You are hereनववे पाऊल / नववे पाऊल
नववे पाऊल
नववे पाऊल
ॐ पूर्णमद: पूर्णमिदम्।
पूर्णात् पूर्णं उदच्यते।।
पूर्णस्य पूर्णं आदाय।
पूर्णं एव अवशिष्यते।।
ॐ शान्ति: शान्ति: शान्ति।।
- ईशोपनिषद्
-----------------------------
तो ‘वराह’ खिंकाळला. एकाद्या बिगुलासारखा त्याचा आवाज स्पष्ट होता, खणखणीत होता. त्या आवाजाने सभोवतालच्या गीतमय शांतीचा भंग झाला. आम्ही त्या शांतीत किती वेळ तरी मग्न होतो.
आम्हा सर्वांची आत्मगीते त्या शांतीत निनादत असल्यामुळे तिला ‘शान्ती’ कसे म्हणता येईल?
नंतर श्रीगुरुदेव त्या वराहाला म्हणाले, “गड्या, जा तू आता.” त्याच्या आयाळीला ते कुरवाळीत होते. काचेच्या सूक्ष्म, सुंदर तन्तूंची केलेली ती एक कलाकृतीच होती. रेशमासारखी मऊ!
श्रीगुरुदेवांचा आशीर्वाद घेऊन वराह चौखूर धावू लागला. घनदाट वृक्षराजींतून भराभर तो धावतच गेला. त्याची लांबलचक पांढरीशुभ्र शेपटी व त्याचा वेग यांमुळे एखादा तारा निखळला, की, वेगाने पृथ्वीकडे येत असताना जसा दिसतो, अगदी तशीच ही स्वारी दिसत होती.
नंतर श्रीगुरुदेव दिसतील, म्हणून मी झाडाच्या बुंध्याकडे पाहिले; पण तेथे फक्त बुंधाच होता. झाडाचे खोड दिसत होते. ज्या मुळांवर ते बसले होते, ती मुळे होती. तृणपर्णांची हिरवळ होती; ते मात्र नव्हते. ते बसले होते, त्यामुळे ती हिरवळ थोडी दबल्यासारखी दिसली. पण पुनश्च ती ताठ होऊ लागली होती.
‘पण श्रीगुरुदेव कोठे आहेत?’, मी स्वत:लाच विचारले.
निदान हे सारे स्वप्न नव्हते, येवढे तरी निश्चित. कारण गवतावरची त्यांची बैठक स्पष्ट दिसत होती.
मी माझ्या सहचर-यात्रिकांना म्हटले, “येथे आपण असेच किती वेळ बसणार? या दोन सुन्दर जीवांपैकी कुणाचा मार्ग आपणांस अनुसरता येईल? सोनेरी लोकर असलेला मेंढा, त्याने तर एकदम त्या पर्वताच्या भिंतीवर उडीच मारली. हा वराह, हा या आम्रवृक्षांच्या राईतून सरळ अदृश्य झाला.”
“हे पहा”, मी माझे हात वर केले आणि मोठ्याने बोलले, “तुम्हाला मुरलीचा स्वर ऐकू येत आहे का? मला वाटते की, तो ध्वनी हा वराह आता गेला ना, त्या मार्गाच्या टोकाकडून येत आहे.
“अरेच्या! माझा हिरण्यपुरुष एवढा माझ्यापुढे कसा गेला?”, मी पटकन् उभीच राहिले व स्वत:शी पुटपुटले.
“चला, जलदी करा. नाहीतर तो दृष्टीआड नव्हे, तर श्रुतिआडदेखील होईल. श्रुतिआड झाला तर त्याच्या मुरलीचा ध्वनी आपल्याला कसा ऐकू येईल?”
म्हणून, माझ्या या सूचनेवरून आम्ही सर्व जलदीने त्या मार्गावरून जाऊ लागलो. नदीच्या काठाकाठानेच आम्ही वर चढत होतो. तेथे हिरण्यपुरुष होता.
“मला एवढ्या मागे तू का टाकलेस?”, मी रुष्ट होऊन विचारले.
“मी? छे! मी कोठे टाकले?”, तो म्हणाला, “तूच मला मार्ग शोधण्यासाठी पुढे पाठविलेस. याचा अर्थ, तुझे स्वत:चेच प्रज्ञान तू पुढे प्रक्षिप्त केलेस. आपल्या अपेक्षा, आशा यादेखील प्रज्ञानाचीच स्वरूपे असतात. तुझ्या-माझ्यातले अद्वैत तू विसरलीस का? मार्गदर्शक बालवीर असतात ना, तसाच मी तुझा बालवीर, पुढे जाऊन मार्ग हेरीत होतो.”
“ते काही असो, मला तू दूर गेलेला आवडत नाहीस. आपण आपले एकत्रच असलेले बरे. कधीकधी तू माझ्या एवढा निकट असतोस की, तुझ्या माझ्यात भेदच उरत नाही. पण दुसर्याच क्षणी तू इतका दूर जातोस की, तुझे मुरली-गीत मला जेमतेम ऐकू येते. तू आता म्हणशील की, ‘हे सर्व खेळ खेळणारी तूच आहेस.’ पण मला नाही ते आवडत! तू म्हणणार, ‘तुझ्याच प्रज्ञानाचा हा सर्व खेळ आहे.’ पण मला वाटते, लपण्या-शोधण्याचा हा खेळ मला फार त्रासदायक होतो आहे!!”, माझी भावना मी व्यक्तविली.
“आहे माझ्या लक्षात”, तो म्हणाला, “ही स्थिती निराशाजनक असते. पण ही एक क्षणिक अवस्था आहे. आत्मज्ञान, आत्मसंज्ञान प्राप्त व स्थिर होताना ही अवस्था अटळ असते.”
“तू म्हणतोस की, ‘माझ्या संज्ञानामध्ये अन्तश्चैतन्यांत अजून तालबद्धता आली नाही. माझी आत्मप्रतीती अजून सहजतेची व सवयीची व्हावयाची आहे. उच्च तालबद्धतेची गती, ती अवस्था माझ्यामध्ये अजून सुस्थिर झाली नाही. म्हणूनच मला, आता येथे, मग तेथे असे वाटत असते.’ असेच ना?”
