You are hereसहावे पाऊल / सहावे पाऊल

सहावे पाऊल


“प्रज्ञानाची बीजे वाढविली पाहिजेत. त्यांचे संरक्षण करणे अत्यन्त आवश्यक आहे. प्रज्ञान-शक्तीनेच अखिल विश्वाची धारणा होत असते. अहंकार नाहीसा होऊन विशुद्ध झालेल्या प्रज्ञानाला प्रतिकार करू शकेल अशी शक्ती या विश्वात कोणतीही नाही.”
- हायरार्की, पान ११०
जेव्हा मी डोळे उघडले, तेव्हा मला विषाद वाटला, श्रीसद्गुरु अन्तर्धान पावले होते. ते अदृश्य होतील, अशी चोरटी भीती व रुखरुख मनाला लागलेली होती.
आम्ही प्रगतिपथावर असावे, एखादी अडचण, एखादे संकट, एखादे दिव्य आम्हाला सामोरे येणार असावे, अगदी नेमके त्या क्षणी, त्याच वेळी अदृश्य होण्याचा श्रीगुरुदेवांचा नेहमीचा परिपाठ होता. ते तसे अदृश्य न झाले तर आश्चर्य!
अदृश्य होण्यात त्यांचा काही तरी हेतू असावा हे स्पष्ट आहे. आम्हाला स्वावलंबन शिकविण्यासाठी, आमची स्फ़ूर्ती, विचारशक्ती व प्रयत्नशक्ती कार्यप्रवण ठेवण्यासाठी, आम्हाला टाकून दूर जाणे हे आवश्यक नव्हे का? आई जवळ असली की, मूल तिच्या कडेवर बसण्यासाठी उत्सुक असणारच. आईलादेखील त्या लाडक्या लहानग्याचे आक्रन्दन, वर उभारलेले चिमुकले हात व केविलवाणी मुद्रा निर्दयतेने अव्हेरता येत नाही.
श्रीसद्गुरु काही वेळ दुरावले नाहीत, तर आम्ही जागच्या जागी बसून राहू.
त्यांनी नेहमी आम्हाला पुढे पुढे, ओढत, फरपटत न्यावं, अशी आपण अपेक्षा कशी ठेवायची? असल्या अनुयायित्वाला, अनुगमनाला विकास कसा म्हणता येईल? ती आमची स्वत:ची प्र-गती ठरेल काय?
“शिवाय तसे त्यांनी केले तर ते निरर्थक ठरणार नाही काय?”, मी हिरण्य-पुरुषाला विचारले.
“अर्थात्”, त्याचे प्रत्युत्तर आले.
मी स्वत:शी गुणगुणले, “माझ्या कल्पनेप्रमाणे श्रीसद्गुरु जवळपास आहेत; त्यांचे सान्निध्य अखंड व अविरत आहे. ‘अदृश्य’ किंवा ‘अन्तर्धान’ या शब्दांतून ‘ते दूर गेले’, असा अर्थ कुठे निघतो? ‘ते दिसेनासे झाले’, असा त्या शब्दांचा स्पष्ट अर्थ नव्हे का? दृष्टीआड जाणे म्हणजे काही दूर जाणे नव्हे; अगदी निकट असूनदेखील न दिसणे, हे सर्वथैव शक्य आहे.
या विचाराने माझ्या चित्तातली निराशा नाहीशी झाली; माझे मन स्वस्थ झालेसे वाटले; पण त्याबरोबर या अपरिचित व विलक्षण उपपत्तीमुळे मनातील गोंधळ मात्र कमी झाला नाही.
‘प्रत्यक्ष दूर गेल्याशिवाय अदृश्य कसे व्हावयाचे? दृश्यतेचा, दर्शनक्षमतेचा अर्थ तरी काय? दृश्यतेच्या गुणविशेषामुळे प्राप्त होणार्‍या सापेक्षतेचे स्वरूप तरी काय असावे? वस्तू, नेत्र व प्रकाश या त्रयींचा अन्तर्भाव दृश्यतेत होत असणारच.’
माझ्या बुद्धीची, विचारशक्तीची अ-गतिकता ओळखून तो सुवर्ण-पुरुष म्हणाला, “तुला वाटते तेवढे त्यात कठीण काहीच नाही. तुला वस्तू दृश्य वाटते, त्याचे कारण असे की, तुझी प्रेक्षणशक्ती, तुझे डोळे प्रकाशलहरींच्या विशिष्ट परिणामाशी नियुक्त आहेत, परिचित आहेत. प्रकाशलहरींचा विशिष्ट वेग, परिणाम व तुझी प्रेक्षणशक्ति यांचा नियत, आवश्यक तो संबंध साधला नाही, तर कोणतीही वस्तू तुला दिसणार नाही. तुझी प्रेक्षणशक्ति सप्त-वर्णात्मक प्रकाशपटाच्या अत्यल्प भागाशीच तेवढी, प्रतिक्रिया करण्यास समर्थ आहे. संपूर्ण प्रकाशपटाचा फार मोठा भाग तुझ्या प्रेक्षणशक्तीच्या पलीकडे आहे. प्रकाशपटाच्या ज्या भागातील लहरींचा वेग व परिणाम तुझ्या प्रेक्षणशक्तीशी सहस्पन्दन करू शकतात, तेवढा भाग तुला दृश्य होतो.
“अदृश्य होणे म्हणजे प्रेक्षणशक्तीच्या पलीकडे जाणे. व्यक्तीचे किंवा वस्तूचे अस्तित्व म्हणजे सूक्ष्म प्रकाशलहरींच्या एका विशिष्ट परिणामांचे फलित कार्य होय. हे प्रकाशलहरींच्या वेगाचे परिमाण, विशिष्ट प्रमाणात वाढविले अगर कमी केले, तरी वस्तू अदृश्य होते. प्रकाशलहरींच्या वेगाचे परिणाम, सामान्य प्रेक्षणशक्तीच्या कक्षेबाहेर गेले, म्हणजे कोणतीही वस्तू साहजिकच अदृश्य होणार.”
मला हे विवेचन पटले व मी म्हटले, “आता माझ्या लक्षात आले. पण आता दुसरा प्रश्न उद्भवतो. हा स्पन्द-वेग, हे प्रकाशलहरींचे परिणाम कसे बदलता येतील? त्याची प्रक्रिया कोणती? हा वेग बदलणे खरोखर आपल्या ताब्यात तरी आहे का? असला अधिकार केव्हा प्राप्त होतो? या अधिकार-योगाची साधना कोणती?”
हिरण्य-पुरुष म्हणाला, “ती प्रक्रिया सोपी नाही. या तुझ्या प्रश्नाचे स्वरूप असे आहे की, त्याचे उत्तर, अनुभूतीच्या विशिष्ट अवस्थेत मिळू शकेल. आध्यात्मिक उत्क्रान्ती, आन्तरविकास जेव्हा एका उच्चकोटीला पोचतो, तेव्हा ही अवस्था प्राप्त होते. ही प्रक्रिया तुला साधली, स्वत: अनुभविता आली, म्हणजे त्यातले कार्यकारणभाव व अन्त:स्वरूप तुझ्या पूर्णपणे लक्षात येईल. शब्दशक्तीच्या आवाक्याबाहेरची ही गूढ तत्त्वे आहेत. ‘अचिन्त्या: खलु ये भावा: न तांस्तर्केण चिन्तयेत्।’ जे अनुभव, जे भाव नुसत्या चिन्तनाने आकळत नाहीत, जे तर्कातीत आहेत, त्यांचा उलगडा, त्यांचा अन्वयार्थ केवळ बुद्धिगम्य शब्दांनी केव्हाही सांगणे शक्य नाही.”
“मी स्वत: माझ्या स्पन्द-वेगाचे परिणाम वाढवू शकेन का? मी अदृश्य होऊ शकेन का? आणि अदृश्यावस्थेतून पुन्हा दृश्यश्रेणीत येण्याची सिद्धी मला प्राप्त होईल काय? खरेच असे होईल?”, मी विचारले.
“अर्थात्, हे सामर्थ्य तुला प्राप्त होईल. मी ज्याप्रमाणे कोणत्याही क्षणी गुप्त होऊ शकतो आणि माझ्या इच्छेप्रमाणे पुन्हा प्रकट होऊ शकतो, त्याप्रमाणे तुलाही स्वेच्छेने अवस्थांतर करता येईल”, हिरण्य-पुरुष उत्तरला.
