसरा प्रश्न.
मला आश्चर्य वाटू लागले. ‘पण मी प्रकाशाचा परमाणु नव्हे. मला ज्ञानवत्ता आहे, प्रकाशाला ती नसते; का असते? कुणास ठाऊक! ज्ञानवत्ता म्हणजे काय, हे तरी कोणाला कळले आहे? कदाचित् मानवी व्यक्ती ही प्रथम एक प्रकाशबिन्दू, प्रकाशरेणु असेलही. त्याच्या ठायी ज्ञानवत्ता विकसित झाली असेल. ज्ञानवान् चेतनेचा एक बिन्दु, एक परिमाण म्हणजे मानव. आपण सर्व ज्ञानवत्तेच्या महासागरात तरंगत आहोत. आपली चेतना, गति आणि धारणा त्या ज्ञानवत्तेच्या, चैतन्याच्या महासागरात अन्तर्भूत आहेत.’
‘या कल्पनासुद्धा माझ्या मनांतून प्रकाशाच्या वेगाने चमकून गेल्या’, हाही विचार माझ्या मनात येऊन गेला. मी समोर हिमशैलाकडे पाहिले. अजून ते कितीतरी दूर होते. आमच्या अध:स्थली पसरलेल्या हिमविस्ताराकडेही माझे लक्ष गेले. एक गोष्ट माझ्या लक्षात आली; आमची गती किती भयंकर, कल्पनातीत वेगाने वाढत होती!
‘आपणास ध्वनी ऐकू येतो, त्याला एका विशिष्ट परिस्थितीची आवश्यकता असते. अवकाश व कर्णरंध्र यांच्याशिवाय ध्वनी ऐकू येत नाही. ध्वनीला वाहक अशा हवेचीही आवश्यकता असतेच.
‘ही विशिष्ट परिस्थिती सर्वत्र थोडीच असते! जेथे हवा नसेल किंवा अत्यंत विरल असेल, तेथे ध्वनी उद्भवत नाही, व अर्थातच ऐकूही येत नाही. या रेषेलाच शास्त्रज्ञ ‘ध्वनीसीमा’ असे म्हणतात.
‘आम्ही ध्वनी-सीमा केव्हाच ओलांडली असणार.’ आमचे तिकडे लक्षही नव्हते.
“पण या आकाशतत्त्वात किंवा ईथरमध्ये ध्वनी मुळी नसावाच. ध्वनी-सीमेप्रमाणे एखादी प्रकाश-सीमा असेल काय? किंवा ज्ञानवत्तेची देखील सीमा असेल काय?
“ ... मला वाटतं हीच ती जागा! इथेच आपल्याला त्या सर्व गोष्टींचा उलगडा होईल.”
आता आम्ही त्या राजहंसांच्या निकट येऊन पोहोचलो होतो. गिरिशिखराभोवती त्यांच्या प्रदक्षिणा सुरू होत्या.
‘ही अखेरची, सर्व-सीमा असल्यामुळे हे राजहंस स्थिर होऊ शकत नाहीत, असे तर नसेल?’ मी स्वत:ला प्रश्न केला.
... आणि त्या क्षणी मला एक भयंकर धक्का बसला. माझ्या प्रश्नाचे उत्तर स्पष्टच होते. आम्ही सर्व यात्रिक या धक्क्याने हादरलो होतो. एखादी दगडी भिंत आमच्यावर कोसळावी तसे झाले; आम्हाला वाटले, आम्ही छिन्नभिन्न झालो! ...
तो एक विलक्षण अननुभूत सुवर्ण-प्रकाश होता! सुदैवाने आम्ही विच्छिन्न झालो नव्हतो; कारण, आमच्या संघातील प्रत्येक व्यक्तीचे आन्तर-बाह्य जीवन सु-संकलित होते. आमचा संघदेखील सु-संघटित होता. त्याला एक नवे व्यक्तित्व आले होते.
आमच्या प्रदक्षिणा नागमोडी आकाराच्या, मळसूत्री आकाराच्या, Spiral सारख्या होत्या. एकामागून एक वर्तुळे उमटत. पण ती एकाहून दुसरे लहान, दुसर्‍याहून तिसरे लहान अशी असत. आम्ही परस्परांच्या अधिकाधिक जवळ येत होतो ....
