You are hereसातवे पाऊल / सातवे पाऊल

सातवे पाऊल


“तू आहेस तरी कोठे? तुला यश मिळाले आहे. तू विजेता आहेस. पण तू कोठे आहेस? तुझ्या कर्तृत्वामुळे आमचे प्रत्येक संकट म्हणजे प्रकाश-मार्गावरील आमच्या प्रगतीचे, उन्नतीचे एक एक पाऊल ठरले.
“ऐक, वीरपुरुषा! ऐक.
“मध्य निशेच्या प्रशान्त क्षणी तुझ्या पावलांना शक्ती व आशीर्वाद देण्यासाठी मी तुझ्या निकट येईन. मी तुझ्या उशीवर तेजस्फुल्लिंगांची पखरण करीन. वीर पुरुषाची निद्रा म्हणजे वीणेची स्तब्धता. त्या वेळी, वीणेच्या सातही तारा एका भव्य-गूढ शान्तीत भिजलेल्या असतात. वीर पुरुषाची निद्रा म्हणजे वादळापूर्वीची, वातचक्रापूर्वीची शान्तता होय. चिमुकली तृणपर्णेदेखील त्या वेळी अगदी नि:स्तब्ध झालेली असतात.
“जाग आल्यावर चैतन्याची एक नवी लकेर प्रकट व्हावयाची असते. आन्तर आत्मशक्तीच्या राजकमलाचा एक नवा उन्मेष व्हावयाचा असतो.
“बन्धूंनो! आनन्द-मन्दिरात आपण एकत्र जमू या. पुष्प उमलले आहे. एक महा-चक्र वर आले आहे. आपला खोल, खोल गंभीर आनन्द सप्तपाताळाशी भिडला आहे आणि भुवर्लोकांतील ज्येष्ठ बांधवांपर्यंत वरती पोचला आहे. वीरतेला, धीरतेला उद्देशून आमचे सर्वोत्तम गीत आम्हाला आता गावयाचे आहे.”
- अग्नियोग, पान ११
------------------------
“केवढा लख्ख प्रकाश पडला आहे इथं! हिरण्य-पुरुष जवळच उभा असला पाहिजे.” स्वत:ला धीर देत मी उद्गारले. माझे दात कडकडत होते आणि अंगाला थंडी चांगलीच झोंबत होती.
टेकडीच्या चढावरचे खडक, ओलसर शेवाळीने आच्छादले होते. त्यांच्यावरून चढणे म्हणजे एक दिव्यच होते. बर्फासारख्या गुळगुळीत झालेल्या त्या प्रस्तरांवरून कोणत्या क्षणी घसरून पाय मोडेल ते सांगता येत नव्हते. पावलोपावली भीती वाटत होती, प्रत्येक पाऊल मी इतके काळजीपूर्वक जपून टाकत होते की, त्या गोठवून टाकणाऱ्या थंडीचा मला पुरा विसर पडला.
“सावधान!”, मी माझ्या सह-प्रवाशांना इशारा दिला. पण मलाच त्याची अधिक आवश्यकता होती; कारण माझी दृष्टीदेखील स्थिरावत नव्हती.
प्राणसंकटाच्या या भयातून क्षणभर मुक्त होऊन मी उभी राहिले; सभोवार नजर टाकली. मला वाटले, ‘या तेजोमेघाच्या अंतरंगात एक नवीनच अद्भुत सृष्टी वसली आहे.’ ‘नेचा’ जातीची हिरवीगार झाडी डुलत होती; दाट शेवाळी पसरली होती, आणि माझ्या माथ्यावरील खडकाच्या छायेत एक सुकुमार गुलाबी फूल डोलत होते. इतके सुंदर फूल मी कधीच पाहिले नव्हते. त्याला स्पर्श करावा, ते हातात घ्यावे, या प्रबल इच्छेने मी पुढे वाकले. एक पाऊल टाकले मात्र आणि केवढे आश्चर्य! पाहता पाहता ते प्रस्तराच्या तळापासून मोठ्या ऐटीने ऊर्ध्व दिशेला सरकले. आतातर, ते कातळाच्या शिरावर आरूढ झाले. मला वाटले, ते माझ्याकडेच निरखून पाहत आहे; आणि त्या दृष्टिक्षेपात काहीशी थट्टेची, उपरोधाची छटा होती.
“तू कोणी अप्सरा आहेस का? की यक्षकन्या? की विद्याधरी?”, मी विचारले.
“खरे आहे, माझे स्वरूप असेच काहीसे आगळे आहे. आम्हाला देवता म्हणतात. अनेक प्रकारच्या देवदेवता आहेत, दैवते आहेत. आम्हाला देवदूत असेही म्हणतात. काही देवदूत अग्रदूत (Archangels) मानले जातात. आम्ही जलदेव आहोत. मी तुषारांमध्ये असलेली ‘अप्सरस् शक्ती’ आहे. आम्ही तुला लहानग्या, कोमल आणि क्षणजीवी दिसत असू. परंतु आमच्या सामर्थ्याची तुम्हाला कल्पना नाही. तुम्हाला मदत करावी, साहाय्य-हस्त द्यावा ही आमची आंतरिक इच्छा आहे व तशी ती नेहमी असते.
“जरा इकडे पहा!”, आणि पाहता पाहता, पंख नसताना, स्थानांतराचे कोणतेही साधन नसताना ते फूल उडाले आणि त्या प्रपाताजवळ वाढलेल्या त्या नेचाच्या झुडुपावर जाऊन बसले. तिथे ते मागेपुढे झोके घेत होते. ते पुष्प अनुभवीत असलेला सुखास्वाद सुस्पष्टपणे त्याच्या हसर्‍या रंगाने प्रकट होत होता. त्याला दैवी व्यक्तित्व असल्याचे कोणतेही बाह्य चिन्ह दिसत नव्हते जणू काही गुलाबी प्रकाशाचा तो एक ठिपकाच!
“तुम्ही ज्याला गुरुत्वाकर्षण म्हणता त्याचा आमच्यावर काहीच परिणाम होत नाही. ती शक्ती डावलण्यास आम्ही पूर्णत: स्वतंत्र असतो. आम्ही मन मानेल तशा उडू शकतो; वाटेल तेथे स्थिर राहू शकतो, खालीही उडू शकतो.”
प्रपाताच्या घनगंभीर गर्जनेतदेखील मला एक तार स्वरांतला आवाज ऐकू आला.
आणि निमिषार्धात, माझ्या डोळ्याचे पाते लवते न लवते तोच, माझ्यासमोरील खडकावर ते पुष्प आलेसुद्धा!
“ही काय अद्भुत किमया आहे? हे तुला कसं शक्य होतं?”, मी आश्चर्यचकित होऊन विचारले.
“त्यात काय एवढे गूढ आहे? आपल्या अन्त:स्पन्दनाचा वेग, गती वाढविणं, शरीराच्या सर्व घटक परमाणूंचे परिभ्रमण कोटिगुणित वेगाने वाढविणे, म्हणजे देह स्थूलातून सूक्ष्मात नेणे.
“मागे, अदृश्यता म्हणजे काय हे आपण पाहिले. दृश्य श्रेणीतून अदृश्य श्रेणीत येणे, हे रूपान्तर जसे घटक द्रव्याचा अणुवेग वाढविला म्हणजे सहजसाध्य होते; तशीच, जड देह स्थूलातून सूक्ष्मात नेण्याची प्रक्रिया आहे.”