या उद्गारानंतर सुवर्ण-पुरुषाची मूर्ती निमिषार्धात दिसेनाशी झाली.
“नको, नको, असा एकाएकी दृष्टीआड होऊ नकोस”, अगतिक होऊन, व्याकूळ होऊन मी उद्गारले, “तुझे खरे अन्त:स्वरूप आता कोठे माझ्या जाणिवेत येत आहे. तुझ्या प्रकाशात मी नुकतीच कुठे वाटचाल करू लागले आहे आणि एवढ्यात तू मला टाकून जाणार? मला एकाकी टाकणार? एवढा मोलाचा अनुभव आल्यावर आता मला तुझा वियोग कसा सहन होईल?”
“ठीक आहे”, असे त्याचे शब्द मी ऐकले आणि पुनश्च मला साक्षात् आनन्दस्वरूप अशा सुवर्णदेहाचे दर्शन झाले. “मला तुझ्यासाठी एवढे सिद्ध करायचे होते की, सामान्यत: अशक्य असे वाटणारे चमत्कार, अशा सिद्धी हे आत्मतत्त्वाचे स्वभावसिद्ध गुणविशेष आहेत. तसे पाहिले तर सिद्धी, विशुद्ध आध्यात्मिक दृष्टीने, विशेष महत्त्वाच्या नाहीत. पतंजलीसारख्या योगशास्त्राच्या प्रणेत्याने या सर्व सिद्धींचा, समाधिमार्गातले व्यत्यय, अडथळे, अंतराय म्हणून उल्लेख केलेला आहे!”, हिरण्य-पुरुष उद्गारला.
खरंच, मी हे विचार व विकल्प मनात येऊ देण्यापेक्षा माझ्या पुढील यात्रेविषयी जागृत राहणे अधिक आवश्यक आहे, नव्हे का?
माझे सह-यात्रिकसुद्धा याच अंत:प्रेरणेने जागृत झालेले दिसले. ते तर पावलेदेखील टाकू लागले.
मला वाटते, पुनश्च त्या सामुदायिक आकांक्षेच्या शक्तीचा हा परिणाम असावा. आम्हा सर्वांच्या अन्त:करणात एकवटलेल्या प्रेरणेने त्या वादळात, त्या झंझावातात केवढा चमत्कार घडवून आणला होता! त्या क्रुद्ध, सन्तप्त वरुणराजाच्या तांडवाला पूर्ण शान्त करण्याचे सामर्थ्य आम्हा सर्वांच्या एकत्रित निश्चयात प्रकट झाले होते. आता कसोटीच्या प्रारंभी या सामुदायिक प्रयत्नांच्या, विचारांच्या सामर्थ्याचा प्रभाव कसा प्रकट होतो, पाहू या!
माझ्या कपड्यांवरचे धुळीचे कण मी झाडून टाकले. माझे पातळ अगदी चुरगळले होते, ते जरा नीट सावरले - आणि माझ्या लक्षात आले - माझी वस्त्रे पूर्णपणे कोरडी झाली होती.
माझे कपडे उन्हामुळे वाळले असावेत काय? पण, भिजले होते तरी केव्हा? ते ओले झाल्याचे तर मला आठवत नाही. हो, मी किती तरी वेळ अधिक महत्त्वपूर्ण विषयात रंगून गेले होते. नंतर भुकेची आठवण होऊन मी एकदम चमकले. मला अगदी ठराविक वेळी, अगदी ठराविक तासाला खावयाची सवय. पण मी केव्हा अन्नग्रहण केले होते, याचादेखील या क्षणी मला विसर पडला. त्या काळ्याकभिन्न वनमार्गात मी सापडले होते. तेव्हापासून व त्यानंतरही माझ्या पोटात अन्नाचा कणही गेला नव्हता. काय आश्चर्य! मी श्रमले नव्हते, मला भुकेचे भानही राहिले नव्हते.
पुनश्च, जणू काही माझ्या प्रश्नाचे उत्तर म्हणून तो दूर, सुदूर उमटलेला आवाज माझ्या कानी आला.
“मला एक दिव्य अन्न मिळते, तुला त्याची चव काय ठाऊक?”
माझ्यापेक्षा जीझसचे अनुयायी व शिष्य अधिक सू-ज्ञ नव्हते. त्यांनीही माझा प्रश्न जीझसला विचारला असला पाहिजे. त्याशिवाय जीझसने वरील वाक्य, त्यांच्या प्रश्नाचे उत्तर म्हणून, उच्चारले नसते. त्यांनाही ज्या अन्नाची चव माहीत नव्हती, ते अमृतान्न मला कसे ठाऊक असणार?
मला एवढे मात्र वाटले की, माझ्या अज्ञानाला जीझसच्या शिष्यांची साथ आहे ... काहीतरी विचार मनात आला इतकेच! तसे पाहिले, तर कोणत्याच अर्थाने जीझसच्या शिष्यांची व माझी तुलना होऊ शकत नाही. त्यांच्या अज्ञानाची जातदेखील, माझ्या अज्ञानाहून कितीतरी वेगळी असेल, वरची असेल.
‘कोणी जीझसला खावयाला काही अन्न आणले आहे काय?’, या प्रश्नाला जीझसने वरील उत्तर दिले होते.
“जीझसने दिलेले उत्तर आपण लक्षात ठेवले पाहिजे”, माझ्या विचारशृंखलेचा अखेरचा दुवा उचलीत तो सुवर्ण-पुरुष म्हणाला, “माझ्या विश्वव्यापी व सर्वज्ञ परमेश्वराने मला जगती-तलावर पाठविले आहे. त्याची आज्ञा, त्याची इच्छा हेच माझे अन्न! त्याची इच्छा व्यक्त करण्यासाठी, सफल करण्यासाठी मी प्रयत्न करीत राहिलो की, त्या कर्मयोगात माझ्या जीवाला खुरेखरे अन्न मिळते, माझ्या प्राणांचे पोषण होते.”
मी प्रतिप्रश्न केला, “जीझसची ही वाक्ये माझ्या समस्येवर कुठला प्रकाश टाकतात? कोणती उकल करतात, हे माझ्या अजून लक्षात आले नाही.”
“जोपर्यंत तुझ्या अन्तरात्म्याची आकांक्षा, हेतू तू सफल करण्याच्या प्रयत्नात आहेस, जोपर्यंत तू माझ्यामागे येत आहेस तोपर्यंत तुझा योगक्षेम व्यवस्थित चालेल. गीतेतले श्रीकृष्णाचे वचन ध्यानात घे. ‘योगक्षेमं वहाम्यहम्‌।’
“मी तुझ्या शारीरिक व वैयक्तिक गरजांची तेवढी पूर्ती करीन. पण, तुझ्या मनाप्रमाणे, मर्जीप्रमाणे तुला अत्यंत रोचक, आवश्यक भासणार्‍या सर्व वस्तू मी तुला देईन असे नव्हे. मला योग्य वाटतील तेवढीच तुझी आवश्यके मी पुरवू शकेन.
“तुला ठाऊक आहे ना? पुरेपूर चाळीस वर्षे इझ्रायलची प्रजा पोसली जात होती, सांभाळली जात होती. पण ही प्रजा, या व्यक्ती, दिवसा, सूर्यप्रकाश असताना एका तेजोमय मेघस्तंभाचे अनुगमन करीत होत्या. या प्रकाशस्तंभामागून जात असताना त्यांच्या मनाचा क्षणभरदेखील विक्षेप झाला नाही. त्यांचे एकदेखील पाऊल मार्गाबाहेर पडले नाही. अशी ध्येयनिष्ठा, एकाग्रता व समर्पणबुद्धी असल्यावर आणि असली तरच, योगक्षेमाची अडचण केव्हाही पडत नाही. ती इझ्रायलची मुले रात्रौ अन्धार पडल्यावर एका अग्निस्तंभाला न्याहाळीत त्याच्या मागोमाग आपली यात्रा सुरू ठेवीत”, सुवर्ण-पुरुष क्षणभर थांबून पुढे म्हणाला,