“अगदी बरोबर. ही जी द्वंद्वे आहेत ना, त्या सर्व द्वंद्वांमध्ये एक प्रकारची साम्यावस्था, सु-संगती निर्माण व्हावी लागते. तरच ‘शान्ती’ अनुभविता येते. ही शान्ती म्हणजे एक समतोल पण गतिमान वृत्ती होय. तू म्हणालीस, ‘मला एकसंध, एकजिनसी व्हावेसे वाटते.’ परस्परविरोधी द्वंद्वांचा निरास केल्यावर ही शान्ती, ही समाधी निर्माण होऊ शकते. ही द्वंद्वे म्हणजे परस्परविरोधक शक्ती आहेत. आता-नंतर, येथे-तेथे; प्रकाश-अंधार; सुख-दु:ख; जय-अपजय; चांगले-वाईट; जीवन-मरण; विधायक-विनाशक; तसेच मी-तू; या द्वंद्वांमधला विरोध नाहीसा करण्याची युक्ती तुझ्या सहज ध्यानात येईल. या द्वंद्वांपैकी, या जोडीतील एक निवडून घेण्याची शक्यताच नाही. त्याच्याबरोबर दुसरे येणारच. प्रत्येक द्वंद्वांतील दोन्ही पदांचा संबंध निसर्ग-सिद्ध आहे, स्वयंसिद्ध आहे. दोन्ही पदे आवश्यक आहेत, अटळ आहेत; हे कळले, म्हणजे मनाला खरी शान्ती येते. आपणाला फक्त एक हवे असते. सुख हवे असते, दु:ख नको असते. पण त्याची शक्यताच नाही. सुखाबरोबर दु:ख, प्रकाशाबरोबर अंधार असणारच.”
“हीच ना ती ज्ञानातीत शान्ती? पतञ्जलींचे ‘निर्विचार वैशारद्य’?”, मी विचारले.
“खरोखर ‘शान्ती’ ही अवस्था प्रत्यक्ष अनुभविली पाहिजे. एरवी ती कळणार नाही. पण चाखली की, मग मात्र तिचे ज्ञानही आपोआप उदय पावते.”
“एकदा पूर्णता आली, पूर्णांक प्राप्त झाला, म्हणजे अपूर्णता, अपूर्णांक शिल्लकच राहत नाही”, मी पुटपुटले, “वसिष्ठ व निवृत्तिनाथ, सेंट फ्रँसिस व सेंट पॉल, यांना असे ज्ञान मिळाले होते. खरे ना?”
“अगदी खरे. एकेक द्वंद्व अस्तंगत होत जाते. क्रमाक्रमाने साधनाशक्ती आपण आत्मसात् करीत राहतो. आणि जणू काय, समाधीचा एक ‘बिंदू’ सिद्ध होतो. अशा अनेक द्वंद्वांचा निरास झाला की, समाधि-भावाची एक रेषाच निर्माण होते. ही सरळ रेषादेखील एक अवस्थाच आहे. द्वंद्वनिरास साधल्यानंतरचे ते अनेक बिंदू आहेत, त्यांचीच ही सरळ रेषा अत्यंत सूक्ष्म, तीव्र, ‘निशित’ असते. या रेषेत चैतन्य गतिमान राहिले की, ती समाधीच होय. याच स्थितीला ‘क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया।’ असे कठ-उपनिषदात म्हटले आहे.”
सुवर्णपुरुषाला मध्येच थांबवीत मी विचारले, “पण अशा मार्गावरून चालावयाचे कसे? ताणलेल्या दोरीवरचा नाचच तो!”
“नीट लक्ष दे. अन्त:शान्ती, चलत् समाधी ही एकाद्या ‘गायरोस्कोप’ सारखी, फिरत्या लोलकासारखी आहे. तुझ्या संज्ञानाची, ज्ञप्तीची सर्व अंगोपांगे, सर्व पैलू तुझ्या चैतन्याच्या मध्यकेंद्राभोवती अत्यंत वेगाने पण हळुवारपणे फिरत राहिले की, तुझा तोल आपोआप सांभाळला जातो. मग तू कोठेही अस. प्रत्यक्ष ताणलेल्या दोरावर किंवा क्षुर-धारेवर असलीस, तरी तू सांभाळली जाशील. पण समाधीतदेखील तू गतिमान राहिली पाहिजेस, हे महत्त्वाचे आहे.”
“माझ्या चैतन्याचे केन्द्रच जर एवढी शान्ती व समाधान देणार असेल, तर ते सर्व अस्तित्वाचा, एकंदर विश्वाचाच मध्यबिंदू असले पाहिजे. ते तर शक्य दिसत नाही”, मी आशंका प्रदर्शित केली.
“पण सत्य अगदी तेच आहे. आठवते का तुला? सेन्ट ऑगस्टिन याने आपल्या ईश्वरविषयक कल्पनेचे विवेचन कसे केले आहे? ‘केन्द्रे सर्वत्र, परन्तु परिघ कोठेच नाही; असे वर्तुळ म्हणजे ईश्वर.’ सर्वांच्या बाबतीत हेच सत्य आहे. केवळ तुझ्याच बाबतीत नव्हे”, हिरण्य-पुरुषाचे उद्गार.
“आले माझ्या लक्षात. असाधारण असे आपणात काहीच नसते. फक्त ज्ञप्तीमध्ये, ज्ञानकलेच्या अंशवत्तेत भेद असतो. (ज्ञप्ती - Awareness - ज्ञानकला) हा भेद अंशवाचक आहे. माझ्यामध्ये जो मला अनुभव आला, तसा तो दुसर्यास येणे आवश्यक आहे, याची जाणीव मी ठेवली पाहिजे.”
“खरोखर, सर्वांत मोठा माणसामाणसांतला भेद म्हणजे त्यांच्या प्रेम करण्याच्या शक्तीतला, सामर्थ्यांतला भेद”, हिरण्य-पुरुष पुढे म्हणाला, “जुलमी झोटिंगशहा कसे उत्पन्न होतात माहीत आहे तुला? सर्व जातमात्रांमध्ये ‘ओतप्रोत’ भरलेल्या ईश्वराला न ओळखणे आणि ओळखून त्याच्यावर प्रेम न करणे, हेच दुर्दम्य अहंकाराचे, आसुरी आकांक्षेचे मुख्य कारण आहे. माझ्यात देव आहे, दुसर्यातही देव आहे. मी माझ्यावर प्रेम करतो, तसेच दुसर्यावरही केले पाहिजे; हा सिद्धान्त पटल्यावर दुसर्यावर हुकूमशाही चालविण्याचा मूर्खपणा कोण करील? हुकूमशहा जन्माला कसा येईल? असले हे वेडे, अहंकारी, स्वत:ला ‘प्रेषित’ व ‘अवतार’ समजणारे अज्ञ जीव आपल्या भोवती कितीतरी आढळतात. त्यापैकी काहीजण वेड्यांच्या इस्पितळांतदेखील जाऊन पडतात.”