आणि नन्तर एका अद्भुत आनन्दाची लहर प्रत्येकाला वेष्टून गेली आणि एक अद्भुत गीत आमच्या कंठांतून बाहेर पडले.
ते राजहंसही एक संघगीत गात होते. त्याच भगवद्गीतात आमचे गीत विलीन होत होते.
माझ्या मनात विचार आला की, ‘हे असेच असले पाहिजे. जेव्हा प्रभात-तार्‍यांनी गीते गाइली असतील आणि सर्व देवदूतांनी, यक्षकिन्नरांनी आनन्दोद्गार काढले असतील, तो क्षण अगदी असाच असला पाहिजे. देवाच्या अवताराचा तो दिव्य क्षण.’
येथपर्यंत आल्यानन्तर आमच्या प्रदक्षिणांचा वेग साहजिकच कमी झाला. गिरिशिखरावर आम्हाला नीट दिसू लागले. स्वत:च्या डोळ्यांवर माझा विश्वास बसेना!
शिखराच्या माथ्यावर बर्फ पडलेले नव्हते. तेथे एक लहानसे जल-कुंड होते. त्याच्याभोवती हिरव्यागार मखमलीचा एक विस्तीर्ण गालिचा दिसत होता. तेथून निघणार्‍या सुगंधाने सारा आसमन्त दरवळून राहिला होता. किती मधुर! सृष्टीच्या आरंभापासून उमललेल्या सर्व गुलाब-पुष्पांचा अर्कच जणू!
हा सुगंध इतका मादक होता की, मला मूर्च्छाच आली. क्षणभर मला कसलेही भान राहिले नाही. नन्तर माझा पाय कसल्यातरी कठीण वस्तूवर टेकल्याचा मला भास झाला. मीच नव्हे, तर आम्ही सर्वजण एका भूमीवर स्थिर झालो होतो. आम्ही नऊजण तर तिथे होतोच; पण इतर सारेही स्थिर झाले होते.
मला वाटते, त्या खोल जल-कुंडाच्या काठाभोवती एकन्दर बारा संघ, बारा समूह, व्यवस्थित आणि नीटनेटके बसले होते.
आता आम्ही तिथल्या मऊमऊ, सुखदस्पर्श, मुलायम तृणस्थलीवर उभे होतो. त्या अलौकिक भूमीतून प्रकाशणार्‍या हिरव्या रंगाला आता आमची दृष्टी सरावली होती. तेजाने चमकणार्‍या इवलाल्या परिजातासारख्या फुलांनी ती हरितभूमी नटली होती!
त्या तृणपुष्पांकडे पाहून मी आश्चर्यमुग्ध झाले. ‘एवढ्या उंचीवर येथे तृणबीज उगवले तरी कसे? आणि त्यावर ही फुले फुलली कशी?’, मी स्वत:ला विचारले.
‘पण असेही असेल कदाचित्’, मी पुढे विचार केला, ‘हे एखाद्या प्राचीन निद्रित ज्वालामुखीचे शिखर, मुख असेल आणि जमिनीच्या अन्तर्भागातील उष्णतेने येथे या तृणबीजांना ऊब मिळाली असेल.’
“पण तो अद्भुत सुगंध कोठून येत आहे? येथे गुलाब तर एकही दिसत नाही.” दलदल-दोस्त उद्गारला.
हरित वर्तुळाच्या मध्यभागी कुंडावर आम्हाला एक मेघाकृती हलताना दिसली. ती लाटेसारखी खाली-वर होई. एका गूढ तेजाने ती आकृती चमकत होती. या मेघामधून तो सुगंध येत असावा असे आम्हाला वाटले. आम्ही थोडे निरखून पाहिले. अगदी वेगळाच प्रकार आमच्या दृष्टोत्पत्तीस आला.
ती मेघासारखी आकृती सभोवतालच्या वातावरणात विरली. तेथे महात्म्यांचे एक मंडल दिसले. मध्यभागी एक अत्यंत तेजस्वी पुरुषोत्तम उभा होता. त्याचे हात आशीर्वाद देण्यासाठी उंचावलेले होते. त्याच्या पदकमलांजवळून धवलनिर्मल जलाचा निर्झर फेसाळत होता. हिरकण्या फेकणारे कारंजेच जणू!
