You are hereदहावे पाऊल / दहावे पाऊल
दहावे पाऊल
“सातव्या अमृतत्त्वाचे शेवटचे स्पन्दन अनन्ततेतून पुलकित होत पुढे गेले.
“ते स्पंदन वेगात पुढे गेले. सर्व विश्वाला त्याच्या धावत्या पंखाने स्पर्श केला. त्याच पंखाने, अन्ध:कारात लपलेल्या बीजाला स्पर्श केला. तो अन्ध:कार जीवनाच्या सुषुप्त जल-लहरींवर आपले श्वास सांडीत होता.
“अंध:कारातून प्रकाश प्रकटतो. तो प्रकाश आपला एक, एकमात्र किरण जलसमूहांत विसर्जित करतो, मातृ-तत्त्वाच्या खोल गर्भागारात निक्षिप्त करतो. तो प्रकाश-किरण मूल अंडकामधून जातो आणि तो त्या चिरन्तन अंडकाला पुलकित करतो. तोच किरण, अंडकामध्ये प्राणबीजाचा निक्षेप करतो. हे प्राणबीज थिजल्यावर त्याचे ब्रह्मांड होते.”
- दि सीक्रेट डॉक्ट्रिन, एच्. पी. ब्लॅव्हॅट्स्की, अड्यार आवृत्ती, भाग १ ला, पान ९२
-----------------------
माझे आत्मचिंतन सुरू झाले.
‘मोठे भाग्यच म्हणावयाचे! इथे सोसाट्याचा वारा नाही, आणि थंडीही कमी आहे. नाहीतर आपण गोठून जाऊन या बर्फाच्या कड्यांप्रमाणे येथल्या येथेच स्थिर झालो असतो. पण कदाचित् कुठल्यातरी अदृश्य भिंती आपले संरक्षण करीत असतील.
‘या क्षणी, आपल्याभोवती धवलिमेचे तट उभे आहेत, असा भास होतो. अंड्याभोवती जसे शुभ्र कवच असते व ते आतल्या लहानग्या पिलाचे रक्षण करते, तसे हे शुभ्र तट आपले रक्षण करीत आहेत.’
एवढ्यात एकाएकी, मेघगर्जनेचा प्रचंड गडगडाट झाला व विद्युल्लतेची दृष्टीला दिपविणारी दीप्ती चमकून गेली. ते शुभ्र कवच आणि तो धवल तट यांचे तुकडे तुकडे झाले. ते तुकडेही वादळांत कोठल्या कोठे गडप झाले.
ईश्वरकृपेने वादळाचा आम्हाला काही त्रास झाला नाही. माझे डोळे आकस्मिक चमकलेल्या त्या विद्युत्प्रकाशाने दिपून गेले होते. त्यामुळे, मला सभोवतालचे दृश्य पाहता आले नाही. मात्र एक जाड काळी रेषा समोरच्या शुभ्र पर्वतावरून आडवी गेलेली दिसली. मी एकदम मोठ्याने ओरडले, “आपण थांबलो नसतो, तर काय झाले असते पहा. समोर बर्फाला ही एक मोठी भेग पडलेली दिसते. आपण एका हिम-नदीवर उभे आहोत. न पाहता जर आपण पुढे गेलो असतो, तर पृथ्वीच्या उदरातच गडप झालो असतो.”
क्षणभर स्तब्ध राहून दलदल-दोस्त आम्हाला म्हणाला, “होय. पण ते भगदाड पाहून घाबरून जाण्याचे कारण नाही. जरा दूर पहा. ईशान्य दिशेला, निळ्या आकाशात एक उंचच उंच डोंगर दिसत आहे.”
आम्ही सर्वजण त्याच्याकडे पाहत एकदम ओरडलो, “धवलगिरी! आपल्या पर्वताचे शिखर!”
मी विरोध दर्शविला. मी म्हटले, “तो तर तरंगत आहे, असे वाटते. अनंत शिखरांवरून पोहणारा, तरंगणारा जणू एक विशाल मेघच! त्याच्या भोवताली अन् क्षितिजाभोवती, कितीतरी दुसरी शिखरे आहेत. आकाशाच्या निळाईला ती शिखरे छेदीत आहेत, कापीत आहेत असा भास होतो.
तो पर्वत आहे, हे निश्चित ना?”, आम्ही विचारले.
दलदल-दोस्त उत्तरला, “पर्वतच आहे तो. नीट पहा. सूर्यप्रकाशामुळे तिथले बर्फ किती चकाकत आहे!” मी म्हणाले, “होय. दिसला! मला तर तो एकाद्या आरक्त ध्वजासारखा दिसत आहे.”
आदराने व आश्चर्याने आम्ही स्तब्ध झालो. असीम आकाश आणि अथांग हिमराशी! अनन्ततेची साक्षात् देवता तेथे अवतरली होती. मंजु-मधुर स्वर-लहरी ऐकू येत होत्या. त्यामुळे सभोवतालची शान्तता मात्र नष्ट झाली नाही. उलट अधिकच गंभीर झाली. मी विचार करीत होते, कशामुळे हा नाद होत असावा?
“अ ऊ म् --” असा काहीसा तो नाद होता. जणू काय आकाशांतून आलेली कोणाची हाकच! मी वर पाहिले. पांढर्या शुभ्र राजहंसांचा एक थवा अवकाशातून जात होता. त्यांचे लांबट कंठ मोठे मनोहर दिसत होते. दलदल-दोस्त म्हणाला, “हे राजहंस दिसतात ना, ते सरळ धवलगिरीकडे झेपावत आहेत.” ते दृष्टीआड होईपर्यंत आमची नजर त्यांच्यावर खिळली होती.
धवलगिरीकडे उड्डाण करताना त्यांच्या गतीत अनिश्चय नव्हता. त्यांच्या गतीतील एकाग्रता आमच्या मनावर ठसा उमटवून गेली.
“हे राजहंस तिकडेच जात आहेत. त्यांनी जर आम्हाला त्यांच्या पंखांवरून नेले असते, तर किती छान झाले असते! आता तेवढाच मार्ग मला शक्य दिसतो. आता समोरचे भगदाड ओलांडणार तरी कसे? आणि आमच्या हिरण्य-पुरुषाचे काय झाले? मला सोडून तर गेली नाही स्वारी? त्या खोल खोल चिमणीतला प्रवास सुरू झाल्यापासून त्याची काही खबर नाही. कुठे दिसतही नाही. त्याचे गीतही ऐकू येत नाही. असे झाले तरी काय?”
तेवढ्यात मुरली-गीताच्या लहरी माझ्या कानांवर आदळल्या. “तुला पाहायला आणि ऐकायला वेळ तरी कुठे होता? तू आपली तुझ्याच कार्यात मग्न होतीस?”, त्याचे शब्द माझ्या कानांवर आले.