“आता माझ्या ध्यानात येत आहे, असे वाटते”, मी उत्तरले.
“पण मी आणि तू एक आहोत, याचा प्रत्यक्ष अनुभव घे. कारण अपूर्ण हा मुळात पूर्णांकच आहे, अंश हा तत्त्वत: पूर्ण आहे. अपूर्णांक व पूर्णांक यात स्वभावत: भेद नाही. आणि म्हणून कोणताही एक भाग दुसर्या भागाच्या तत्त्वत: बरोबरीचा आहे, हे सत्य कळणे, अनुभवात येणे, याचाच अर्थ द्वंद्वभाव नष्ट होणे. ‘सुखदु:खे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ’, हीच ती अवस्था.
या गहन सत्याचे दर्शन, तुला झाले तसे, ओझरते दर्शनदेखील, एक प्रमाणपत्र आहे. परिघावरून केंद्राकडे खरोखरच तुझा कितीतरी प्रवास झाला आहे! तुझी कितीतरी प्रगती झाली आहे”, हिरण्य-पुरुष आनंदित होऊन बोलला.
“अजून”, मीही म्हटले, “मला त्या सत्याचे, सिद्धान्ताचे पूर्ण ज्ञान झाले नाही. पण त्यावर माझी पुरेपूर श्रद्धा आहे.”
“प्रथमदर्शनी ते सत्य कितीही तर्कदुष्ट वाटले, तरी त्याची सत्यता, तर्कशुद्धता नंतर पटते. जसे बीजातच फल अन्तर्भूत असते, अगदी तसे! सेन्ट पॉल या सत्पुरुषाच्या मनात हाच अर्थ अभिप्रेत असला पाहिजे. श्रद्धा ही अदृश्य वस्तूचे ‘प्रमाण’ आहे. ज्या वस्तूची आपल्याला अपेक्षा असते, त्या वस्तूचे मूलद्रव्य, घटकद्रव्यदेखील ही श्रद्धाच होय. या श्रद्धेतूनच अपेक्षा व ती वस्तूदेखील जन्मास येते!”
“अगदी बरोबर”, हिरण्य-पुरुषाने उत्तर दिले, “दुसर्या एका तत्त्वज्ञाने सांगितले आहे की, ‘श्रद्धा म्हणजे नकळत झालेले ज्ञान!’ गाढ श्रद्धा ही एक साक्ष आहे! कसली? तुला कळल्याची, जाणीव झाल्याची. तुला ज्ञान झाले आहे, हे जरी तुला पटत नसले, तरी ते ज्ञान तेथे असतेच. त्या ज्ञानाचे नाव श्रद्धा! भ्रमिष्ट लोकांच्या भ्रमाचेही कारण, या तर्हेची श्रद्धा त्यांचे ठिकाणी असते, असे तू म्हणशील. पण भ्रमिष्टपणा ही एक प्रकारची विकृती आहे; श्रद्धा नव्हे. काही सत्ये, काही वस्तू आत्मतत्त्वाला प्रत्यक्ष प्रतीत होतात. इंद्रियांची साक्ष त्याला आवश्यक नसते. ‘स्वयं-प्रकाश’, ‘स्वयं-सिद्ध’ सत्य म्हणतात, ते असे असते. ते सत्य प्रतीत झाल्यावर आपल्या मनात येते की, आजपर्यंत मला हे कसे अगदीच कळले नाही? हे इतके स्वयं-स्पष्ट असून माझ्या लक्षात कसे आले नाही?”, हिरण्य-पुरुष हसत हसत बोलला.
“छान! छान!!”, मी उद्गारले, “अगदी तसाच अनुभव आहे तो. मलादेखील अनेक वेळा तसा अनुभव आल्याचे आठवते. अरे, पण आता आपल्याला निघाले पाहिजे. सगळ्यांचा मी खोळंबा केला. हे निष्कारण विषयांतर झाले.”
आता मी एका पायावर रेलून उभी होते. दुसरा पाय किंचित् उचलला होता, पण उचलल्यावर तो बधिर झाला होता, हे माझ्या लक्षात आले. म्हणजे मी एका पायावर एवढा वेळ उभी होते की काय? सॉक्रेटिसबद्दल मी असे ऐकले होते: त्याची एकदा ध्यान-समाधी लागली की, तो तासन् तास एका पायावर उभा राही. “तशी तर माझी समाधी लागली नव्हती ना?”, मी विचारले. पण कुणाला?
“छे! तसे नव्हे!”, हिरण्यपुरुष पट्कन म्हणाला. सॉक्रेटिसच्या उल्लेखाने त्याला जरा गंमत वाटली... “हा एवढा वेळ जो आपला विषयांतराचा प्रवास झाला, हा सर्व प्रवास अगदी एका क्षणात झाला. तू एका पावलानंतर दुसरे पाऊल उचलण्यापूर्वी हा सर्व विषयांतराचा विचार-विनिमय होऊन गेला. तुझा तो महत्त्वाचा ‘काल’ फारसा काही फुकट गेला नाही”, हिरण्य-पुरुष हसला.
“सहस्त्र वर्षे गेली म्हणजे एक दिवस गेला, असे तुझे विचित्र गणित आहे. तसेच एक अत्यल्प क्षण हा तुझा एक कलाकदेखील होऊ शकतो. कमाल आहे! मला या तुमच्या कालगणतीची सवय व्हायला किती वेळ लागेल कोण जाणे!”, मी आश्चर्यमूढ होऊन बोलले.
“फार नाही! थोड्याच वेळात होईल!”, हिरण्य-पुरुष म्हणाला. नंतर आम्ही पावलापुढे पाऊल टाकू लागलो. मी माझा अन्तश्चक्षू जागृत ठेवला होता. अवघ्या दोन पावलांच्या अवधीत मला मघाशी केवढे तरी अधिक ज्ञान झाले होते. तसा योग पुन्हादेखील यावयाचा! म्हणून मी अन्तरंगात चांगली जागी होते.