“या प्रवासात, या यात्रेत त्यांचे अन्न कोणते होते? ती प्रजा काय खात असे?”
“त्यांचे अन्न म्हणजे स्वर्गातल्या, नन्दनवनातल्या अमृत-पुष्पांतला मधु होता”, मी म्हणाले.
“अगदी बरोबर. वातावरणातून त्यांचे अन्न प्रक्षेपित केले जाई. पण तुला आठवत असेल, ते लोक जरा ताठर वृत्तीचे, अहंमन्य होते. त्यांना कुणी काही सांगितले तरी सहसा पटत नसे. आणि म्हणून हे अमृतान्न प्रत्यक्ष दिसावे, हातात धरता यावे, तळहातावर घेता यावे; म्हणून त्या अन्नाला घनरूप, जडरूप देणे आवश्यक होत असे. एरवी ते स्वर्गीय अन्न त्यांनी खाल्ले नसते. खरोखर, त्या अन्नाला घनत्व, जडत्व देण्याची वास्तविक जरूरी नव्हती. जीवात्म्याच्या विशिष्ट अवस्थेत जीवात्म्याच्या विशिष्ट विकासानंतर, हे अमृतान्न वातावरणातून एकदम ग्रहण करता येते. त्या अवस्थेत त्या अन्नाला घनत्व व जडत्व देण्याची आवश्यकता नसते.
“वनस्पति व औषधी यांच्या माध्यमाशिवाय, प्रकाशातील काही घटकांचे संकलन करणार्‍या साधनांशिवाय, या दिव्य अन्नाचे ग्रहण करता येते. सामान्यत: सूर्यप्रकाशाच्या साह्याने वातावरणातले जलतत्त्व आणि कर्ब-द्वि-प्राणिल यांचा संयोग होऊन पुन्हा त्यांचे रूपान्तर पिष्ट व शर्करा यांच्या स्वरूपात होते. परन्तु ही सर्व प्रक्रिया डावलून एकदम अन्नरसाचे ग्रहण करणे सर्वथैव शक्य आह”, हिरण्य-पुरुषाचे विवेचन संपले.
“मला हे विधान पटत नाही, माझ्या लक्षात येत नाही. पण मला कोठूनतरी अन्नरसाचा पुरवठा सुरू होता हे मात्र निश्चित. निदान येवढे खरे की, मी भुकेली नाही किंवा तृषार्त नाही.” माझा अनुभव मी सांगितला.
एवढे बोलल्यावर, मी सभोवताली पहात पुन: म्हटले, “अरे, माझं कुत्रं कुठं आहे? तेसुद्धा या दिव्य अन्नावर राहू शकतं की काय?”
मी समोर पाहिले, तो त्या कुत्र्याचा पूर्ण कायापालट झाला होता. जलप्रवाहातून आल्याचा तर हा परिणाम झाला नसेल? त्याची मूर्ती लहान झाली होती. वर्ण काळा राहिला नव्हता, धूसर झाला होता - आणि त्याच्या ठिकाणचे जडत्व, घनत्व व स्थूलत्व पार नष्ट झाले होते. त्याच्या मूर्तीची बहिर्रेषा विवर्ण व अन्धुक झाली होती. तरीपण त्याच्या देहाला पारदर्शकत्व नव्हते. प्रकाशकिरणे त्याच्या देहात शिरल्यावर तेथेच लय पावत होती, प्रकाश-लहरी आरपार जावयाला जी सूक्ष्म विरलता लागते ती, अजून त्या श्वानदेहाला प्राप्त झाली नव्हती.
“बिचारा! या माझ्या पुराणपशूला अन्न मिळाले नाही. अन्न मिळाले असते, तर त्याची अशी अवस्था झाली नसती; आणि, एवढा दीर्घकाळ मला त्याचे विस्मरण झाले, हा माझा दोष नाही का? माझे हे पाप नव्हे का?”
या जाणिवेने मी त्याच्या मुद्रेकडे न्याहाळून पाहिले. पण तो मुळीच श्रमलेला किंवा कष्टी झालेला दिसत नव्हता. क्षुधेची वेदना त्याच्या मुद्रेवर मला दिसली नाही. उलट त्याच्या डोळ्यांत एक चमक होती, कान ताठ उभे होते आणि त्याची गुलाबी जिव्हा तोंडातून बाहेर लवलवत होती. तो अधिकच संतुष्ट दिसला. त्याच्या तोंडावर हुशारी आणि उत्साहही दिसत होता. जणू तो पुढच्या प्रवासासाठी उत्सुक झाला होता, तयार झाला होता.
त्याचा तो कायापालट पाहून आणि इतक्या श्रमानन्तरही त्याच्या वृत्ती तरतरीत झालेल्या पाहून, मी आश्चर्यमूढ झाले. अगदी गोंधळून गेले.
माझी ती विस्मयमूढ मुद्रा पाहून माझा सुवर्णपुरुष उद्गारला, “तुझ्या या सहचर-श्वानाचे संपूर्ण रूपान्तर होत आहे आणि हे साहजिक नव्हे का? त्याचे रूपान्तर होणारच. तुझे चित्त माझ्या मूर्तीवर जसजसे एकाग्र होईल, तल्लीन होईल, तसतसे त्या श्वानाकडचे तुझे लक्ष कमी होत जाईल. आणि हेच व्हावयास हवे आहे.
“तू त्याला विसरत नाहीस अथवा मुद्दाम त्याला डोळ्याआड करीत नाहीस, चित्ताबाहेर टाकत नाहीस, ही चांगली गोष्ट आहे. तुझ्या जीवाला दुसरीकडे कोठेतरी आनन्द मिळू लागला आहे, दुसर्‍या विचारांचा आलंब निर्माण झाला आहे आणि म्हणून तुझ्या अन्त:शक्ती, त्या विचारांचा मागोवा घेत असतात. विचार बदलले की, अन्त:शक्तींचे लक्ष्यही बदलते. नव्या विचारांकडे त्या अन्त:शक्तींचा विनियोग होऊ लागतो.
“यामुळे साहजिक त्याच्या देहाला लघुत्व येत आहे. त्याचा रंग गर्द कृष्ण राहिला नाही. आता तो धूलि-धूसर झाला आहे. त्याला पूर्वीचे जडत्व, घनत्व राहिले नाही.
“आता डोंगरचढाईला तुला पूर्वीइतके ओझे राहिले नाही. तुझा भार हलका झाला आहे.
मी म्हटले, “पण, त्याला एवढा सन्तोष, आनन्द आणि समाधान तरी कसले होत आहे, ते माझ्या ध्यानात येत नाही. तुम्हाला साहजिक असे वाटेल की, माझे दुर्लक्ष झाल्यामुळे त्याला विषाद वाटला व देहाला लघुत्व आल्यामुळे तो खिन्न झाला.”
हिरण्य-पुरुष संथपणे बोलू लागला, “त्या कर्मपशूला स्वत:मध्ये केवढे स्थित्यंतर होत आहे, कोणत्या अनुभूतींतून त्याचा जीव प्रगत होत आहे, याची कशी कल्पना असणार? पण त्याला एक सहजधारणा आहे की, सर्वथैव समुचित, योग्य, श्रेयस्कर अशाच घटना घडत आहेत.
“हे पहा, त्याचे अस्तित्व पूर्णपणे नष्ट होणार नाही. शरीर कोमेजणे किंवा त्याला लघुत्व येणे, म्हणजे त्याच्या अस्तित्वाचा अन्त नव्हे. तो फक्त दृष्टिपथात राहणार नाही. तुझ्याकडे व तुझ्यामध्ये आकृष्ट झाल्यामुळे आणि प्रकाशपुंजात त्याचे हळूहळू रूपान्तर झाल्यामुळे तो अधिकाधिक अदृश्य होत राहील, एवढेच. अदृश्यतेचा अर्थ तुला माहीत आहे ना?
“त्याच्या देहाच्या घटकतत्त्वांचा, परमाणूंचा वेग, गति-परिमाण अनन्त पटीने वृद्धिंगत होईल व त्यामुळे तो प्रेक्षणशक्तीच्या पलीकडे गेलेला असेल”, सुवर्ण-पुरुषाने स्पष्टीकरण केले.