मी आश्चर्याने विचारले, “पण तू होतास तरी कुठे? आता तुझा आवाज ऐकू येत आहे, तरी तू मात्र मला दिसत नाहीस. पण तुझी सुवर्ण-दीप्ती माझ्याभोवती पसरली आहे. तुझे मुरली-गीतच या सुवर्ण-दीप्तीमध्ये साकार झाले असावे! खरे ना हे?”
“अगदी तंतोतंत खरे! तुझ्या-माझ्यात असणारा भेदभाव तू ओलांडला आहेस. आता निश्चितपणे तुझ्या लक्षात येईल की, ‘तू’ हे माझे साधन आहेस किंवा ‘तू’ - माझे नव्हे - स्वत:चेच साधन, उपकरण आहेस. मी तुझे आत्मतत्त्व ना? ‘तू’ एक मुरली आहेस. तुझे गीत तू स्वत:च वाजवीत आहेस. तूच एक दीप आहेस. आणि म्हणून तुझ्या गीताची एक सुवर्ण-ज्वाला झाली आहे. तू एक मुरली आणि तुझा श्वास म्हणजे एक सुरेल गीत होय!”
त्या दुसर्या आकाशवाणीचा प्रतिध्वनी माझ्या कानांवर आला:
“तू सर्व विश्वाचा प्रकाश आहेस.”
माझ्या अंत:श्रुतीला हे शब्द गोड लागले. काही क्षण या रहस्याबद्दल विचार करण्यात गेले. नंतर मी म्हटले, “आता मला थोडी उकल होत चालली आहे. पण त्या भगदाडाचे काय? आपल्याला त्यावरून जावे लागणार ना? त्याच्या अलीकडे किंवा पलीकडे एखादे वळण नाही का? एखादा पूल? छे! मला वाटते, नसणारच! पण माझा शब्द आणि माझा प्रकाश, पलीकडच्या बाजूस, सहज पोहोचू शकेल. प्रकाश आणि नाद हवेतून जाऊ शकतात. पण माझे हे शरीर, हे वाद्य, साधन, उपकरण, हा देह पलीकडे कसा न्यावयाचा? ते भगदाड बरेच रुंद आहे. त्यावरून उडी मारणे शक्य दिसत नाही, पण पाहूया एकदा ते किती रुंद आहे ते!”
नंतर आम्ही सर्वजण बर्फावरून पुढे गेलो. “अगदी अशक्य. हे भगदाड ओलांडणे खरोखरच अशक्य!”, आम्ही मोठ्या खेदाने उद्गारलो. भगदाड कसले? एक भले मोठे खिंडारच होते ते. चांगले शेकडो यार्ड रुंद. सहस्त्र फूट खोल! खालून एक नदी वाहत होती. तिच्या धावत्या पाण्याची भेसूर गर्जना वर ऐकू येत होती.
“ही या जन्माची अनुभव-सरिता आहे!”, एकजण बोलला, “आणि आपणास ती येथेच ओलांडावयाची आहे”, तो पुढे म्हणाला.
“आपण ही भेग मागेच का ओलांडली नाही? तेथे कदाचित् उतार सोपा झाला असता, नाही का?”, मी विरोध दर्शवीत बोलले.
“पण ते अशक्य होते. तुला आठवते ना? पाऊलवाट फक्त या बाजूला होती. अगोदर नदी ओलांडली असती, तर त्या काठावर गेलो असतो; परंतु, पुढे वाट कोठे होती?”, दलदल-दोस्त उद्गारला.
“तू म्हणतोस ते खरे असले पाहिजे”, मी कबुली दिली, “पण हे भगदाड ओलांडण्याचा मार्ग येथून तरी मला दिसत नाही. पण क्षणभर थांब ना!”, मी म्हटले, “गरुडासारखे पंख पालवीत वर चढणे, या उक्तीचा अर्थ काय बरे?”
सर्वजण एका सुरात उत्तरले, “होय होय. आम्ही सर्वांनी ती उक्ती ऐकली आहे. ‘ईश्वरावर श्रद्धा ठेवून जे काही वेळ थांबतात; त्यांना पुनश्च शक्ती लाभते. ते गरुडासारखे पंख पालवीत वर जातात’; हे विधान आम्ही ऐकले होते. आम्ही वाट पाहिली आणि म्हणून आता या खिंडारात तरी पडलो नाही, बचावलो.”
मी विचारले, “का हो, हे अक्षरश: खरे असेल का?” माझ्या अंधश्रद्धेबद्दल मला थोडी लाजही वाटली. “आपण दुसर्या काठाला खरोखरच उडून जाऊ काय? गरुडासारखे?”
दलदल-दोस्त पुढे म्हणाला, “मला तर दुसरा कोणताही मार्ग दिसत नाही. शिवाय मागे जायचे म्हटले, तर आपण मागेही जाऊ शकत नाही, कारण मागे जावयास पुन: दोर पाहिजे. बरे, येथे अधिक वेळ राहणेही शक्य नाही. आपण गारठून, गोठून जाऊ. आपण आता उड्डाण केले पाहिजे. माझी अशी कल्पना आहे की, हवेत उडणे हा पोहण्याचाच एक प्रकार आहे. हवा हे मूलतत्त्व, महाभूत वेगळे आहे, हे खरे. पण पाण्याऐवजी हवा, इतकेच. दोहोतही पोहता येणे शक्य आहे.”
आम्ही सर्व आश्चर्याने स्तब्ध झालो होतो. दलदल-दोस्त पुढे म्हणाला, “पुन्हा श्रद्धा हवी. अंतस्थ, कूटस्थ, आत्मतत्त्वावर म्हणजेच परमेश्वरावर आपण श्रद्धा ठेवू या. आपण त्याचीच वाट पाहू. त्याची वाट पाहणे, म्हणजे त्याच्या कृपेची वाट पाहणे. श्रुती आपल्याला काय सांगते, की, परमेश्वर पुनश्च आपल्याला शक्ती देतो. जलतत्त्वावर आपण विश्वास ठेवला, तसा वायुतत्त्वावर ठेवला पाहिजे. त्याशिवाय अन्य मार्ग दिसत नाही.”
दलदल-दोस्ताचे एवढे भाषण झाल्यावर मी म्हटले, “पण पंखांबद्दल काय? श्रुतीमध्ये आपणास ‘पंख मिळतील’ असे अभिवचन आहे. पण ते आहेत कोठे? आपल्याला पंख फुटले आहेत, हे मला तरी खरे वाटत नाही.”