केन्द्रस्थानी असलेल्या महात्म्यांच्या मंडलाकडून येणार्‍या प्रकाशाने आमचे डोळे दिपून गेले. आम्हाला त्या महात्म्यांच्या मुद्रा नीट दिसत नव्हत्या. पण हळूहळू आमची नजर स्थिरावली.
मध्यभागी असलेल्या श्रीगुरुव्यासांना आम्ही ओळखले. त्या मंडलांतील इतर महात्मेदेखील नन्तर स्पष्ट दिसू लागले.
ते देव होते, मानवही होते.
एवढ्यात आकाशवाणी झाली: “हे मानव, पण पूर्णतेला पोचलेले मानव, म्हणजेच देव आहेत.”
या श्रेष्ठतम पुरुषांनी तेजाचे वस्त्र परिधान केले होते. त्या सर्वांचे मिळून एक तेजोमंडल निर्माण झाले होते. केन्द्रवर्ती श्रीगुरुदेवांच्या भोवतालचे इन्द्रधनुष्य त्या महात्म्यांच्या दीप्तीने अधिकच तेजाळले होते.
श्रीगुरुदेवांचे इन्द्रधनू, जणू काय सर्व विश्वाला उजाळा देत होते. हे दृश्य पाहून माझ्या मनात आले, ‘शिवशंकर आणि त्यांचे गण, भगवान बुद्ध आणि त्यांचा संघ, जीझस आणि त्याचे चर्च, महंमद आणि त्याचे शिष्य, श्रीकृष्ण आणि त्याचे भक्त ... कोण बरे असावेत हे?
‘हे महान् धर्मवेत्ते वस्तुत: एकरूपच आहेत. श्रीगुरुदेवांच्या म्हणजे परमात्म तत्त्वांच्या त्या विभूती आहेत. त्यांच्या विविध व्यक्तिमत्वांत श्रीगुरुदेवांनीच अवतार घेतला होता. श्रीगुरुदेवांचे हे सर्व अवतार निराळे असतील, देह निराळे असतील; पण त्यांच्या ठायींचे ‘गुरुत्व’, ‘श्रेष्ठत्व’, ‘परमात्म-तत्त्व’ एकच आहे. श्रीगुरुतत्त्वाचा, आत्म-तत्त्वाचा हा विस्तार आहे. हे व्यास-दर्शन आहे.’
आम्ही दूर अन्तरावर होतो; तरी श्रीगुरुदेव, त्यांची मूर्ती, त्यांचे हास्य आमच्या नजरेत भरले. सर्वांनी आपले कर जुळविले आणि हृदयाशी नेले. आमचे डोळे आपोआप मिटले. आमचे अंतश्चक्षू व्यासदर्शने घेऊ लागले.
आम्ही मन्त्र म्हणू लागलो. या मन्त्रांचा शब्दोच्चार उंच स्वरात निनादू लागला. त्याने द्यावापृथिवी व्यापली. त्याने सप्त-स्वर्ग, सप्तभुवने व सप्त-पाताल व्यापले.
“आज व्यास-पौर्णिमा आहे.
“माझ्या विस्ताराची, विकासाची आज पूर्णावस्था, प्रफुल्लावस्था आहे.
“श्रीशंकराला, श्रीकृष्णाला, श्रीख्रिस्ताला, श्रीव्यासांना, त्यांच्या भविष्यत्कालीन देवळांना व अनुयायांना, माझे जीवन-सर्वस्व मी निवेदन करीत आहे.
“माझा वर्तमान आणि भविष्यत्काल, त्यांच्या अर्थात् श्रीगुरुदेवांच्या - श्रीव्यासांच्या सम-चरण-सरोजी मी समर्पण करीत आहे!
“अ उ म् .... !”
----------------------------
ध्यान-बीज (११)
वन्दे महापुरुष ते चरणारविन्दम्
- शुकाचार्य, भागवत
भावार्थ:
हे महापुरुषा, निर्गुण परमात्म्याची तू साक्षात्, सजीव व सगुण मूर्ती आहेस. तुझ्या चरणकमलाचे वन्दन करण्यात मला माझ्या मानवी जीवनाचे साफल्य वाटते. कारण निर्गुण ब्रह्म तुझ्यात साकारले आहे. तू, देवाची कल्पना किंवा जड मूर्ती नसून, प्रत्यक्ष देव आहेस, ईश्वर आहेस.