“असं आहे काय!”, माझ्या तोंडून आश्चर्योद्गार बाहेर पडले.
पुनश्च, एक परिचित स्वर माझ्या आन्तर् श्रवणेंद्रियाला सुखस्पर्श करून गेला:
“मी जर थोडा वरच्या श्रेणीवर गेलो तर त्याला, सर्वांना माझ्याकडे व वरच्या श्रेणीवर मी आकृष्ट करून घेईन ...”
त्या सुवर्ण-पुरुषाकडून प्रत्युत्तर प्रकटले, “अगदी बरोबर.”
हा आमचा विचार-विनिमय बराच वेळ चालला होता, असा मला भास झाला. माझ्या सहयात्रिकांची मी क्षमा मागितली. ते आपले कपडे साफसूफ करीत होते, त्यांवर उडालेली धूळ झटकून टाकीत होते. पुष्कळ वेळ बसल्यामुळे त्यांना कंटाळाही आला होता. इतक्यातच ते आडवे होऊ लागले होते.
मी स्वत:शीच म्हटले, “इतका वेळ लागला की काय! हा कालाचा अनुभव, हा कालाचा कूट प्रश्न, अधिकाधिक बुचकळ्यात टाकत आहे. पुन्हा केव्हातरी त्याचा विचार केला पाहिजे. पण, ‘केव्हातरी’ म्हटल्यावर त्या शब्दातदेखील काळाचा अन्तर्भाव झाला की!”
प्रत्येक विधानात व विचारात ‘काल’ हा शब्द सारखा डोकावतच असतो. ‘पुन्हा केव्हातरी’, ‘दुसर्‍या वेळी’ मी याचा विचार कसा करू शकेन? ‘हा क्षण’, ‘हा काल’ म्हणजे काय, हे मला समजले नाही, मग ‘दुसरा क्षण’ आणि ‘दुसरा काळ’ तरी कसा समजेल?
या विचारचक्राने मी अगतिक झाले होते. मागे दलदलीत अडकलेला तो मनुष्य, इतक्यात मला हाका मारू लागला. त्याच्या चेहर्‍यावर संभ्रम उमटला होता. पण त्याच्या त्या आवाजामुळे मी त्या ‘कालचक्राच्या’ बाहेर पडले, एवढे मात्र खरे.
तो म्हणाला, “आपण सरोवराच्या या तीराला पोचल्यानंतरही सूर्य जागच्या जागी स्थिर आहे. मी सारखे लक्ष ठेवून होतो, विचार करीत होतो, नीट न्याहाळून पाहात होतो. पण तो जेथल्या तेथेच आहे. हे खरे आहे का? तुम्हालाही असेच वाटते का?”
मी त्या प्रश्नाचे उत्तर न देता एवढेच म्हटले, “आपण पुढे चालायला लागू या.” पण पुन्हा मला प्रश्न पडला, ‘पुढे म्हणजे कोठे? येथून जाणार तरी कसे? यापुढे एकही पाऊल टाकणे अशक्य वाटते.’
जोषुआ आणि इझ्राएलची प्रजा यांनादेखील त्यांचे इष्टपदावर, स्वर्भूमीवर, आरोहण होण्यापूर्वी अशा तर्‍हेची अगतिकता वाटली होती. नुकत्याच वाचलेल्या बायबलातल्या गोष्टी मनात येत होत्या.
मी मोठ्याने बोलले, “पण मला तर हे शक्य वाटत नाही.”
पूर्वी दलदलीत फसलेला माझा मित्र माझ्या विधानावर भाष्य करीत म्हणाला, “तुम्ही म्हणता ते खरे. या पर्वतराजींकडे दृष्टी लावून आपण नुसते विचार करीत स्तब्ध राहिलो आहोत, स्थिर उभे आहोत, पण हा सूर्य आकाशात असाच कायमचा प्रकाशत राहणार नाही; आपला सर्वांचा निश्चय होईपर्यंत तो असाच अनंत काळपर्यंत थांबणार आहे का?
“सर्वांनी एकत्र येऊन, एकविचाराने आपण निश्चित योजना ठरवूया व आरोहणाला प्रारंभ करू या.”
या क्षणी आम्ही सर्वजण पर्वताला अभिमुख होतो. त्याचे भास्वर शिखर मेघाच्छादित दिसत होते. ‘या विरल मेघपटांतून त्याचे अगदी ओझरते तरी दर्शन आम्हाला होत आहे’, असा माझ्या मनात एक स्फ़ूर्तिप्रद विचार डोकावला.
पुन्हा आमच्या संघातील एक आरोहक बोलू लागला, सरोवरातल्या पाण्यातून चालत असताना त्याच्याच पायांतून बळ, पेटके येत होते.
“आपल्यासमोरचा हा पर्वत दाट वनराजीनं आच्छादलेला दिसतो. दृष्टी पोचते तिथपर्यंत, उंचच उंच वृक्ष आणि त्यांमधून वाढलेल्या करवंदीच्या जाळीशिवाय कोणताही पदार्थ इथे दिसत नाही. येथून चढण्यासाठी एखादी पाऊलवाटसुद्धा सापडणार नाही. पण आपल्या उजव्या बाजूला कुठल्यातरी झर्‍याची झुळझुळ मात्र माझ्या कानांवर येत आहे.
“या घनदाट अरण्यांतून, पर्वताच्या या उतरणीवरून या झर्‍याने अरुंद का होईना, कठीण का असेना, पण वाट काढलीच आहे. त्याच्या उतरत्या प्रवाहाबरोबरच, पण उलट्या दिशेने आपण चालत राहू या. निदान प्रारंभी तरी ही एकच शक्यता मला दिसते.”
किंकर्तव्यमूढ होऊन पर्वताकडे आम्ही नुसते पाहत बसलो होतो. या वेळी आम्हाला ही सूचना किती शहाणपणाची आणि स्वागतार्ह वाटली! आम्ही तत्काळ चालू लागलो, सारेजण त्या निर्झराच्या आवाजाच्या दिशेने पावले टाकू लागलो.
चालता चालता मी मागे वळून पाहिले. सरोवराला पार करून, त्याला मागे टाकून जात असताना, आम्हाला ते अगदी नि:स्तब्ध पण घननील वर्णाचे दिसत होते. आम्ही त्याच्या तीरावर प्रथम आलो, तेव्हा पहिल्याच दृष्टिक्षेपात ते जसे शान्त गंभीर दिसले होते, अगदी तसेच आताही दिसत होते.
आमच्यापुढे कपोत पक्षी उडताना दिसत होते. आमच्या तेथील अस्तित्वाची त्यांना जाणीवही नव्हती. ओणवलेल्या फान्दीवरून एखादा बलाकपक्षी, माशावर झडप घालताना दिसे. त्याच्या झडपेमुळे पाण्याचा नीलिमा अधिकच लकाकू लागे. खारी इकडून तिकडे बागडत होत्या. त्यांच्या पावलांचे ठसे वाळूवर उमटलेले दिसत होते. एक लहानगा ससा थोडा दूर ऐटीत बसला होता; तो एखाद्या शिलेत जणू काय कोरून ठेवल्यासारखा, स्थिरचित्राकृति कोरीव लेण्यासारखा दिसत होता. क्वचित् त्याचे नासिकाग्र स्फुरण पावे, एवढीच त्याच्या जिवन्तपणाची खूण!
करवंदाच्या जाळींतून एक कोल्हा आपले कान उभारून तीक्ष्ण नजरेने आमच्याकडे पाहत होता. मी पुटपुटले, “हे एक निराळेच विश्व आहे! येथील प्रत्येक गोष्ट किती अद्भुत आहे! इथले हे सर्व जीव, समोर उडणारे पक्षी, बलाक, खारी, ससा आणि कोल्हा या सर्वांना आम्हा माणसांची जरादेखील भीती वाटत नाही. कदाचित् त्यांनी आम्हाला पाहिले नसेल; पण परस्परांचीही त्यांना भीती वाटत नाही. येथील मोठमोठ्या वन्य, हिंस्र पशूंमध्ये एकमेकांविषयी अशी निर्भयता असेल का? असणारच. हे निर्भयतेचे विश्व दिसते. येथे रानमांजरे, अस्वले, मृगराज असणारच. पलीकडच्या पर्वतराजीमध्ये आणखी किती प्रकारचे हिंस्र प्राणी असतील कोणास ठाऊक!”