“होय. माझ्या लक्षात आहे. श्रद्धा ही अदृष्ट वस्तूंच्या अस्तित्वाचे प्रमाण आहे. पण ती श्रद्धा आपल्याजवळ नाही. मला वाटते, आपण स्वत:ला एकदम हवेत भिरकावले, तर प्राणसंकटांत पडल्यासारखे होईल. आपण काय करावे, याबद्दलची सूचना ईश्वराकडून आपल्याला मिळाली असती तर गोष्ट निराळी होती”, दलदल-दोस्त म्हणाला.
आणि इतक्यात मुरलीचे सुस्पष्ट गीत कानांवर पडले. त्या गीतातील शब्द आम्हाला ऐकू आले:
“ज्याला आदि नाही आणि अंत नाही अशा तत्त्वाच्या पंखाखाली मधु-मधुर शांती, विश्रांती मिळते. ते तत्त्व ‘प्रणव’ म्हणजे ‘ॐ’कार होय. आणि हे तत्त्व चिरंतन आहे!”
‘ही श्रुति किती सुंदर आहे!’ माझ्या मनात विचार आला. पण तिचा अर्थ मला समजला नाही.
“पहा, पहा; तुम्हा सर्वांच्या डोक्यावर एक सोनेरी, हिरण्मय ज्योती आहे. ती ज्योती दुभंगत आहे आणि त्या दोन भागांचे दोन पंख बनून तुमच्या स्कंधांवर विराजत आहेत”, मी विस्मयाने उद्गारले.
माझे सह-यात्रिक मला उलट म्हणाले, “तुलाही तसेच पंख फुटले आहेत. तुझे तुला ते दिसत नाहीत.”
“कसले पंख? कोठून आले ते?”, मी विचारले.
एवढ्यात काय चमत्कार! श्रीगुरुदेव तेथे अचानक अवतरले आणि म्हणाले, “ते आत्मतत्त्वाने दिलेले पंख आहेत. आत्मतत्त्व सनातन आहे; सर्वशक्तीमान् आहे. त्याला जन्म नाही व मृत्यू नाही. या पंखांवर श्रद्धा ठेवा. देह आणि आत्मा यांमधला भेद पूर्ण विलयाला जाऊ द्या. तुम्ही शुद्ध आत्म-तत्त्व आहात; ही वृत्ती, ही स्थिती, ही धृ्ती निश्चित झाल्यावर, नंतर पहिले उड्डाण करा. अवकाशामध्ये उंच उंच गेल्यावर हवेच्या विरलतेमुळे नाद उत्पन्न होत नाही. या प्रकाराला शास्त्रीय भाषेत ‘नादसीमा ओलांडणे’ असे म्हणतात. आपण ही सीमा ओलांडली पाहिजे. सीमोल्लंघन झाले पाहिजे. स्वत:ची सीमा, ममत्वाच्या मर्यादा, मागे टाकून अनंत-तेत विलीन झाले पाहिजे. पूर्णत्वातून वेगळीक अनुभवण्यासाठी अहंकाराची भिंत तुम्ही उभारलेली असते. ती उखडून उद्ध्वस्त करून टाका. ‘तत्त्वमसि।’ या सत्याचा साक्षात्कार होऊ द्या. ब्रह्मतत्त्व म्हणजे तूच!” श्रीगुरुदेवांचे शब्द येथे विराम पावले.
“गुरुदेव, पण हे सर्व करावयाचे कसे”, माझा प्रश्न.
श्रीगुरुदेव गंभीरपणे बोलले, “तुम्ही ‘स्व’ला, स्वत:ला फेकून दिले पाहिजे. ‘अहम्’ हरपेल तेव्हाच आत्म्याची प्राप्ती होईल.
“ते भगदाड ओलांडण्यासाठी तुम्ही ‘स्व’ला भिरकावून दिले पाहिजे. परिणाम काहीही होवो. तसे पाहिले, तर त्या मोठ्या भगदाडाच्या दोन्ही बाजूंकडून सेतूचे बांधकाम झालेले आहे. फक्त मधोमध कमान उभारण्याचे काम राहून गेले आहे. मध्यशिला कुठेतरी हरवली आहे. तुम्ही अहंकार टाकलात की, त्या अहंकाराचीच मध्यशिला घडविण्यात येईल. फेकून द्या तो अहंकार! अहंकाराचा त्याग झाल्यावर इंद्रधनुष्यासारख्या त्या सेतूला मधली कमान, मध्यस्थल, मध्यशिला मिळेल.” श्रीगुरुदेवांचे गूढ गंभीर भाषण थांबले.
पुनश्च ती आकाशवाणी ऐकू आली.
“जो ध्येयाला किंवा देवाला आपले जीवन समर्पण करील, त्यालाच चिरजीवन मिळेल!”
श्री गुरुदेव पुढे बोलू लागले, “ही आकाशवाणी अगदी खरी आहे. तसे तुम्ही एकदा केलेत, म्हणजे तुमचे चित्त पुढे केव्हाही द्विधा होणार नाही. तुमच्या सर्व अंत:शक्ती एकवटतील. तुमच्या दोन पंखांमध्ये असलेल्या स्थिरकेंद्रामध्ये तुमच्या सर्व शक्ती एकवटतील, तेथे तुम्ही स्थिर राहाल. नंतर तुमचे गीत, तुमचा प्रकाश पलीकडच्या तीराला जाईल, आणि त्याचे पाठोपाठ तुम्हीही निर्धास्तपणे पलीकडे पोहोचाल.”
हे गुरुदेवांचे भाषण मी ऐकले अन् माझी शंका मी विचारली, “माझ्या कर्मपशूचे काय करायचे? स्वारी आता अगदी लहानशा छायेसारखी झाली आहे. ती मला मागे तर खेचणार नाही ना?”
श्रीगुरुदेव म्हणाले, “छे, छे, तसे होणार नाही. तो मध्यशिलेचा भाग आहे. मध्यशिला म्हणजे तुझा अहंकार. कर्म हे अहंकाराला चिकटलेले असते. ‘अहम्’ला तू एकदा भिरकावलेस की, ते कर्मश्वान त्यांच्याबरोबर आपोआप भिरकावले जाईल. अहंकारजन्य कर्माशय म्हणजे कर्मश्वान. अहंकारामुळे घडणारे कर्म विद्रूप व बंधनकारक असते.
“इंद्रधनूच्या मध्य-बिंदूमध्ये तुझ्या परित्यक्त ‘स्व’चे रूपांतर होईल. नंतर इंद्रधनुष्याच्या सेतूवरून तुझे गीत आणि तुझा प्रकाश सहज जा-ये करील.”
श्रीगुरुदेवांच्या उत्तराने आता माझे समाधान झाले. केवळ यासाठी येथपर्यंत ते कर्मश्वान माझ्याजवळ होते तर!
“पण गुरुदेव, ‘स्व’ला भिरकावून द्यावयाचे म्हणजे करावयाचे तरी काय?”