“दोन मुद्रित ओळी वाचण्यापेक्षा त्यांचेमध्ये असलेला अमुद्रित भाग वाचणे, हे अधिक महत्त्वाचे असते. शब्दांत अर्थ लपलेले असतात. अनेक वेळा मुद्रित पृष्ठांपेक्षा अमुद्रित पृष्ठांत अधिक अर्थवत्ता असते. चिनी चित्रकारांची चित्रे असतात ना, त्यांमध्ये जे रंगविहीन, मोकळे अवकाश असतात, त्यांचे रसग्रहण करणे अधिक आनंददायक, अधिक अर्थप्रापक समजले जाते.
“ताला-तालामधील विश्रान्तिस्थळे ही संगीत-शास्त्रात फार महत्त्वाची असतात. मध्यंतरे हीच अतीव अर्थपूर्ण असतात.”
हिरण्यपुरुष थोडे थांबून म्हणाला, “पण हे विसरून चालणार नाही की, ‘विश्रांतिस्थळे’, ‘मध्यंतरे’ सिद्ध होण्यासाठी समेची, ध्वनीची, प्रत्यक्ष गीताची अत्यन्त आवश्यकता आहे.”
मी म्हटले, “तुमचे म्हणणे असेच ना की, काही प्रत्यक्ष इंद्रियनिष्ठ अनुभवांचे अधिष्ठान असलेच पाहिजे? संज्ञानातील ही उच्च परिभ्रमणे सिद्ध होण्यासाठी प्रथम प्रत्यक्ष, इंद्रियनिष्ठ अनुभवाची जरुरी आहे. आपले पाय नेहमी जमिनीवर असले पाहिजेत. पतंगाची दोरी हातात घट्ट हवी. ती नसेल, तर तो पतंग उलटासुलटा होऊन एकदोन क्षणांतच जमिनीवर येतो.”
“अगदी बरोबर”, हिरण्य-पुरुष म्हणाला.
“ठीक आहे तर, चला. माझ्या आत्मदेवा, पुढे चला. तो वराह जेथे अदृश्य झाला ना, तेथे काय असेल बरे? आमच्यापुढे कुठलेही व कसलेही ताट वाढलेले असो. आता आम्हाला भीती नाही. वाटेल त्या अनुभवाला तोंड देण्याची आमची तयारी आहे”, मी माझ्या सहयात्रिकांकडे दृष्टीक्षेप केला.
“मला स्वत:ला विचाराल, तर मला या बागेतली दृश्ये अधिक पहावीशी वाटतात”, दलदलदोस्त उद्गारला.
“पण मला वाटते, तुमचे म्हणणे बरोबर आहे. आपण पुढे गेले पाहिजे.” दुतर्फा आम्र-वृक्ष असलेल्या त्या सावलीच्या रस्त्यावरून आम्ही चाललो होतो. ती गंधमधुर हवा आम्ही हृदयांत, फुफ्फुसांत साठवून घेत होतो, भरून घेत होतो. आमचे डोळे फुलांच्या सौंदर्याने वेडावून गेले होते. पलीकडे एक रम्य वनस्थली होती. त्या वनस्थलीवर सूर्याचे ऊन नुकतेच कुठे कुठे सांडत होते.
त्या वनस्थलींमध्ये कुणीतरी उदार व मोकळ्या हाताने रत्न-मण्यांचे दाणे उधळले होते. जवळ नदी वाहत होती. तिच्या एकाच एका अखंड नादावर पक्ष्यांचे वैचित्र्यपूर्ण सह-संगीत जणू काही एक सुन्दर कशिदा काढीत होते.
“खरोखर, ‘सब है भूमी गोपालकी!’ या भूमीवर उतरलेले सर्व वैभव आणि सौंदर्यदेखील त्याचेच नव्हे का?”, मी स्वत:शीच पुटपुटले.
आता आम्ही वृक्षराजीच्या शेवटापर्यंत, सीमेपर्यंत आलो. जेथे रस्ता संपला, तेथे पर्वताचा कडा आकाशाला जाऊन भिडला होता. त्याची हिमशृंगे हिर्यासारखी चमकत होती. मला जरा बरे वाटले. तेथे रस्ता उजवीकडे वळला होता. नदीच्या काठाकाठाने आता आम्हास जावयाचे होते. कड्यावर चढण्याची जरुरी नव्हती.
या ठिकाणी तो रस्ता एका निरुंद खिंडीतून गेला होता. आमचे तेथे पाऊल पडताच, कुणीतरी आमच्यावर स्वारी केल्यासारखे आम्हाला वाटले. पायांतील तोल सुटला होता. वारा! वार्याचा काय तो जबरदस्त झोत! पर्वताच्या कड्यापेक्षाही हा वारा अधिक टणक होता, जोरदार होता. आम्ही ओरडलो. आमच्या देहांतून व प्राणांतून त्याने आपली हिमकट्यार खुपसली.
आमच्या डोळ्यांत अश्रू आले. थंडीने त्या अश्रूंचेही बर्फ झाले. मागच्या बागेत परत जावे, असेही क्षणभर मनात आले. दुसरा एखादा रस्ता असेल, या आशेने मी सहज मागे पाहिले; पाहिले मात्र, आणि माझ्या हातांनी मी डोळे गच्च मिटूनच घेतले. कारण जळत्या प्रकाशाची एक शलाका मला दुभंगून गेली. पण निमिषार्धात मला एक उंच, भव्य व्यक्ती तेथे दृष्टीस पडली. त्या व्यक्तीला पंख होते. कंबरेला भली मोठी तरवार होती. ही तरवार विजेसारखी लखलखत होती.
“एकंदरीत असा प्रकार आहे. आदम आणि ईव्ह, एडनच्या बागेत परत जाऊ शकले नाहीत, असे बायबलांत आहे. आम्हीही जाऊ शकणार नाही. मागे पाहणे धोक्याचे असते. नुसती नजर टाकणे, हीदेखील माझी चूक होती. कसे माझ्या लक्षात राहत नाही! माझ्या सह-यात्रिकांबरोबर पुढे तरी जायला मिळेल ना मला?”, मी पुटपुटले.
भीतीने माझी बोबडी वळली. त्या वार्याच्या गर्जनेपेक्षाही अधिक मोठा, अधिक भयानक असा दुसरा आवाज मी ऐकला. का तोही आवाज वार्याचाच होता?
“नांगरावर एकदा हात ठेवला की, मागे पाहता कामा नये. जो पाहील, त्याला देवाच्या राज्यात प्रवेश नाही.”