इतक्यात आमचा सुवर्ण-पुरुष म्हणाला, “एवढ्यात विसरलात का? त्या मागल्या अरण्यात तुमचा मार्ग रोखून बसणार्‍या भयानक हिंस्र पशूंना तुम्ही क्षणार्धात कसे शान्त केले होते? बस्स्. एवढ्यातच त्या प्रसंगाची विस्मृति झाली?”
त्याच्या शब्दात किंचितदेखील मला दोष देण्याची भावना नव्हती, पण माझ्या विस्मृतीदोषाची मला जाणीव झाली. हा माझा मोठाच प्रमाद झाला, असे मला वाटल्याशिवाय राहिले नाही. मी थोडी ओशाळले; पण मोकळेपणाने बोलले,
“क्षणभर मला विस्मृती झाली होती खरी. मला वाटतं, आपण प्रेमाच्या प्रबल शक्तीबद्दल मला सुचवीत आहात.
“जेथ असे प्रीत। तेथ कुठुनी भीती’ हे जीझसचे वाक्य सहज माझ्या स्मरणात आले. भीतीबरोबर संकटही नाहीसे होते. भीती गेली की, संकट असे काही शिल्लकच राहत नाही, असा त्याचा अर्थ ना?”
हिरण्य-पुरुष एकदम उत्तरला, “अगदी बरोबर. ज्याला आपण संकट म्हणतो, ती एक छाया आहे. भीतीमुळे ही छाया आपल्यापुढे नाचू लागते. त्या दलदलीत असताना, भीतीदेखील स्वत: एक छायाच असते, हे तुमच्या लक्षात आले होते. वास्तवतेच्या, सत्याच्या प्रकाशाला आच्छादित करणार्‍या मनोविकारांच्या धुक्याची स्वत: भीती ही एक छाया आहे. लक्षात आले ना?
“ज्याला आपण संकट म्हणतो, अरिष्ट म्हणतो; ती एका छायेची छाया आहे. या दोन्ही छाया विशुद्ध, परिपूर्ण प्रेमाच्या प्रकाशकिरणांनी अस्तंगत होतात. विकृती, भीती, अरिष्ट व प्रीती हे चार शब्द, चार बिन्दू लक्षात ठेव. विकारांमुळे भीतीची छाया, भीतीमुळे अरिष्टाची छाया आणि प्रीतीमुळे या दोन्ही छायांचा संपूर्ण निरास!”
थोडे थांबून तो पुढे म्हणाला, “तुला स्वत:ला याचा प्रत्यक्ष अनुभव आहे. मग माझ्या शब्दांची, माझ्या साक्षीची जरूरच कोठे उरली?”
मी म्हटले, “आपण म्हणता ते खरे. पण मला वाटते, त्या व या अनुभवात महदन्तर आहे. जो पशू मी माणसाळवला होता, तो माझा स्वत:चाच एक अंश होता; तो माझा कर्मपशू होता. घनदाट धुके दूर झाले, तेथेसुद्धा, त्या चमत्कारातदेखील, एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. वास्तविक जेथे एक सुन्दर वनस्थली होती, तेथे एक दलदलीचा खड्डा आहे, असा आभास होत होता. आभास दूर होणे व स्वत:चाच एक अंशभूत असलेला कर्मपशू शान्त करणे, हे दोन्ही अनुभव आश्चर्यकारक खरे; पण, प्रत्यक्ष अस्वले व सिंह यांना शान्त करणे, काबूत आणणे हा विक्रम फारच विलक्षण आहे. या वास्तवतेतल्या भयानक पशुसंघर्षाची पहिल्या दोन चमत्कारांशी कशी तुलना करता येईल?”
सुवर्ण-पुरुष म्हणाला, “तू मोठीच चूक करीत आहेस. आपल्या अन्तरंगातल्या पशूला काबूत आणणे, हीच गोष्ट अधिक कठीण आहे. बाहेरचे भयानक व हिंस्र पशू आवरणे, शान्त करणे खरोखर तितके कठीण नाही; पण प्रेमशक्तीची ही विशाल क्षितिजे तुला स्वत:ला स्वानुभवाने व स्वानुभवांतच दिसली पाहिजेत. त्या प्रेमशक्तीचे महत्त्व, तिची अमर्याद सत्ता तुला शब्दांनी सांगण्यात काही अर्थ नाही. तरीपण एका वाक्याचे स्मरण ठेव. तसा प्रसंग आलाच तर हे महावाक्य तुझी सुटका करील. It works if you work it. केल्याने होत आहे रे!”
सुवर्ण-पुरुष पुढे म्हणाला, “या क्षणी मी तुला एवढे सांगू शकतो: सर्व विश्वाची जीवनशक्ती, चैतन्यशक्ती एक प्रेमतत्त्वच आहे. प्रत्येक वस्तूचे, जातमात्राचे अन्तस्तत्त्व, प्रेम ही शक्ती आहे. हिंस्र पशू व हिंस्रतर मानव यांच्यामध्येदेखील शेवटी प्रेमशक्तीचेच वर्चस्व आहे. प्रेमाच्या अधिष्ठानावरच हिंस्र व क्रूर जीवांची धारणा आहे. त्यामुळे जर एखाद्या व्यक्तीने विशुद्ध प्रेमाचा किरण हिंस्र पशूकडे प्रक्षिप्त केला, तर तो किरण त्याच्या जीवनतत्त्वाशी जाऊन भिडतो. ते जीवनतत्त्व विशुद्ध प्रेमाने ओतप्रोत भरलेले असते. या विशुद्ध प्रेमतत्त्वाची जागृती झाल्याबरोबर त्यांच्या प्रतिक्रियेत व आचरणात क्षणार्धात विलक्षण बदल होतो. अनेक वेळा, त्या हिंस्र पशूंना त्यांच्या ठायींच्या प्रेमतत्त्वाचे बौद्धिक ज्ञान नसते; तरीदेखील त्यांची वृत्ती बदलते, त्यांचा हृदयपालट होतो.
“पण या प्रेमतत्त्वाच्या एका विशेषाचा मात्र तुला क्षणमात्रही आणि अणुमात्रही विसर पडता कामा नये. कठोर अन्त:करणाला नवनीतासारखे मृदु बनविणारी ही प्रीती; भीतीचं, शंकांचं, क्रोधाचं धुकं वितळवून टाकणारा हा प्रेमकिरण, विशुद्ध, विमल भावानंच बाहेर पडला पाहिजे.
“ह्या प्रेमाच्या पाठीमागे स्व-संरक्षणाचा हेतू, भीती किंवा एखादी वैयक्तिक तृष्णा साधणं - या भावांचा अंशही असता कामा नये. मातेचं अपत्यावर जसं सहज, निरपेक्ष प्रेम असतं; प्रेम करणं या साहजिक भुकेशिवाय त्यात जसा दुसरा कोणताही भाव नसतो, दुसरे कोणतेही हेतू त्यामागे दडलेले नसतात; तसं प्रेम हवं. ते प्रेम निरपेक्ष, निर्मल असलं पाहिजे. एखाद्या अशुद्ध भावाचं मिश्रण झालं असेल, जर ही प्रीती गढूळ झाली असेल, तर तिचा प्रभाव कधीही पडणार नाही. ती आपल्या लक्ष्यावर जाऊन कशी पोचणार? तिची शक्ती अरिष्टावर, भीतीवर मात करायला असमर्थ ठरेल; अपुरी पडेल आणि ती भीती, ते संकटच तुमच्यावर आक्रमण करील.”