हे ऐकून मी म्हटले,
“गुरुत्वाकर्षणाच्या कक्षेबाहेर जाण्याइतका देह हलका होऊ शकतो किंवा अगदी सजड, घनिष्ट, अगदी लोहमय होऊ शकतो; हे सारं तुला सहज, सरळ वाटत असेल, पण मला मात्र ते अगदी गूढ वाटते. माझ्या आकलनशक्तीच्या कक्षेबाहेरचे हे कोडे उलगडायला कोठून आणि कसा प्रारंभ करावा, हेही मला समजत नाही.”
“माझ्या कृतीचे रहस्य तुला मी समजावून सांगू शकेन की नाही, याची मला शंका वाटते, कारण ही देणगी, ही शक्ती आम्हाला सहजसिद्ध, निसर्गसिद्ध लाभली आहे. याचं ज्ञान आम्हाला कधी करून घ्यावं लागलं नाही. माझ्या या स्थानांतराकडे, रूपाकडे पाहून तू इतकी आश्चर्यमूढ झाली आहेस, पण सुवर्ण-दीप्तीनं झगमगणारा तुझा तो मार्गदर्शक, हितैषी - त्याला मात्र यात काहीच नवीन नाही”, फुलाने विवेचन केले.
“अरे, कुठे अदृश्य झाला माझा हिरण्य-पुरुष? त्याच्यावर सतत ध्यान ठेवून, दृष्टी लावून पावले टाकण्याऐवजी इतर विषयांत कशी मी गुरफटून गेले!” विषादाने माझे अन्त:करण जड झाले होते.
प्रपाताच्या पार्श्वभागातून तो हिरण्य-पुरुष एकदम आविर्भूत झाला आणि उद्गारला, “या अनुभूतींतून तुझे ज्ञान, तुझी संवेदन-क्षमता वृद्धिंगत होते आहे. परन्तु केवळ ज्ञान असणं येथे पुरत नाही. त्यासाठी तुला एक प्रकारची धृती, दृढ वॄत्ती बाणविली पाहिजे. सतत अभ्यास ठेवला पाहिजे. तुझ्या वृत्तीला स्थिरता आणली पाहिजे. एकाच प्रकारच्या अनुभूतीतून, प्रतीतींच्या मालिकेंतून धारणाशक्ती निर्माण होत असते. याचेच नाव अभ्यास! अर्थातच त्यासाठी अल्पाधिक कालाची अपेक्षा असते.”
“नको, कृपा करून त्या काल-प्रमेयाचा, कालाच्या गूढ प्रश्नाचा पुन्हा उल्लेख करू नकोस. या कड्यावर चढून त्याचा माथा गाठायचा असेल, तर तो कालाचा विषय पुनश्च काढून मला गोंधळवून, विचलित करू नकोस. एका वेळी, आपण एकाच विचारावर मन केन्द्रीत करू या; एकाग्र होऊ या”, मी विनवणी केली.
“बरं तर”, स्मितहास्य करून तो विनोदाने म्हणाला, “पण तुझ्या निदर्शनाला एक गोष्ट आणावी, असं मला वाटतं. तूच आता पुन्हा नाही का या ‘काला’चा उल्लेख केलास?”
त्याच्या या बोलण्यामुळं मी नि:शब्द झाले; अधिकच बावचळून गेले. मान हालविली अन् मी पुढे पाऊल टाकले. इतक्यात त्याची गंभीर व मधुर वाणी मला ऐकू आली.
“कालाच्या ओघातच अमृतत्वाचा, शाश्वताचा शोध घे. वर्तमान क्षणांमध्ये क्षणाक्षणांची मोत्ये ओघळत असताना ज्या सनातन सूत्रामध्ये व सूत्रामुळे, ती अभिव्यक्त होत आहेत; त्या सूत्राचे स्मरण व मनन ठेव. त्या सूत्राचे ज्ञान व ध्यान राहू दे.”
त्याच्या संदेशाचे, त्यातल्या तत्त्वाचे आकलन मला होत नव्हते. त्याचा अर्थ प्रतीत होत नव्हता. तरीसुद्धा त्याचे ते सूत्र-भाष्य अर्थपूर्ण आहे, असे मला वाटले. पण त्या विधानाचा विशिष्ट अर्थ माझ्या बुद्धीच्या, विचाराच्या कक्षेबाहेर घोटाळत होता.
“हे तुझ्या संवेदना-शक्तीच्या, तुझ्या जाणिवेच्या मर्यादेपलीकडचं सत्य आहे. हे समजावून घेण्याचा खटाटोप व्यर्थ आहे. योग्य वेळी, योग्य प्रसंगी तुला त्याचे ज्ञान होईल. या चढणीच्या कालावधीतच ते ज्ञान तुला होईल.”
असल्या विचारांच्या तन्द्रीत मी माझ्या मार्गदर्शकाकडे पाहिले. त्याने संमतिदर्शक मान हलविली.
अधरावर मुरली धरून तिचे दिव्य सूर वातावरणात पसरवीत तो हिरण्य-पुरुष पुन्हा प्रपाताच्या पार्श्वभागी गुप्त झाला.
‘या निर्मनुष्य, एकान्त स्थळी कोणीही श्रोता नसताना खरोखर हा बासरीवर सूर का आळवीत आहे? कोणासाठी हा मुरली-नाद आहे?’
अशा विचारांत मी मग्न होते; पण माझी दृष्टी मात्र त्या प्रचंड जलप्रपातावर खिळली होती. प्रचंड वेगाने पाण्याचा तो झोत दरीत कोसळत होता. खडकावर ठिकर्‍याठिकर्‍या होऊन ते जलकण पुन्हा वर उसळत होते.
“अरे, हा माझ्या दृष्टिआड होता कामा नये. मला त्याच्या पाठोपाठ जायचं आहे. त्याच्या पावलावर पाऊल ठेवून धबधब्याच्या पोटातसुद्धा मला शिरलं पाहिजे.
“अय्या! पण माझे सहचर? ते कुठे आहेत? आणि ती लहानगी अप्सरा?”, मी सभोवार नजर टाकीत म्हटले.
ती छोटी देवता खडकावरल्या ‘नेचा’च्या झुडुपावर झोके घेत होती. मी माझ्या सहचरांकडे पाहिले. त्यांच्याही मुद्रेवर माझ्या मनातलेच भाव उमटलेले दिसले.
तो प्रचंड प्रपात व त्याच्या कडेकडेने चढत जाणारा अवघड मार्ग पाहून ते अगदी भांबावून, घाबरून गेले होते. पण, परत फिरण्याची इच्छा एकाच्यासुद्धा मुद्रेवर मला दिसली नाही. प्रत्येकाने ते आव्हान स्वीकारायचे ठरविले होते. तो निर्धार मला त्यांच्या नजरेंतून प्रकट झालेला स्पष्ट दिसत होता.
“चला, पुढे होऊ या”, माझा दलदल-दोस्त म्हणाला.