गुरुदेव करूण-गंभीर आवाजात म्हणाले, “तो एक आध्यात्मिक प्रयोग आहे. त्याला विशुद्ध प्रेमाची प्रेरणा लागते. आध्यात्मिक इच्छाशक्तीचा तो एक विनियोग आहे. येथे ‘प्रेम’ या शब्दाचा अर्थ ‘आकर्षण’. इष्ट वस्तूबद्दल, ध्येयाबद्दल तुम्हाला जे आकर्षण वाटते, तेच प्रेम! त्या ओढीमुळे, आकर्षणामुळे तुम्ही वाटेल तो ‘स्व-अर्थ-त्याग’ करू शकता. त्या प्रेमासाठी, त्या ओढीमुळे तुम्ही अहंकाराला भिरकावून देऊ शकाल.”
श्रीगुरुदेवांचे हे विवेचन झाले व मी पुटपुटले,
“त्या राजहंसांची आपल्या घरट्याकडे जाण्याची जशी ‘सहज’ प्रवृत्ती आहे, तसेच हे आकर्षण, ही ओढ, हे प्रेम आमचाही सहजस्वभाव आहे, खरे ना?”
श्रीगुरुदेव आपल्या गंभीर आवाजात बोलू लागले, “अगदी बरोबर! एखादा कुशल धनुर्धारी आपले धनुष्य वाकवितो, आपल्या ‘लक्ष्या’कडे एकाग्रतेने पाहतो, अगदी तादात्म्य पावतो; आपला बाण त्या लक्ष्याशी सरळ रेषेत आणतो; आणि नंतर एकदम बाण सोडून देतो; लक्ष्य-वस्तूच्या मध्यभागी मध्य-केंद्रात तो बाण सहज जाऊन भिडतो. अध्यात्म-शास्त्रातही धनुर्विद्येतली तन्मयता, एकाग्रता आत्मसात् करावी लागते.
“या तन्मयतेच्या महान् क्षणासाठी मागील सर्व पूर्वानुभवांची तयारी आवश्यक आहे. हा क्षण एकाग्रतेचा, सर्वस्व-समर्पणाचा आहे. पुढे जाण्याची तुझी तयारी आहे ना? यात तुला खराखुरा आनंद वाटतो ना? या संधीबद्दल कृतज्ञता वाटते ना? जे जे घडले आणि जे घडणार आहे, त्याकडे तू जीवन-साफल्याच्या भावनेने पाहतेस ना?” हे प्रश्न करताना श्रीगुरुदेव आमच्याकडे मोठ्या वात्सल्याने पाहत होते.
आम्ही सर्व सह-यात्रिक या विलक्षण समाधीतून जागे झालो. आम्हा सर्वांचे डोळे मोठ्या आनंदाने, तल्लीनतेने एकमेकांना भेटले. आमची अंत:करणेही क्षणभर आम्ही न्याहाळली. आणि सर्वांनी शांतपणे एकच उद्गार काढला,
“होय. आम्ही सर्व तयार आहोत.”
“काय करावयाचे ते तुमच्या ध्यानात आले ना? सर्व सूचना लक्षात आहेत?”, श्रीगुरुदेवांनी विचारले.
“होय. सर्व सूचना ध्यानात आहेत”, आम्ही उत्तरलो. नंतर आम्ही त्या खचलेल्या भू-भागाकडे, विशाल भगदाडाजवळ गेलो आणि सर्वजण एका रांगेत उभे राहिलो.
श्रीगुरुदेव म्हणाले, “हा क्षण सर्वस्व-निवेदनाचा, सर्व-समर्पणाचा आहे. चिंता, भीती, सर्व काही सोडून द्या. दक्षतेने श्रवण करा. घंटेचा गंभीर नाद तुमच्या कानी आला की, तयारी पूर्ण झाली असे समजा. त्या घंटानादाचा अर्थ असा की, तुमचा आत्मयज्ञ पूर्ण झाला. पूर्णाहुति पडली! अहंकार, ‘मी’पणा हा तुमच्यातून निखळून गेला व त्याची एक मध्यशिला झाली. सेतूला आवश्यक ती कमान तयार झाली. घंटानाद झाला की, पहिले पाऊल टाकण्याची वेळ झाली. एक खोल श्वास घ्या; पाऊल उचला, पुन्हा खोल श्वास घ्या, आणि उडी टाका.
“लक्षात ठेवा. तुमचे आत्मतत्त्व सर्वज्ञ आहे. त्याच्याकडून कधीही प्रमाद घडणार नाही. दिशेचे, कालाचे, परिस्थितीचे संपूर्ण ज्ञान त्याला आहे. ‘श्रद्धत्स्व।’ विश्वास ठेवा.”
नंतर आम्ही सर्वस्व-समर्पणासाठी सिद्ध झालो. त्या दिव्यासाठी, भव्य हेतूसाठी आम्ही धनुर्धार्याप्रमाणे परमावधीची एकाग्रता केली. नंतर मंत्रोच्चार केला,
“मृत्योर्मा अमृतं गमय।”
एवढ्यात घंटानाद ऐकू आला. पिङ्ग् ङ्ग् ङ्ग् झाले. आम्ही अवकाशांत तरंगू लागलो. खोल खोल, खाली वाहणार्या नदीच्या गर्जनेला विश्रांती नव्हती. मला तर क्षणभर वाटले की, माझा वेग, माझी शक्ती संपली; मी वेगाने खाली पडू लागणार; पण, तेवढ्यात दोन पंखांतल्या मध्यस्थानावर मला स्थिरता आली; नेट मिळाला, व मी पुढे झेपावू लागले.
‘त्या राजहंसांच्या थव्यासारखे आम्हीदेखील आता उडू लागलो’, पैलतीरी आम्ही सर्वजण सुखरूप पोहोचल्यानंतर माझ्या मनात विचार आला.
श्रीगुरुदेवांचे शब्द आमच्या कानी पडू लागले - “अनंत दिक् कालांतून अवतरलेला राजहंस! या राजहंसालाच काही पूर्वश्रुतींनी ‘गरुत्मन्’ किंवा गरुड अशी पारिभाषिक संज्ञा दिलेली आहे. ‘गरुत्मन्’ हे आत्मतत्त्वाचे प्राचीनतम वैदिक प्रतीक आहे.”
मी मध्येच बोलू लागले, “त्या आत्मत्त्वाच्या पंखांतले मध्यस्थान, हा स्थिर-बिंदू आहे. पंख हलतात, पण हे मध्यस्थान अचल, स्थिर असते”, मी पुटपुटले व पुढे बोलू लागले, “काय आश्चर्य आहे! आपण या पैलतीरावर आलो आहोत, पण माझ्यात बदल असा काहीच दिसत नाही. माझी प्राणशक्ती जशी पूर्वी होती तशीच आता आहे.”