किनार्‍याकिनार्‍याने आमची चाल सुरू होती. मध्येच पाण्याच्या काठापर्यंत एक प्रचंड शिला पडलेली होती. तिला प्रदक्षिणा घातल्यावर आम्ही ओढ्याजवळ आलो. त्या झर्‍याच्या प्रवाहातल्या खडकावर पाणी जोरजोराने आदळत होते. सरोवराच्या जलाशयात गेल्यावरच जणू काही त्याला विश्रान्ती घ्यावयाची होती!
ओढ्याच्या पलीकडच्या बाजूला, देवदारु वृक्षांच्या अरण्याची गर्द छाया पसरली होती. तेथे एक हरिणी आणि तिचे पाडस जवळच वाढलेले शेवाळ कुरतडत होते. आमची चाहूल लागल्यामुळे ते दोन्ही प्राणी जरा चमकले. आम्ही सर्वांनी क्षणभर श्वास रोखून धरला. त्या क्षणीच्या त्या महनीय सौन्दर्य-दृश्याचे अखंड ध्यान करावे, असे आम्हा सर्वांना वाटले. ती माय-लेकरे भ्याली असती, तर आमची सौन्दर्यसमाधी भग्न झाली असती; म्हणून आम्ही आमची हालचाल अगदी नि:शब्द ठेवण्याचा प्रयत्न करीत होतो.
त्या हरिणीने कंठ उंचावला, डोके वर केले आणि आमच्याकडे मोठ्या स्निग्ध नजरेने पाहिले व पुन्हा शेवाळ कुरतडण्याचे आपले महत्कार्य तिने मोठ्या स्वानन्दात सुरू केले. ती हरिणी भ्याली नाही, आमच्या येथील अस्तित्वाची तिने नोन्दच घेतली नाही. पण थोड्या वेळानन्तर तिचे पोट भरले, म्हणून की काय, ती मागे फिरून, देवदारुच्या वृक्षराजींकडे मोठ्या डौलाने धावू लागली. तिच्या मागोमाग त्या पाडसाने टण‍्टण्‌ उड्या मारीत आपली मातृभक्ती प्रदर्शित केली.
आम्ही एक दीर्घ श्वास घेतला व एकमेकांकडे पाहून मंद स्मित केले. हा क्षण विशुद्ध, दिव्य आनंदाचा होता! आमच्या स्मृतिपटलावर तो कायमचा कोरला गेला.
ओढ्याच्या काठाकाठाने वर चढण्याच्या प्रयत्नास आम्ही लागलो. सुरुवातीला ती चढण क्रमाक्रमाने उंचावत होती. ओढ्याचे पाणीदेखील अगदी उथळ होते. करवन्दीच्या जाळ्या जेथे फारच दाटीवाटीने वाढलेल्या होत्या; तेथे आम्हाला ओढ्याच्या पाण्यात पावले टाकून पुढे सरकावे लागे.
पाणी अगदी थंडगार लागत होते. परंतु, त्याच्या शीतस्पर्शामुळे आमच्यात नवीन उत्साह आला. त्या पाण्यामध्ये काही निराळेच चैतन्य होते, उत्तेजकता होती. त्याने आमच्या पायांना जोम आला. त्या पाण्याची चव तर इतकी मधुर होती की, अमृत म्हणतात ते हेच की काय, असा विचार माझ्या चित्ताला चाटून गेला.
मी स्वत:शी पुटपुटले, ‘ह्या पाण्याला तर एक विलक्षण चटका आहे, धार आहे!’ हा झरा म्हणजे एक स्वर्गीय अमृतौघ होता, आणि तसा तो असणारच! या महामेरूच्या तुंगोत्तुंग शिखरावरील चिरंतन हिमनिचयांतून तो निर्झर पाझरत येत होता.
आणि नंतर पुन्हा एकदा मी तो दूरचा निनाद, पडसाद ऐकला! त्या पडसादांतून हे वाक्य संथपणे उमटत होते,
“विश्वेश्वराच्या अंगुष्ठातून, महेश्वराच्या महापीठांतून, उद्भवणारी ही चैतन्य-गंगा.”
आम्ही अरण्यातल्या अधिकाधिक गर्द वृक्षराजीत जाऊ श्लागलो. छाया-प्रकाशाची मनोहर गुंफण डोळ्यांसमोर दिसू लागली.
केव्हा केव्हा निळ्या-काळ्या छाया आणि त्यांच्यामधून सोनेरी प्रकाशाचे ठिपके व झुबके नाचत, बागडत खेळत होते.
ओढ्याच्या काठावरील काही जागा, काही स्थळे कायमची छायान्वित असत. तिथे देवदारु अन् इतर वन्य वृक्षही होते. निळी, पिवळी फुलपाखरे जोडीजोडीने इकडून तिकडे पिंगा घालीत होती. हे दृश्य दिसायला मोठे आकर्षक होते. ती फुलपाखरे म्हणजे जणू काही आपले देठ सोडून फिरावयास निघालेली फुलेच वाटत.
देवदारुच्या शीत हवेचा एक दीर्घ श्वास घेऊन मी म्हटले, “फुलांनो आणि पाखरांनो, तुमच्या या स्वर्गीय सौंदर्याने आणि सुवासाने मी तृप्त झाले आहे. तुमच्या या प्रासादिक दर्शनाबद्दल मी तुमची जन्मोजन्मी कृतज्ञ राहीन!”
पुन्हा मी स्वत:शी म्हटले, “मागे गेलेले ते कृष्णारण्य व हे श्वेतारण्य, पुष्पारण्य या दोन अरण्यांत केवढा मोठा फरक आहे! का हा फरक माझ्यामध्ये पडला आहे? येथे मला सहचर आहेत, साथी आहेत. त्यामुळेदेखील फरक पडणे, बदल वाटणे साहजिक आहे. कृष्णारण्यात मी अगदी एकटी सापडले होते.”
माझ्या सहचरांकडे मी न्याहाळून पाहू लागले. त्यांच्या भावनादेखील अगदी माझ्यासारख्या असाव्यात असे मला वाटले.
काही वेळ मी एका कुठल्यातरी गूढ स्वराचे ध्वनी ऐकत होते. काही वेळाने हा मन्द स्वर कानठळ्या बसविणार्‍या गर्जनेसारखा ऐकू येऊ लागला.
सुमारे शंभर यार्ड पुढे, एक उंच कडा दिसत होता. जणू काही तो अरण्यातून अचानक वर सरकला होता. त्या कड्याच्या शिखरावरून एक रजतरसाचा लोंढा धडाधड खाली उड्या घेत होता. तळ-कातळावर हा धबधबा आदळत होता आणि तेथून मोठमोठे तुषार-मेघ वरवर तरंगत, अधिक वरती जात होते.
खरोखर, येथे पडणार्‍या धबधब्यातून अनेक निर्झर निघत होते; आणि अशाच एका निर्झराच्या काठाकाठाने आम्ही येथवर आलो होतो. आम्ही सर्व या जलप्रपातापुढे उभे राहिलो. बराच वेळ आम्हाला आनंदाचे आणि आश्चर्याचे धक्के बसत होते.
काही वेळानंतर आम्ही पुन्हा भानावर आलो. मी म्हटले, “आता, यापुढे आपण निर्झराच्या काठाने कसे जाणार? मोठमोठ्या उड्या घेणारा सालमन मासातरी येथून कशी उडी घेणार व प्रपाताच्या तळापासून स्कंधावर कसा चढणार?”
आम्ही सर्व या जलप्रपाताच्या प्रवाहापाशीच होतो.
यानंतर मी क्षणभर, मऊमऊ, हिरव्यागार गवताच्या गालिचावर कलंडून बसले. मनात विचार आला, माझ्या सुवर्ण-पुरुषाचे काय झाले? बराच वेळ मला त्याचे दर्शन नाही.