‘मला पुढे गेले पाहिजे! गेलेच पाहिजे. आता मी इथेच गळून गेले, तर कसे होईल? हिरण्य-पुरुषा, आता कृपा कर. तू आहेस कुठे? मला तू का दिसत नाहीस?’
“माझे ते कुत्रे, ते माझे सह-यात्रिकही दिसत नाहीत! मला काहीच दिसत नाही! मी त्या भयंकर वायुघाताने आंधळी तर झाले नाही? धावा, धावा! कृपा करा! या क्षणी मला मदत हवी आहे”
मी हुंदके देऊ लागले. निराशेची सीमा झाली. इतक्यात एका प्रेमळ, ऊन ऊन जिव्हेने माझी मुद्रा चाटण्यास प्रारंभ केला.
“देवाची दया! तू अजून इथेच आहेस! लाडक्या श्वाना!” मी एकदम ओरडले. मला कित्ती बरे वाटले! “कितीतरी वेळ तुझ्याबद्दल एकही विचार माझ्या मनात आला नाही. पण काय रे, तुझी जीभ एवढी ऊन ऊन कशी? माझ्या गालावर ठेवलीस, तरी ती गोठून कशी गेली नाही? तिच्यात ऊब कशी राहिली?
“ओहो, मी आंधळी झाले नाही! माझ्या पापण्या गोठून गेल्या होत्या. महाकवी डान्टेने चित्रिलेल्या ‘इन्फर्नो’ मध्ये म्हणजे नरकामध्ये तेथल्या लोकांना असेच होत असे. त्यांच्या पापण्याच गोठून जात. काय रे गड्या, या गोठलेल्या पापण्यांना तू उबवितोस का? मला अजून तुझी कित्ती कित्ती जरूर आहे. तुझी ऊब, तुझे सहज ज्ञान यांची मला अजून जरूर आहे.”
मला हे सांगायला वेळ लागला ना, त्यापेक्षा कितीतरी थोड्या अवधीत वरील सर्व प्रकार झाला. एवढ्यात माझ्या कमरेभोवती त्या दलदल-दोस्ताचे हात लागले, असे मला वाटले. त्यामुळे मला शक्ती वाटली; शान्ती मिळाली; चांगलाच धीर आला.
दलदल-दोस्त म्हणाला, “या रस्त्याच्या कडेला हा दोरखंड मला मिळाला. देवाची देणगी! इथे कोणी ठेवला असेल कोण जाणे! या वार्याला तोंड देणे फार धोक्याचे आहे. या कड्यावरून चढून जाणेच सोपे. आपण हे दोरखंड बांधून घेऊ आणि सर्वजण एकदम वर सरकू. ‘आल्प्स्’ पर्वतामधले लोक अशा चढणीला ‘चिमणी’ म्हणतात. आता आपण सर्वजण एकदम चढणार किंवा एकदम पडणार.”
दलदल-दोस्त हे बोलत होता, एकीकडे त्याचे दोन्ही हात एकेकांच्या कमरेभोवती तो दोर बांधीत होते. दोन व्यक्तींमध्ये त्याने योग्य तेवढे अंतर ठेवून दोर तर बांधला. आम्ही आता वर जाण्यास तयार झालो. आमचा बळकट स्नेही दलदल-दोस्त सर्वांच्या पुढे गेला आणि मी तितक्याच सहजपणे पिछाडी सांभाळली. आता मला दृष्टी आली.
दृष्टी आल्यामुळे माझ्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. पण मी संयम राखला; नाहीतर पुन्हा माझ्या भुंवयाच गारठून-गोठून जावयाच्या. अशा तर्हेने आम्ही पुढे जाऊ लागलो. पुढे म्हणजे त्या खिंडीत. पुढे पुढे, खोल खोल. वार्याशी झगडत, पाण्याचा प्रतिकार करीत!
‘समजा, वारा एकदम थांबला, तर आम्ही धाडकन् तोंडघशी पडू. एखादी काठी, एखादा सोटा माझ्या हातांत या वेळी हवा होता.’
आणि नंतर त्या वार्याच्या आवाजाहूनही अधिक गंभीर आवाज माझ्या कानी आला.
“तुझा दंड आणि तुझी यष्टी मला धीर देत आहे!” हा आवाज ऐकल्यावर मी म्हटले, “पण ते आहेत कोठे?” इतक्यात, माझा हिरण्य-पुरुष माझ्यापुढे चालत असलेला मला दिसला. त्याच्या एका हातात दणकट यष्टी होती आणि दुसर्या हातात एक चांदीचा दंड दिसत होता.
“किती श्रद्धाहीन आहे मी!”, स्वत:ला दोष देत मी म्हटले, “मला हे तत्त्व कळायला हवे होते. अत्यंत आवश्यक तो पदार्थ, ती वस्तू, प्रत्येकाजवळ नेहमीच असते. संकटाच्या क्षणी, स्वत:च्या आत्मतत्त्वावर मी विश्वास का ठेवीत नाही?” मी स्वत:ला शिकवीत होते. दण्ड आणि यष्टी पाहून त्या क्षणी मला फार समाधान वाटले. मी पुढे चालू लागले. मनात आले, ‘पण त्याच्या मुरलीचे काय झाले?’
“खरंच, चांदीचा दंड हीच त्याची मुरली नव्हे का?” मला या क्षणापूर्वी ती कधीच दिसली नव्हती. बहुधा मी त्याच्या गीत-लहरी ऐकण्यात अगदी तल्लीन होऊन देहभान विसरत असे. ते गीत कसले, त्याचा श्वासच होता तो! मला बायबलमधले वाक्य आठवले.
“परमेश्वराने त्याच्या जड तत्त्वात प्राणवायू निक्षिप्त केला. नंतर तो मनुष्य एक सजीव शरीरिन् झाला.”
देहवान् व आत्मवान् मानवाची ही जन्मकथा खरी असेल काय?
केवढं नवल? या दृष्टीने मी कधी विचारच केला नव्हता. “आत्मतत्त्व हे परमेश्वराचा श्वास आहे, आणि मी त्याची मुरली आहे. त्याचा श्वास मी श्राव्य केला पाहिजे. त्याच्या श्वासाचे एक गीत बनविले पाहिजे.”
मी अंतर्मुख होऊन बोलत होते.
“याचा अर्थ दुसरा काय असणार?”, हिरण्य-पुरुष म्हणाला. पुनश्च एकदा त्याच्या स्कंधावरून माझ्याकडे एक दृष्टीपात धावत आला. एक प्रतिप्रश्न करून त्याने मला उत्तर दिले होते. त्यामुळे मला किती बरे वाटले!