आम्ही धबधब्याच्या जवळ उभे होतो. जल-तुषारांची शिंपण सतत आमच्या अंगावर होत होती आणि आमची वस्त्रे अगदी ओलीचिंब झाली होती, पाण्याने निथळत होती. तेव्हा आता जलौघाच्या पाठीमागे शिरताना ती अधिक भिजण्याचा काहीच प्रश्न नव्हता. तरीसुद्धा स्वत:ला आवरून, शरीरे सावरीत आम्ही त्या शीतल जलात पावले टाकू लागलो; पण त्याच्या शीतलतेनं आम्ही मुळीच गारठून गेलो नाही. उलट ते जल चैतन्यदायी, थकवा नाहीसा करणारे आहे, असे आम्हाला प्रतीत झाले. एक प्रकारचा सुखद उष्मा आमच्या शरीरांत पसरत होता.
पाण्याच्या या जीवनदायी शक्तीबद्दल मला विस्मय वाटला, पण त्याच क्षणी स्मरण झाले, ‘यात आश्चर्य काहीच नाही. त्या नील-सरोवराला जाऊन मिळणारी ही नदी आहे.’
चालता चालता आम्ही प्रपाताच्या अगदी पायातळी येऊन पोचलो. आमचे पुढचे पाऊल प्रत्यक्ष प्रवाहातच पडणार होते.
तो उंच कडा आणि प्रपाताच्या कोसळत्या पाण्याची प्रचंड भिंत, यांच्यामध्ये एक छोटासा मार्ग, एक पोकळीच तयार झाली होती. ‘पण या पाण्याच्या भिंतीआड असलेल्या या पोकळीत अंधार कसा नाही?’ मी सभोवार पाहिले. तेथील झुडपे, देवदाराची छोटी छोटी रोपे आणि शेवाळीसुद्धा प्रकाश टाकीत होती. ती सारी स्वयंप्रकाशित होती.
मी निरखून पाहिले, त्या जीवमान व्यक्ती होत्या, व त्यांच्या श्वासोच्छ्वासांतून प्रकाशाचे स्पन्दन चालू होते. हे सर्वजण देवतांच्या जातीतले असले पाहिजेत. इतक्यात उंच कड्यावर चमकत असलेल्या, झगझगीत तेज:किरणावर माझी नजर गेली. मी त्याला ओळखले. तो माझा हिरण्य-मित्र होता; मला खूण करून बोलावीत होता.
“या प्रस्तरांवरून एकदम उडी घेणे मला कसे शक्य आहे?”, मी त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न केला, “गुरुत्वाकर्षणाच्या खाली खेचणार्‍या शक्तीला प्रतिरोध करणे तुला अवगत आहे; पण आम्ही त्या बाबतीत अनभिज्ञ आहोत. तुझ्याजवळ मी एकदम यावे, अशी अपेक्षा तू कशी करतोस?”
“पण तुम्ही प्रयत्न तरी करून पहा; तुम्हालाही या गुरुत्वाकर्षणाचा जोर, शक्ती हतबल करणे, निष्प्रभ करणे सहज शक्य होईल. या निसरड्या मार्गावरून चालताना तुम्ही परस्परांचे हात धरा. एकमेकांच्या निकट या”, हिरण्य-पुरुष उद्गारला.
त्याचा हा इषारा ऐकत असताना आणखी एका चमत्कृतीने माझे मन वेधून घेतले. धाडधाड कोसळणार्‍या या धबधब्याच्या प्रचंड आणि अखंड गर्जनेतून याची स्पष्ट वाणी मला कशी ऐकू येते? तिचा आशय तात्काल कसा जाणता येतो? या घनगंभीर घोषात तो आवाज लुप्त कसा होत नाही? पण असे तर नसेल की, त्याच्याशी मी इतकी एकतान, समरस झालेली असल्यामुळे माझ्या अंत:करणातूनच त्याचा स्वर, शब्दरूप घेतो आहे आणि या बाह्य व्यत्ययांचा त्याच्यावर मुळीच परिणाम होऊ शकत नाही! त्यांच्या परिणामापासून तो स्वर पूर्णतया मुक्त आहे!
पण या विचारांच्या मागे चित्त दवडण्यापेक्षा ते मला माझ्या पावलांवर, चढणीच्या वाटेवर केंद्रित केले पाहिजे. नाहीतर या प्रपाताच्या आघातामुळे माझा चुरा होऊन, मी मृत होऊन जाईन.
माझा जीव मला असा अशक्य कोटीतला, साहसी प्रयत्न करण्याची प्रेरणा देईल का? पण हा चढ, हा आरोह आमचे सत्त्व घेण्यासाठीच सज्ज झाला आहे, असे मला वाटते. माझ्या सार्‍या शक्ती, धैर्य, बुद्धी आणि श्रद्धा यांची कसोटी पाहणारा हा जणू निकषच आहे.
या कठीण मार्गावर आम्ही परस्परांच्या निकट उभे होतो. खडकासमोर आम्ही एकाच मालिकेत सूत्रित झालो होतो. खडकांवर उगवलेल्या नेचांच्या मुळांवर पाय ठेवीत प्रत्येकजण चढण्याचा प्रयत्न करीत होता. छोट्या छोट्या झुडपांची, रोपट्यांची मुळे खडकांच्या फटीत खोलवर रुजली होती, त्यांचा आम्ही हाताने आधार घेत होतो.
त्या बालतरूंवर लक्षपूर्वक पाऊल ठेवताना माझ्या ध्यानात आले, प्रकाशमान जीवांच्या त्या सृष्टीत आम्हाला आलंब देणार्‍या, साहाय्यहस्त देणार्‍या त्या वनस्पती, काही आगळ्याच तेजाने प्रस्फुरित होत होत्या. क्षणभर स्थिर होऊन, नि:श्वास टाकून मी त्यांच्याकडे पाहत राहिले आणि विनयपूर्वक त्यांना म्हटले,
“माझ्या पदाघाताने तुमच्या मुळांना थोडी वेदना होईल खरी; पण तुमचे उन्मूलन होणार नाही, अशी सतत काळजी घेऊन मी पाऊल टाकीन.”
“त्यासाठी तर या स्थळी आमचे अस्तित्व आहे.” उच्च असा संघ-स्वर माझ्या श्रवणावर पडू लागला:
“याबद्दल तुम्ही विषाद वाटून घेऊ नका, खेद करू नका. तुला प्रपाताजवळ भेटलेल्या त्या छोट्या अप्सरेने सांगितले असेल की, आम्ही तुला अवश्य साहाय्य करू. तुमचे पाऊल पुढे पडावे, तुम्ही प्रगतिमान व्हावे, म्हणून हसत हसत बलिदान करायला आम्ही उत्सुक आहोत. आमच्या देहावरील प्रत्येक आघाताबरोबर आम्ही या मुक्तिमार्गावर, पूर्णत्वाच्या, त्या धवल-गिरी-शिखराच्या दिशेने, अधिक वर वर चढतो आहोत.”
“धन्यवाद, धन्यवाद!”, असीम कृतज्ञतेने भारावून मी उद्गारले. “तुम्हाला कमीत कमी वेदना होतील अशी काळजी मी घेत आहे.”
