You are hereपाचवे पाऊल / पाचवे पाऊल

पाचवे पाऊल


“आम्ही म्हणतो, ‘कुठलीही वासना ठेवू नका.’ पण त्याचा अर्थ हा नव्हे की, तुम्ही निश्चेष्ट व्हा. खरोखर, आमचा आशय हा की, विशुद्ध विचाराच्या अनिवार्य आदेशाला वासनेचे स्थान घेऊ द्या. विशुद्ध विचारांची प्रेरणा सर्व प्रकाश-शक्तींना जागृत करते. त्यामुळे तुमच्या स्वाभाविक प्रयत्नशक्तीला विशुद्ध विचारांच्या प्रवाहाची साथ मिळेल.
आनंद घ्या आणि आनंद लुटा. हा वासना-पूर्तीचा नसावा. हा आनंद आत्मविकासासाठी केलेल्या प्रयत्नांच्या पराकाष्ठेमुळे उदित झालेला असावा.”
- हायरार्की, पान ५९
मी झोपेतून जागी झाले.
प्रखर प्रकाशझोताच्या स्पर्शाने मला जाग आली. मी डोळे उघडले, तेव्हा पृथ्वीतलावर काळी छाया पसरली होती. सरोवरातल्या जलपृष्ठावर तारकांचे प्रतिबिंब पडले होते. पांढुरके क्षितिज प्रभात-कालच्या प्रसाद-चिन्हाप्रमाणे भासत होते.
‘तो झगझगीत प्रकाश कोठून येत असावा बरे?’ मी स्वत:शी विचार करू लागले.
“अरे, हा माझा सोनसखा मला बोलावीत आहे”, माझ्या शेजारी उभ्या असलेल्या हिरण्य-पुरुषाचे रम्य दर्शन होताच मी उद्गारले.
जलमार्गावरून पलीकडे जाण्याचे आकर्षण मला वाटू लागले. आता त्याची मला मुळीच भीती वाटेना. पुढे जावयास मी अत्यंत उत्सुक होते. माझ्या वृत्तीतला हा अचानक बदल पाहून मी आश्चर्यमूढ झाले.
माझे कर्मश्वानसुद्धा आपली शेपटी हलवीत वरखाली उड्या घेत होते. पुढे जाण्याची केवढी ही उत्सुकता! ‘नवल आहे!’ मी विचार करू लागले, ‘या पशूला पाण्याची तर फारच आवड दिसते. कदाचित् जलतत्त्व हे त्याच्या जीवनाचा आधार असेल.’ त्याला मागे ठेवावेसे मला वाटेना. कदाचित् त्याच्याशिवाय मी पैलतीर गाठू शकले नसते. ‘मला पोहता येत नाही; पण त्याला खचित येत असेल. पुष्कळ पशूंना पोहायला येत असते.’
“चला पुढे!”, मी म्हटले. सरोवराच्या तीराकडे मी चालू लागले.
“थोडे थांबा”, माझा सुवर्ण-पुरुष उत्तरला, “ध्यानात घ्या. आपण सर्वांनी एकदम गेले पाहिजे. क्षितिजाच्या कडेवर सूर्याचे बिंब दिसू लागल्याखेरीज आपण निघता कामा नये. नाहीतर आपण कोणत्या दिशेकडे चाललो आहोत, हे आपणास उमगणार नाही.”
“समजले. मागे एक सूर्याचा किरण अरण्यामध्ये माझा मार्गदर्शक ठरला होता. आतादेखील मला वाटते, सूर्यनारायणच मला मार्ग दाखविणार.”
आमच्या समूहातील इतर व्यक्तींकडे मी पाहिले. ते सर्व जागे झाले होते. माझा दलदल-दोस्तदेखील जागा झाला होता. सर्वजण आता तयारीला लागले होते. डोळे चोळीत चोळीत जणू काय, नेत्रातली निद्रा ते कुस्करून बाहेर टाकीत होते.
दुसर्‍याच क्षणी आम्ही एकमेकांजवळ उभे राहिलो. आता आम्ही पाण्यात उतरलो होतो.
एवढ्यात दिशा चांगल्याच उजळल्या होत्या. परार्वातत सूर्यप्रकाशामुळे पाण्याचा रंग अधिकाधिक निळसर होत होता. आता तर सुवर्णप्रकाशाचा एक लांबच लांब पट्टा त्या जलाशयाच्या पृष्ठभागावर दिसू लागला.
“जलदेवतेवर श्रद्धा ठेवा”, आमच्या जलतरणपटु शिक्षकाचे शब्द आम्हाला ऐकू आले, “आणि तुमच्या सहज-प्रवृत्तीवर निष्ठा ठेवा. तुम्ही एकदा पाण्यावर तरंगू लागलात, म्हणजे, पुढे सरकण्यास पाण्याचा किती उपयोग होतो, ते तुमच्या लक्षात येईल. पाणी अडथळा करीत नाही; पाणी गती वाढविते.”
यानन्तर आम्ही पाण्यात पुढे सरकलो. आम्ही व आमचा शिक्षक सारेच नि:शब्द होतो. आम्ही अगदी निर्भय झालो होतो.
‘एकाद्या घटनेचे काल्पनिक चित्र आपणास भेडसावते. प्रत्यक्ष घटना तितकी भेसूर नसते. आपले काल्पनिक चित्र अधिक भयप्रद असते.’ माझे मन विचार करू लागले.
‘किती वेळ, किती श्रम, किती शक्ती आपण अकारण फुकट घालवितो!’ माझ्या पाठीवर मी पडले होते. तशा स्थितीत पाण्यावर तरंगत असताना मी वर पाहिले. भगवान् सूर्यनारायणाचे सुवर्ण-बिंब क्षितिजावरून चांगलेच वर सरकले होते. अनन्त अन्तरिक्षात माझ्याप्रमाणे ते सूर्यबिंब पोहत असेल काय?
‘सध्या ज्या अनुभूतींतून आम्ही जात आहोत, भगवान् सूर्यनारायणाचे जे मार्गदर्शन आम्हाला लाभले आहे; त्यावरून असे वाटते की, काल श्रवण केलेल्या महामंत्राची ही प्रतीती आहे. त्या मंत्राचा प्रगूढ अर्थ प्रत्यक्ष अनुभवात उतरत आहे.’
हिरण्मयेन पात्रेण। सत्यस्यापिहितं मुखम्।।
तत् त्वं पूषन् अपावृणु। सत्यधर्माय दृष्टये।
- ईशावास्य उपनिषत्, मंत्र १५
“सत्याची मुद्रा एका हिरण्मय पात्राने आच्छादिली आहे. हे सूर्यनारायणा, हे आच्छादन, आवरण तू दूर कर. हे आवरण दूर केलेस, तरच सत्याचे ज्ञान होईल.”
भौतिक सूर्याचे हिरण्मय स्वरूप हे आत्मसूर्यावरील तेजाचे आवरण आहे. भौतिक सूर्याच्या तेजाने आत्मसूर्य दृष्टिआड होता कामा नये. आत्मसूर्याचे ज्ञान होण्यासाठी भौतिक सूर्याचा तेजोविस्तार आहे.
‘या हिरणम्य तेजोविस्ताराने आत्मसूर्य झाकला न जाता, त्याचे तेज विशेषत्वाने प्रकट होणे इष्ट आहे.’ हा विचार माझ्या मनात घुटमळत होता. तो महामंत्र आणि आम्हा सर्वांचा हा अनुभव यांच्यामधला सन्दर्भ आणि संबंध पूर्णपणे ध्यानात यावा, म्हणून माझी विचारचक्रे झपाट्याने फिरत होती.