“होय”, मी बोलले, “फ्रेंच लोक म्हणतात ना, ‘देवाचे श्वासगीत स्वत:लाच ओळखून घेते.’ आपण कोण आहोत, हे त्या दैवी श्वासगीताला ठाऊक असतेच. त्याचे स्वरूप दुसरे कोणी कसे सांगू शकेल?”
एवढ्या वेळात वायुदेवाने मात्र आसुरी रूप धारण केले होते. त्या झंझावाताचा प्रलयकारी जोर सारखा वाढतच होता. जवळ वाहणार्या महानदीच्या उच्च गर्जनेला वायुदेवाचे भयानक रणगीत साथ देत होते. ती नदीदेखील खूप खूप खोल वाहात होती. एवढ्या लहानग्या पात्रांतून जावे लागत आहे, याबद्दल ती जणू काय, क्रंदून आक्रंदून विधात्याचा निषेध करीत होती. आम्ही पुढे सरकत होतो. आम्ही आमचा श्वास पकडीत होतो. तो प्रचंड वाराही आमचा श्वास पकडू पाहत होता. आमची फुफ्फुसे केव्हा आणि कशी तडकतील, हीच त्या वायूची धडपड होती. त्या बिंदूवर आल्यानंतर दलदल-दोस्त थांबला. आम्हा सर्वांकडे त्याने एकदा नजर टाकली. तो ओरडून काहीतरी सांगत होता. त्याच वेळी मी त्याला बजावलं,
“मागे पाहू नको. मागे पाहण्यात धोका आहे.” पण वायूच्या चण्ड गर्जनेत त्याला माझे शब्द ऐकू गेले नसावेत. नंतर माझ्याच लक्षात आले की, मागे बघण्याची क्रिया ही घातुक नसते. ज्या हेतूसाठी, ज्या कारणामुळे तुम्ही मागे बघता ते कारण महत्त्वाचे असते.
समोर आलेली अडचण टाळण्यासाठी, भीतीमुळे मागे वळणे धोक्याचे असते. तसेच, निघून गेलेला क्षण, अस्तंगत झालेले अनुभव यांच्यासाठी, आसक्तीमुळे जीव गुंतून राहणे, हे फार वाईट. त्यांच्याकडे आसक्तीने, लालचीने मागे वळून पाहणे यात खरा धोका असतो.
नजरेत धोका नाही. ज्या वृत्तीने ती नजर मागे पाहते ती वृत्ती, भीतीची व आसक्तीची असता कामा नये.
पण मागे पाहणे, सिंहावलोकन करणे; किंबहुना, प्रत्यक्ष मागे फिरणेदेखील कधी कधी आवश्यक असते. विशेषत: मागच्या माणसांना मदत करण्यासाठी मागे पाहिले, मागे वळले तर त्यात धोका कसला? ते ईश्वरी कार्य आहे.
मी माझ्या कानामागे हात धरून दलदल-दोस्त काय म्हणत होता, ते ऐकण्याचा प्रयत्न करीत होते. दलदल-दोस्त उद्गारला, “मला वाटत होते, अगदी तसेच झाले!”
आम्ही थोडे पुढे गेलो. ‘ज्या जमिनीच्या पट्ट्यावरून आम्ही पुढे जात आहोत, त्या मार्गाचा पुढचा भाग नदीने गिळून टाकला आहे. पायाची एक करंगळी ठरेल, एवढेही अंतर येथे नाही. नदीचे चढते पाणी एका बाजूला आणि तो उंचच उंच पर्वताचा कडा दुसर्या बाजूला आहे. कडा म्हणजे काय, काचेची एक गुळगुळीत भिंतच! तेथे आपण पाय ठेवणार कसा आणि कोठे?’ माझे विचार फडफडत होते.
‘माझ्या उजव्या बाजूला, त्या भिंतीत एक लहानसे प्रवेशद्वार आहे. तेथून वर जाणारी धुरांड्याच्या चिमणीसारखी (Chimney) वाट असावी. मला वाटते, गिरिशिखरावर पोचण्याचा मार्ग आता येथून सुरू होईल. कड्याच्या एका बाजूला आपले खांदे लावावेत, आणि दुसर्या बाजूवर आपले पाय ठेवावेत.’
या प्रवेशद्वारातून वर गेलेला मार्ग चिमणीसारखा वाटोळा वाटोळा होता. आमची बोटे, गुडघे, शरीराचा प्रत्येक अवयव या चढण्याच्या क्रियेत उपयोजिणे आवश्यक होते. ही आमच्या कसोटीची वेळ होती. अचाट धैर्य, असामान्य तितिक्षा यांची आता जरुरी होती.
“करायचा का प्रयत्न?”, दलदल-दोस्ताने आवाहन केले.
“होय. करू या.” आम्ही सर्वजण एकमुखाने बोललो.
दलदल-दोस्त पुढे बोलू लागला, “या चिमणीमध्ये वार्यापासून आपले संरक्षण होईल. हे केवढे तरी भाग्य! तरीही खालच्या बाजूने कदाचित् थोडा वार्याचा झोत येईल. तिकडे आपले लक्ष राहिले पाहिजे.”
आता आम्ही सर्वजण त्या चिमणीच्या तळाशी, पायथ्याशी जमा झालो आणि दलदल-दोस्त पुढे काय सांगणार त्याची उत्सुकतेने वाट पाहत राहिलो.
तो बोलू लागला: “आपण आता असे करू, मी प्रथम वर जातो. माझ्याजवळ दोरखंड आहे. मी प्रथम वर जाऊन, तेथून एक दोरखंड टाकतो, तो दोरखंड कोणीतरी एकजणाने घट्ट धरावा. नंतर मी दोरखंड वर खेचीन.
“मुख्य म्हणजे, आपण सुरक्षित आहोत, आपल्याला कोणतीही भीती नाही, असे तुम्हांला वाटले पाहिजे. सरोवरात असाच अनुभव आला होता ना! आपण श्रद्धा ठेवली की, पाणी आमचे संरक्षण करील. तशीच श्रद्धा आता हवी. हा दोर आम्हाला खात्रीने वाचविणार.
“दुसरा आरोहक माझ्यापर्यंत पोहोचला की, मी अधिक वर जाईन. नंतर तिसरा आरोहक दुसर्याजवळ येईल.