‘या स्थितीत खाली दृष्टी वळविणे ठीक नाही; पण माझ्या साथीदारांना विसरून, त्यांच्याकडे दुर्लक्ष करून कसे चालेल?”, या विचाराने मी एका भक्कम झाडाला घट्ट धरून नजर खाली वळविली. आणि हे काय? माझ्या पाठोपाठ चढण्याचा प्रयत्न करीत असलेल्या माझ्या एका मित्राचा आधार सुटून त्याचा तोल जात होता.
तत्काल मी माझ्या सार्‍या अवयवांची शक्ती एकवटून एका हाताने त्याचे मनगट पकडले व त्याला सावरले. त्याला आपला तोल सावरायला अवधी मिळाला. दुखावलेल्या पावलांना जरा कुरवाळायला त्याला मी अवसर दिला आणि मग त्याने दुसरा बळकट आधार घेतला.
“अशा कठीण चढणीवर दीर्घ, खोल श्वास घेऊन पाऊल टाकावे.” माझ्या मार्गदर्शकाने सुचविले.
गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीला प्रतिरोध करण्याचा हा आमचा पहिला धडा असावा. दीर्घ श्वास घेऊन मी तो आत आवरून धरला आणि उद्गारले, “खरंच, आता किती हलकं वाटतं आहे!”
त्याची ही सूचना आम्ही एकमेकांना सांगितली. अशा प्रकारे चढता चढता आम्ही कड्याच्या शिखराजवळ येऊन पोहोचलो. परन्तु पाण्याची ती भिंत आणि खडक यांच्यामधली वाट, ती पोकळी आता इतकी निरुन्द झाली होती की, पुढे पाऊल टाकणे केवळ अशक्य होते. अन्य मार्ग शोधणे अगदी अपरिहार्य होते. त्या अरुन्द वाटेवर मी मोठ्या शर्थीने स्वत:ला सावरले होते. जलतुषारांचा थंडगार वर्षाव होत होता.
पाण्याच्या वेगवान् जोषामुळे एक वायुमंडल निर्माण होत होते. त्याचा प्रत्याघात मला चांगलाच जाणवत होता. मला माझ्या देहाला लघुत्व द्यावे लागले. एकीकडे शीत पर्जन्याचा वर्षाव होत होता, पण टपटप ठिबकणार्‍या घर्मबिंदूंच्या धारांना आवरणे शक्य नव्हते. देहाच्या रन्ध्रारन्ध्रांतून ऊन ऊन घर्मबिन्दू ठिबकत होते. सर्वस्व पणाला लावून मी पुन्हा धडपडू लागले, आधार शोधू लागले.
श्वासासाठी धडपडत मी स्वत:शी पुटपुटले, “येथले वृक्ष तरी जरा मोठाले दिसतात.” कड्याच्या खालच्या बाजूला झाडाचे एकादे बळकट मूळ हातांत धरता येईल व त्याच्या आधाराने कड्यावर एकदम चढून जाता येईल, अशी आशा मनात डोकावू लागली. मी एकदम आवेशाने उद्गारले, “असे एकादे मूळ इथे असलेच पाहिजे. पण माझी बोटे बधिर झाली आहेत; माझ्या पायांत वळ येत आहेत. खरोखर माझी शक्ती संपुष्टात आली आहे.
“शिखराच्या इतके जवळ येऊन, आता तेथे न पोचणे म्हणजे केवढी निराशा!” एवढे मी बोलले आणि पुन्हा माझी निकराची धडपड सुरू झाली.
ज्याला पकडून मी वर सरकू शकेन, असा एकही आलंब माझ्या दृष्टीत येईना. निराशेचे थर एकावर एक चढू लागले. तेथे हरित तृणांकुरांशिवाय जवळपास काहीच दिसेना. त्या तृणपर्णांना मी कशी पकडणार?
इतक्यात, मी एका वन्य, हिंस्र पशूची गर्जना ऐकली. बाप रे! त्वरितच एका वनराजाच्या अक्राळविक्राळ, भयानक आयाळीचे, लालबुंद जिव्हाग्राचे व चवताळलेल्या चेहर्‍याचे दर्शन झाले. माझी पाचावर धारण बसली.
‘हेच ते भयानक दिव्य! यांतून मी बाहेर कशी पडणार?’
पण मला भीतीचा स्पर्श होण्यापूर्वीच हृदयात प्रीतीची अनुभूती जागृत झाली. माझ्या अन्त:करणातून दैवी प्रेमाचा एक किरण तीरासारखा सुटून थेट त्या सिंहाच्या अन्त:करणात प्रविष्ट व प्रकट झाला. पुनश्च मी तो स्वर्गीय नाद ऐकला,
‘जेथे आहे पवित्र प्रीती, तिथे कुणाची कसली भीती।’
त्या मृगेन्द्राने आपली दन्तावली माझ्या मानेवरील गळपट्टीत सरकन् रुतवली होती; आता मला तो झपाट्याने कड्यावर ओढून घेऊ लागला.
मनात आले, माझ्या गळपट्टीची बटणे तुटणार तर नाहीत ना? एकीकडे माझे हात इवल्याश्या तृणपर्णांवर आश्रयासाठी स्थिर होत होते. प्रथम माझा एक गुडघा मी कड्यावर टेकला आणि नन्तर माझे दोन्ही पाय सुखरूप त्या कड्यावर स्थिर झाले. आता मात्र मला आनन्दाचे भरते आले. मोठमोठ्याने मी हसू लागले.
या अद्भुत प्रयत्नांत येणारे यश किंवा अपयश अक्षरश: एका बिसतन्तूवर, एका केसावर, नशिबावरच अवलंबून होते. आणि तसे पाहिले तर, या अनुभवांत लक्षणा, कविकल्पना, तुलना यांना अवसर कोठे आहे? प्रत्यक्षात हे एक केशाकर्षण नव्हते काय?
मी स्वत:ला सांवरले. एके ठिकाणी बसण्याचा प्रयत्न केला व माझे ते संभ्रम-हास्य, ते अविचारी खिदळणे एकदम आवरले.
मला संकटमुक्त करणार्‍या त्या महान् जीवाकडे मी नीट न्याहाळून पाहिले. पुन्हा माझे हास्य अनावर होऊ लागले.
मी म्हटले, “तू सिंह नव्हेस, तुला तर पंख आहेत. आणि तुझी मुद्रा तर कारुण्याचे कारंजे आहे. तू कोण? तुझे खरे स्वरूप कोणते?”
त्याने एक गूढगंभीर आवाज केला.
“मी सेन्ट मार्कचा सिंह आहे”, असे जणू काय तो म्हणत होता.
हे घनगूढ विधान ऐकून माझे हसे थांबले. आता माझ्या मनाला एक विलक्षण विस्मयाचा स्पर्श झाल्यासारखे वाटले. पण मी या विस्मयाकडे सहेतुक दुर्लक्ष केले, कारण मला एक उदात्त, अर्थपूर्ण असा क्षण समोर आल्यासारखे वाटले.
“तू मला पकडण्यासाठी खाली डोकावलास तेव्हा तुझ्या डोळ्यांत एक आशय, एक हेतु तरंगताना मी पाहिला. खरे का हे?”, मी विचारले.