“दर्शन, हा तुझा शब्द अगदी बरोबर आहे. मी जवळच आहे; पण तुला माझे ‘दर्शन’ होत नव्हते”, हा सुवर्णपुरुष प्रपाताच्या पायथ्याशी व नेचाच्या एका झुडुपावर डौलाने उभा होता. आणि काय आश्चर्य! या वेळी त्याचे मुरलीवादन सुरू होते. मुरलीचे मंदमधुर स्वर प्रपाताच्या भयंकर गर्जनेत कोठच्या कोठे विरून जात होते. त्याच्या मुद्रेभोवती एक तेजोवलय होते. त्यामधून स्रवणार्‍या प्रकाशकिरणांमुळे प्रपाताच्या तुषारमेघांमधून एक इंद्रधनुष्य साकार होत होते.
त्याची ती तेजोमूर्ती पाहून मी हर्षभरित झाले आणि त्याच वेळी त्याचे विस्मरण झाल्याबद्दल मला किंचित् लज्जाही वाटली. त्याचा उपरोध मला अस्थानी वाटला नाही.
मी म्हटले, “तुला काय म्हणावयाचे आहे ते माझ्या लक्षात आले. या सृष्टिसौंदर्याच्या ध्यानात मी मग्न झाले होते. तू सारा वेळ इथे माझ्याजवळ असूनसुद्धा तुझ्याकडे माझे लक्षच गेले नाही. आणि आता वर चढण्याची वेळ आली, कठीण प्रसंग आला आहे, तेव्हा पुन्हा मी तुला शोधू लागले आहे, असेच ना? पण माझ्या सुदैवाने, तू माझ्या प्रमादांच्या बाबतीत सहिष्णु आहेस.
पण हेही खरे की, सौंदर्यजन्य आनंदाचा आस्वाद घेण्यात, सौंदर्याची पूजा करण्यात मला काही दोष वाटत नाही”, माझी भूमिका मी मांडली व त्याने उत्तर दिले,
“नाही, नाही. सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठीच सौंदर्याची निर्मिती आहे, पण हा आस्वाद योग्य तर्‍हेने घेतला पाहिजे. सुखास्वादामध्ये, उपभोगामध्ये मला विसरणे योग्य नव्हे. कारण, त्यामुळे, तुझी स्वत:ची आत्मप्रतीती, स्व-अनुभव, आत्मज्ञान अधिक दुरावेल. पण सौंदर्याच्या आस्वादात जर तुला तुझ्या आत्मतत्त्वाची, अंतर्यामीची अधिक तीव्रतेने जाणीव झाली, अनुभूती आली; तर तो सुखास्वाद, सौंदर्यस्वाद खर्‍याखुर्‍या अर्थाने सफल झाला. तुझे आत्मतत्त्व म्हणजे सर्व विश्वाचेही आत्मतत्त्व आहे. जीवात्मा हाच जगदात्मा होय. ‘जे पिंडी ते ब्रह्मांडी.’ आत्मतत्त्वाला माझे, तुझे, त्याचे हे प्रत्यय लागत नाहीत.
“तुला, तुझ्या आत्मतत्त्वाची तीव्रतेने जाणीव झाली, तर त्या जाणिवेत जगदात्म्याच्या जाणिवेचा अंतर्भाव होतो. आत्मानुभूती म्हणजे परमात्मप्राप्ती. ज्या आस्वादाने तुला आत्मज्ञान मिळेल, म्हणजे ब्रह्मज्ञान, किंवा सर्वात्मज्ञान होईल तो आस्वाद केवळ प्रेयस्कर नसून श्रेयस्करही ठरतो. आत्मज्ञान व ब्रह्मज्ञान हे मानवी जीवनाचे सर्वश्रेष्ठ श्रेयस् आहे.” उच्च-उच्च तत्त्वज्ञान किती सोप्या शब्दांत मी ऐकले.
आता माझ्या ध्यानात आले, नुसती सत्कर्मे करून भागत नाही. तहानलेल्या जीवाला पाणी देणे, यातच तुझी सेवा आहे असे नव्हे; दयेची, औदार्याची कृत्ये करणे, एवढेच धर्माचे लक्षण नव्हे. क्षणाक्षणाला, प्रत्येक अनुभवात, सुखात आणि दु:खात, विचार करताना, प्रेम करताना, अंतरीचा भाव दर्शविताना, किंबहुना श्वासाश्वासाबरोबर तुझे नाम, तुझी उपस्थिती, तुझा आठव राहिला पाहिजे. तुझ्या अखंड, अव्याहत सान्निध्याचा अनुभव, हेच जीवनाचे ध्येय आहे. विसौंदर्याने, कुरूपतेमुळे, दु:खामुळे जर हे आत्मज्ञान व ब्रह्मज्ञान, हा स्व-रूपाठव अधिक तीव्रतेने होत असेल, तर हे सर्व अनुभव केवळ आकृति-सौंदर्यापेक्षा व क्षणजीवी इंद्रियसुखांपेक्षा अधिक महत्त्वाचे होत.” माझे स्वगत भाषण संपले.
“होय, होय”, माझा सौंदर्यसंपन्न सुवर्ण-पुरुष म्हणाला. हा होकार त्याच्या आतल्या आनंदाचे प्रतिबिंब चेहर्‍यावर बिंबविणारा होता. त्याच्या मुद्रेवर व्यक्त झालेल्या त्या आनंदशलाकांनी, प्रकाशकिरणांनी तुषारांच्या ढगांतून पुन्हा एकदा इंद्रधनुष्य साकार झाले.
नंतरचे काही क्षण मी अगदी स्तब्ध होते. त्यांच्या आनंदहास्याचे व त्या इंद्रधनुष्याचे सौंदर्य माझ्या चित्तात मी साठवून ठेवत होते. पण मनात अशी लकेर आली की, ‘या भव्य, दिव्य सौंदर्याचा व माझा काय बरे संबंध असेल? ... पण माझी चूक होत आहे. हे भव्य, दिव्य सौंदर्य मला दूर वाटते, त्याचा-माझा संबंध नाही, अशी भावना होते याचे कारण माझी विचारक्रिया सदोष आहे. माझा स्वत:चा त्या सत्सौंदर्याशी, सच्चिदानंदाशी माझ्या बाजूने संबंध घटविला पाहिजे; मी त्याच्याजवळ गेले पाहिजे. ते तत्त्व माझ्याजवळ येणार नाही. तो सिंधू आहे, मी बिंदू आहे. सच्चिदानंद हा माझा अंश नव्हे, मी सच्चिदानंदाचा अंश आहे. सान्त, मर्यादित, परिमित जीवांची ही चूक नेहमी होते. अनंत, अमर्याद, अपरिमित ब्रह्मतत्त्वात ते विलीन होत नाहीत; ब्रह्मतत्त्वाला स्वत:मध्ये विलीन करू पाहतात. ते तर सर्वथैव अशक्य ! म्हणून जीवनात आणि जगात निराशा आहे, मृत्यू आहे. अनंततेत मी विलीन झाले पाहिजे!’
हे माझे चिन्तन माझा सुवर्ण-पुरुष, त्याच्या अन्त:श्रवणाने ऐकत होता. त्या माझ्या विचारांनी त्याला इतका आनन्द झाला की, एकदम तो माझ्या शेजारी येऊन उभा राहिला.
उभी राहता राहता मी म्हटले, “मला वाटते, तुम्ही मला, ‘या जलप्रपातावरून सरळ पोहत जा’, असे म्हणणार अथवा असली काहीतरी असंभाव्य योजना आणि कल्पना माझ्यापुढे ठेवणार!”
“तसे नव्हे”, सुवर्णपुरुष म्हणाला, “ये, माझ्यामागे ये. माझ्या पावलावर पाऊल टाक.” असे म्हणत स्वारी तुषारमेघात अदृश्य झाली की! निराशेच्या खोल दरीत मी धाड्दिशी कोसळून पडले. त्याचा मुरलीनाद मला ऐकू येईना.
तरीही, मी एका क्षणाचादेखील विलंब केला नाही. झटकन् माझ्या सहचरांकडे एक दृष्टिक्षेप केला आणि त्या सर्वांना हाताने खुणावत मी, इन्द्रधनुष्याने भूषविलेल्या त्या तुषारमेघांत विलीन झाले!
ध्यान बीज (६)
कर्म-बीजम् मन:स्पंद:।
- योग-वासिष्ठ
भावार्थ:
कर्माचे बीज मनाच्या कंपनांत आहे.