मला हे कोडे नि:संशय उलगडणार. प्रत्येक प्रश्नामध्ये त्याचे उत्तर सुप्त आणि गुप्त असते. अनेक वेळा आपल्या प्रश्नांची उत्तरे आपोआप प्रकट होतात; हा आपला नेहमीचा अनुभव आहे. मला तर वाटते, उत्तर देण्यापेक्षा यथोचित प्रश्न विचारणे अधिक कठीण आहे.
सध्याच्या या अणुयुगात आज अशी काही यंत्रे उपलब्ध आहेत की, त्या यंत्रात कोणताही संख्यावाचक प्रश्न टाकला की, त्याचे उत्तर क्षणार्धात आपल्या हाती येते. हे यंत्र गुणाकार करते, भागाकार करते, बेरीज-वजाबाकीही करते.
पण ही यंत्रे प्रश्न विचारू शकत नाहीत! प्रश्न-सिद्धीला मानवी व्यक्ती लागते. अनेक वेळा, एक व्यक्ती पुरत नाही. एक मानवसमूह लागतो.
प्रश्नाचे स्वरूप यथोचित व यथार्थ असेल तर त्या प्रश्नाच्या स्वरूपातच उत्तर अंतर्भूत असते; ही गोष्ट खरी आहे का?
मी वस्तुत: आणि लक्षणेने कितीतरी वेळ तरंगत राहिले; माझे शरीर जलपृष्ठावर आणि चित्त विचार-सागराच्या लाटांवर असे तरंगत राहिले, तर मी फार मागे पडेन. माझे साथीदार पुढे निघून जातील. ‘आपल्या सहजप्रवृत्तींवर तुम्ही निष्ठा ठेवा, श्रद्धा ठेवा’, असे आमचा जलतरण-शिक्षक, दलदल-दोस्त म्हणाला होता, त्याचा काय अर्थ असेल बरे?
मी माझे डोके किंचित् वर केले, आणि सभोवार पाहू लागले. पण माझे पाय खाली ओढले जाऊ लागले. मी चांगलीच धास्तावले.
इतक्यात आपल्या चारी पायांवर पुढे सरकत असलेला माझा स्वामिनिष्ठ कर्मपशू माझ्या सहज दृष्टिपथात आला. तो चारी पायांनी पुढे सरकत होता. ‘माझे दोन्ही हात व दोन्ही पाय पोहताना मी वापरले पाहिजेत.’
मी अगदी त्याच्यासारखे माझे हातपाय हलवू लागले. जे माझ्या ध्यानात आले नव्हते, ते तो मला सांगेल, याची मला कल्पनाही नव्हती. खरोखर केवढे माझे सुदैव! मला तो नकोसा झाला असतानादेखील मी त्याला टाकू शकले नाही.
हात व पाय चालवीत असताना मी सभोवार पाहिले. आम्ही सर्वजण हळूहळू पुढे सरकत होतो. आम्हा सर्वांच्या मुद्रेवर सूर्यप्रकाशाचा झोत पडत होता. पण पैलतीराचा काहीच पत्ता नव्हता. समोर, सभोवताली, मागे, सर्वत्र पाणीच पाणी.
‘तेथे पोहोचण्यास आम्हाला किती वेळ लागेल?’ मी स्वत:शी पुटपुटले. ‘एक बरे आहे की, हे पाणी बर्फासारखे थंड नाही.’
इतक्यात मला पुन्हा एकदा दूरचा पडसाद ऐकू आला:
“अमर बाहू पसरले खाली!”
मी म्हटले, “कशाच्या खाली?”
“प्रत्येक वस्तूच्या!”, हिरण्य-पुरुष उत्तरला.
तो माझ्यापुढे अगदी जवळ नेहमीप्रमाणे उभा होता. काही काळ मला तो दिसला नव्हता. त्याचे कारण सूर्यप्रकाशाच्या चंड किरणांनी माझे डोळे दिपले होते. त्याच्या उत्तराचा अर्थ मला समजला नाही. पण काहीतरी आश्वासन मिळाले व मला धीर आला.
काही वेळ संथपणे मी पुढे पुढे सरकत होते. प्रशांत पाण्यामधून पुढे सरकण्याचा तो अनुभव नितांत सुखमय होता. एवढ्यात मला, माझ्या मागे, पाण्यावर प्रचंड आघात झाल्यासारखे वाटले. मी मागे पाहिले. माझ्या लक्षात आले की, मी माझ्या साथीदारांपासून थोडी दूर गेले होते, आणि आमच्यापैकी एकजण मोठ्या गंभीर अडचणीत होता.
“असे चालणार नाही”, मी स्वत:शी बोलले, “माझा आनंद, माझी प्रगती, यांमध्ये मी गढून गेले आहे; माझ्या सहचरांना पूर्ण विसरले आहे.”
पाणी कापीत मी झपाझप त्याच्याकडे गेले. आमच्यापैकी एक भयभीत झाला होता. त्याचा धीर सुटला होता. बुडण्याच्या बेतात होता तो. मला वाटले की, ही भीती आम्हा सर्वांनाच पछाडू लागली आहे. मी मागे वळून पाहिले. आमच्या मागे असलेल्या सरोवराचा किनारा आमच्या दृष्टीआड झाला होता. खरोखर किनारा, काठ, भू-प्रदेश, तीर असा काही पदार्थच कोठे दिसत नव्हता. सोसाट्याचा झंझावात थैमान घालू पाहत होता.
भयाने अस्थिर झालेल्या माझ्या मनाला मी कह्यात आणण्याचा प्रयत्न करीत होते. एवढ्यात आमचा जलतरणपटू दलदल-दोस्त पाण्यामध्ये सरकत सरकत त्या आपद्ग्रस्त, बुडत्या सहचराजवळ जाऊन पाण्यातच उभा राहिला आणि त्याला म्हणाला, “माझ्या खांद्यावर तुझे दोन्ही हात अलगद ठेव आणि विश्रान्ती घे. तू अगदी सुरक्षित आहेस. आम्ही तुला आधार देत आहोत. तुझ्या पायातल्या वेदना कमी होईपर्यन्त आम्ही तुझ्याजवळ उभे राहू.”
पण दुर्दैवाने झंझावाताचा वेग भयंकर वाढला. डोंगरलाटा येऊ लागल्या. आता मात्र आम्ही एकमेकांपासून दूर फेकले जाणार, असे वाटू लागले.
“केवढ्या या लाटा! हे तुफान, अन् हा झंझावात! आम्हाला पुढे जाणे कसे शक्य आहे?”, हताश होऊन मी स्वत:शीच म्हटले. मी चांगलीच धास्तावले होते, “आम्ही आहोत तेथेही स्थिर राहू शकत नाही. पण काहीही होवो”, एकदम मी मोठ्याने ओरडले, “आपण एकत्र राहिले पाहिजे. आपण सारेजण एक वर्तुळ करू या. एकमेकांचे हात गुन्तवून घेऊ या आणि बुडणार नाही एवढी काळजी घेऊ या. अशा स्थितीत आपण हळूहळू पाय पुढे सरकवीत राहिलो, तरच मला वाटते, आपली धडगत आहे.”