“होय”, त्याने उत्तर दिले, “ ‘भिऊ नकोस. मी अलगद तुला वर घेणार आहे. त्यासाठी तुला धरण्याचा, पकडण्याचा प्रयत्न करीत आहे’, हाच आशय माझ्या नेत्रकिरणांतून प्रकट करण्याचा प्रयत्न मी करत होतो.”
पण, मी भीतीने इतकी गांगरले होते व स्वत:च्या प्राण-संकटांतून सुटण्याची इतकी धडपड करीत होते की, तशा परिस्थितीत त्याच्या मनातील आशय मला समजू शकला नाही.
तो सिंह पुढे म्हणाला, “पण तुझी प्रतिक्रिया अगदी इष्ट व आवश्यक तीच झाली. तुझ्या अन्त:करणातून प्रीतीचा एक तीक्ष्ण, तरल किरण थेट माझ्या अन्तरंगात प्रविष्ट झाला.
“ही अद्भुत सिद्धी तुझ्या ठिकाणी होती; हे उच्च उदात्त प्रेम तुझ्याजवळ होते. सर्व विश्वाशी एकात्मता साधण्याची युक्ती व शक्ती तुला अवगत होती, यातच तुझे खरे यश व विजय आहे. तुला भीती वाटत होती हे खरे, पण तशा त्या प्राणसंकटात थोडी भीती वाटणे साहजिक नव्हे का?
“त्या भीती-प्रीतीच्या द्वंद्वात प्रीती विजयी ठरली. हेच तुझ्या ठिकाणचे वैशिष्ट्य व सामर्थ्य होय. विरोध नसेल, मोह नसेल, परीक्षा नसेल तर कोठल्याही सद्गुणाला, शौर्याला, प्रतिष्ठेला किंमत तरी किती देता येईल? ती कशी देणार? तेज तरी कसे चढणार?
“तसे पाहिलेस, तर तुझ्या त्या दिव्य विश्वप्रीतीमुळेच, अद्वैतसिद्धीमुळे, मी तुला वर घेऊ शकलो. तुझ्या मनातल्या भीतीचा विजय झाला असता तर माझेही सामर्थ्य, संरक्षणशक्ती दुबळी ठरली असती. तू मागे सरली असतीस व तुला पकडणे मला अशक्य झाले असते.” सेंट मार्क्सचा ‘लायन’ धीरगंभीर स्वरांत बोलला.
माझ्या मनात एक विचार चमकून गेला, ‘माझ्या गळपट्टीची दोन बटणे किती य:कश्चित, क्षुद्र वस्तू त्या! समजा, ती बटणे नसतीच, किंवा तुटलेली असती, तर त्या सिंहाने मला कसे खेचून घेतले असते?
‘ज्या वस्तू, जे अनुभव, जे क्षण आपणास अगदी क्षुद्र, क्षुल्लक वाटतात, त्यांना केव्हा केव्हा या विशाल विश्वसंसारात अद्भुत, ऐतिहासिक व अतर्क्य महत्त्व प्राप्त होऊ शकते.’
मला माझ्या, किंबहुना, सर्व मानवतेच्या अल्पज्ञेची, अज्ञानाची कींव आली. थिटे आणि मोठे, लहान आणि थोर, क्षुद्र आणि भव्य यांतले भेद खरोखर आपल्याला कळतात का? किंबहुना, हे भेद खरोखर तेथे असतात का? जीवनातले सर्व महत्त्वमापन ही एक अर्थहीन, भ्रामक आणि प्रमादपूर्ण प्रक्रिया असेल का?
आपल्या ज्या क्षणिक प्रक्रिया असतात, त्यासुद्धा किती महत्त्वपूर्ण व निर्णायक ठरू शकतात! त्यांच्यामागेसुद्धा केवढा प्रदीर्घ, ऐतिहासिक व भव्य पार्श्व असू शकतो!
शेजारीच माझा हिरण्य-पुरुष कड्याखाली निरखून पाहात होता.
अरे, माझ्या सहप्रवाशांचा मला पूर्ण विसर पडला होता. “वनराज, माझे दोन्ही किंवा एक पाय तरी तुम्ही घट्ट दाबून धरा, म्हणजे मी या माझ्या सर्व सहचरांना वर येण्यासाठी हात देऊ शकेन. वनराज, तुमचं असं आहे की, तुमची नखं तुम्ही जमिनीत रोवू शकता; तुमचा पंजा जमिनीला पकडू शकतो; पण माझे पाय काय, पट्‌दिशी सरकायचे!”
एवढे मी म्हटल्यावर स्वारीने माझे पाय दाबून धरले. मग मी निर्धास्तपणे कड्यावरून खाली हात सोडले. माझी नजर माझ्या साथीदारांवर गेली. त्यांच्या सहनशक्तीची सीमा सरली होती. खरोखरच ते सर्व खालच्या खोल दरीत देहत्याग करण्यास तयार झालेले दिसले. त्यांना आशा उरली नव्हती. काडीचाही आधार कोठे दिसेना. ‘न ययौ न तस्थौ’ अशा दोलायमान अवस्थेत त्यांचे मन आणि शरीर अधिक एक क्षणदेखील राहणे अशक्य झाले होते. त्यांच्याकडे लावलेल्या माझ्या नजरेत त्यांना एक सर्वसंरक्षक असा आधार दिसला. मी माझा हात खाली सोडला होता.
माझा हात पकडण्यासाठी लागणारे बळ त्यांनी पुन्हा एकदा कसेबसे एकवटले; आणि माझ्या हाताची अगदी घट्ट पकड घेऊन ती सर्व मंडळी एकामागून एक सुरक्षितपणे वर चढली. त्यांच्या चेहर्‍यावर सुरक्षिततेचा, या दिव्यातून पार पडल्याचा भाव अगदी स्पष्टपणे उमटला होता.
तितक्यात त्यांना त्या ‘सेन्ट मार्क’ च्या मृगेन्द्राचे ओझरते दर्शन झाले. स्वत: मृगेंद्र स्तब्ध पडले होते; त्यांच्या चेहर्‍यावर एक सूक्ष्म व गूढ आनन्द ओसंडत असलेला दिसला. ही मृगेन्द्रमूर्ती माझ्या सहचरांच्या दृष्टिपथात आल्याबरोबर ते सर्वजण स्तिमित, दिङ्मूढ झाले.
मलाही माझ्या संभ्रम-हास्याची आठवण झाली. आठवण कसली? मी अगदी पहिल्यासारखी वेडसरपणे खिदळू लागले! तोंडातून शब्दोच्चार करण्याचा अवस्थेत आल्याबरोबर मी त्या मृगेंद्राचा परिचय करून दिला.
“मित्रांनो, हे ‘सेंट मार्क’ चे मृगेंद्र आहेत.”
“जर हे ‘सेंट मार्क’ चे मृगेंद्र असतील, तर दुसर्‍या काही दिव्य जीवांचेही वास्तव्य येथे असणारच. तेही आपल्याला येथे आढळतील असा माझा तर्क आहे.” हे शब्द, मला वाटते, या क्षणी आमचा एक अबोल स्वभावाचा सहप्रवासी प्रथमच बोलला.
“दुसरे कोणते जीव? दिव्य आत्मे कोठले? कोणाचा तुम्ही उल्लेख करता आहात?”, मी त्याला विचारले.