पुस्तकाचे चॅप्टर्स

संपूर्ण पुस्तक वाचण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा.

You may keep up to date with our updates by subscribing to RSS feed of this website. RSS Feed is available at www.maharshivinod.org/rss.xml

श्रीगुरुपादुकोदयस्तोत्रम्


आज मुहूर्तवूं या एक नित्योत्सव।
अद्वैत आमोदें, जेणे फुलेल हें विश्व।
क्षणोक्षण प्रभातेल नवोनव महापर्व।
प्रसादचिन्ह श्री-श्री-श्रीविद्येचें।।१।।

परा, परापरा, अपरा।
श्रीगुरूपुजा ही त्रिशिरा।
विमर्शा माऊलीची ही स्तनदुग्धधारा।
ओष्ठविण्याचा समय हा।।२।।

‘अपरा’ आराधनेंत भेद-ग्रह-स्थिती।
‘परापरा’ अवस्थेंत भेद-अग्रह-वृत्ती।
‘परा’ अवस्थानांत अभेद-स्फूर्ती।
श्रीगुरूपुजेची पादुका ही।।३।।

आदिभान हें परात्परगुरुबीज।
विमर्शशक्ती श्रीशिवा गुरूविद्येची गुह्यशेज।
जीवूजीवूचा पहिला परिव्राज।
गुरूपादुकेचें आलोचन ।।४।।

एक उफराटे अ-कुल ब्रह्मपद्म।
तेथ निष्कलेचे निजशक्तीधाम।
निर्झरले व्यापिनीचे श्यामव्योम।
अमृतमेघ वोसंडला।।५।।

चतुष्कोणी देवतात्म्यांचे उगमस्थान।
बिंदुस्थली अमृतसिद्धीचें अनुभावन।
यथाक्रम आंतर अनुभवांचें अनुस्थापन।
श्रीगुरूविद्येचा सहजाचार हा।।६।।

‘विमर्श’ म्हणजे आदिभानस्थित चित्शक्ती।
पादुकोदय म्हणजे शिवशिवेची साम्यरसस्थिती।
गुरूकृपयैव या भाग्यश्रीची समवाप्ती।
‘गुरूकृपा’ ये नामें जीवू जीवूचें निरवस्थान।।७।।

‘चार’ म्हणजे सोपचार आराधन।
‘राव’ म्हणजे विमर्शशक्तीचें उपयोजन।
‘चरू’ म्हणजे द्रव्यगुणांचे संयोगीकरण।
‘मुद्रा’ या नांवे प्रतीकाचा प्रत्यंगभाव।।८।।

चित्गगन-चंद्रिकेची फेसाळली जान्हवी।
श्रीगुरूकृपेची वेल्हाळली की पान्हवी।
प्रकटली वा नीलाब्जाची श्रीसुषमा अभिनवी।
श्रीपादुकोदय स्तोत्र हें ।।९।।

श्रीनवशुक्तिकांचा सम्यक् समुल्लेख।
येथ दशोपनिषद्रहस्याचे महावार्तिक।
आदिकृपेचा जणुं संतताभिषेक।
श्रीगुरूपादुकोदयस्तोत्रम्।।१०।।

।।इति श्री गुरूपादुकोदय स्तोत्रम्।।
------------------------------