आणि खरोखरच आम्ही एक मंडल तयार केले. पाय दुखावलेल्या अभागी व्यक्तीला मध्ये उभे केले. आम्ही एकमेकांचे हात धरल्यावर जणू काय, आमच्या देहांतून एक विजेचा प्रवाह झरकन् पसरत गेला. त्या प्रवाहाने आम्हाला विलक्षण धैर्य दिले. आम्हाला एक नवशक्ती लाभली. मध्यभागी असलेला तो दु:खी जीव क्षणभर हसला.
कितीतरी वेळानंतर, त्या बिचार्‍याच्या चेहर्‍यावर हास्यरेषा उमटली!
“मला आता फार छान वाटते आहे. माझ्या पायातल्या वेदना गेल्यासारख्या आहेत. तुमचे आभार मी कोणत्या शब्दांत मानू? थोड्याच वेळात मला आपल्या मंडलामध्ये उभे राहता येईल. आता आपल्यापैकी दुसर्‍या कोणीतरी येऊन विश्रांती घ्यावी. आपणांपैकी प्रत्येकाला थोड्या विश्रांतीची गरज आहे. हे वादळ अधिकाधिक विक्राळ व उग्र होत आहे. या प्रसंगात किती वेळ आपणांस अडकून राहावे लागेल, कोण जाणे! ही आपल्या तितिक्षेची कसोटी आहे, परीक्षा आहे.”
त्याचे हे भाषण आम्हाला अर्थपूर्ण व समुचित वाटले, व त्याचे सांगणे आम्ही त्वरित मान्य केले.
सभोवार डोंगरलाटा एकमेकींवर आदळत होत्या. एकीमागून दुसरी, नंतर तिसरी आणि प्रत्येक लाटेची उंची आकाशाला भिडेल की काय, असे वाटत होते. आमच्या डोक्यावर त्या लाटा येऊन आदळत. आमच्या पाठीमागे तर काळ्याकभिन्न ढगांचा एक प्रचंड डोंगरच खडा होता. जेथून आम्ही आमच्या यात्रेला आरंभ केला, ते ठिकाण कोठल्या कोठे नापत्ता झाले होते. सूर्यनारायण पूर्व दिशेला अजून दृश्यमान् होता. त्यामुळे आमचे दिशांचे ज्ञान नष्ट झाले नव्हते, एवढे आमचे भाग्य म्हणावयाचे.
इतक्यात माझ्या हृदयाच्या पिंपळ-पानावर भीतीची थंड पकड पडली. “एकदा भगवान् सूर्यनारायण दिसेनासे झाले म्हणजे कसे होणार?” हा प्रश्न मी कोणाला विचारला कोणास ठाऊक!
“तुम्ही आपल्या आत्मतत्त्वावर श्रद्धा ठेवा, त्याच्यावर विश्वासून रहा.” हिरण्य-पुरुषाने तत्परतेने उत्तर दिले, “दृष्टीआड म्हणजे चित्ताबाहेर; हे जरी सामान्यपणे खरे असले, तरी माझ्याबाबतीत मात्र ते तसे नाही. मी दृष्टीआड झालो, तरी जवळच कोठेतरी असतो.”
आणि इतक्यात मला ते दुसरे वचन ऐकू आले, ‘इकडे पहा. मी कायमचा तुझ्याजवळ आहे. जगाच्या अगदी अन्तापर्यंत मी तुझ्या सन्निध असेन.’
नि:स्तब्ध होऊन मी हे वचन प्रतीतीत उतरविण्याचा प्रयत्न करू लागले. ती संजीवक वाणी पुन्हा माझ्या कानांवर पडली.
‘माझ्या शान्तीचा मी तुझ्याठायी निक्षेप करीत आहे. हे माझे देणे अगदी विलक्षण आहे. जगाची देण्याची रीत निराळी, माझी निराळी! तुझ्या मनाला तू कष्टवू नकोस. निर्भय रहा. घाबरू नकोस.’
“या वचनाचा अर्थ लावण्याचा, समजावून घेण्याचा हा क्षण आहे.” मी स्वत:शी म्हटले. “आमची परिस्थिती अत्यन्त गंभीर आहे, चिन्ताजनक आहे; हे तर खरंच. वादळाचा जोर वाढत आहे. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, हे वादळ आमच्या अन्तरंगात घुसणार नाही, याची आम्ही काळजी घेतली पाहिजे.”
लाटा आणि वादळ यांच्या सुरांपेक्षा अधिक उंच स्वरात मी बोलले, “मला वाटतं, काल सायंकाळी या सरोवराचा पृष्ठभाग प्रशान्त होता. त्या वेळी श्रीगुरुदेव आपल्याजवळ होते. ते चित्र, ती प्रतिमा आपण चक्षूंपुढे उभी करू या. काल सायंकाळी हा पृष्ठभाग कसा आरशासारखा स्थिर होता, निश्चल होता. त्याच्यामध्ये लव्हाळी आणि शुभ्र अभ्रखंडे यांची प्रतिबिंबे पडली होती. ही प्रतिबिंबे इतकी निश्चल, स्वच्छ व स्वयंपूर्ण होती की, प्रतिमा कोणत्या अन् मूळ वस्तू कोणत्या; बिंब कोणते आणि प्रतिबिंब कोणते, हे सांगणे कठिण होते. बघा! मनात संथ लहरी दिसू लागल्या.
‘अन्त:स्थिती व बाह्य स्थिती, यांमध्ये नि:संशय घनिष्ठ संबंध असला पाहिजे.’ हा माझा निर्णय निश्चित झाला.
आमची ही ध्यानाची अवस्था किती वेळ टिकली, हे सांगणे अशक्य आहे. आम्हाला वेळेचे भान होते कोठे? आमचा अनुभव कालातीत होता.
जाग आल्यावर मला एक नवलपूर्ण दृश्य दिसले. एक प्रचंड पर्वत उभ्या सुळक्यासारखा सरळ आकाशात घुसू पाहात होता. त्याचे हिममय शिखर सूर्यप्रकाशात, सोनेरी रंगात न्हाऊन निघाले होते. हाच तो धवलगिरी!
भगवान सूर्यनारायण आता क्षितिजाच्या चांगले वर आले होते.
“काय, झाले तरी काय?”, मी स्वत:ला विचारले, “मला भ्रम तर झाला नाही? पूर्वी समोर नसलेले हे दृश्य मी कसे पाहत आहे? का हे मृगजल आहे?”
प्रश्नार्थक मुद्रेने मी माझ्या सहचरांकडे पाहिले. त्यांनाही ते दृश्य दिसत होते काय? त्यांच्या मुद्रेवरील आश्चर्यावरून त्यांनाही तसा अनुभव आला असला पाहिजे.
“ज्याला सामुदायिक दृष्टिबंधन किंवा संभ्रम म्हणतात, असा हा अनुभव आहे का? अथवा काही विलक्षण, अज्ञेय घटना घडत आहेत? तो पर्वताचा कडा आत्तापर्यंत ढगांनी झाकला तर गेला नव्हता? पण छे ! ती जागा, तो पर्वत पूर्वेकडे आहे. ढग असते, तर त्यांनी पर्वताबरोबर सूर्यालाही थोडेबहुत झाकले असते. ईश्वरकृपेने सूर्यबिंबाची आम्हाला निरन्तर सोबत होती.”
अगदी या क्षणी मला हास्याची एक लकेर ऐकू आली आणि त्यापाठोपाठ हिरण्य-पुरुषाचे बोलणे सुरू झाले.
“श्रीगुरुदेवांचे व त्या निश्चल प्रतिबिंबांचे एक सुन्दर चित्र निश्चित करू या. आपल्या मनात तेच ध्यान ठसवून घेऊ या. आपण हा प्रयत्न तर करून पाहू!”