“दिव्य वृषभ, खगश्रेष्ठ गरूड आणि महामानव येथे असले पाहिजेत. त्यांचेही येथे वास्तव्य अपेक्षित आहे.”
“पण हे आपल्याला निश्चित कसे म्हणता येईल? येथे जवळपास त्यांच्या अस्तित्वाचा कानोसा अजून तरी लागत नाही”, मी बोलले.
हे उद्गार माझ्या तोंडून बाहेर पडत असताना माझी नजर त्या मृगराजाच्या मुद्रेकडे वळली. त्याचे मुख आनंदाने उजळले होते. ते पाहून मात्र, मला माझ्या मित्राच्या विधानाची सत्यता पटू लागली.
“होय, होय, आपले म्हणणे बरोबर आहे. येथे त्यांचे अस्तित्व असेल यात शंका नाही. चला, आपण सर्वजण त्यांचा शोध करू”, मी एकदम उद्गारले.
याच दिदृक्षेने, अपेक्षेने, विश्रान्ती संपवून नव्या उत्साहाने, ताजेतवाने होऊन आम्ही खडे झालो. सभोवार दृष्टी फिरविली आणि समोरचे ते संमोहक दृश्य पाहून आमच्या हृदयाचे स्पन्दन थांबले. हृदय एकदम स्थिरावले, शान्त झाले. एक अद्भुत सौन्दर्यपट आमच्या दृष्टीसमोर विस्तारला होता!
त्या भव्य, उदात्त, मनोहारी दृश्याने आम्ही मन्त्रमुग्ध झालो. अगदी भारून गेलो, वेडावून गेलो. क्रमाक्रमाने उंचावत जाणारी ती प्रचंड दरी आमच्या दृष्टीच्या सीमेपार पसरली होती. शान्त, संथ वाहणारी ती सरिता, तिचा नि:शब्द प्रवाह, दोन्ही तीरांवर हिरवळ घेऊन गतिमान् होऊन पुढे चालला होता.
आणि या जलौघाने आमच्या मार्गांत, आमच्या आरोहात किती अडथळे आणले होते! आपल्या अवखळ, उच्छृंखल, बेफाम खळखळाटाने आमच्या मनात केवढे भय उत्पन्न केले होते! तीच ही नदी, आता आपल्या गूढगंभीर आणि मधुर दर्शनाने आमच्या अन्त:करणांत उत्साह, आल्हाद आणि एक प्रकारचे अबोध आकर्षण निर्माण करीत होती.
आणि हिच्या दोन्ही तीरांना आच्छादून टाकणारी मृदु आणि स्निग्ध हिरवळ ... पण हिरवळ कशी? ही तृणपर्णे हिरवी कुठे दिसत आहेत?
इन्द्रनील मण्यांची गर्द निळी मखमल येथे अंथरल्यासारखी दिसत आहे. वर वितानलेल्या नीलांबराचा नीलिमा या तृणांत जणू परार्वातत झाला आहे.
या सौन्दर्य-समाधीतून मी थोडीशी भानावर आले. पावलांना मृदू स्पर्श करणार्‍या त्या निळ्या तृणावर मी वाकले. एक चिमुकले नील-पुष्प तिथे डोलत होते. या अशाच फुलांनी येथली भूमी झाकली गेली होती. ही नीलकमले, अक्षयफुले असली पाहिजेत; आणि हा नील-कमलांचा गालिचा! किती अद्भुत, स्वर्गीय व रम्य दृश्य हे!
पण यात आश्चर्य वाटण्यासारखे काय आहे? या स्वर्गंगेच्या तटांवर, या अलौकिक, दिव्य भूमीवर कोणता चमत्कार संभवत नाही?
त्याच क्षणी एक उच्च स्वर, सर्वांची एक गर्जना, चढत्या तार स्वरांत वर गेलेली मला ऐकू आली.
तो पहा, प्रवाहाच्या पैलतीरावर दिव्य वृषभराज स्वच्छंद विहरत आहे. अरे वा, त्याला पंखही आहेत. आणि वर दृष्टी टाका, आपल्या बरोबर, शीर्ष-मध्यावर पण खूप उंच तो पक्षीश्रेष्ठ गरुत्मन्! किती डौलानं, ऐटीनं तो तीरासारखा सूर्याकडे झेपावत आहे! आणि किती सहज, स्वच्छंदतेनं, लीलेनं नभोवितानांत तरंगत आहे!
काही क्षण मी मन्त्रमुग्ध होऊन, उडणार्‍या त्या भव्य आकृतीकडे पहात राहिले. आणि एकदम मला वाटले, तो महामानव, तोही या परिसरातच असला पाहिजे.
आणि माझ्या अन्त:करणातून जणू आनन्दाची कारंजी उडू लागली; आनन्दाच्या लहरी उचंबळू लागल्या. खळखळत्या निर्झरात सारखे जल-बुद्‌बुद्‌ उठत असतात; अगदी तसे, माझे मोदभाव उदित होऊ लागले.
आनन्दाचा एक अस्फुट चीत्कार माझ्या तोंडून बाहेर पडला. मी ओरडले, “तिकडे पहा, तेथेच आहे तो महामानव! प्रवाहाच्या या तीरावरच, थोड्या अन्तरावर तो उभा आहे.
“तो इकडे, आपल्या दिशेनं येत आहे. काय भव्य मूर्ती आहे! ‘नमवी पहा भूमि हा चालताना!’ त्याच्या मस्तकावर इन्द्रधनूचा मेघमुकुट शोभतो आहे. अरे होय. हे आपणा सर्वांचे श्रीसद्गुरु!”
आम्ही त्यांच्याकडे धाव घेतली. आमचा आनन्द गगनात मावेना. आमच्या मुखांतून हर्षोद्गार बाहेर उड्या घेत होते. माय-मृगीकडे तिच्या पाडसाने उड्या घ्याव्यात, पान्हेलेल्या गाउलीकडे वासराने टुणटुण उड्या मारीत जावे, अगदी तसे आमच्या अन्त:करणांत श्रीगुरुमाउलीचे प्रेम जागे झाले. खरे पाहिले, तर त्यांच्या ठिकाणी असलेल्या अप्रकट वात्सल्यभावाची ही सहज प्रतिक्रिया होती.
पण मी पायांनी कुठे धावत होते? त्या वनस्थलीवरून वरच्यावर, अलगद मी तरंगत चालले आहे, असा सुखद भास मला होत होता. माझा देह, हिमपुष्पांच्या परागासारखा, एखाद्या अभ्रासारखा हलका झाला होता. त्या भयप्रद आरोहानन्तर, समभूमीवर, सपाटीवर आल्यामुळे असा हलकेपणा आला असेल काय?
त्या निसरड्या शेवाळ्याला, त्या ओबडधोबड, कठीण प्रस्तरांना माझी पावले सरावलेली होती. त्यांना या सपाट भूमीवरून ... छे! निळ्या मुलायम गालिच्यावरून चालताना असे वाटणे स्वाभाविक नव्हते काय? माझी पावले क्वचितच त्या तृणांकुरांना स्पर्श करीत होती; अन् वेगाने धावणार्‍या माझ्या मित्रांच्या पायांखाली ती अक्षयफुले, ती लहानगी नीलपुष्पे कळत नकळत वाकत होती. त्यांना लवमात्रही वेदना होत नसावी, असे मला वाटले.