पुस्तकाचे चॅप्टर्स

संपूर्ण पुस्तक वाचण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा.

You may keep up to date with our updates by subscribing to RSS feed of this website. RSS Feed is available at www.maharshivinod.org/rss.xml

श्रीगुरुपादुकोदयस्तोत्रम्


आज मुहूर्तवूं या एक नित्योत्सव।
अद्वैत आमोदें, जेणे फुलेल हें विश्व।
क्षणोक्षण प्रभातेल नवोनव महापर्व।
प्रसादचिन्ह श्री-श्री-श्रीविद्येचें।।१।।

परा, परापरा, अपरा।
श्रीगुरूपुजा ही त्रिशिरा।
विमर्शा माऊलीची ही स्तनदुग्धधारा।
ओष्ठविण्याचा समय हा।।२।।

‘अपरा’ आराधनेंत भेद-ग्रह-स्थिती।
‘परापरा’ अवस्थेंत भेद-अग्रह-वृत्ती।
‘परा’ अवस्थानांत अभेद-स्फूर्ती।
श्रीगुरूपुजेची पादुका ही।।३।।

आदिभान हें परात्परगुरुबीज।
विमर्शशक्ती श्रीशिवा गुरूविद्येची गुह्यशेज।
जीवूजीवूचा पहिला परिव्राज।
गुरूपादुकेचें आलोचन ।।४।।

एक उफराटे अ-कुल ब्रह्मपद्म।
तेथ निष्कलेचे निजशक्तीधाम।
निर्झरले व्यापिनीचे श्यामव्योम।
अमृतमेघ वोसंडला।।५।।

चतुष्कोणी देवतात्म्यांचे उगमस्थान।
बिंदुस्थली अमृतसिद्धीचें अनुभावन।
यथाक्रम आंतर अनुभवांचें अनुस्थापन।
श्रीगुरूविद्येचा सहजाचार हा।।६।।

‘विमर्श’ म्हणजे आदिभानस्थित चित्शक्ती।
पादुकोदय म्हणजे शिवशिवेची साम्यरसस्थिती।
गुरूकृपयैव या भाग्यश्रीची समवाप्ती।
‘गुरूकृपा’ ये नामें जीवू जीवूचें निरवस्थान।।७।।

‘चार’ म्हणजे सोपचार आराधन।
‘राव’ म्हणजे विमर्शशक्तीचें उपयोजन।
‘चरू’ म्हणजे द्रव्यगुणांचे संयोगीकरण।
‘मुद्रा’ या नांवे प्रतीकाचा प्रत्यंगभाव।।८।।

चित्गगन-चंद्रिकेची फेसाळली जान्हवी।
श्रीगुरूकृपेची वेल्हाळली की पान्हवी।
प्रकटली वा नीलाब्जाची श्रीसुषमा अभिनवी।
श्रीपादुकोदय स्तोत्र हें ।।९।।

श्रीनवशुक्तिकांचा सम्यक् समुल्लेख।
येथ दशोपनिषद्रहस्याचे महावार्तिक।
आदिकृपेचा जणुं संतताभिषेक।
श्रीगुरूपादुकोदयस्तोत्रम्।।१०।।

।।इति श्री गुरूपादुकोदय स्तोत्रम्।।
------------------------------