आम्ही सर्वांनी नेत्र मिटून घेतले. कालचे ते प्रशांत सरोवर, श्रीगुरुदेवांची ती शांत मूर्ती आणि पाण्यातली ती स्थिरसुंदर प्रतिबिंबे यांचे आम्ही ध्यान करू लागलो.
- आणि क्षणार्धात विलक्षण घटना घडू लागल्या.
माझ्या अन्त:करणात गाढ शान्ति उदित झाली. माझी सारी भीती कोठेतरी दडून बसली. आश्चर्यमुग्ध झाले मी! डोळे क्षणभर उघडून मी पाहिले, अन् मला दिसले की, माझ्या सर्व सहचरांच्या मुद्रेवर तीच शान्ती विलसत होती. अगदी माझ्यासारख्याच अनुभवातून ती सारी गेली होती. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे, झंझावाताचा वेगही मन्द झाला होता. डोंगरलाटा ओसरत होत्या.
‘ ‘मनात ते जगात’, हा सिद्धान्त इतका खरा आहे का?’, मी विचार करू लागले.
‘आमच्या मनात वादळाची भीती निर्माण होताच समोर वादळ उभे राहिले. आम्ही प्रशान्त जलपृष्ठाचे ध्यान करताच वादळ विरून गेले. ध्यानयोगात एवढे सामर्थ्य आहे काय?’
‘काय हे नवल! चमत्कार म्हणतात, तो हाच काय?’, मी स्वत:ला विचारले, ‘मला वाटतं, हा एक योगायोग आहे. आमच्या ध्यानातले प्रशान्त सरोवराचे चित्र व वादळाचे एकदम झालेले शमन, यांचा काय संबंध असेल?’
काही वेळ मी स्तब्ध राहिले. आमच्या मनात शान्त सरोवराचे चित्र स्थिरावले. बाहेरचा झंझावात शान्त, पूर्णपणे शान्त झाला होता. भयानक, पर्वतप्राय लाटांच्या ऐवजी आता निश्चल जलपृष्ठ समोर दिसले.
“तुझ्या हे ध्यानात कसे आले नाही?”, त्या झंझावाताने आणि त्या पर्वतप्राय लाटांनी तुझी गती, तुम्हा सर्वांची प्रगती अनेक पटीने वाढली. नाही तर येथपर्यंत येण्यास कितीतरी अधिक वेळ लागला असता. तुम्हाला वाटले हा झंझावात तुम्हाला दूर लोटीत आहे, तुम्हा सर्वांना तो रसातळाला नेणार; पण वास्तविक तो तुम्हाला इष्टस्थळाकडे खेचीत होता.”
“परंतु”, मी विरोध केला, “माझी खात्री आहे, वादळ आम्हाला सूर्यापासून दूर दूर ढकलीत होते. झंझावात आम्हाला पूर्वदिशेला, सूर्याकडे निश्चित नेत नव्हता.”
हिरण्य-पुरुष उद्गारला, “पण जेव्हा तुम्ही भीती सोडलीत, आपले डोळे मिटून घेतलेत आणि अंतर्दृष्टीने, नि:स्तब्ध जलपृष्ठाचे ध्यान सुरू केलेत; अगदी त्या क्षणी, प्रचंड वादळाने आपले तोंड फिरविले आणि तुम्हाला ते वादळ पूर्वेकडे, सूर्याकडे, तुमच्या इष्टस्थळाकडे खेचून नेऊ लागले. तो प्रलयवायू मंद झुळुकेसारखा वाहू लागला, खवळलेला समुद्र शांत झाला. नंतर तुम्ही डोळे उघडलेत.”
“तुम्ही म्हणता, हे सर्व खरे असले पाहिजे. कारण आम्ही येथे येऊन पोहोचलो, यात आता काही शंका नाही.” या सर्व अनुभवाने मी मात्र चांगली गोंधळले होते.
“हे का व कसे झाले? आम्ही मनामध्ये त्या प्रशान्त चित्राचे ध्यान केले, त्यामुळे खवळलेला समुद्र शांत झाला. हे खरे आहे का?”
“एका दृष्टीने ते सर्व खरे आहे”, हिरण्य-पुरुष उत्तरला, “तुम्ही प्रशान्त सरोवराचे चिंतन केलेत, त्यामुळे खवळलेले पाणी स्तब्ध झाले खरे, पण ते अप्रत्यक्षपणे. प्रत्यक्षपणे एवढा परिणाम झाला की, तुमच्या भावनांचे सरोवर प्रथम शांत झाले. भीतीमुळे तुमचे भावनाविश्व भंगले होते. तुला हे स्मरत असेल, वादळ शांत होण्यापूर्वी तुमची भीती समूळ नष्ट झाली होती. तुम्ही पूर्णपणे निर्भय झालात आणि लगेच चवताळलेले वादळ शांत झाले. आठवते ना तुला?”
“अर्थात्! मला त्याची चांगली आठवण आहे”, मी उत्तरले.
हिरण्य-पुरुष पुढे बोलू लागला, “एकदम वादळ शांत झाल्याचा चमत्कार म्हणून जो तुम्हाला वाटला, त्याचे खरे कारण तुमच्या अंतरंगातील निर्भयतेत, शान्तीत आहे.
“तुम्हा सर्वांच्या भावना एकवटल्या. त्या भावनांत शांतीचा उदय झाला. तुम्हा सर्वांची मिळून एक प्रभावी शक्ती उत्पन्न झाली. त्या शक्तीने सरोवरावरील वादळे आणि वावटळी शमविल्या. या शक्तीलाच ‘शांती’ म्हणतात. ‘शांती’ ही बुद्धीच्या पलीकडची शक्ती असते.
मी म्हटले, “येवढे तर निश्चित! ती शांती बुद्धीच्या पलीकडील अवस्था, शक्ती असते. माझ्या बुद्धीच्या ती फारच पलीकडे आहे.” आश्चर्यमूढ होऊन मी माझी प्रतिक्रिया दर्शविली व पुढे म्हटले, “पण कशामुळे, कोणत्या शक्तीमुळे वादळाची दिशा बदलली?”
“याचे उत्तर अगदी साधे, सोपे आहे”, हिरण्य-पुरुषाने स्मित केले आणि तो बोलू लागला, “मी तुला हसत नाही. तुला माहीत आहे, मी तसे कधीही करणार नाही. तुझ्या मुद्रेवरील आश्चर्य पाहून मला हसू आले. वादळाची दिशा बदलणे साहजिक होते; त्यात एवढे आश्चर्य ते काय? तुमचा सामुदायिक हेतू, तुमच्या एकत्रित झालेल्या इच्छाशक्तीची तीव्रता व पवित्रता हेच त्याचे कारण. दुसर्‍या किनार्‍याला पोहोचणे, पैलतीरी जाणे, या तुमच्या तीव्र विशुद्ध सामुदायिक इच्छाशक्तीचे सामर्थ्य मोठे होते. तुमच्या सर्व आशा, अपेक्षा आणि इच्छा संघटित होऊन पैलतीराकडे वळल्या होत्या. या सामूहिक इच्छाशक्तीने पैलतीराकडे जाण्यासाठी एक अदृष्ट मार्ग जलपृष्ठावर आखून दिला होता. सांघिक इच्छाशक्तीने आखून दिलेल्या या मार्गात त्या वादळाने प्रवेश केला. पण त्याची दिशा साहजिकच बदलली; कारण तुमचे, तुमच्या सामूहिक इच्छेचे, आणि आशेचे तोंड पैलतीराकडे होते. समजले का?”