“एक लक्षात ठेवा. तुम्ही आणि तुमच्या मागचा आरोहक यांच्या मध्ये असलेला दोरखंडाचा भाग ताठ राहिला पाहिजे, डोके शान्त ठेवा. मन बळकट राहू द्या. आत्मशक्तीवर विसंबून रहा; विश्वासून रहा.
“झाली तयारी?”, दलदल-दोस्ताने पृच्छा केली.
“झाली.” आम्ही उत्तरलो, “झाली, झाली, झाली!” त्या खडकाच्या निमुळत्या, वर्तुळाकार परिघात आमचा शब्द त्रिवार प्रतिध्वनित झाला!
“ही एक कठीण कसोटी आहे”, मी स्वत:शीच म्हटले. आमच्या चपळ शरीराची गती आणि त्या कड्याची स्थिर स्थिती यांच्यामधला हा संघर्ष होता. गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीवर आमची प्रभावी व विधायक इच्छाशक्ती विजय मिळवीत होती. गुरुत्वाकर्षण आम्हाला खाली खेचीत होते. आणि आमचे आत्मबल, आमची इच्छाशक्ती आम्हाला वर उचलीत होती!
“कसेही असो. माझ्यावरची जबाबदारी भयंकरच आहे. माझा क्रमांक शेवटचा आहे. मी जर खाली पडले, तर माझ्याबरोबर सर्वांचे पतन होईल. हिरण्य-पुरुषाने जर एक धीराचा सूर ऐकविला, तर किती छान होईल!”, मी विचार करीत होते.
“अंधारात एखादी शीळ ऐकली की, जरा धैर्य येते, नाही का?” हे मी म्हणते तेवढ्यात एक लकेर मला ऐकू आलीच. साक्षात् स्फूर्तीच ती - !
छातीवरची धोंड उचलली गेल्यासारखी मला वाटली.
“हिरण्य-पुरुषाला जर एवढा आनंद होत आहे, तर मला घाबरण्याचे कारण काय? केवढे नशीब! माझे वजन एकदम कमी झाले आहे!”, मी उद्गारले.
मोठ्या एकाग्रतेने व गंभीरपणे माझी पाळी येण्याची मी वाट पाहत बसले. माझे सर्व सह-यात्रिक त्या चिमणीतून सुरवंटासारखे वरवर सरकत होते.
माझा श्वास मी रोखून धरला. माझे हात उंच केले. त्यांना मी धीर देत होते. सर्कशीमध्ये बरोबर असेच दृश्य दिसते. उंच तारेवर कसरत करणार्या व्यक्तींना खालून काही माणसे स्फ़ूर्ती देत असतात. एकाग्रतेने त्यांच्याकडे पाहत असतात. समतोलपणा राखण्यास या खालच्या व्यक्तींकडून केवढी तरी मदत होते. “ ‘Understand’ या शब्दाचा अर्थ असाच असेल काय?”, मी स्वत:शीच पुटपुटले.
“To stand under म्हणजे खाली उभे राहणे, प्रेमाचा आधार देणे. काहीही असो. या स्फूर्तीचा उपयोग होतो, हे निश्चित. असेच कोणी मला खाली आधार द्यायला उभे राहील काय?”
माझी पाळी आली होती. मी वर चढू लागले. पुनश्च मला आकाशवाणी ऐकू आली.
“परमेश्वर तुला यक्षकिन्नरींच्या ताब्यात देईल. या किन्नरी तुला आपल्या हातात तोलून धरतील.”
मला आश्चर्य वाटले. पण धीरदेखील आला. मी मोठ्या दक्षतेने वर चढू लागले.
मी म्हटले, “मला तोलून धरणार्या किन्नरी असल्या, म्हणून काय झाले? पण त्यांच्यावर काही मी सगळा भार टाकणार नाही. मी आणि माझे शेजारी यांची जबाबदारी माझ्यावर आहे. माझ्या स्वावलंबनाची पराकाष्ठा मी केली पाहिजे. नंतर देव-देवता, यक्ष-किन्नर माझ्या मदतीला येतील.”
‘न हि श्रांतस्य सख्याय देवा:।’ या श्रुतिवचनाची मला आठवण झाली.
माझे जानु आणि स्कन्ध चिमणीच्या आतल्या कड्यावर टेकून मी वर सरकू लागले. माझ्या हाताची बोटे कोठेतरी पकड घेण्यासाठी, त्या खडकाळ भागावर एखादा टेकू शोधीत होती. माझे सह-यात्रिक माझ्या डोक्यावर ओळंबत राहिलेले होते. त्यांनी आपला श्वास रोधून, रोखून धरला होता व आपल्या सर्व अंत:शक्ती एकत्र केल्या होत्या. माझ्या कमरेभोवती असलेला दोर ताठ राहावा, यासाठी त्यांचे सर्व प्रयत्न होते. अशा तर्हेने आम्ही हळूहळू वर सरकू लागलो. नवल तर खरेच! आमच्यापैकी कोणीही खाली घसरले नाही.
दलदल-दोस्त अगदी शान्तपणे सूचना देऊ लागला, “मी शिखर गाठले आहे. पण अगदी अखेरचा भाग हिममय आहे. थिजलेल्या जलप्रपाताच्या भोवताली असावी, तशी येथली परिस्थिती आहे. थोडी धोक्याचीच आहे. तुम्ही सर्व निश्चल राहा. खोल श्वासोच्छ्वास करा. मी घसरलो तरीदेखील तुम्हास इजा होणार नाही. भिऊ नका.” त्याच्या सूचनेने आम्हाला धीर आला.
“आजपर्यंत, या क्षणापर्यंत सुटकेचा संभवच नाही, अशी स्थिती आपल्यावर केव्हाही आली नाही. अडचणी आल्या, अनंत आल्या! पण त्या सर्वांतून आपली सुटका झाली, तशीच आताही होईल!
आता मी सावकाश तीन अंक मोजणार आहे. एक, दोन, तीन, म्हटले की, मी एकदम शिखरावर झेप घेणार आहे. या वेळी माझ्या हातांत बर्फावर चालताना टेकण्याची ‘अल्पाइन’ काठी हवी होती. त्या काठीसाठी माझे सर्व-स्वदेखील मी सहज दिले असते!
“आता आपण आत्मशक्तीवर विसंबिले पाहिजे. आत्मश्रद्धा हीच आपली आशा! ध्यानात आले ना तुमच्या?”, दलदल-दोस्ताने विचारले.