काही क्षणांतच, त्या आनन्द-वन भूमीवरचे आम्ही सारे सहप्रवासी श्रीसद्गुरुंच्या भोवती उभे राहिलो आणि परस्परांच्या हातांत हात गुन्तवून, फेर धरून नृत्य करू लागलो. केन्द्रस्थ असलेल्या श्रीसद्गुरुंच्या वात्सल्यपूर्ण नेत्रांतून कृपाकटाक्षांची पखरण आमच्यावर होत होती. कोवळ्या कोवळ्या उन्हाच्या सोनसळ्या अंगावर पडल्या. म्हणजे जशी उष्ण-मन्द स्पर्शाची सुखद अनुभूती येते, अगदी तसेच आम्हा सर्वांना वाटले.
त्यांनी आम्हाला आसनस्थ होण्याची खूण केली. ‘सुस्वागतम्!’ त्यांची चारच सान्द्रगंभीर अक्षरे - पण त्या चार अक्षरांत चारी वेदांचे ज्ञान, चारी दिशांनी एकदम वर्षाव करीत येणार्‍या प्रेममेघांनी सांडलेले साक्षात् जीवनच, आमच्या चित्ताला आनन्दवून गेले, उजळून व सुखवून गेले.
“छान झाले!”, गुरुमाउली म्हणाली, “त्या अखेरच्या दिव्यातून, त्या कड्यावरून तुम्ही सर्व सुखरूप येथे येऊन पोहोचलात. तुम्हाला किती श्रम झाले असतील; यातना, वेदना झाल्या असतील, याची मला पूर्ण जाणीव आहे. या क्षणी तुम्हा सर्वांना आनन्दसागरात पोहोताना मी पहात आहे. वा! असे क्षण तुमच्या अनुभवांत अवतीर्ण होतील, अशी कल्पना तरी पूर्वी तुम्हाला झाली होती का?
“थोड्याच वेळापूर्वी तुम्हाला वेदना, यातना झाल्या, त्यांचा साक्षात् परिणाम म्हणजे आत्ता तुम्हाला होणारा आनन्द! हा आनन्द त्या यातनांशिवाय कधीच उपभोगता आला नसता.
ही जी लघुता, अ-जडता तुम्ही अनुभवीत आहात, तिचे बीज तुमच्या तीव्रतम प्रयत्नांनी जागविलेल्या, आविष्कृत केलेल्या सुप्त शक्तीत आहे.
“हे पहा, जीवमात्राने आपला कर्माशय गतिमान् राखला पाहिजे. आपली कर्मेन्द्रिये, ज्ञानेन्द्रिये सारखी कार्यप्रवण ठेवावी लागतात. इन्द्रियग्रामाच्या या अखंड गतिमत्वामुळे, अनन्त जन्मोजन्मींच्या कर्मविपाकांत दडून बसलेल्या, थिजलेल्या आणि निजलेल्या नवनव स्फूर्ती साकार होत राहतात. तुम्हाला कल्पना नसेल, इतक्या दैवी शक्तींचा अधिवास तुमच्या ठिकाणी आहे.
“कर्मप्रवण राहिले, प्रयत्नशील असले म्हणजे आपले निरनिराळे गुण, आपल्या अनेक सुप्त व गुप्त शक्ती प्रकट होऊ लागतात.
“कर्मनियतीचे एक आवाहन असते; एक हाक असते. तो आवाज, तो ध्वनी ओळखावा लागतो. ओळख पटल्यावर एकाग्रतेने त्या विशिष्ट दिशेने पावले टाकीत राहणे हेच आपले श्रेष्ठतम कर्तव्य ठरते. तुम्ही सर्वांनी ती हाक ऐकली, खूण ओळखली. हे तुमचे महद्भाग्य होय. यात तुमच्या जीवनाचे सार्थक आहे.
“आता मात्र थोडा वेळ तुम्ही विश्रान्ती घेतली पाहिजे. या सरित्प्रवाहाशेजारी, या नदीच्या पवित्र संगतीत नि:स्तब्धपणे पडून रहा. थोडे आडवे व्हा. अन्तर्मुख होऊन स्वत:च्या अनुभवांचे मूल्यमापन करा.
“आजपर्यंत घेतलेल्या विविध अनुभवांतले रहस्य उकलून पहा. आपले अनुभव विशाल व अस्ताव्यस्त असतात. त्यांचा मध्यबिंदू शोधावा लागतो, त्यांचा अर्थ लावावा लागतो. मधून मधून असे सिंहावलोकन करणे फार आवश्यक व उपकारक असते.”
मी तेथील तृणांच्या व फुलांच्या शय्येवर पहुडले होते.
ही तृणस्थली हिरवी नव्हती, पाचूची नव्हती; ती नीलमण्यांची होती. गर्द निळसर अशी ही तृणस्थली गूढ, गर्द निळसर अशा या अवस्थेला अधिक समुचित होती; आणि हा नदीकाठदेखील!
दंवबिंन्दूंची वर्षा जशी संथपणे होत राहते, तशीच एक अनुपम शान्ती आमच्या अंतरंगावर शीतल छाया पसरवीत होती. ही शान्ती स्वर्गांतून, नन्दनवनांतून, ऊर्ध्वदिशेकडून खाली आल्यासारखी भासली, ती अधोवर्धिनी, नि:स्तब्ध, गूढ शान्तता आमच्या अन्तरंगांतही हळूहळू पसरत होती.
ती सारी अश्व:स्थली गर्द गर्द नीलिम्यात अन्तर्धान पावत होती; विलीन होत होती. जो काही अल्पस्वल्प चन्देरी प्रकाश मागे रेंगाळत होता, तो सारा श्रीगुरुदेवांच्या भोवती नवोनव वलये निर्माण करीत राहिला; आणि त्यांच्या मुखमंडलापासून त्या प्रकाशपुंजांतून इन्द्रधनूचे सप्तरंग आम्हाकडे परावर्तित झाले होते. शुभ्र प्रकाशाचा पुंज श्रीगुरुदेवांच्या मुखमंडलाशी जाताच, इन्द्रधनूच्या सप्तरंगांत त्या प्रकाशाचे का व कसे रूपान्तर होऊ शकले, या कूटप्रश्नाने आमच्या चित्तचक्षूंपुढे एक प्रचंड प्रश्नचिन्ह उभे केले होते.
हे सप्तरंग दृश्य होते, तसेच श्राव्यही होते. इन्द्रधनुष्याच्या सप्तवर्णांचे हे सप्तस्वर असतील काय? रंगसंगति व स्वरसंमेलन ही एकाच वस्तूची दोन दर्शने, दोन अंगे, दोन अनुभव, दोन आभास असू शकतील काय?
त्या सात रंगांच्या दर्शनाबरोबरच त्यांचं एक दिव्य श्रुतिसप्तक ऐकू येत असताना, ही रंगसंगति खरी का हे स्वरसंगीत खरे, असा आमच्या मनांत संभ्रम उत्पन्न होई.
ध्यान-बीज (७)
म्हणौनि जे जे उचित। आणि अवसरें करूनि प्राप्त।
तें कर्म हेतुरहित। आचरे तूं।।
- ज्ञानेश्वरी, अध्याय ३, ओवी ७८

पुस्तकाचे चॅप्टर्स

संपूर्ण पुस्तक वाचण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा.

You may keep up to date with our updates by subscribing to RSS feed of this website. RSS Feed is available at www.maharshivinod.org/rss.xml

श्रीगुरुपादुकोदयस्तोत्रम्


आज मुहूर्तवूं या एक नित्योत्सव।
अद्वैत आमोदें, जेणे फुलेल हें विश्व।
क्षणोक्षण प्रभातेल नवोनव महापर्व।
प्रसादचिन्ह श्री-श्री-श्रीविद्येचें।।१।।

परा, परापरा, अपरा।
श्रीगुरूपुजा ही त्रिशिरा।
विमर्शा माऊलीची ही स्तनदुग्धधारा।
ओष्ठविण्याचा समय हा।।२।।

‘अपरा’ आराधनेंत भेद-ग्रह-स्थिती।
‘परापरा’ अवस्थेंत भेद-अग्रह-वृत्ती।
‘परा’ अवस्थानांत अभेद-स्फूर्ती।
श्रीगुरूपुजेची पादुका ही।।३।।

आदिभान हें परात्परगुरुबीज।
विमर्शशक्ती श्रीशिवा गुरूविद्येची गुह्यशेज।
जीवूजीवूचा पहिला परिव्राज।
गुरूपादुकेचें आलोचन ।।४।।

एक उफराटे अ-कुल ब्रह्मपद्म।
तेथ निष्कलेचे निजशक्तीधाम।
निर्झरले व्यापिनीचे श्यामव्योम।
अमृतमेघ वोसंडला।।५।।

चतुष्कोणी देवतात्म्यांचे उगमस्थान।
बिंदुस्थली अमृतसिद्धीचें अनुभावन।
यथाक्रम आंतर अनुभवांचें अनुस्थापन।
श्रीगुरूविद्येचा सहजाचार हा।।६।।

‘विमर्श’ म्हणजे आदिभानस्थित चित्शक्ती।
पादुकोदय म्हणजे शिवशिवेची साम्यरसस्थिती।
गुरूकृपयैव या भाग्यश्रीची समवाप्ती।
‘गुरूकृपा’ ये नामें जीवू जीवूचें निरवस्थान।।७।।

‘चार’ म्हणजे सोपचार आराधन।
‘राव’ म्हणजे विमर्शशक्तीचें उपयोजन।
‘चरू’ म्हणजे द्रव्यगुणांचे संयोगीकरण।
‘मुद्रा’ या नांवे प्रतीकाचा प्रत्यंगभाव।।८।।

चित्गगन-चंद्रिकेची फेसाळली जान्हवी।
श्रीगुरूकृपेची वेल्हाळली की पान्हवी।
प्रकटली वा नीलाब्जाची श्रीसुषमा अभिनवी।
श्रीपादुकोदय स्तोत्र हें ।।९।।

श्रीनवशुक्तिकांचा सम्यक् समुल्लेख।
येथ दशोपनिषद्रहस्याचे महावार्तिक।
आदिकृपेचा जणुं संतताभिषेक।
श्रीगुरूपादुकोदयस्तोत्रम्।।१०।।

।।इति श्री गुरूपादुकोदय स्तोत्रम्।।
------------------------------