“समजले. पण, चांगलेसे नाही!”, मी उत्तरले व पुढे म्हटले, “जो चमत्कार मी स्वत: अनुभविला. तो कल्पनातीत आहे.” क्षणभर थांबून मी पुन: बोलले, “तुम्ही केलेले विवेचन तर्कशुद्ध आहे. अदृष्ट आणि अज्ञात अशा शक्ती असतात, आणि त्यांचे बळ एवढे प्रचंड असू शकते; हे तत्त्व, ही कल्पना मला आज प्रथम पटली. आता आपण म्हणता ते सर्व कार्यकारणशास्त्र सुसंगत व ग्राह्य वाटते.”
“वास्तविक सर्वच शक्ती अदृश्य असतात. तुम्हाला त्या शक्तींचे फक्त परिणाम दिसतात. शक्ती दिसत नाहीत. विद्युत्, गुरुत्वाकर्षण, चुंबकत्व या सर्वांचे परिणाम तुम्ही पाहू शकता. परंतु प्रत्यक्ष त्या शक्तींचे दर्शन तुम्हाला होते का?”, हिरण्य-पुरुष म्हणाला.
“त्या शक्ती कधीच दिसू शकत नाहीत.” मी कबूल केले, “त्यांचे परिणाम आपल्याला इतके परिचित असतात की, ते परिणाम म्हणजेच कारण-शक्ती असा आपला गैरसमज होतो. म्हणून, त्या शक्तींची दिशा बदलली तर परिणामातही बदल होईल; हे आपल्या लक्षात येत नाही. काही प्रचण्ड व अज्ञात शक्ती या विश्वामध्ये असू शकतील. त्या शक्तींमुळे परिचित शक्तींचे परिणाम पूर्णपणे नष्ट होऊ शकतील; कदाचित् ते अगदी उलट्या तर्‍हेचेही होऊ शकतील. असेच ना?”
“अगदी बरोबर”, हिरण्य-पुरुष म्हणाला, “या शक्तींचा विनियोग, वापर, उपयोजन कसे करावयाचे, या सोप्या प्रश्नाचा आता आपण विचार करू या. शक्तींचे उपयोजन करणारी दुसरी शक्ती अधिक प्रभावी असली पाहिजे, हे तुला पटते ना?”
“होय, अर्थातच. पण दिशेचे ज्ञान कसे व्हावयाचे? शक्तीचा विनियोग कोणत्या बाजूने करावयाचा? कोणत्या दिशेने करावयाचा?”, मी विचारले.
“विनियोग-शास्त्राबद्दल तुला थोडी अधिक माहिती देतो. असे पहा, त्या शक्तींचा विनियोग कोठे करावयाचा याचे ज्ञान असणे प्रथम आवश्यक आहे”, हिरण्य-पुरुष म्हणाला.
“आले माझ्या ध्यानात. शक्तीला वळण देणे, शक्तीला मार्गदर्शन करणे हे श्रेष्ठ मानवी व्यक्तीला शक्य आहे. अशा योग्य व्यक्ती असल्याशिवाय शक्तींना कोण वळण देईल?”, मी माझे विचार प्रकट केले.
“अगदी बरोबर”, हिरण्य-पुरुष म्हणाला, “या विश्वामध्ये अनेक ज्ञात व अज्ञात अशा शक्ती आहेत. पण त्यांचा विनियोग, उपयोजन करणे, हे सर्वात महत्त्वाचे काम आहे. हे काम ज्ञानी व्यक्ती किंवा द्रष्टाच करू शकतो. योजकत्वाचे काम करण्यासाठी, शक्तींच्या नेतृत्वासाठी, दिग्दर्शनासाठी दोन गोष्टींची जरूरी आहे. ज्याला आत्मज्ञान झाले आहे, असे प्रभावी मन आणि त्याच्या जोडीला तितकाच प्रभावी हेतु, आकांक्षा किंवा ध्येय.”
मी म्हटले, “हे अगदी खरे आहे! हेतुशक्ती ही विश्वातली किती प्रबल, प्रभावी शक्ती आहे! थोड्याच वेळापूर्वी आम्हाला तिच्या प्रभावाची एक झलक पहावयास मिळाली.”
“पण लक्षात ठेव. प्रत्येक हेतू इतका प्रभावी नसतो बरे. त्यासाठी हेतूला शुचिता असावी लागते. ह्या उच्च उदात्त हेतूचे स्वरूप अगदी आगळे असते. तुझ्या संपूर्ण व्यक्तिमत्वाचा अंतर्भाव अगदी एकमात्र हेतूमध्ये पूर्णत: व्हावयास हवा. संपूर्ण व्यक्तित्वाचे संकलन करणारी जी वृत्ती, तिलाच ‘ध्येय’ हे नाव शोभेल. तुमच्या व्यक्तित्वाच्या एका भागाने, एका अंशाने तुम्ही एक ध्येय कवटाळाल, व दुसर्‍या अंगाने दुसराच हेतू धरून बसाल, तर शेवटी वैफल्य, निराशा आणि पराभव तुमच्या पदरी येईल. परस्परविरोधी ध्येयांचा एकमात्र परिणाम म्हणजे अनेक प्रकारच्या शारीरिक, मानसिक व भावनात्मक विकृती, हा होय. अशी अवस्था झाली म्हणजे माणसाचे चित्त दुभंगून जाते. दुभंगलेले व्यक्तित्व ही एक भयानक मनोविकृती आहे.” हिरण्य-पुरुष गंभीर होऊन थांबला.
“अस्से! आले माझ्या लक्षात! दोन परस्परविरोधी दिशांना एकदम जाणे कसे शक्य होईल? असली धडपड केली, तर व्यक्तित्व भयंकर ताणले जाऊन त्याच्या चिंधड्या उडणार.”
हिरण्य-पुरुष म्हणाला, “जेव्हा एकादी व्यक्ती आपल्या सर्व आकांक्षा संकलित करू शकते आणि अशा रीतीने त्या सर्व आकांक्षांचे एकाच इच्छा-शक्तीत रूपांतर होते; तेव्हा त्या इच्छाशक्तीचा प्रभाव अनिवार्य होतो. पण नीट लक्षात ठेव की, प्रबल इच्छाशक्ती ही एक नुसती शक्ती आहे. ती चांगली असू शकते, वाईटही असू शकते. तिचा उपयोग सत्कृत्याकडे वा दुष्कृत्याकडेही केला जातो.
“मला वाटते, चांगुलपणा व वाईटपणा हे दोन गुण, जो तुमचा हेतू असेल, त्यावर अवलंबून असणार. मघाशी ‘दिशा’ हा शब्द आपण हेतू या अर्थानेच वापरला होता ना?”, मी प्रश्न केला.
“होय, अगदी बरोबर. तुझा कर्मपशू अथवा तुझा वैयक्तिक अहंकार क्षुद्र स्वार्थासाठी हेतूंचे निर्माण करीत असतो, हेतूंना वळण देत असतो. अर्थात् या सर्वांचा परिणाम अनिष्ट व घातुकच होणार. अखेरीस तुला एका क्षुद्र ‘स्व’ च्या नरकात एकटे खितपत पडावे लागणार. स्वार्थानं विणलेल्या विविध प्रकारच्या जाळ्यांत तुझा ‘स्व’ अडकून पडतो. तुरुंगातच कोण्डला जातो. स्वार्थी हेतूदेखील सृजनशील (Creative) असतात. नवीनवी बंधने, नव्यानव्या वासना सारख्या निर्माण होत असतात. तू त्या काळ्याकुट्ट अरण्यात वाट चुकली होतीस, आठवते ना तुला?” हिरण्य-पुरुषाने आठवण दिली.
“त्याचा मला विसर पडणे कधीही शक्य नाही”, मी कंपित होऊन बोलले, “त्या अरण्याच्या नुसत्या आठवणीनेच माझा थरकाप होतो.”
“तू त्या भयंकर अरण्यात जाऊन पडलीस, तेथे जागी झालीस; याचे खरे कारण काय होते, ठाऊक आहे तुला? स्वार्थनिष्ठ सुखोपभोगाची तू अगदी सीमा गाठली होतीस. त्यांचा तुला अगदी वीट आला होता. काहीतरी निराळे, काहीतरी अद्भुत घडण्याची आवश्यकता निर्माण झाली होती, असे म्हणता येईल.
“तुझे त्या वेळेचे विशिष्ट प्रज्ञान, त्या वेळची चैतन्यावस्था अतिरिक्त सुखोपभोगामुळे उदित झाली होती. गोड पक्वान्नाचे आकंठ सेवन केल्यानंतर आणखी एक घास घेतला की, जसा वीट येतो, तो नकोसा होतो; अगदी तशीच तुझी अवस्था झाली होती. त्या क्षुद्र अनुभवांहून निराळी अशी अवस्था तुला हवीशी वाटू लागली.
“रसायनशास्त्रातला प्रयोग तुला माहीत असेल. एकाच अणुरेणूने एखादे द्रव्य अधिक पडले, तर सर्व रसायन बिघडून जाते. सुखोपभोगांच्या अतिरेकाने तुझे असेच झाले होते. त्या अवस्थेत असताना तुला फक्त एक इच्छा उरली होती. त्या अतिरिक्त सुखाच्या नरकामधून बाहेर पडण्याची तीव्रतम उत्कंठा तुला लागली होती. तुझ्या आशेच्या, इच्छेच्या, प्रयत्नांच्या तीव्रतेमुळे तुला माझे दर्शन झाले - माझे म्हणजे तुझ्या अंतरात्म्याचे! आणि तुला मुक्तीचा मार्गही समजला.”
“समजले. मला वाटते, तू म्हणजे माझा खराखुरा आत्मा; माझ्या ‘हेतूं’ना दिशा दर्शविण्यास तूच समर्थ आहेस. इतक्यात आपण त्या हेतूंबद्दल बोलत होतो. माझ्या खर्‍याखुर्‍या आत्म्याने, म्हणजे तू स्वत: या हेतूंचे मार्गदर्शन केलेस - म्हणजे मला अपाय होणार नाही; व इतरांनाही अपाय होणार नाही; सर्वांचा भाग्योदय होईल.”
मी विचारले, “जीवनरथाचा सारथी, स्वत:च्या आत्म्यालाच करणे श्रेयस्कर असते, होय ना?”
“होय”, हिरण्य-पुरुष सस्मित म्हणाला, “जेव्हा तुला याचा प्रत्यय येईल व जेव्हा या विकासबिंदूपर्यंत आलेल्या यात्रिकांची व तुझी भेट होईल तेव्हा, तुला एक दिव्य शक्ति लाभेल. त्या शक्तीपुढे वावटळे व वादळे क्षणात अंतर्धान पावतील.”
“अस्सं आहे तर!”, आणि त्यानंतर भीतीने मी एकदम ओरडले, “पण माझे साथीदार कोठे आहेत? मी त्यांना कशी विसरून गेले? आपले हे संभाषण चालू होते, तेवढ्या वेळात मला त्यांची मुळीच आठवण राहिली नाही.”
हिरण्य-पुरुष हसला आणि म्हणाला, “प्रथम, ‘काळी’, ‘काळ’ हे शब्द विसरून जा. तुला लवकर समजून येईल की, ‘काला’चा सत्याशी काहीही संबंध नाही. दुसरे म्हणजे ते सर्व सहचर जेथे होते तेथे आताही आहेत, ते कोठेही गेले नाहीत. तुला जे अनुभव येत होते ते अनुभव त्यांनाही येत आहेत. पहा ना त्यांच्याकडे.”
आम्ही सर्वजण तेथे होतो. आम्ही नऊजण अगदी पूर्वीसारखे होतो. जो किंचित्, सूक्ष्म फरक झाला होता तो आमच्या चेहर्‍यावर, मुद्रेवर स्थिरावलेल्या एक प्रकारच्या गांभीर्याचा. आता सर्वांच्या मुद्रेवर एक नवा उत्साह, नवचैतन्य विलसत होते. त्या वादळातली आमची भयाकुल वृत्ती या नव्या उत्साहात आता लुप्त झाली होती.
माझ्या मनात आले, ‘तेच कारण असले पाहिजे. यशस्वी नेतृत्वामुळे ते चैतन्य अगदी उत्स्फूर्त झाले होते. ही उत्स्फ़ूर्ती म्हणजे एक आनंद असतो; कृतार्थता असते. या भावनेला एक प्रभावी अंत:शक्ती व गती असते.
‘अर्थातच शांतीचे निर्माते धन्य होत! आपण आता शांती निर्माण केली आहे. या ठिकाणी केवढी अशांती होती; केवढा गोंधळ होता ...’
इतक्यात आम्ही सर्वजण एका आवाजात ओरडलो;
“माझा पाय तळाला लागला. आपण स्थानावर आलो. आपण पैलतीर गाठले!”
माझ्या मनाने मला सांगितले, ‘गूढ, विस्मयजनक घटना एकदम, अचानक येऊ नयेत. त्यांच्या स्वागताची पूर्वतयारी झाल्यानंतर त्या आलेल्या बर्‍या.
‘याचा अर्थ असा आहे की, जे जे आपण पाहतो, ते ते आश्चर्यमय असते. आपले चित्त जर सतत आश्चर्य-सन्मुख राहिले, तर आपल्या ज्ञानाची खोली कितीतरी पटीने वाढेल.’
आता अगदी उथळ अशा पाण्यात आमची पावले बुडली होती. किनारा अगदी जवळ आला होता ... आम्हाला आता जमिनीवर पावले टाकणे किती अवघड वाटले. किती जड, किती चमत्कारिक! मला तर कसेसेच वाटू लागले. पाण्यात होते तोपर्यंत कशी हलकी होते आणि आता एकदम जडपणा वाटू लागला.
पूर्वी मला पाण्यात शिरायचा धीरच होत नसे. ‘पाण्यात कसे जायचे? पाणी मला कसे तारणार?’, असे मला वाटे. यापुढे मात्र मला पाण्याची भीती कधीच वाटणार नाही. तसे पाहिले, तर हा सवयीचा प्रश्न आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश यांपैकी कोणत्याही मूलतत्त्वाशी तुमचा अधिक संबंध आला की, त्याची तुम्हाला भीती वाटणार नाही. त्या मूलतत्त्वाचे गुणधर्म, त्यांचा उपयोग माहीत झाल्यावर तुमचा दुजाभाव नष्ट होतो.
‘द्वितीयात् वै भयम्।’
माझ्या मनाने हा निर्णय घेतला; आणि त्याच क्षणी पायाखाली कोरडी जमीन पण लागली.
हिरण्य-पुरुषाचा आवाज मी पुनश्च ऐकला, “वर पहा. किनार्‍यावरून पलीकडे दूर दृष्टी टाका.”
मी वर पाहिले. माझी पावले खड्ड्यातून पुढे मार्ग काढीत होती. माझे अन्त:करण आनन्दाने भरून आले! तेथे पलीकडे श्रीगुरुदेव उभे होते. इन्द्रधनुष्याच्या बरोबर मध्यभागी त्यांनी आपले बाहू आमचे स्वागत करण्यासाठी पुढे पसरले होते. निर्व्याज प्रेमाची ज्योती त्यांच्या डोळ्यात तेवत होती. एखाद्या चुंबकाप्रमाणे ती आम्हाला आकृष्ट करीत होती.
“सूर्याची प्रकाशकिरणे त्यांच्या मूर्तीमधून झरत आहेत”, मी स्वत:शीच म्हटले, “अरे, हे इंद्रधनुष्य त्याच प्रकाशातून झळकत आहे काय? श्रीगुरुदेवांचा देह हा एखादा लोलक आहे की काय? तसे असेल तर त्यांचा देह अत्यंत सूक्ष्म, काही निराळ्याच घटकांनी सिद्ध झालेला असावा. आमचे देह कसे जड आहेत. लोलकासारखे नाहीत आणि म्हणूनच आमच्या भोवती इन्द्रधनुष्य नाही. पण श्रीगुरुदेवांचा देह सूर्यप्रकाशाचे मूल घटक स्पष्ट करून दाखवितो. त्यांच्या देहातून जर सूर्यप्रकाशाचे पृथक्करण झाले नसते तर श्रीगुरुदेव आम्हास दिसतेच ना. प्रत्यक्ष सूर्याकडे आम्हाला कोठे पाहता येते?”
माझ्या मनात या विचारांनी गर्दी केली होती. आम्ही सर्व अलगद, हळुवारपणे श्रीगुरुदेवांजवळ सरकलो. त्यांनी आम्हा सर्वांना मंडलाकार बसण्यास सांगितले.
बराच वेळ ते काहीच बोलले नाहीत. आमच्याकडे एकाग्रतेने पाहत होते. मला तर असे वाटले की, त्यांच्या डोळ्यातून पाझरणारी प्रकाशकिरणे माझ्या शरीरातील अणुरेणूंत शिरत आहेत! माझ्या ठिकाणी नवचैतन्य जागे झाले. माझे शोधन झाले. मी पवित्र झाले. माझ्यात एकात्मता आली.
“खर्‍या अर्थाने विकारमुक्त होणे म्हणजे एकात्मता येणे, व्यक्तित्वाचे संकलन होणे”, मी स्वत:शीच पुटपुटले.
पुनश्च तो दूरचा पडसाद माझ्या कानात घुमू लागला.
“शान्तपणे पुढे चल. तुझ्या श्रद्धेमुळे तू आता पूर्ण आहेस. पूर्णांक आहेस.”
“होय”, श्रीगुरुदेव तरल आवाजात बोलू लागले, “तुमच्या श्रद्धेमुळे तुम्ही वादळी लाटातून सुखरूप बाहेर आलात. तुमची श्रद्धा दृढ होती, म्हणून मी येथे आलो आहे. आता मी तुम्हाला एक प्राचीन प्रार्थना-गीत शिकविणार आहे. अज्ञात शक्तीचा प्रभाव स्वत:च्या अनुभवामुळे तुमच्या परिचयाचा झाला आहे. जिला आता मी प्राचीन प्रार्थना म्हणून संबोधले, त्या साध्या-सुध्या प्रार्थना नव्हेत. त्यांच्या अर्थाप्रमाणेच त्यांचे उच्चार व शब्दोच्चार महत्त्वाचे आहेत. शब्दांचा अर्थ तुमच्या मनावर प्रत्यक्ष परिणाम करतो. पण ध्वनी अथवा शब्द यांचा परिणाम तुमच्या एकंदर व्यक्तिमत्वावर होतो. तुमच्या शरीरावरही होतो; व्यक्तिमत्वाच्या दुसर्‍या अंगोपांगांवरही होतो. अशा तर्‍हेच्या प्रार्थनेला आम्ही मंत्र म्हणतो. या मन्त्रांपैकी ‘अ उ म्’ हा पवित्र शब्द मन्त्रांचा मंत्र आहे. वैदिक संगीताचा तो केवळ पहिला सूर नव्हे. त्याच्यामध्ये एकंदर सर्व सूर आहेत. वटबीजामध्ये सबंध वटवृक्ष नसतो का?
“तुमच्या व्यक्तित्वाचे संकलन करण्यास, त्याला एकात्मता देण्यास तीन गोष्टींची आवश्यकता आहे. मन्त्रांचा योग्य उपयोग, अन्त:करणाची खरीखुरी ओढ आणि ध्यानाचा अभ्यास. ह्या त्रिविध साधनेमुळे तुमच्या ठिकाणची विवेकशक्ती तीव्रतर होते. याच त्रिविध साधनेने तुमचे देह विशुद्ध होतील; पारदर्शक होतील. नन्तर आत्मसूर्याचा प्रकाश तुमच्या देहातून बाहेर येऊ शकेल.
“तुमच्या भोवतीही इन्द्रधनुष्य विलसू लागेल. ज्यांना दृष्टी असेल त्यांनाच ते दिसेल. त्यानंतर तुम्ही मोक्षमार्गावरचे दीपस्तम्भ व्हाल. अन्धारात, अज्ञानात धडपडणार्‍या, मागून येणार्‍या इतर साधकांना, जिज्ञासू जीवांना तुमच्या दीपस्तंभातून मार्गदर्शक प्रकाश-झोत मिळेल.
“आणि आता काळजीपूर्वक ऐका व माझ्या मागून म्हणा -
असतो मा सत्‌गमय।
तमसो मा ज्योतिर्गमय।
मृत्योर्मा अमृतं गमय।
अ उ म् म् ...
“अत्यंत काळजीपूर्वक नाद ध्यानात घ्या. त्या ध्वनीचे स्वरूप नीट ओळखा. शब्दांचे अर्थही प्रतीत होऊ द्यात. म्हणा, माझ्याबरोबर एकंदर तीन वेळा म्हणा. नन्तर बीज-तत्त्व म्हणून, केन्द्र म्हणून ध्यानासाठी या मन्त्राचा उपयोग करा, तुमचे चित्त दोन्ही भुवयांच्या मध्यभागी पण मागच्या व आतल्या बाजूला असलेल्या बिन्दूवर एकाग्र करा. तुमचा मेरुदण्ड - पाठीचा कणा - सरळ ठेवा. पण त्याला जास्त ताण देऊ नका.”
श्रीगुरुदेवांचे आदेश मी अनुसरीत होते. एक विलक्षण शान्ती, शक्ती आणि उष्णता माझ्या सर्व अस्तित्वाला व्यापून राहिली होती.
तशा अवस्थेत मी अनन्तकाल राहिले असते, पण काही क्षणानन्तर श्रीगुरुदेव बोलू लागले, “तुमच्या यात्रेच्या पुढील अवस्थेत तुमच्या अनन्त जीवनांच्या अनुभवांनी तुम्ही जे काही शिकला असाल, त्याचा उपयोग करावयाचा आहे. पुन: पाऊल टाकण्यापूर्वी आता पुनश्च ते ध्यान-बीज म्हणू या.
असतो मा सत्‌‌गमय।
तमसो मा ज्योतिर्गमय।
मृत्योर्मा अमृतं गमय।
अ उ म् म - ”
- बृहदारण्यक उपनिषत् अध्याय १, ब्राह्मण ३, मंत्र २८

पुस्तकाचे चॅप्टर्स

संपूर्ण पुस्तक वाचण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा.

You may keep up to date with our updates by subscribing to RSS feed of this website. RSS Feed is available at www.maharshivinod.org/rss.xml

श्रीगुरुपादुकोदयस्तोत्रम्


आज मुहूर्तवूं या एक नित्योत्सव।
अद्वैत आमोदें, जेणे फुलेल हें विश्व।
क्षणोक्षण प्रभातेल नवोनव महापर्व।
प्रसादचिन्ह श्री-श्री-श्रीविद्येचें।।१।।

परा, परापरा, अपरा।
श्रीगुरूपुजा ही त्रिशिरा।
विमर्शा माऊलीची ही स्तनदुग्धधारा।
ओष्ठविण्याचा समय हा।।२।।

‘अपरा’ आराधनेंत भेद-ग्रह-स्थिती।
‘परापरा’ अवस्थेंत भेद-अग्रह-वृत्ती।
‘परा’ अवस्थानांत अभेद-स्फूर्ती।
श्रीगुरूपुजेची पादुका ही।।३।।

आदिभान हें परात्परगुरुबीज।
विमर्शशक्ती श्रीशिवा गुरूविद्येची गुह्यशेज।
जीवूजीवूचा पहिला परिव्राज।
गुरूपादुकेचें आलोचन ।।४।।

एक उफराटे अ-कुल ब्रह्मपद्म।
तेथ निष्कलेचे निजशक्तीधाम।
निर्झरले व्यापिनीचे श्यामव्योम।
अमृतमेघ वोसंडला।।५।।

चतुष्कोणी देवतात्म्यांचे उगमस्थान।
बिंदुस्थली अमृतसिद्धीचें अनुभावन।
यथाक्रम आंतर अनुभवांचें अनुस्थापन।
श्रीगुरूविद्येचा सहजाचार हा।।६।।

‘विमर्श’ म्हणजे आदिभानस्थित चित्शक्ती।
पादुकोदय म्हणजे शिवशिवेची साम्यरसस्थिती।
गुरूकृपयैव या भाग्यश्रीची समवाप्ती।
‘गुरूकृपा’ ये नामें जीवू जीवूचें निरवस्थान।।७।।

‘चार’ म्हणजे सोपचार आराधन।
‘राव’ म्हणजे विमर्शशक्तीचें उपयोजन।
‘चरू’ म्हणजे द्रव्यगुणांचे संयोगीकरण।
‘मुद्रा’ या नांवे प्रतीकाचा प्रत्यंगभाव।।८।।

चित्गगन-चंद्रिकेची फेसाळली जान्हवी।
श्रीगुरूकृपेची वेल्हाळली की पान्हवी।
प्रकटली वा नीलाब्जाची श्रीसुषमा अभिनवी।
श्रीपादुकोदय स्तोत्र हें ।।९।।

श्रीनवशुक्तिकांचा सम्यक् समुल्लेख।
येथ दशोपनिषद्रहस्याचे महावार्तिक।
आदिकृपेचा जणुं संतताभिषेक।
श्रीगुरूपादुकोदयस्तोत्रम्।।१०।।

।।इति श्री गुरूपादुकोदय स्तोत्रम्।।
------------------------------