“होय”, आमच्या सर्वांच्या कंठांतून एकदम तो होकार वर गेला. एखाद्या उकळणार्या किटलीतून वाफ बाहेर पडावी ना, तशी ‘हिस्हिस्’ बराच वेळ आमच्या आवाजामुळे त्या चिमणीत घुमत होती.
“आता सर्वांनी श्वास रोखून धरा. एक, दोन, तीन!” ‘तीन’ हा शब्द ऐकल्याबरोबर आमच्या डोक्यावरच्या बाजूस बर्याच उंचीवरून एक बर्फाचे शिखर कोसळल्याचा भयानक आवाज झाला.
इतक्यात एक जयघोष माझ्या कानी आला. दलदल-दोस्त म्हणाला, “सापडली. येथे एक ‘अल्पाइन’ काठीच मला सापडली. माझे दुसरे पाऊल थेट शिखरावर पडणार. तुम्ही आता खोल श्वास घ्या. आता मी त्या अल्पाइन काठीला दोरखंड बांधून टाकीन, नंतर मी वर चढेन. आणि आपण सर्वजण नंतर पुन्हा एकत्र येऊ. हा मी वर चढलोच!” आम्हा सर्वांचा श्वास आम्ही आणखी एक क्षण रोखून धरला.
दलदल-दोस्त वरून, शब्द कसले, पुष्पगुच्छच फेकीत होता. तो म्हणाला, “सर्व काही यथास्थित झाले. तुम्हाला आता वर खेचतो. नंबर एक, नंबर दोन, तीन. चला!”
अगदी थोड्या वेळात मीदेखील चिमणीच्या निसरड्या अन्तर्भागातून वर ओढली जात होते. या भयंकर दिव्यातून पार पडताना आम्हाला विचार करायला क्षणाचीही उसंत नव्हती. दुसरा कसला विचारच मनात आला नाही. आता मात्र आम्ही एकमेकांकडे अधिकच आश्चर्याने पाहू लागलो.
मी प्रश्न केला, “तेथे ती अल्पाइन काठी आली तरी कशी? आणि तसे पाहिले तर रस्त्याच्या बाजूला तो दोरखंड तरी कोणी ठेवला?
“आमच्या अगोदर, नि:संशय दुसर्या व्यक्ती येथून गेलेल्या असणार. आता येथे स्वच्छ-शुभ्र हिम-भूमी दिसत आहे. त्यावरून येथे कोणीही पाऊल टाकलेले नसेल, असे वाटेल. पण खात्रीने, आम्ही येथे येणारे पहिले यात्रिक नव्हेत.”
नंतर मी दलदल-दोस्ताला विचारले, “अरे, पण तू करतो आहेस तरी काय? तुझ्या हाताभोवती तू दोर गुंडाळून का घेत आहेस? आमच्या कमरेभोवती गुंडाळलेला दोर कशासाठी सोडत आहेस? आपण एकाच सूत्रात गोवलेले असणे बरे नव्हे का?”
दलदल-दोस्त निश्चयपूर्वक म्हणाला, “तू म्हणतेस, ते खरे आहे. दोरखंडच काय, पण मला वाटते, ती अल्पाइन काठीही आपल्याबरोबर घ्यावी. पुढचा सर्व मार्ग बर्फमय आहे. निदान माझा तसा अन्दाज आहे.
“पण आपल्या अगोदर जसे यात्रिक गेले, तसे आपल्या मागूनही येणार! आपले कर्तव्य आपण करूया. ही अल्पाइन काठी आपण येथेच ठेवणे योग्य आहे. आणि हा दोरदेखील या चिमणीतून खाली, जेथे तो आपल्याला मिळाला, तेथे पुनश्च ठेवणे बरे.”
असे म्हणून स्वारीने ती काठी हातात धरली, पोटावर घसरत अगदी कड्याशी गेलासुद्धा. आत ओणवला. कारण आता त्याचा हात खोलवर जाऊ शकला. तेथून त्याने तो दोर टाकला. खाली खाली जात असलेला तो दोर पाहून आम्हाला त्याच्याबद्दल कृतज्ञता वाटल्याशिवाय राहिली नाही. समजा, हा मिळाला नसता तर? दलदल-दोस्ताने स्वत:च्या हाताने, चिमणीमध्ये दोर खाली सोडून दिला. तसेच करणे जरूर होते. एकदम तळापर्यंत, कोठेही न अडकता तो दोर आता निश्चित जाईल असे वाटले. दलदल-दोस्त पुन्हा उभा राहिला आणि म्हणाला, “आणि आता पुढे काय?”
मी सभोवार नजर टाकली. पुढच्या आक्रमणाची दिशा अजून निश्चित झाली नव्हती. आमची मने थोडीशी गोंधळातच पडली होती. आम्ही सर्व, धवलिमेवर, शुभ्रतेवर उभी आहोत, असा मला भास झाला. या शुभ्रतेची एक कक्षा अन्तराळातील शुभ्रतेत मिळून गेली होती. वर, खाली, सर्व दिशांत ही शुभ्रताच भरून राहिली होती. मी पुटपुटले, “ही सर्व अभ्रे तर नसावीत? हे पांढरे मेघ आहेत. मला तर वाटतं, आमच्याभोवती हे एक पारदर्शक काचेचे वर्तुळच तयार झाले आहे.”
आम्ही आता धवल शान्तीच्या कोषात, गाढ-गूढ आवरणात होतो. इतक्यात ती धवल शान्ती एखाद्या मोठ्या घंटेसारखी निनादित होऊ लागली. कोणत्यातरी अदृष्ट हाताने ती घंटा वाजविली जात असावी. माझ्या देहाच्या अणुरेणूंत तो नाद फिरक्या घेत होता. आणि त्या नादाने शब्दरूप धारण केले:
“ईश्वरावर श्रद्धा ठेवून जे वाट पाहतात, त्यांना पुनश्च शक्ती लाभते. नन्तर, चंडोलाप्रमाणे पंख पालवीत ते वरवर जातील.”
--------------------
ध्यान-बीज (९)
आत्मा निर्गुण निरंजन । तयासी असावें अनन्य
अनन्य म्हणजे नाहीं अन्य । आपण कैंचा तेथें।।
- रामदास (दासबोध)
- प्रतिसाद देण्यासाठी सहभागी व्हा अथवा सदस्य बना
पुस्तकाचे चॅप्टर्स
संपूर्ण पुस्तक वाचण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा.