You are here‘श्री भवानी: महाराष्ट्र माऊली’ / ‘श्री भवानी: महाराष्ट्र माऊली’

‘श्री भवानी: महाराष्ट्र माऊली’


श्री भवानी : महाराष्ट्र माऊली’
भवानी ही भवाची म्हणजे शंकराची शक्ति, आद्य शक्ति होय.
वैदिक परिभाषेंत तिला ‘अजा’ ही संज्ञा आहे.
‘अ-जा’ म्हणजे जिला जन्म नाहीं व म्हणून मृत्यूहि नाहीं, ती.
सांख्य परिभाषेंत तिला ‘मूल-प्रकृति’ हें नांव आहे.
भवानी शक्तीच्याच त्रि-विध उपांगांना, तंत्र-वाङ्मयांत कामेश्वरी, वज्रेश्वरी व भग-मालिनी असें म्हटलें आहे. आदि भवानीला उद्देशूनच ‘ऐं -हीं क्लीम् चामुण्डायै विच्चे।’ या नवार्ण महामंत्राची रचना व उप-योजना आहे.
भवानी हीच ‘परब्रह्म-महिषी’ आहे. भवानीशिवाय भवाचें, शक्तीशिवाय शिवाचें एकहि स्पंदन शक्य नाहीं.
(‘सौन्दर्य-लहरी’ - श्री शंकराचार्य)
भव किंवा शिव हें तत्त्व आहे. भवानी व शिवा ही शक्ति आहे.

भवानी ही विकास - देवता आहे. सूक्ष्म व गूढ, दैवी व अतीन्द्रिय, सुप्त व गुप्त शक्तीचें प्रकटन ही भवानी देवीची सहज-क्रिया होय.
‘देवयति, प्रकाशयति इति देव: देवता वा।’ ऋग्वेदांतील सुप्रसिद्ध नासदीय सूक्तांतील ‘असत्’ हा शब्द ‘अव्यक्त’ या अर्थानें उपयुक्त झाला आहे. हें ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलांतलें १२९ वें सूक्त आहे.
तैत्तिरीय ब्राह्मणांत (२.८.९) हेंच संपूर्ण सूक्त उद्धृत केलें आहे. सृष्टीचें उत्पादन कसें झालें, या प्रमेयावरील प्रस्तुत सूक्त, ही मानवानें लावलेली पहिली उपपत्ति आहे. ह्या सूक्ताचा कर्ता परमेष्टि - प्रजापति होय.
सृष्टि-उत्पादन-शास्त्र (Cosmology) हें परमेष्ठि प्रजापति या महान् ऋषीनें किंवा ऋषि-स्वरूप देव-तत्त्वानें प्रस्थापित केलें.
भागवत - धर्माचा, महाराष्ट्राच्या वैशिष्ट्यपूर्ण भागवत-धर्माचा उष:काल या सूक्तांतच प्रथम प्रकटला आहे.
महाभारतांतील नारायणीय किंवा ‘भागवत’ धर्माचे विवेचन नासदीय सूक्ताच्या आधारानेंच भगवान् व्यासांनी केलें आहे.
विष्णु-भक्ति, वासुदेव-भक्ति व शेवटीं विठ्ठल-भक्ति असा हा ऐतिहासिक क्रम आहे.
नासदीय सूक्त हें एक विलक्षण तत्त्व-काव्य आहे. त्याची सूचकता अत्यंत विशाल आहे. संशयवाद, निरीश्वरवाद, ब्रह्मवाद, ज्ञानयोग, कर्मयोग व भक्तियोग या सर्व-सर्व विचारप्रणालींचा उगम नासदीय सूक्तांत आहे. भगवान् व्यासांनी भारतीय भागवत-धर्म नासदीय सूक्ताच्या आधारानेंच प्रकटविला आहे.
‘भव’ हा शब्द ‘शं-कर’ - वाचक आहे. ‘पुनर्निर्माण’ ही ‘शं-कर’ - क्रिया आहे.
‘मृत्युंजय’ हें शंकराचे मूल-स्वरूप आहे. शंकर ही विनाशक देवता नव्हे. विनाश हें फक्त पूर्वांग आहे.
पुनर्निर्मिती हें शंकराचे उत्तरांग आहे. शंकरांचे शिव-त्व, शंकर-त्व, हें त्यांच्या मृत्यूवरील विजयाचें, मृत्युंजयत्वाचे द्योतक आहे. केवल मृत्यूच्या, संहाराच्या देवतेला ‘शिव’ कोण म्हणेल !
ब्रह्मदेव हा एकदांच व प्रथम सृष्टि निर्माण करतो. पण त्याला पुनर्निर्माणाची किमया अवगत नाही.
स्मशानाला स-जीवता देण्यासाठीं श्रीशिवशंकरांचा अधि-वास स्मशान-भूमींत आहे. मुंड-माळा गळयांत घालून श्रीशंकर त्यांना स-चेतन करीत असतात व पुनश्च ईशकार्य पुढें चालविण्यासाठीं मानव-सृष्टींत पाठवून देतात.
महाराष्ट्राच्या पुनरुत्थानासाठी, श्रीशंकरांनी, सतराव्या शतकांत लक्षावधि मुंड-माला, भवानी शक्तीद्वारें, स-चेतन करून सह्याद्रीच्या आसपास प्रक्षिप्त केल्या होत्या. माणसांच्या प्रेतांना जगविण्याची व जागविण्याची ही सिद्धि श्रीशिवछत्रपतींच्या ठिकाणीं, भगवान् श्री शिवशंकरांनी निक्षेपित केली होती.
ही आदि-शक्ति म्हणजेच भवानी होय. श्रीशिवछत्रपतींच्या हांकेने, दृष्टिक्षेपानें व स्पर्शानें महाराष्ट्रांतल्या मुडद्यांचे महापुरूष होत असत, त्याचें कारण महामृत्युंजयाची संजीवक भवानी-शक्ति त्यांच्या ठिकाणीं साकारली होती.
भव किंवा शंकर यांची आदि-शक्ति, बीज-शक्ति हीच भवानी होय. ‘भव’ हा शब्द ‘भू’ या धातूपासून उपलब्ध आहे.
‘भू’ म्हणजे होणें, प्रकट होणें, सूक्ष्मांतून स्थूलांत येणे, अव्यक्तांतून व्यक्त अवस्थेंत येणें.
‘भव’ हें विकास-तत्त्व आहे. भवानी ही भव-तत्त्वाची प्र-स्फोटक शक्ति आहे.
सन्धिनी, संवित् व ह्लादिनी या श्रीभवानीच्या तीन क्रिया-शक्ति आहेत. संधिनीद्वारा श्रीभवानी योग्य मानवामध्यें स्वत:च्या शक्तीचे ‘संधान’ करते; स्वत:ची शक्ति जुळवून, मिळवून देते. संवित्’ द्वारा योग्य मानवाला श्रीभवानी स्फूर्ति देते, ज्ञान-विज्ञान देते व चैतन्य-पूर्ण ठेवते. ह्लादिनीद्वारें श्रीभवानी योग्य मानवाला आल्हादित, आनंदित, कृतकृत्य-भावनेंत प्रसन्न ठेवते. भवानी हीच साक्षात् शक्ति होय. प्रकटनाची, विकासाची, उत्कर्षाची प्रक्रिया हीच भवानी आहे. Evolution चें, उत्क्रांतीचें तत्त्व हा भवानी प्रतिकाचा मूलार्थ व गूढार्थ आहे.
‘या देवी सा देवता।’ हे यास्काचार्यांचें एक दिसण्यांत सोपें पण मोठें गूढार्थवाचक सूत्र आहे.
श्रीशिवाजींच्या ठिकाणीं श्रीभवानी माउलीने संधिनी क्रिया केली, त्या वेळेचा प्रसंग ‘Grand Rebel’ या किंकेड यांचा सुप्रसिद्ध इंग्रजी ग्रंथांत देखील उल्लेखित आहे. श्रीभवानीपुढें श्रीशिवाजीने स-अष्टांग दण्डवत् नमन घातलें आहे. संपूर्ण चार प्रहर, म्हणजे १२ तास शिवाजी त्याच अवस्थेंत निश्चल होते.
श्रीभवानीने ‘संधिनी’ क्रिया केली व स्वत:शीं श्रीशिवबांचे ‘संधान’ केलें. नंतर संवित् क्रिया केली व तिच्यामुळें ध्यान, धारणा, संयम, सविकल्प, निर्विकल्प समाधि या सर्व अवस्थांमधून श्रीशिवाजी गेले.
शेवटीं ‘ल्हादिनी’ क्रियेमुळें आनंदाश्रू ढाळीत ते जागे झाले.

आपण ज्या प्रतीकांना ‘देवी’ म्हणतों, त्या देवता-तत्त्व-वाचक आहेत. देव-ता म्हणजे प्रकाश-केंद्र किंवा
शक्ति-केंद्र. मानवी शरीरांतील इंद्रियांच्या शक्ति या देवता आहेत. निसर्गातल्या शक्ति या देव-ताच होत.
देवता म्हणजे प्रकाशक-ता. ज्यांना आपण देवी म्हणतों - लक्ष्मी, सरस्वती, कालीं इत्यादि- तीं सर्व प्रकाशकतेचीं केंद्रें आहेत.
यास्काचार्यांच्या वरील सूत्रानें ‘देवी’ शब्दाचा मूलार्थ ‘प्रकाशक-ता आहे, हें स्पष्टविण्यांत आलें आहे.
देवी भवानी हें प्रकाशन-केंद्र आहेच पण शिवाय तें विकास-केंद्र आहे. ‘भवानी’ या शब्दानें
आदर्श अस्तित्व, विकासशील अस्तित्व या अर्थाचा बोध होतो.
सर्वोपेता च तद्दर्शनात। - ब्रह्मसूत्रे.
भवानीशक्ति सर्व समृद्ध आहे. तिचें साक्षात् दर्शन होतें व सर्व समृद्धि प्राप्त होते - ब्रह्मसूत्रे (बादरायण)
भवानीची शक्ति शस्त्र व शास्त्र या दोनही स्वरूपांत अवतीर्ण होते. शास्त्र व शस्त्र हीं दोनही तत्त्वत: एकच आहेत.
शास्त्र हें अनिष्ट प्रवृत्तींचा, स्वैरतेचा, दुराचारांचा नाश करण्यासाठी अवतरते.
शस्त्र हें शत्रूंच्या नाशासाठीं आहे. स्व-हिताचे, स्व-राष्ट्राचे, स्वराज्याचे शत्रू नष्ट करण्यासाठी शस्त्रांचा अवतार आहे.
आर्त जनांच्या परित्राणासाठी शस्त्रांचा उपयोग शास्त्र-पूत आहे. आर्तत्राणाय व: शस्त्रम्!

शस्त्र व शास्त्र या दोहोंचाही दुरुपयोग शक्य असतो. आजपर्यंतच्या इतिहासाची साक्ष त्यांचा दुरूपयोगच सिद्ध करते.
धर्मयुद्धें झालीं, ती धर्म-मतांसाठी झालीं असलीं, तरी तीं धर्म-प्रधान व धर्म-प्रचुर युद्धें नव्हतीं.
धर्मयुद्धांत एवढा भयानक अधर्म होता कीं, ‘धर्म’ मारण्यासाठींच ती लढलीं गेलीं, असें वाटतें.
दोन्ही पक्ष आपसांत लढतांना ‘धर्म’ कसा मारला जाईल याची, अधिकांत अधिक काळजी घेताना दिसतात!
शस्त्रापेक्षां शास्त्राचा दुरुपयोग, मानवी इतिहासांत कितीतरी पटीनें, अधिक भयानक ठरला आहे!
माणसामाणसामधील भेद, उच्च्-नीचता, कृत्रिम विषमता या सर्व गोष्टी शास्त्राच्या दुरूपयोगामुळेंच उत्पन्न झाल्या आहेत.
शस्त्र व शास्त्र हे तत्त्वत: एकाच अर्थाचे शब्द आहेत, असें म्हणणें योग्य होईल. ‘शास्त्र’ शब्दांत ‘शस्त्र’ शब्दापेक्षां एक ‘अ अधिक आहे. ‘अ’ काराची द्विरुक्ति ही केवळ जोर देण्यासाठींही योजण्यांत येते.
शस् व शास् या दोन निराळया धातूंपासून शस्त्र व शास्त्र शब्द उत्पन्न झाले आहेत, असें सामान्यत: मानलें जातें. पण, या दोनही धातूंचा अर्थ मुळांत एकच आहे. शस्त्र या शब्दाचा अर्थ ‘स्तोत्र’ असा आहे.
मीमांसकांच्या कर्मकांडांत, शस्त्र या शब्दांचा अर्थ ‘स्तोत्र’ हा अर्थ सु-प्रतिष्ठित आहे. शस्त्रानें किंवा शास्त्रानें ईश-प्राप्ति करणें, हा मानवी जीवनाचा मुख्य हेतु आहे. शस्त्राचें किंवा स्तुतीचें एक शास्त्र आहे.
मीमांसादर्शन हें स्तोत्राचें, शस्त्राचें शास्त्र आहे. शास्त्र हें ईश्वर-निष्ठ जीवनाचें ‘शस्त्र’ किंवा साधन आहे.
शस्त्र हेंही ईश्वरनिष्ठ जीवनाचें, स्तोत्र या अर्थानें, साधनच आहे. एवंच, शस्त्र व शास्त्र हे दोनही शब्द एकाच अर्थाचे बोधक आहेत. दोहोंच्या उपयोगामागें हेतू हा एकच आहे. पंक्त व पांक्त, क्षत्र व क्षात्र, शक्त व शाक्त, वहन व वाहन, यजन व याजन हे शब्द एकाच अर्थानें अनेक वेळां वापरले जातात.
त्याचप्रमाणें शस्त्र व शास्त्र हे दोनही शब्द तत्त्वत: एकच अर्थ व्यक्तवितात. भवानी माऊलीचीं शस्त्र व शास्त्र ही दोन आयुधें आहेत. पण तीं मूलत: एकच आहेत. एकाच हेंतूने व एकाच हेतूसाठी तीं प्रकटतात.
श्रीशिवछत्रपतींच्या हातांत, माऊली भवानीनें तरवार दिली; शस्त्र दिलें व शास्त्र दिलें. ‘भवानी माऊलीची तरवार’ हे एक दिव्य प्रतीक आहे. माऊलीनें शिवरायाला ‘असि’ बरोबर ‘असि-धारा व्रत’ दिले.
किंबहुना, माऊलीचा मुख्य हेतु दीक्षा देणें, व्रत देणें एवढाच होता.
भवानी-तरवार हें अ-संग शस्त्र होते. त्या असंगशस्त्रानें महाराष्ट्रांतल्या अज्ञानाचा, दुहीचा, पारतंत्र्याचा संहार करण्याची त्यांना स्फूर्ति दिली होती. महाराष्ट्राच्या स्वातंत्र्याआड येणा-या म्लेच्छांचाहि संहार त्याच तरवारीनें करावा लागला, पण ते म्लेंच्छ म्हणून नव्हे, तर हिंदवी स्वातंत्र्याचे शत्रु म्हणून, हिंदू धर्माचे, भागवत धर्माचे, सत्याचे व शीलाचे हिंसक म्हणून! स्वातंत्र्य व पारतंत्र्य हे मुख्यत: आन्तरअंगाचे भाव-विशेष आहेत.
बाह्यत: तुरुंगांत, गुलामगिरींत असणारी माणसें, मनानें स्वतंत्र असूं शकतात. सर्व देशांतली स्वातंत्र्य-लक्ष्मी तुरुंगाच्या महाद्वारांतूनच अवतीर्ण झाली आहे. तुरुंगातल्या अंधारांत स्वातंत्र्य-लक्ष्मीची दीप्ति अधिकच तेजानें तळपते.
श्रीशिवप्रभु जन्मत:च स्वतंत्र होते. त्यांनी पारतंत्र्याचा स्पर्श स्वत:ला कधींच होऊं दिला नाहीं.
‘स्व’ हा जसा निसर्गसिद्ध असतो, तसेंच त्याचें विशिष्ट ‘तंत्र’ देखील स्वयंसिद्धच असतें.
स्वतंत्रता ही एक स्वयंभु, स्वयंसिद्ध, स्वयंप्रकाश वस्तुस्थिति आहे. परतंत्रता ही विकृति आहे; प्रकृती नव्हे.
अज्ञान हेंच परतंत्रतेचे कारण आहे. अज्ञानाच्या पोंटी भीति, लाचारी, परावलंबन इत्यादि वृत्ति उद्भवतात व व्यक्ति आणि राष्ट्रें परतंत्र होतात. ‘मी स्वतंत्र आहे’ या वस्तुस्थितीची जाणीव व्यक्तिमात्रानें अखंड तेवत ठेवली पाहिजे.
स्वतंत्रतेत तंत्र म्हणजे नियम, शास्त्र किंवा पद्धति या गोष्टी असतातच. पण त्या सर्व स्वत: स्वीकारलेल्या असतात.
स्वैरतेंत नियम नसतात, बेतालपणा असतो. स्वतंत्रता ही नेहमी नियमनिष्ठ, तालबद्ध असते.
आपण स्वतंत्र असल्यामुळेंच परतंत्र होऊं शकतो, या विधानांत ‘वदतो व्याघात’ नाही.
परतंत्रता आपण स्वीकारतों म्हणून आपण परतंत्र होतों व राहतों. आपण ती स्वीकारलीच नाहीं, मान्य केली नाहीं, तर परतंत्रता आपणांस कालत्रयी येऊं शकत नाहीं. असे चिर-स्वतंत्र, स्वयं-स्वतंत्र महापुरुष थोडे असले,
तरी प्रत्येक कालखंडांत उपलब्ध असतात. माऊली भवानी त्यांना जन्म देत असते व त्यांची परंपरा अखंड तेवत ठेवते.
भवानी ही भाग्याची, भवितव्याची, भविष्यत् भाग्यविकासाची अधिष्ठात्री देवता आहे. ती भवानीच ईश्वरनिष्ठ व पराक्रमी पुरुषांच्या हातांत तरवार म्हणजे असिधारेसारखे प्रखर ‘व्रत’ देत असते.
श्रीशिवाजीमहाराजांच्या हातांत दिलेलें असिधारा-व्रत भवानीनें आज श्री. यशवंतराव चव्हाण यांच्या हातांत दिलें आहे. हें खडतर व्रत त्यांनी सांभाळावें. श्रीभवानीने त्यांना सांभाळून घ्यावें हीच प्रार्थना.
हिंदवी स्वराज्य अमर व्हावें, हें श्रींच्या, म्हणजे श्रीभवानीमातेच्या, महाराष्ट्रमाऊलीच्या मनांत फार आहे.
प्रत्येक महाराष्ट्रीय मानसाने असि-धाराव्रत चिर-स्थिर ठेवावे हेंच माऊलीच्या आशीर्वादाचें ग्रहण!

Facebook page

We have a page on facebook "Maharshi Vinod Publications.
You can join us.

श्रीगुरुपादुकोदयस्तोत्रम्


आज मुहूर्तवूं या एक नित्योत्सव।
अद्वैत आमोदें, जेणे फुलेल हें विश्व।
क्षणोक्षण प्रभातेल नवोनव महापर्व।
प्रसादचिन्ह श्री-श्री-श्रीविद्येचें।।१।।

परा, परापरा, अपरा।
श्रीगुरूपुजा ही त्रिशिरा।
विमर्शा माऊलीची ही स्तनदुग्धधारा।
ओष्ठविण्याचा समय हा।।२।।

‘अपरा’ आराधनेंत भेद-ग्रह-स्थिती।
‘परापरा’ अवस्थेंत भेद-अग्रह-वृत्ती।
‘परा’ अवस्थानांत अभेद-स्फूर्ती।
श्रीगुरूपुजेची पादुका ही।।३।।

आदिभान हें परात्परगुरुबीज।
विमर्शशक्ती श्रीशिवा गुरूविद्येची गुह्यशेज।
जीवूजीवूचा पहिला परिव्राज।
गुरूपादुकेचें आलोचन ।।४।।

एक उफराटे अ-कुल ब्रह्मपद्म।
तेथ निष्कलेचे निजशक्तीधाम।
निर्झरले व्यापिनीचे श्यामव्योम।
अमृतमेघ वोसंडला।।५।।

चतुष्कोणी देवतात्म्यांचे उगमस्थान।
बिंदुस्थली अमृतसिद्धीचें अनुभावन।
यथाक्रम आंतर अनुभवांचें अनुस्थापन।
श्रीगुरूविद्येचा सहजाचार हा।।६।।

‘विमर्श’ म्हणजे आदिभानस्थित चित्शक्ती।
पादुकोदय म्हणजे शिवशिवेची साम्यरसस्थिती।
गुरूकृपयैव या भाग्यश्रीची समवाप्ती।
‘गुरूकृपा’ ये नामें जीवू जीवूचें निरवस्थान।।७।।

‘चार’ म्हणजे सोपचार आराधन।
‘राव’ म्हणजे विमर्शशक्तीचें उपयोजन।
‘चरू’ म्हणजे द्रव्यगुणांचे संयोगीकरण।
‘मुद्रा’ या नांवे प्रतीकाचा प्रत्यंगभाव।।८।।

चित्गगन-चंद्रिकेची फेसाळली जान्हवी।
श्रीगुरूकृपेची वेल्हाळली की पान्हवी।
प्रकटली वा नीलाब्जाची श्रीसुषमा अभिनवी।
श्रीपादुकोदय स्तोत्र हें ।।९।।

श्रीनवशुक्तिकांचा सम्यक् समुल्लेख।
येथ दशोपनिषद्रहस्याचे महावार्तिक।
आदिकृपेचा जणुं संतताभिषेक।
श्रीगुरूपादुकोदयस्तोत्रम्।।१०।।

।।इति श्री गुरूपादुकोदय स्तोत्रम्।।
------------------------------

You may keep up to date with our updates by subscribing to RSS feed of this website. RSS Feed is available at www.maharshivinod.org/rss.xml