श्रीगुरुदेव म्हणाले, “साहजिक आहे. बदल होणार कसा? ही विस्मृतीची नदी आहे. ज्यांचे आत्मज्ञान किंवा प्रज्ञान अभंग, अविच्छेद्य राहिले आहे, त्यांना कधीच विस्मृती जाणवत नाही.”
मी एकदम बोलू लागले, “तसे असणारच. कारण आमची सर्व ज्ञानेंद्रिये या क्षणी यथापूर्व कार्यक्षम आहेत.”
मी माझ्या सर्व सह-यात्रिकांकडे क्रमाक्रमाने पाहिले. आम्ही जी भयानक दरी ओलांडली, त्या विस्मयजनक अनुभवाचे पुन: स्मरण झाले. मी पुन: बोलले, “पण दुसर्या बाजूला हे काळे ढीग कसले? काहीतरी चिंध्यांच्या बोचक्यांसारखे दिसते आहे. पूर्वी तेथे शुभ्र, धवल असे काहीतरी होते. निदान तेथे काळे ढीग पूर्वी दिसत नव्हते.”
श्रीगुरुदेवांना नुसती गंमत वाटत होती. आम्ही मात्र अगदी गोंधळून गेलो होतो. आणि अकस्मात् हिरण्य-पुरुषाचा शब्द माझ्या अंत:करणांत उमटला, “नाही का तू ओळखलेस? ते तुमचे जड देह आहेत.”
मी विचारले, “मघाशी आम्ही जी उडी घेतली ती आमच्या देहांच्या बाहेर घेतलेली उडी होती का?”
“तेच तर मी सांगतो आहे”, हिरण्यपुरुष बोलला.
मी विरोध दर्शवीत बोलले, “पण हे देह म्हणजे आमची उपकरणे ना? ती आम्ही येथपर्यंत आणावयास हवी होती. त्या साधनांशिवाय यापुढे चालणार कसे?”
“तसे नव्हे”, हिरण्य-पुरुष बोलला, “ते देह म्हणजे प्रतिक्रिया करण्याची साधने होत. आणि त्यांचा उपयोगदेखील परिस्थितीसापेक्ष असतो. तुम्हीच पहा ना, आतादेखील तुमच्या उपकरणांची क्रियाशक्ती तुमच्याजवळ आहे.”
“तसेच असले पाहिजे”, मी म्हटले, “कारण मला दिसत आहे, ऐकू येत आहे, इतकेच नव्हे, तर मला भावनाही आहेत”, मी कबुली दिली; मी स्वत:ला चिमटादेखील घेतला. माझ्या शेजारीच दलदल-दोस्त उभा होता त्याला माझ्या हाताने स्पर्श करून पाहिला. माझ्याप्रमाणे तोही विस्मयचकित झाला; आणि इतर सर्वजणसुद्धा!
श्रीगुरुदेवांनी नि:स्तब्ध हवेत तरंगत असलेली लुकलुकणार्या तारांची वलये दाखविली. ही वलये पलीकडच्या तीरावर असलेल्या काळसर पदार्थांची व आमची गाठ घालीत होती. आमचा जुना संबंध पुनश्च निर्माण करीत होती.
श्रीगुरुदेव पुढे म्हणाले, “आले का लक्षात? ते तुमचे देह तुम्ही कायमचे टाकले नाहीत, निदान अजून तरी नाहीत.”
मी गुरुदेवांना विचारले, “पुढील प्रवासात असताना आमच्या देहाशी असलेला आमचा पूर्वसंबंध तसाच कायम राहतो काय? कोळी जशी जाळी विणतात, तशा या तारा विणीत विणीत आम्ही पुढचा प्रवास करीत असतो काय?”
“अगदी कोळ्याप्रमाणेच तुमची स्थिती असते”, श्रीगुरुदेवांचे उत्तर.
ही विलक्षण कल्पना आत्मसात् करण्यास मला पुष्कळ वेळ लागला. पण, मी प्रत्यक्ष पाहत होते. ते लकाकणारे तंतू, त्या भगदाडाच्या वर तरंगत होते. त्यांचा इंद्रधनुष्यासारखा एक सेतू तयार झाला होता. ही वस्तुस्थिती मी नाकारणार तरी कशी?
“काहीही असो”, मी स्वत:शीच म्हटले, “मी जशी पूर्वी होते, तशीच आताही आहे. एक मोठा फरक मात्र झाला आहे. आता मला हे कळून चुकले की, माझ्या आत्म्याला पंख आहेत, आणि मी कुठेही उडून जाऊ शकते. पंख असल्यामुळे पोकळी, अवकाश यांचे आम्हाला भय उरले नाही. मृत्यूचीही भेसूरता आता नष्ट झाली आहे.”
आकाशवाणीचे शब्द पुनश्च ऐकू आले.
“ईश्वराच्या प्रेमापासून, ईश्वराच्या संरक्षणातून आम्हास कुणीही दूर लोटू शकत नाही. आमचा स्वामी श्रीकृष्ण आहे. कृष्णामध्ये, ख्रिस्तामध्ये परमेश्वराचे प्रेम साकारले आहे. जीवन किंवा मृत्यू, वर्तमानकाळ अथवा भविष्यकाळ, उंची किंवा खोली, जगतीतलावरची कोठलीही शक्ती आम्हाला ईश्वराच्या प्रेमापासून दूर करू शकत नाही.”
“अस्से”, मी मोठ्याने बोलले, “सेन्ट पॉलच्या मनात हाच आशय होता का, की जीवन आणि मृत्यु, स्थल आणि काल आपल्या मर्यादित विचारशक्तीचे ‘फलित’ आहे. सत्य एकच आहे व ते म्हणजे परमेश्वराचे प्रेम.”
श्रीगुरुदेव म्हणाले, “अगदी बरोबर. श्रीकृष्णाने हेच सिद्ध केले. ईश्वराला आपण ‘प्रेमनाथ’ म्हणून संबोधतो ना?”
“गुह्यांत गुह्यतम अशा रहस्याची उकल, आता या क्षणी होत चालली आहे”, मी पुटपुटले.
श्रीगुरुदेव म्हणाले, “होय. हाच तो क्षण, हेच ते स्थान. हा मोक्षाचा दिव्य क्षण आहे. माझ्याभोवती तुम्ही वर्तुळाकार बसा. आपण सर्वजण याचा विचार करू.”
“या बर्फावर आम्ही कसे बसू? आणि गोठून गेलो तर?”, मी एकदम उद्गारले.
मी हा प्रश्न केला आणि माझ्या मनात आले, किती वेडेपणाचा हा माझा प्रश्न! आमच्याभोवती सर्वत्र बर्फच बर्फ होते, ही गोष्ट खरी. जिकडे तिकडे आम्हाला बर्फच दिसत होते. पण ते थंड नव्हते! निदान मला तरी थंडी मुळीच वाजत नव्हती. माझ्या सह-यात्रिकांनाही बहुतेक वाजत नसावी. मला वाटले, ‘थंड’ आणि ‘उष्ण’ या संवेदना, पूर्वीच्या परिस्थितीत सार्थ होत्या. येथे या कक्षेत, शीतोष्ण भेदाला अवसर नव्हता.
आम्ही सर्वजण श्रीगुरुदेवांच्या सभोवती मंडलाकार बसलो. त्यांची प्रकाशमय कफनी अधिकाधिक तेजाने लकाकत होती. मी थोडे लक्ष देऊन पाहिले; माझ्या ध्यानात आले की, आम्हा सर्वांच्या देहांतून तेजोवलये निघत होती, ती तेवढी प्रखर नव्हती. पण श्रीगुरुदेवांच्या तेजोमय कफनीला ती अधिकच तेजोमय करीत होती.
हे प्रकाशाचे झोत एकमेकांत मिसळत व त्यामुळे परस्परांच्या रंगांची प्रखरता अधिकाधिक तीव्र होई. शब्दातीत सौंदर्याच्या नवोनव, गतिमान आकृती क्षणाक्षणाला निर्माण होत होत्या. हे सर्वच दृश्य मनाला वेड लावणारे होते. शुभ्र बर्फाचा अफाट विस्तार आणि विविध रंगांचे त्यावर चाललेले खेळ! मला असा काही ‘अ-निर्वचनीय’ आनंद होत होता की ... पण तो ‘अ-निर्वचनीय’ आहे!
नंतर श्रीगुरुदेव बोलू लागले. त्यांचा आवाज संपन्न, स्पष्ट आणि प्रेमळ होता! आमच्या अंतरंगांत तो आवाज पेट घेई.
“ज्याला आपण गूढ रहस्य म्हणतो, ते गूढ रहस्य म्हणजे ‘प्रेम’ होय. जीवनाचे रहस्यही प्रेमच आहे. जीवन म्हणजे तरी काय आहे? परमेश्वरी प्रेमाचा एक आविर्भाव आहे, प्रकटन आहे. हे प्रेम शाश्वत आहे, चिरंतन आहे. जीवनाच्या अनंत आविष्कारांमधून परमेश्वरी प्रेम प्रकट होत आहे, नव्हे का?
“पूर्वी, प्राचीन काळी गूढविद्येच्या गुहा असत. तेथे मिळणार्या शिकवणीचे आंतर रहस्य प्रेमच असे. प्रेम हे जीवनाच्या निरनिराळ्या अंगांतून अभिव्यक्त होत असते, प्रकट होत असते. जीवनाचा विकास म्हणजे प्रेमशक्तीचा विकास! या विकासामुळे जीवनाला नवचैतन्य, पुनश्चैतन्य मिळत राहते.
“आपण ज्याला मृत्यु म्हणतो, ते जीवनाचेच एक स्वरूप आहे. महान गूढ तत्त्वे समजण्यापूर्वी, साधकाला अंत:शुचित्व येण्यासाठी अनेक यम-नियमांतून जावे लागते.
“शुद्धीसाठी, सुवर्ण जसे अग्नीत टाकतात, तसे साधकाच्या जीवाला यम-नियमांच्या अग्निदिव्यांतून जावे लागते. नंतर, पराविद्येच्या महाविद्यालयात त्याला प्रवेश मिळतो. तेथे स्वत: प्रत्यक्ष अनुभव घेताना त्या साधकाला जीवन, मृत्यू आणि पुनर्जनन यांचे वस्तुपाठ घ्यावे लागतात. एकमात्र महाजीवनाचे हे तीन आविर्भाव आहेत. जन्म, मृत्यू आणि पुनर्जन्म!”
महाजीवनाचा अर्थ आता मला समजू लागला होता. इतक्यात आकाशवाणीचा घन-गंभीर ध्वनी ऐकू आला:
“देव प्रेममय आहे.”
श्रीगुरुदेव पुढे म्हणाले, “दोन हजार वर्षांपूर्वी प्रेममय परमेश्वराने मानवांचे उद्धारासाठी एक अवतार-नाट्य, एक भव्य जीवन-प्रयोग करावयाचे ठरविले. मानवी अनुभव ही त्या नाट्याची रंगभूमी. ही नाट्यवस्तू अत्यंत वैचित्र्यपूर्ण आणि विलक्षण धारदार होती. नाट्यवस्तूचे सूक्ष्म ध्वन्यर्थ अत्यंत निश्चित व सुस्पष्ट होते. ते कोणाच्याही सहज लक्षात यावेत. मात्र त्याला निरीक्षक नेत्र हवा व श्रवणोत्सुक कर्ण हवेत; त्याबरोबरच लहान बालकाचे निरागस, सहज सरळ अंत:करण पाहिजे.”
श्रीगुरुदेवांनी आपले भाषण क्षणभर थांबविले आणि आम्ही सर्वांनी एकदम म्हटले, “आले लक्षात. भगवान जीझस्, त्यांचे जीवन, त्यांनी सोसलेल्या यातना, त्यांचे सुळावर जाणे; त्यांचा मृत्यू आणि पुनश्च देहधारणा हीच ती नाट्य-वस्तू ना?”
श्रीगुरुदेव म्हणाले, “युगायुगांचे ठायी भगवंताचे अवतार होत असतात. साधुत्वाचे संरक्षण, दुष्टत्वाचे निर्दालन आणि धर्म-संस्थापना या तीन हेतूंसाठी, किंवा त्रिविध अशा या एकाच हेतूसाठी, भगवंताचे असंख्य अवतार होतात.
“भगवान् श्रीकृष्णांनी हे अवतार-रहस्य गीतेत सांगितले आहे.
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्।
धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे।।
“हे अवतार जगातील सर्व देशांत पूर्वी झाले आहेत; आजही होत असून सदैव होत राहतील.
अवतार-तत्त्वाची कल्पना विकास-क्रमाला व उत्क्रांति-योजनेला बीजभूत अशी आहे. भारतातील भगवंताचे दहा अवतार प्रसिद्ध आहेत. मत्स्य, कच्छ, वराह, कूर्म, नरसिंह, वामन, परशुराम, राम, श्रीकृष्ण आणि बुद्ध. भारतीय तत्त्वज्ञानात या दहा अवतारांखेरीज दुसर्या अनेकानेक अवतारांचा निर्देश आहे.”
श्रीगुरुदेव पुढे म्हणाले, “जीझस्, महंमद, झरतुष्ट्र, बुद्ध, महावीर आणि नानक, हे सर्व एकाच परमात्म्याचे अवतार व आविष्कार होत.
“प्रभु रामचंद्र व भगवान् श्रीकृष्ण यांच्या जन्मकथा आजदेखील भारतात सर्व-प्रसिद्ध आहेत. प्रभु रामचंद्रांची माता कौसल्या व श्रीकृष्णाची माता देवकी यांना जे अलौकिक अनुभव आले, अगदी तसेच अनुभव, प्रत्येक अवतारी विभूतीच्या जन्मकाली, त्यांच्या मातांना आलेले आहेत.
“जन्मकालची प्रत्यक्ष परिस्थिती, सर्व अवतारांचे बाबतीत साधारणपणे सारखीच खडतर, कष्टमय व दैन्यपूर्ण आहे. श्रीकृष्णाचा जन्म कारागृहात झाला. बुद्धाचा जन्म ‘लुम्बिनी’ नामक वनात झाला. येशू ख्रिस्ताचा जन्म चंद्रमौळी गोठ्यात झाला.
“राम-जन्म, कृष्ण-जन्म यांची नाट्यपूर्ण कथा तुम्हाला माहीतच आहे. आता येशू ख्रिस्ताच्या जन्मकथेबद्दल आपण थोडा विचार करू. जीझसच्या जन्मकाली घडलेल्या घटना तुम्हाला ठाऊक आहेत का?”
मी झटकन् उत्तर दिले, “होय. जीझस् जन्मल्याबरोबर देवदूतांचे संगीत सर्वांना ऐकू आले. सारे मेंढपाळ कसे धावत आले! एक वृषभ, एक गर्दभ हेदेखील आले. सर्वांनी नुकत्याच जन्मलेल्या जीझसला मानवंदना दिली. पूर्वेकडचे तीन धर्मवेत्ते, महाज्ञानी अचानकपणे जीझसजवळ उपस्थित झाले.”
श्रीगुरुदेव म्हणाले, “ठीक! जीझसने स्वेच्छया आत्म-बलिदान केले. ‘प्रेम हाच परमेश्वर आहे’, या सत्याचे चिरंतन व ज्वलंत असे हे प्रतीक आहे, प्रकटन आहे. कारण प्रेम हे परमेश्वराचे व्यक्त स्वरूप आहे.
“प्रेममय परमेश्वराचे जीझस एक उत्कृष्ट प्रतीक आहे. ईश्वर हे प्रेमाचे अधिष्ठातृ दैवत आहे. प्रेम ही जी एक महनीय शक्ती आहे, तिचा उगम, आविष्कार, तिचा प्रयोजक व विनियोजक परमेश्वर आहे.” हे स्पष्टीकरण करताना श्रीगुरुदेव अधिक गंभीर, अधिक अन्तर्मुख झाले होते.
श्रीगुरुदेवांचे विवेचन येथेच थांबले. एवढ्यात आमच्यातील एक सुस्पष्ट, मधुर आवाजाचा यात्रिक मेरी मातेबद्दल बोलू लागला.
“मेरीला किती आश्चर्य वाटले असेल! आपण जन्म दिलेल्या मुलाचे केवढे हे भाग्य! तिला तर भयच वाटले असेल. देवदूतांची आकाशगीते, धावत आलेले ते मेंढपाळ, तो वृषभ आणि गर्दभ, त्यांनी केलेले अभिवादन आणि ते तीन पौर्वात्य तत्त्वज्ञ!”
श्रीगुरुदेवांचे विवेचन पुढे सुरू झाले, “माता मेरी विस्मित झाली, हे खरे; पण ती भ्याली नाही. माता मेरी ही स्वभावाने अत्यंत विनीत होती. तिला अहम्, स्व अशी काही भावना उरलीच नव्हती. मनाने ती अत्यंत शुद्ध होती. अशा जीवाला भीती शिवत नाही. एका देवदूताने तिला दर्शन दिले होते.
“ ‘तुझ्या उदरी परमात्मा अवतरणार’, अशी घोषणाही त्याने केली होती.
“तिचे जीवन प्रेममय, ईश्वरमय होते. म्हणूनच जीझसचा नाद तिच्या अंत:श्रुतीवर पडला. शुभ्र पारव्याने तिच्या डोक्यावर आपले पंख पालवले आणि त्याच क्षणी तिने आपले जीवितकार्य ओळखले. अगदी सहज लीलेने, थोड्या विस्मित अवस्थेत तिने आपली भूमिका पार पाडली. उगीच नम्रतेची नाटकं तिने केली नाहीत. ती इतकेच म्हणाली, ‘तुझा हेतू असेल, तसेच होऊ दे. देवा, मी तुमची एक दासी आहे.’ किती सुंदर कल्पना, किती उदात्त भावना!
“माता मेरी म्हणते की, ‘मी देवाची एक सेविका आहे. मातृपद तुला द्यावयाचे असेल, तर त्याचाही मी स्वीकार करते.’
“सेविकेला कधी स्वत:ची इच्छा असते का? अगदी तशीच माता मेरीची अवस्था होती. ती प्रथम सेविका, नंतर जन्मदात्री माता झाली. देवाचा शब्द, देवाची इच्छा म्हणून तिने मातृपद स्वीकारले. पण तिचा स्वत:चा भाव नम्र, विनीत सेविकेचा होता.
“ख्राइस्टचा जन्म प्रथम तिच्या हृदयाच्या गुहेत झाला. तिचे सर्व शरीर पुनीत झाले; यथाकाल एका दैदिप्यमान पुत्ररत्नाला तिने प्रत्यक्ष जन्म दिला. हा पुत्र परमेश्वराचे दिव्य उपकरण म्हणून जन्मला!”
“जीझसमध्ये अवतरलेल्या परमेश्वराच्या प्रेमाने तिचे जीवन अगोदरच ओतप्रोत भरलेले होते. कारण तिचे स्वत:चे व्यक्तिमत्व, अहंकार, स्वत्व, काहीही शिल्लक राहिले नव्हते”, मी पुटपुटले.
गुरुदेव फक्त हसले, त्यांच्या हास्यात माझ्या विधानाला परिपुष्टी होती.
पुनश्च आकाशवाणी ऐकू आली:
“जीझसचे ज्ञान व श्रेष्ठता वाढू लागली, लोकांना पटू लागली.”
“मानव आणि देवही जीझसवर संतुष्ट होते”, मी हे स्वत:शीच गुणगुणले.
“त्यांच्या पावलांच्या स्पर्शामुळे पायतळीचे शेत, शेतातले गवत अन् तिथली धूळही प्रसन्न झाली असेल. त्यांनादेखील कृतज्ञता वाटली असेल. तो चालत असता, त्याच्यावर छाया धरावी म्हणून वृक्षराजींनी आपल्या शाखा विस्तारल्या असतील. आपल्या शाखांखाली त्याला विश्रांती मिळावी, म्हणून, त्या वृक्षांनी छायांचे भव्य मंडप उभविले असतील, सजविले असतील.” मी कल्पनेच्या राज्यात रंगले; पण माझ्या मनात अचानकपणे शंका आली, “आम्हाला त्याने का सोडले असावे? आमच्यामधून तो का निघून गेला? त्याने आपले अवतारकार्य व्यवस्थित पार पाडले. थडग्यातून-देखील तो पुनश्च बाहेर आला. मग राहिला का नाही? आम्हाला तो का सोडून गेला?”
श्रीगुरुदेव प्रशांतपणे म्हणाले, “पण तो गेला नाही. तू त्याचे वचन विसरलीस का? तो म्हणाला होता, ‘मी चिरकाल तुमच्याजवळ आहे!’ ”
“आपल्याला असे म्हणावयाचे आहे का, की जीझस हा सदासर्वदा आमच्याबरोबर आहेच? मागे होता, आता आहे व पुढे असणार?”
श्रीगुरुदेव म्हणाले, “मला अगदी तेच म्हणावयाचे आहे. कृष्ण, ख्राइस्ट येथून गेले नाहीत. ते येथेच होते. ख्राइस्ट थोडा वेळ अदृश्य झाला होता, एवढेच.”
पुन: एकदा आकाशवाणी ऐकू आली: “तो अदृश्य झाला, याचा अर्थ, त्याला एका मेघाचे आदरातिथ्य स्वीकारावयाचे होते.”
“म्हणजे आता येथे आहे की काय तो?”, मी मंद स्वरांत विचारले.
“अर्थात्!”, श्रीगुरुदेव उद्गारले, “आता तो येथे आहेच. पहा, तिकडे पहा. आदिनाथांचा, श्रीशंकराचा त्रिशूळ, जीझसचा क्रॉस तुम्हाला दिसेल.”
आणि मी पर्वताकडे नजर टाकली. माझ्या हृदयाची धडधड थांबली होती. माझा श्वासोच्छ्वास मंदावला होता.
ते गिरीशिखर सूर्यबिंबाला भिडत होते. तेथे मी एक क्रॉस पाहिला. कुणाला तो त्रिशूळ वाटला. त्या क्रॉसचे दोन्ही बाहू, क्षितीजाच्या दोन्ही बाजूंना पसरले होते. त्या त्रिशूळाच्या, क्रॉसच्या ऊर्ध्वबिंदूपासून सर्व भूमीपृष्ठाला आणि नभोवितानाला व्यापणारा एक दिव्य प्रकाश पाझरत होता. त्या प्रकाशाची किरणे थेट आमच्या पावलांपर्यंत येऊन रेंगाळत होती.
“हे तेज आहे तरी कसले? त्या तेजाची समकेन्द्र वर्तुळे इंद्रधनुष्याच्या सप्तरंगांनी पृथ्वीला व आकाशाला प्रदक्षिणा घालीत आहेत”, मी उद्गारले.
जणू काय, ते एक इंद्रधनुष्य होते. फरक एवढाच की, हे इंद्रधनुष्य अर्धवर्तुळाकार नव्हते; श्रीकृष्णाच्या सुदर्शन चक्रासारखे संपूर्ण वर्तुळ होते. इंद्रधनुष्यातले रंग मात्र अत्यंत विशुद्ध होते. त्यांच्यामध्ये एक स्वर्गीय शुचिता होती. आपणास परिचित असलेल्या सर्व रंगांच्या सर्वोच्च छटा त्या सुदर्शनचक्रात होत्या. त्या त्रिशूळाचा, क्रॉसचा विभाजन-बिंदू, मध्य-बिंदू, एका विलक्षण तेजाने तळपत होता. ते तेज अत्यंत तीव्र, तीक्ष्ण आणि तेजस्वी होते. त्या तेजाच्या किरणांवर क्षणमात्रच मानवी नजर ठरेल! आणि त्या एका क्षणांत, त्या किरणस्पर्शामुळे प्रेक्षकाचा सर्व देह, सर्व अस्तित्व रूपांतरित होऊन जाईल.
मी म्हटले, “धनुर्धारणा केलेल्या कामदेवाचे असेच प्रतीक असणे अगदी साहजिक आहे. त्याचे बाण आपल्या हृदयात घुसतात. त्या क्षणापासून आपले हृदय प्रेमाचा पेट घेऊ लागते. हे प्रेमदेखील विशुद्ध व एकाग्र असेल, तर मानवाच्या ईश्वरावरील प्रेमाचे ते प्रतीक होय. ईश्वराचे प्रेम हे मानवासाठी, सर्वांसाठी असते, सर्व जातमात्रांसाठी असते. ईश्वराचे प्रेम अनुभवणे, त्याची जाणीव ठेवणे, हे मानवाचे परमोच्च जीवन होय. प्रेम ही एक दिव्य शक्ती आहे. त्या शक्तीमुळे वस्तूंना नवचैतन्य लाभते! दिव्य प्रेमाच्या शक्तीने आमची हृदये व्यापून टाकली आहेत. आम्हाला नवचैतन्य लाभले आहे.” आम्ही सर्व एका सुरांत, एक-दिलाने उद्गारलो.
एका जुन्या धर्मगीताचा चरण आमच्या कंठांतून बाहेर पडला.
“तुझी प्रतिमा म्हणून मी जेव्हा जागा होईन, तेव्हाच मला शांती लाभेल.”
आणि आकाशवाणीचा एक नवध्वनी कानी आला:
“तो प्रत्यक्ष आला की, आपण त्याच्यासारखेच होऊ.”
आकाशवाणीचा आशय असा होता:
‘देवासारखे व्हावयाचे, तर देवाचा साक्षात्कार हवा. त्याच्याबद्दलच्या आपल्या ‘कल्पना’ उपयोगी नाहीत. आपणाला प्रत्यक्ष त्याच्यासारखे व्हावयाचे आहे; त्याच्याबद्दलच्या आपल्या कल्पनांसारखे नाही.’
------------------------
ध्यान-बीज (१०)
अनिर्वचनीयं प्रेमस्वरूपम्।
मूकास्वादनवत्।
प्रकाश्यते क्वापि पात्रे।
- नारदभक्तिसूत्रे
भावार्थ:
प्रेमाची व्याख्या, लक्षणा करता येत नाही.
मुक्या मनुष्याला आस्वाद घेता येतो. परन्तु त्या आस्वादांतील माधुर्याची प्रतीती, त्याला वर्णन करून सांगता येत नाही; प्रेमाची अनुभूती अशीच आहे.
विकसित झालेल्या जीवाच्या ठायी, यदृच्छया या प्रेमशक्तीचा उदय होतो.
- प्रतिसाद देण्यासाठी सहभागी व्हा अथवा सदस्य बना
पुस्तकाचे चॅप्टर्स
संपूर्ण पुस्तक वाचण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा.