You are hereचवथे पाऊल / चवथे पाऊल
चवथे पाऊल
“पहिला आविर्भाव, पहिली सृष्टी, पहिले दृश्य प्रकट होते, त्या वेळी मोठा गडगडाट होतो.
“शेवटले दृश्य मात्र नि:शब्द शान्ततेत अवतीर्ण होते. शान्ततेचा ध्वनी आत्मसात् करणे अत्यन्त कठीण आहे. ते साधण्यात केवढ्यातरी अन्त:शक्तीचा उपयोग, व्यय आवश्यक असतो.
“गगनभेदी गडगडाटात नि:शब्दाचा ध्वनी आत्मसात् करणे त्या मानाने सुशक्य असते. या गडगडाटाशिवाय ते सुतराम् अशक्य आहे.
“परन्तु, प्रकाशमय झालेल्या नेत्राला अन्धार दिसणे केव्हातरी शक्य होईल काय?”
- अग्नियोग, (पान २३१)
-------------------------------------------
त्या रम्य वनस्थलीतून सरोवराच्या वालुकामय किनार्यावर मी पाऊल टाकले.
पण तेवढ्यात ते वृन्दगीत विराम पावले. सर्वत्र गंभीर शान्तता पसरली. तो महापुरुष तेथेच होता. इन्द्रधनूचे तेजोवलय त्याच्या मुद्रेभोवती झळकत होते. मी क्षणभर घुटमळले. माझ्यामुळे तिथल्या त्या दिव्य शान्ततेचा भंग तर होणार नाही ना? - माझे मन शंकित झाले. पण गुरुदेवांनी ‘सुस्वागतम्’ म्हणणारा एक दृष्टिक्षेप माझ्याकडे केला. जणू त्यांना म्हणावयाचे होते की, ‘ये. आम्ही सर्वजण तुझीच वाट पाहत आहोत.’
- आणि म्हणून आम्ही हळुवारपणे, मन्दपणे पावले टाकीत पुढे सरकलो. समोर दिसणार्या त्या समूहातली मंडळी दाटीवाटीने बसली होती. त्यातल्या दोन व्यक्तींमध्ये आम्हाला थोडीशी जागा दिसली. हिरण्य-पुरुष, मी आणि माझी ती छाया - माझा कर्मपशू - आम्ही तिघेही तेथे जाऊन बसलो. पण ती जागा फारच अरुन्द आणि लहान होती. मी हिरण्य-पुरुषाच्या अगदी जवळ बसले. तोही माझ्याजवळ सरकला. माझा कर्मपशू दोन्ही बाजूच्या निकटवर्ती व्यक्तींना त्रास तर देत नाही ना, म्हणून मी त्याच्याकडे पाहिले, तो केवढे आश्चर्य! तो पशु इतका लहान झाला होता की, माझ्या शेजारी एखाद्या ठिपक्यासारखा भासू लागला.
“ही इतकी साधी गोष्ट आहे?”, मी स्वत:शीच पुटपुटले, “हा हिरण्य-पुरुष अन् मी एकरूप झालो की, हा कर्मपशू अन्तर्धान पावेल, नाहीसा होईल? कर्मपशू ही माझी छाया आहे. हिरण्य-पुरुष हा माझा सूर्य आहे. सूर्य माझ्याहून निराळा असेपर्यंत माझी छाया पडण्याची शक्यता. मी व सूर्य एकरूप झाल्यावर माझी छाया कशी पडेल?”
“होय”, हिरण्य-पुरुष संथपणे म्हणाला, “याच कारणासाठी तू या कर्मपशूला कृष्णारण्यात सोडू शकली नाहीस. तू अगदी कंटाळली होतीस; तुला तो नकोसा झाला होता. पण जोपर्यंत तू माझ्याशी, तुझ्या सूर्याशी एकरूप होणार नाहीस, तोपर्यंत तुझी छाया तुला कशी सोडणार?
“तू मला तुझ्याकडे आकृष्ट करीत असतेस. तुला असा भास होई की, तू स्वत: माझ्याकडे येत आहेस, आकृष्ट होत आहेस; पण तो भासच होता. वस्तुत: मी तुझ्याकडे आकृष्ट होत होतो; तू मला खेचीत होतीस. आता मला तू जितके जवळ खेचशील, तितकी तुझी छाया, तुझा हा कर्मपशू अधिकाधिक क्षीण होईल, व शेवटी नष्ट होईल.
“माध्यान्हीचा सूर्य डोक्याच्या अगदी जवळ येतो; सरळ रेषेत येतो. तुझे डोके आणि सूर्य यात कमीत कमी अन्तर असते, म्हणून तुझी छायादेखील तुझ्या अगदी जवळ, पायांखाली आलेली असते. असेही म्हणता येईल की, तूच त्या छायेला आकृष्ट करीत असतेस. अखेरीस छाया म्हणून ती शिल्लकच राहत नाही. त्या वेळी खरोखर ती छाया म्हणजे काय आहे, याचे तुला ज्ञान होते. आणि नन्तर त्या छायेचे खरेखुरे स्वरूप काय आहे ते तुला समजते. ती छाया म्हणजे तुझ्या स्वत:च्या अनुभवांतून निर्माण झालेला तुझा देह आहे.
“हा देह हेच मला ओळखण्याचे तुझे मुख्य साधन आहे. या सर्व अनुभवांनी समृद्ध झालेल्या देहाशिवाय तुला आत्मज्ञान कधीही होणार नाही”, हिरण्य-पुरुष थांबला.
“आलं लक्षात. पण अजून तसे झालेले नाही. माझे तुमच्याशी, माझ्या सूर्याशी पूर्ण तादात्म्य झालेले नाही”, मी स्वत:शी पुटपुटले, “या अवस्थेत मला विशेष काळजी घेतली पाहिजे. जरी हा कर्मपशू अत्यन्त आकुंचित झाला आहे; आता अगदी लहानगा, इवलासा दिसतो, तरी तो नाहीसा झाला नाही; अन्तर्धान पावला नाही; हे मला विसरता येणार नाही. मी किंवा कोणीही त्याला धक्का दिला, त्याला पाय लागला, तर तो चिडेल. कदाचित् त्याला दुखापतसुद्धा होईल.” हे विचार मनात येत असताना मी माझ्या डाव्या उजव्या बाजूला बसलेल्या व्यक्तींच्यामध्ये अलगद बसून गेले. मी एक शब्दसुद्धा बोलले नाही, तेथील शान्ततेचा भंग केला नाही. त्या दोन व्यक्तींनी माझ्यासाठी ती जागा खास राखून ठेवली होती, असे त्यांनी नजरेने मला सुचविले. अन् माझी भावना झाली, की हेच माझे स्थान.
त्या वेळी मला कल्पना नव्हती; पण याच महाकेन्द्रासाठी, या पुण्यतीर्थासाठी, माझी आजपर्यंतची सर्व धडपड होती.
मी त्या टेकडीवरून खाली उतरत होते तेव्हा मी घसरून पडले, आणि मला एक दिव्य जागृती आली. त्या वेळी अजाणतेपणे याच पुण्यतीर्थाला जाण्याची मला इच्छा झाली होती.
सभोवार बसलेले वृन्दगायक हेच माझे खरेखुरे सोबती, खरेखुरे स्नेही आणि सहचर होत. इन्द्रधनूच्या वलयाने सुशोभित असणारे हे गुरुदेव, यांच्या साहाय्याने, कृपेने, आम्ही सर्व गिरिशिखरावर पोहोचू. आता निराशेची, अपयशाची शक्यताच उरली नव्हती.
“त्या भीतीचे बोचके त्या केराच्या ढिगात आता फेकून देता येईल”, मी स्वत:शी बोलले आणि पुन्हा उद्गारले, “या माझ्या इतर सहचरांपुढेसुद्धा असाच एक क्षण आला असेल. कितीतरी मोठा भीतीचा बोजा त्यांनी माझ्याप्रमाणेच खांद्यावर बाळगला असेल. हा येथे केराचा ढीग दिसत आहे. हा सर्व केर त्यांनी फेकून दिलेल्या अडगळीचा, अनावश्यक गोष्टींचाच असणार. गिरिशिखरावर जर चढायचे, तर अंगावर ओझे कसे ठेवता येईल?
“या देहाचे ओझे ओढणे, यालाच कितीतरी श्रम पडतील; पण या देहाशिवाय वर जाणे शक्य नाही; ही देहधारणा आवश्यक आहे, अटळ आहे, आणि निसर्गातली ही एक स्वयंसिद्ध घटना आहे, ती आपण स्वीकारली पाहिजे.”
“या देहाचा, या वस्तूचा उपयोग करून घेतला पाहिजे”, असे काही विचार माझ्या मनात घिरट्या घालीत होते. एवढ्यात तेथे काही नवीन व्यक्ती आल्या; स्त्रिया व पुरुष. ते सर्वजण किनार्याकडे येत होते; पण निरनिराळ्या रस्त्याने, निरनिराळ्या दिशेने. या तिघांपैकी जो पुरुष होता, त्याच्याकडे पाहून मी सर्दच झाले. दलदलीतून मी ज्याला वर काढले, तोच तो पुरुष!
“इतक्या लवकर त्याने आम्हाला कसे गाठले?”, हिरण्य-पुरुषाला मी माझी शंका विचारली.
“येथे पोचण्याचे अनेक व विविध मार्ग आहेत. ते काळे अरण्य ओलांडले की, मग ज्याचा त्याचा मार्ग, ज्याने त्याने स्वत: निवडावयाचा असतो. काहीजण स्वत:चा स्वतंत्र मार्ग निवडून काढतात. या गृहस्थाने एखादा जवळचा मार्ग शोधून काढला असेल; किंवा त्याने क्षणमात्रही वेळ फुकट घालविला नसेल. आपण त्या ओढ्याच्या काठाकाठाने कितीतरी वेळ भटकलो, नाही का? त्यात काही विशेष नाही. महत्त्वाची गोष्ट ही की, तो आणि आपण सर्वजण अगदी वेळेवर येथे येऊन पोचलो”, हिरण्य-पुरुष उत्तरला.
अगदी याच क्षणी त्या दलदलीतल्या पुरुषाचे माझ्याकडे लक्ष गेले. आनन्दित होऊन तो माझ्याकडे धावत आला. माझ्या मागे असलेल्या वाळूमध्ये तो एकदम बसला. बिचारा धापा टाकीत होता; जरा शान्त झाल्यावर त्याचा श्वास त्याला गवसला. आणि तो बोलू लागणार, इतक्यात मी कुजबुजले,
“श्, श्, येथे मोठ्याने बोलावयाचे नसते.”
“अरेरे, चुकलं माझं!”, तो माझ्या कानात पुटपुटला, “तरीसुद्धा हे सांगितल्याशिवाय मला राहवणार नाही. तुम्ही सांगितले ते अगदी खरे. हिरण्य- पुरुष, कर्मपशू - ते सारेच खरे. मला त्यांचा अनुभव आला. बहुतेक सर्व मार्गावरून मी धावत पळत आलो. कड्यापाशी मला मोठीच झटापट करावी लागली. तुमची पुन्हा गाठ पडेल याची मला फारशी आशा नव्हती. बहुधा पडणार नाही, अशी चोरटी भीती माझ्या लहानग्या आशेवर मात करण्याचा प्रयत्न करीत होती.”
“मला अतिशय आनन्द झाला; तुम्ही मला गाठलेत. आणि मीही तुम्हाला भेटू शकले”, त्याला हलक्या आवाजात मी सुचविले, “आता आपण शान्तपणे बसून ऐकू या.”
“येथे प्रत्यक्ष काहीच ऐकू येत नाही. पण इन्द्रधनूचे वलय मस्तकाभोवती धारण केलेल्या, मध्यभागी उभ्या असलेल्या गुरुदेवांकडे नुसते पाहत बसण्यानेच किती समाधान होते! शिवाय येथली गूढ आणि प्रगाढ शान्ती आपणास काही दिव्य ध्वनी, अमूर्त शब्द, मूक संगीत ऐकवीत आहे असे वाटते.”
एवढे बोलून माझी नजर मी श्रीगुरुदेवांच्या मुद्रेकडे वळविली. त्यांनीही स्वत:च्या तीक्ष्ण नजरेने माझ्या डोळ्यांत एक प्रकाशकिरण ठेवला. या त्यांच्या दृष्टिक्षेपातून कारुण्य आणि ममत्व ओसंडत होते. माझ्याबद्दल व माझ्या हिडीस कर्मपशूबद्दल त्यांना काहीही ठाऊक नव्हते. मी कोण आहे, येथे कशी, केव्हा आले; हे कुत्रे येथे कसे आले; यातले काहीही त्यांना माहीत नव्हते. असे असूनदेखील, वात्सल्याने न्हालेली त्यांची दृष्टी माझ्याकडे वळली, तेव्हा ती माझ्या ‘मी’ला भेटली. माझ्याबद्दलच्या अनेक गोष्टी, घटना, माझा कर्मपशू, माझे कालनिष्ठ जीवन या सर्व गोष्टी गौण आहेत, माझ्या ठिकाणचे ‘मी-पण’ हीच मध्यवर्ती, महत्त्वाची गोष्ट आहे, हा सर्व आशय त्यांच्या त्या मातृवत्सल दृष्टीत भरला होता.
श्रीगुरुदेवांना माझे सर्वच्या सर्व अनुभव पूर्णपणे माहीत होते; किंबहुना, याच अनुभवांमधून ते प्रत्यक्ष गेले होते, किंवा गेले असले पाहिजेत, याबद्दल मला शंका उरली नाही. ते स्वत: त्या कभिन्न अरण्यात मार्ग चुकले होते. त्यातून ते त्यांचा स्वत:चा मार्ग काढू शकले. सर्व मार्ग त्यांनी स्वत: आक्रमिला होता. मला तर निश्चितपणे असेही वाटत होते की, ते गिरिशिखरावर यापूर्वीच एकदा आरूढ झाले होते.
केवळ आम्हा नवयात्रिकांसाठी ते गिरिशिखरावरून पुन्हा मागे परतले असतील काय? आम्हाला धीर द्यावा, साहाय्य करावे, स्फ़ूर्ती द्यावी, या वत्सल भावनेने श्रीगुरुमाऊलींनी हे सर्व श्रम घेतले असावेत; असा विश्वास माझ्या ठिकाणी उत्पन्न झाला. या कल्पनेने तर माझे अन्त:करण इतके गहिंवरून गेले, कृतज्ञतेने भरून आले की, एक क्षण माझ्या हृदयाचे स्पन्दन स्थिर झाले.
श्रीगुरुदेव प्रत्यक्ष काहीच बोलले नाहीत; पण मी त्यांचे विचार समजू शकले. माझ्या प्रश्नांचे उत्तरच त्यात होते. त्यांचे सोज्वळ हास्य अर्थपूर्ण व अर्थसूचक होते.
“गिरिशिखर गाठण्याचे अनेक, विविध मार्ग आहेत. जेवढे यात्रिक तेवढे मार्ग. अर्थात् काही वाटा अधिक सुरक्षित, अधिक जवळच्या असतात. मी एक चांगला, रुळलेला मार्ग तुम्हाला दाखवितो. त्या मार्गावरून युगानुयुगे साधक व संशोधक वर चढले आहेत.”
हा सर्व वेळ विश्रान्तीत गेला. माझे अंत:करण शान्त होत गेले. माझ्या भावना समोर असलेल्या सरोवराच्या पृष्ठभागाप्रमाणे अगदी संथ झाल्या होत्या. माझे विचार पूर्वीसारखे पाठशिवणी खेळणार्या पिंजर्यातल्या खारींप्रमाणे आता त्याच त्या वर्तुळात चकरा घालीत नव्हते.
आणि नन्तर क्षणभर, माझा देह असल्याची जाणीव मला उरली नाही. अर्थातच ती छाया, म्हणजेच तो कर्मपशू नाहीसा झाला होता. मला एवढेच ज्ञान होते की, ‘मी आहे.’ आणि एका दिव्य नि:शब्दतेचा मी एक घटक आहे! ती नि:शब्दतादेखील एक दिव्य संगीतच होते.
‘अ उ म् म् म् -’
“अथ योगानुशासनम्।” श्रीगुरुदेव आपल्या घनगूढ आवाजात बोलू लागले. त्यांचा तो शब्द, एका गीताची खेचलेली स्वरसंतति होती. ते गीत माझ्या अन्त:श्रुतीला एका क्षणापूर्वी ऐकू आले होते. भोवतालची अर्थपूर्ण व बोलकी नि:शब्दता त्यांच्या त्या आवाजाने जरादेखील भंगली नाही.
श्रीगुरुदेव बोलू लागले, “तो नि:शब्द ध्वनी म्हणजे जीवनाच्या अन्तरंगातले सूक्ष्म संगीत होय. विश्वातल्या सर्व गीतिकांचा त्या महनीय संगीतात अन्तर्भाव झालेला असतो. आपणांपैकी प्रत्येक व्यक्ती, ज्याला ज्याला अस्तित्व आहे असे सर्व जातमात्र, त्या महनीय संगीतातील निरनिराळे सूर आहेत, निरनिराळ्या श्रुती आहेत.
“प्रत्येकाच्या वैयक्तिक जीवनाचे स्वरूप जसे असेल, तसा स्वर, तशी उक्ती, त्या जीवनातून निर्माण होते. महा-जीवनाच्या महनीय संगीताला सुसंगतीचा अथवा विसंगतीचा सूर, वैयक्तिक जीवनाच्या विशिष्ट गुणांमुळे प्राप्त होतो. वैयक्तिक जीवन नीतिनिष्ठ, सुसंगत व अन्तर्मुख असेल, तर विश्वव्यापी जीवनाच्या महनीय संगीताला ते पोषक होते.
“वैयक्तिक जीवन जर नीतिभ्रष्ट, विसंगत, ध्येयशून्य असेल; तर त्या महनीय संगीताला विसंगती, बेसूरपणा, विद्रूपता व अर्थहीनता प्राप्त होते. एखादे जीवन अत्यन्त क्षुद्र असते, गुणहीन असते, सन्दर्भहीन असते. असल्या जीवनामुळे महनीय संगीताला उपकारक असा सूर न निघता शान्तिभंजक गोंधळच निर्माण होतो.
“आपण या सरोवराच्या तीरावर एकत्र जमलो आहोत. या भेटीचा हेतू असा आहे की, आपले हे देह, ही उपकरणे अधिक कार्यक्षम व्हावीत. तुमच्या अन्त:करणात जे अंतर्विरोध आहेत, त्यांचे निर्मूलन होणे आवश्यक आहे. तुमच्या वैयक्तिक जीवनातले अंतर्विरोध दूर झाले, तरी तेवढ्याने भागत नाही. स्वत:त अंतर्विरोध नसले, तरी समूहात आल्यावर काही व्यक्तींच्या ठिकाणी अंतर्विरोध उत्पन्न होतात. आणि त्यामुळे एक संघ म्हणून, एक समूह म्हणून जी एकात्मता आवश्यक असते, ती नष्ट होते. समूहस्थ झाल्यामुळे निर्माण होणारे हे अंतर्विरोधदेखील समूळ नष्ट केले पाहिजेत, उखडून टाकले पाहिजेत. ते गेल्याशिवाय सामूहिक जीवनाला व वृन्दसंगीताला पूर्णता येणार नाही.”
श्रीगुरुदेवांचे हे प्रवचन मी ऐकत होते. त्या इन्द्रधनूचा प्रकाशझोत माझ्यावर पडत होता. श्रीगुरुदेवांचे शब्द त्या प्रकाशझोतामधूनच उत्पन्न होत आहेत, असे मला वाटत होते. या प्रतीतीच्या पलीकडे, या दिव्य अनुभवाखेरीज मला कशाचेही भान नव्हते. समूह नव्हता, सहचर नव्हते, किनारा नव्हता, सरोवर व पलीकडले क्षितिज, काही, काहीही शिल्लक उरले नव्हते. मला स्वत:ला देहदेखील नव्हता. श्रीगुरुदेवांची अमृतवाणी ऐकण्यासाठी, व ऐकत होते म्हणूनच केवळ श्रवणेन्द्रिय शिल्लक उरले होते.
“होय, होय”, मी विचार केला. ‘ज्याला श्रवणेन्द्रिय असेल त्यालाच हे शब्द, हे संगीत ऐकू येईल’, या महावाक्याचे मला सहज स्मरण झाले.
“अध्यात्मविद्येतला पहिला वस्तुपाठ हा आहे”, श्रीगुरुदेव पुढे बोलू लागले, “‘स्तब्धता’. नुसती स्तब्धता राखणे. पण स्तब्ध राहणे एवढ्याने भागत नाही; स्तब्ध ‘असले’ पाहिजे. स्वत:चा देह स्तब्ध ठेवण्याचा अभ्यास सुरुवातीला अत्यन्त आवश्यक असतो; पण खरे महत्त्व आहे ते विचार आणि भावना स्तब्ध ठेवण्याचे. तोपर्यंत तुमच्या स्वत:च्या भावना आणि तुमचे स्वत:चे विचार यापलीकडे तुम्ही दुसरे काहीच ऐकू शकणार नाही.
“विशेषत: गीतांचे गीत, भगवद्-गीत, चालू झाले असेल आणि त्याच वेळी कोलाहल चालला असेल, तर ते महनीय संगीत कसे ऐकू येईल? एका आगळ्या, अनोख्या खुंटीत, अपरिचित कळीमध्ये त्या संगीताची स्वररचना झालेली असते. गंभीर स्तब्धतेत त्या संगीताचे आकलन होऊ शकते.
“ही अन्त:शान्ती, अन्त:स्तब्धता उपलब्ध झाल्याशिवाय आपला बदसूर लक्षात येत नाही. त्या महागीताशी आपल्या वैयक्तिक अन्तर्गीताचे मेलन कसे करावयाचे, हे कळण्यासदेखील विचार व भावना यांचे वादळ शान्त होणे आवश्यक आहे.
“त्या सरोवराकडे पहा. त्याचा पृष्ठभाग एकाद्या वायूच्या झुळकेनेदेखील विचलित होत नाही. काठावरच्या लव्हाळीचे प्रतिबिंब त्यात कसे सुस्पष्ट पडले आहे, पाहिलेत का? लहान लहान पानेदेखील आपली हिरवी छाया सरोवराच्या पृष्ठभागावर उमटवीत आहेत. आणि आकाशातले ते पांढरे ढगदेखील स्वत:चे चेहरे, जणू काय त्या जलदर्पणात न्याहाळीत आहेत.
“तुमची अन्तकरणे, तुमची मने त्या सरोवराच्या पृष्ठभागासारखी अगदी अचल, स्तब्ध झाली पाहिजेत. संदर्भहीन, असंबद्ध विचाराची एकही लहर तुमच्या चित्तपृष्ठावर उमटता कामा नये. तुमच्या भावना अन्त:करणाच्या गुहेतून वरवर उड्या घेत असतात; असे होणे योग्य नाही.
“त्यामुळे चित्तपृष्ठावर बिम्बित झालेल्या प्रतिमा विभग्न होतात. लहान लहान मासे उसळी मारून वर येतात आणि अनन्त समकेन्द्र वर्तुळे त्यामुळे जलपृष्ठावर उमटत राहतात. हे दृश्य तुम्ही पाहिले असेल. आपल्या भावनांचे मत्स्य वर उसळून येणे, हे केव्हाही इष्ट नसते.
“नि:स्तब्ध व्हा. प्रशान्त व्हा.” दूर कोठूनतरी आलेला आकाश-वाणीचा आवाज मी ऐकला.
“माझी शान्ती मी तुला देत आहे. तुझ्याजवळ ती ठेवून जात आहे. भौतिक जगातले देणे ज्या तर्हेचे असते, तसे हे माझे देणे नव्हे. तुझे हृदय व्यथित होऊ देऊ नकोस. तू भयभीत होऊ नकोस”, दुसरी आकाश-वाणी.
अगदी एकच क्षण, पण मला हा सन्देश पूर्णपणे पटला; अनुभवात उतरला.
माझी विचारशृंखला तुटली, शान्तता भंगली. दलदल-मित्र आता काय करीत असेल? माझे कुत्रे - कर्मश्वान - कोठे असेल? या क्षणापर्यंत, यापूर्वी ते इतका वेळ स्तब्ध कधीच बसले नव्हते.
“तू निराश होऊ नकोस”, श्रीगुरुदेव पुन्हा बोलू लागले, “स्तब्धता राखणे, एक क्षण स्तब्ध होणे, ही फार कठीण गोष्ट आहे. सुरुवातीला तर ही स्तब्धता अशक्यच वाटते. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर, आग्रहाने, हट्टाने, विचार व भावना दडपून, त्यांना निरोधून व विरोधून ही स्तब्धता साधणे धोक्याचे आहे. कारण असल्या मूढ-ग्राहामुळे तुझी एकाग्र होण्याची, एकाग्र राहण्याची शक्तीच नष्ट होईल.
“आपले विचार व भावना, त्यांच्या स्वत:च्या अस्तित्वाबद्दल फार जागरूक असतात; अत्यन्त दक्ष असतात. त्यांना विरोध झाला, तर त्या अधिकाधिक बलिष्ठ होत राहतात. त्यांना चकवावे, फसवावे लागते. सर्वोत्कृष्ट उपाय हा की, त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करणे. लाडाने बिघडलेल्या मुलांसारखी त्यांची स्थिती असते. आपल्याकडे कोणी बघत नाही, हे लक्षात आल्याबरोबर, मुलांची कटकट आपोआप थांबते. इतर माणसांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेणे, एवढाच त्या बालकांचा हेतू असतो. आसुरी महत्त्वाकांक्षा लोकांचे लक्ष वेधण्यासाठीच मानवाला वेड लावीत असते. हिटलरला हेच वेड लागले होते.
“अर्थात्, मुलांना दुखापत झाली, आणि ती ओरडत राहिली की, त्यांच्याकडे लक्ष देणे आवश्यक असते. तसेच विचार व भावना प्रश्नचिन्हे निर्माण करू लागल्या की, त्यांची नोंद घेणे अत्यन्त आवश्यक आहे. पण, अगदी निरर्थक, क्षुद्र, यत्किंचित व्यत्यय सारखे येत राहतात. ध्यानयोगाच्या प्रथमावस्थेत या व्यत्ययांचे, त्यांच्याकडे दुर्लक्ष करूनन निवारण केले पाहिजे. परिणामी हे क्षुद्र नसतात, यत्किंचित् नसतात. असल्या उपद्रवांमुळे सगळे आयुष्य निरर्थक व निष्फळ होऊन जाते. आता आपण प्रयोग करू या”, श्रीगुरुदेव पुढे बोलू लागले, “सरळ बसा. तुमचा मेरुदंड, पाठीचा कणा अगदी ऊर्ध्वरेषेसारखा ठेवा. पण ताठरून धरू नका. सरळ, पण सैल आणि मोकळा. डोके किंचित् पुढे झुकवा; आणि डोळे मिटून घ्या. आता तुमचे चित्त तुमच्या डोक्याच्या मध्यभागी केन्द्रित करा. ते दुसरीकडे कोठेही जाऊ देऊ नका. तुमच्या दोन्ही भुवयांच्या मध्यभागी, पण आन्तर अंगात, एक कल्पित बिन्दु स्थापित करा. या बिन्दूचे स्थान कपाळाचे वर नसून, डोक्यामध्ये आन्तर अंगात आहे.
“आता तुमच्या अन्तश्चक्षूने, आणि अन्त:श्रुतीने पहा आणि ऐका. तुमच्या अन्तरंगात असलेले निश्चल जलपृष्ठ तुम्हाला प्रथम दिसेल; आणि नन्तर त्या जलपृष्ठावर कोणती प्रतिमा येते, ते नीट न्याहाळून पहा. अन्त:श्रुतीने तुमच्यामध्ये असलेल्या घनगंभीर शान्तीचे नाद ऐका. असा प्रयोग काही दिवस केल्यानन्तर त्या अन्त:शान्तीचे शब्ददेखील तुम्हाला ऐकू येऊ लागतील. हेच ते विशुद्ध, महनीय संगीत.
“हे एकदा तुम्ही ऐकल्यानन्तर तुमचे स्वत:चे संगीतदेखील, अगदी निर्दोष, विशुद्धतम व मधुर स्वरांत निघू लागे”, श्रीगुरुदेव थांबले.
थोडा वेळ आम्हा सर्वांची अन्त:शान्ती कोणत्या दर्जाची आहे, कोणच्या जातीची आहे, याचा ते अन्दाज घेत होते. आमच्या शान्तीचा नि:शब्द निनाद, जणू काही ते ऐकून, मापून घेत होते.
नन्तर ते म्हणाले, “या प्रयोगात सहजासहजी एक ढोबळ चूक होत असते. नि:स्तब्ध होणे म्हणजे केवळ जड होणे नव्हे; तुमचे मन रिकाम्या भोपळ्यासारखे शून्यरूप करणे नव्हे. तुमचे चित्त सतत दक्ष असले पाहिजे, तत्पर असले पाहिजे. अनेक प्रकारचे मोह आणि संभ्रम तुम्हाला दूर सारता आले पाहिजेत.
“तुमची विवेकशक्ति, तारतम्यभाव नाहीसा होता कामा नये. नाहीतर आयत्याच मोकळ्या झालेल्या तुमच्या चित्ताच्या भोपळ्यात, ते मोह आणि ते संभ्रम वास्तव्य करतील. लक्षात ठेवा; निसर्ग अव्याप्त, मोकळ्या जागेचा द्वेष्टा आहे. जेथे जेथे पोकळी दिसेल, रिकामी जागा आढळेल, तेथे काहीतरी येऊन बसणारच. हे ‘काहीतरी’ कशा स्वरूपाचे आहे, ते नीट तपासले पाहिजे”, गुरुदेव थांबले.
“खरे, अगदी खरे”, मी स्वत:शी पुटपुटले. माझ्या स्मरणात अचानक पूर्वी वाचलेली काही वाक्ये उमटून गेली.
‘तो शून्य-मनस्क असताना सात आसुरी शक्ती त्याच्या अन्तरंगात घुसून बसल्या. आणि त्या माणसाची शेवटची अवस्था, पहिल्या अवस्थेपेक्षा अधिकच भेसुर झाली.’
श्रीगुरुदेवांनी माझ्याकडे सहास्य पाहिले. आणि ते पुढे बोलू लागले: “आपले अन्तर्जीवन, आपले प्रज्ञान, आपले चैतन्य ज्या तर्हेचे असेल, ज्या श्रेणीचे असेल, ज्या गुणधर्माचे असेल; त्या गुणधर्माच्याच वस्तू, व्यक्ती व घटना आपल्याशी संबद्ध होत असतात; म्हणून सर्व मोह आणि संभ्रम दूर करून अन्त:शुद्धी करणे आवश्यक आहे. भावनांना मोह होतो आणि मनाला संभ्रम होतो. या दोहोंपैकी एक किंवा दोन्ही वस्तुस्थितीवर, सत्यतेवर आभास निर्माण करीत असतात. आपली विवेकशक्ती प्रथमत: वाढवावी लागते. त्या विवेकशक्तीनेच स्वकल्पित बन्धनातून स्वत:ला आपण मुक्त करू शकतो आणि तेव्हा कुठे सत्यतेची आपल्याला जागृत जाणीव होऊ लागते; व आपल्या अन्त:श्रुतीला ते महनीय संगीत ऐकण्याची, ओळखण्याची पात्रता येते.”
“हे जरी अशक्य वाटलं, दिसलं तरी”, मी स्वत:शी पुटपुटले, “तरी तेच खरं आहे. हाच तो सूक्ष्म, प्रशान्त नाद. हाच नाद देवहूतीने ऐकला असावा. एलिझानंही ऐकला होता, असे बायबल सांगते. पण केव्हा? जेव्हा मनातले झंझावात, अग्निप्रलय शान्त झाला तेव्हा.
“ती ईश्वराची कृपा. त्या कृपेने सर्व संभ्रम व मोह धुवून नेले. त्यामुळेच नि:स्तब्धता सिद्ध झाली; आणि त्यामुळेच नि:शब्दाचा ध्वनी ऐकू येऊ शकला.”
हे सर्व विचार माझे होते की श्रीगुरुदेवांचे होते, का त्या सर्व समूहांतून उदित झाले होते? मला तर काहीच समजत नव्हते. आम्ही सर्व एका विलक्षण एकात्मतेचा अनुभव घेत होतो.
‘समानीव आकूती: समाना हृदयानि व:।’
आम्हा सर्वांचे विचार आणि भावना समरस होऊन आता आम्ही एका अननुभूत अद्वैताचा आनन्द उपभोगीत होतो. पुन्हा या अनुभवात एक प्रकारचा मोक्ष, एका अभिनव स्वातंत्र्याची प्रतीती आम्हा सर्वांना येत होती. जणू काही दुसऱ्याच वातावरणात आमचा श्वासोच्छ्वास सुरू होता.
मी स्वत:शीच प्रश्न केला, “शिखरावरच्या या स्वच्छ, सुगन्धी हवेचा हा परिणाम असेल काय?”
या माझ्या वाक्याकडे, शिराभोवती इन्द्रधनुष्य धारण केलेल्या गुरुदेवांनी थोडा वेळ अधिक लक्ष दिले; आणि त्यांनी शान्ततेचा भंग केला. एकादा भलामोठा आरसा ताड्कन फुटावा, त्याप्रमाणे त्यांच्या आवाजाने शान्ततेचा भंग झाला होता.
“सुरुवात तर फार छान झाली. पहिला प्रयत्न पाचच मिनिटांचा असावा. अल्पारम्भ: क्षेमकर:। काही महिने गेल्यावर, पंधरा मिनिटांचे ध्यान करता येईल. प्रथम पाच मिनिटांचे हे ध्यान पुरेसे आहे. प्रत्येक ध्यानाच्या प्रयोगाला आणि प्रयत्नाला विलक्षण ताण घ्यावा लागतो. आता तुम्हाला एक अत्यन्त प्राचीन मन्त्र शिकविणार आहे. महनीय संगीताचा तो एक चरण आहे. हा मन्त्र हृदयात आणि हृदयातून म्हटला म्हणजे असताकडून सत्याकडे जाण्याचा मार्ग दिसू लागतो.
“हिरण्मयेन पात्रेण। सत्यस्यापिहितं मुखम्।
तत् त्वं पूषन् अपावृणु - सत्यधर्माय दृष्टये।।
ॐ अ उ म् म् म् म् ... ।”
आम्ही सर्वांनी हा मन्त्र एकसुरात म्हटला. वनस्थली ओलांडताना जे वृन्दगीत मी ऐकले होते ते हेच.
“आता क्षणभर तुम्ही विश्रान्ती घ्या”, थोड्या वेळानंतर श्रीगुरुदेव म्हणाले, “मी तुम्हाला ‘लोहन्’ बद्दल काही माहिती सांगणार आहे. ‘लोहनत्व’ ही आशिया खंडातली पुराणपरंपरा आहे. ‘लोहन्’ हे महनीय संगीताचे उद्गाते होत. आशिया खंडात त्यांचा सर्वत्र संचार असतो. हे महनीय संगीत ते अखंडपणे गात असतात.
“आधुनिक कालातला सर्वोत्कृष्ट लोहन् जेव्हा हिमालयातील आपल्या स्थानाकडे परतून जाऊ लागला, तेव्हा एक भारतीय तरुण त्यांच्यामागे चालू लागला. ते दोघे आपल्या इष्टस्थळी पोचले. तो भारतीय तरुण लोहन्ला म्हणाला, “स्वामी, आपल्यासारखे, मला लोहन् व्हावयाचे आहे. लोहन्चे गीत कसे गावे, हे तुम्ही मला शिकवाल का?” आठवडे गेले, महिने गेले, वर्षे गेली. त्या भारतीय तरुणाची एकच विनंती स्वामींच्या कानावर दररोज पडे. “स्वामीजी, अजून मला लोहन्चे गीत येत नाही. मला ते शिकवा ना!”
“ते काहीच उत्तर न देता नुसते गात राहत. वेगळ्या शब्दांनी त्या तरुणाला काहीही उत्तर मिळत नसे. प्रश्न करण्यापूर्वी ते आपले गीत गात होते; प्रश्नाचे उत्तर म्हणून ते पुन्हा गीतच गात.
“आणखी काही वर्षे गेली; आणि एका सायंकाळी तो भारतीय तरुण धावत धावत स्वामीजींकडे गेला. त्याचा आनन्द गगनात मावेनासा झाला होता.
““स्वामीजी, स्वामीजी, शेवटी एकदाचे मी लोहन्-गीत गायला शिकलो! मला आता ते गाता येतं! आज सायंकाळी जमिनीवर प्रार्थनेसाठी म्हणून मी माझे आसन पसरले; आणि काय चमत्कार! अनन्तयुगसाक्षी तारका, ते लोहन्-गीतच गात होत्या. ही झाडे, हे खडक, हे गवत, माझ्या आसनाखालची ही विशाल भूमी, सारे, सारे लोहन्-गीत गाण्यात मग्न झाले होते”
“नन्तर ते स्वामीजी, ज्येष्ठ लोहन्, गावयाचे थांबले. त्यांच्या मुद्रेवर मन्द हास्य चमकत होते. स्वत:च्या अंगुलीतली एक भव्यसुन्दर नीलमणि असलेली अंगठी त्यांनी बाहेर काढली, आणि त्या भारतीय तरुणाच्या अंगुलीत सन्निविष्ट केली. “आता मी समाधानाने अन्तर्धान पावत आहे”, स्वामीजी गंभीर स्वरात उद्गारले, “माझे अवतार-कार्य संपले आहे. दुसऱ्या लोहन्चा आता या क्षणी जन्म झाला आहे. आता मी सुखाने, शान्तीने, कृतकृत्य होऊन अन्तर्धान पावतो.” स्वामीजींनी हे वाक्य म्हणताक्षणी त्यांच्या देहातून एक ज्योती ऊर्ध्वदिशेला निघून गेली.
“त्या शिष्योत्तमाने अत्यन्त प्रेमाने, आदरपूर्ण वृत्तीने, स्वामींचा देह एका काष्ठवेदीवर ठेवला. स्वत:चे मस्तक अत्यादराने नमविले. मन्त्राग्नि मिळताच काष्ठवेदीवर अग्निज्वाला धडधडू लागल्या; आणि आश्चर्य हे, संथपणे, शान्तपणे, आनन्दाने आणि आदराने त्या ज्वालादेखील लोहन्गीत गात होत्या.” श्रीगुरुदेवांनी लोहन्-कथा संपविली.
देवदारु वृक्षाच्या शाखांमधून जशी एखादी मन्द झुळुक बाहेर पडावी, तसा एक नि:श्वास आम्हा सर्वांच्या कंठातून एकदम बाहेर आला.
आम्ही सर्व मन्त्रमुग्ध अवस्थेत स्तब्ध झालो असता पुनश्च माझ्या श्रुतिपथावर तेच उद्गीथ आले,
‘अ उ म् म् म् .... ।’
हा प्रणव, हे उद्गीथ कोठून आले, म्हणून मी चारी दिशांना दृष्टी टाकली.
केवढे आश्चर्य! माझ्याच अन्तरात्म्यात ते निनादत होते!
“होय”, श्रीगुरुदेव म्हणाले, (माझ्या अनुच्चारित प्रश्नाला ते उत्तर देत होते.) “लोहन्-गीताचाच तो एक चरण आहे; अंश आहे. त्याला आदि-स्वर असेही म्हणता येईल. तुझ्या प्रज्ञानात, हिरण्य-पुरुषाशी तुझे तादात्म्य झाले. हिरण्यपुरुष हा तुझाच जीवात्मा, अन्तरात्मा; ते लोहन्-गीत तुला स्वत:च्या अन्तरात्म्यात ऐकू आले.
“काही वेळापूर्वी त्याच्या मुरलीचा ध्वनी तू ऐकलाच होतास; पण तो ध्वनी, तुझ्या पुढून, दूर कोठून तरी येत होता असे तुला वाटे. आता तुला तुझ्याच अन्तरात्म्यातून तो ध्वनी निघत असल्याची साक्ष पटली. आता हिरण्य-पुरुष म्हणजे तूच, हे तुझ्या पूर्णपणे अनुभवास आले, म्हणजे तुझी छाया, ते कर्मश्वान पूर्णपणे अदृश्य होईल; ते तुझ्यातच विलीन होईल. कारण त्या छायेचे प्रकाशात रूपान्तर झालेले असेल. हिरण्य-पुरुषाशी, तुझ्या अन्तरात्म्याशी तुझे पूर्ण अद्वैत सिद्ध झाल्यावर केवळ प्रकाश उरणार. मग छायेच्या अस्तित्वाची शक्यताच नसणार.”
आणि आता सूर बदलून ते म्हणाले, “आता तुम्हाला अन्तिम ध्येयाच्या धवलगिरीचे ओझरते दर्शन झाले आहे. आता हे सरोवर ओलांडता येईल. पर्वताची पहिली टेकडी या सरोवराच्या पैलतीरावर आहे.”
“छे, छे!”, मी विषण्णतेने म्हटले, “मला ते पैलतीर दिसतसुद्धा नाही. येथे नौका नाही, मला पोहता येत नाही. या सरोवराला वळसा घालून पलीकडे जाण्याचा काही मार्ग असेल का? या किनार्यावरून चालत गेले, तर पैलतीर गाठता येईल काय?”
मी हिरण्य-पुरुषाकडे पाहिले. मला तो सर्वज्ञनाथ वाटे. स्वारीने तर पावले टाकावयास सुरुवात केली होती.
“नाही”, तो म्हणाला, “पैलतीराला पोचण्याचा दुसरा मार्ग नाही. वर्तुलाकार गतीने, सरोवराच्या काठाकाठाने तेथे जाता येणार नाही.
“पैलतीर दिसत नाही, याचे कारण धुके. दुरारोह असे अनेक डोंगर पाण्यामधून अचानक वर येतात, हे मला माहीत आहे. तसले डोंगर येथे नाहीत. पैलतीरावर पोचल्यावर धवलगिरीचे आरोहण सुरू होते. मी येथे येऊन गेलो आहे. तुझी तयारी नव्हती, म्हणून तुला घेण्यासाठी मला मागे यावे लागले; त्या कृष्ण-अरण्याकडे परतावे लागले.”
“आता माझी तयारी झाली आहे, माझ्या ठिकाणी पात्रता आली आहे, असे मला मुळीच वाटत नाही”, मी विरोध दर्शविला, “दुसऱ्या तीराला जाण्याची शक्यता मला तर दिसत नाही. आद्य शंकराचार्यांचा शिष्य पद्म-पाद पाण्यावरून चालला, जीझस् पाण्यावरून चालला, म्हणून मी चालेन असे थोडेच आहे?”
“वेडी, खरोखर तूही चालशील. पद्मपाद व जीझस यांच्याप्रमाणे”, हिरण्यपुरुष म्हणाला, “सरोवर ओलांडण्याला आवश्यक ती पात्रता, सर्व तयारी तुमची आता झाली आहे. विसरलीस का ती दलदल? तेव्हा तू कशी तिकडे गेलीस? आणि शिवाय आता तू एकटी नाहीस, हे सहयात्रिक आहेत ना? या समूहाचा तू घटक आहेस. आता हे सहयात्रिक तुझ्याबरोबर आहेत; हे सर्व त्याच दिशेने जात आहेत. त्यांचे पोहोचावयाचे इष्ट स्थान तेच आहे. जे अशक्य म्हणून तुला वाटते, ते आता सहज शक्य झाले आहे. असा एक पूर्वानुभव तुला आलेला आहे. हा प्रवास तुला एकटीला करावयाचा नाही. त्याच मार्गाने व तेथेच जाणारे दुसरे यात्रिक तुझ्याबरोबर आहेत”, श्रीगुरुदेव धीर देत बोलले. एवढ्यात माझा दलदल-दोस्त उद्गारला, “येथल्या सर्व परिस्थितीची व परिसराची मला जरादेखील माहिती नाही. पण मला पोहता येते. मी चांगला धट्टाकट्टा व तगडा आहे. स्नायुबल माझ्या ठिकाणी भरपूर आहे. कदाचित् मी ज्या संधीच्या शोधात आहे, ती संधी मला मिळणार. माझ्याकडून आपली सेवा व्हावी, ही माझी मनीषा आहे.”
“बाकी सर्व यात्रिक तयार आहेत ना? जेवढे लवकर आपण निघू तेवढे बरे.”
मी मागे पाहिले, इन्द्रधनुष्य परिधान केलेले आमचे श्रीगुरुदेव अदृश्य झाले होते. प्रत्येक यात्रिक भीतीने थरथरत होता. मीही विषण्ण झाले.
“हे असे चालणार नाही”, मी स्वत:शीच म्हटले, “श्रीसद्गुरु असे कसे सांगतील ? हा जलमार्ग ओलांडता येणे शक्य असलेच पाहिजे. तशी त्यांची आज्ञा आहे. हे अशक्य वाटत आहे; पण विचार केला तर या विलक्षण यात्रेतील प्रत्येक गोष्ट प्रथम अशीच अशक्य वाटली होती.”
दुसर्या क्षणाला मी मोठ्याने बोलू लागले,
“मित्रांनो, आपल्याला हे सरोवर ओलांडावयाचे आहे. पलीकडे जाण्याचा मार्ग कोठेतरी असलाच पाहिजे. श्रीगुरुदेव असंभवनीय गोष्ट करण्यास आपल्याला कधीतरी सांगतील का? आपल्याला पोहून जावे लागणार असे दिसते. आपल्याला पोहता येते की नाही, हा प्रश्न वेगळा. मला स्वत:ला पोहता येत नाही; पण हा आपला मित्र, याला चांगले पोहता येते. हा आपल्याला शिकवील. शिवाय, आपण सर्वजण आता संगती-सोबतीने चाललो आहोत. एकमेकांच्या जवळ असल्यामुळे आता ‘एकमेकां साहाय्य करूं। अवघे धरूं सुपंथ।।’”
“पोहण्याचा पहिला पाठ सुरू कर”, असे म्हणून, सर्व जबाबदारी मी दलदल-मित्रावर सोपविली.
“पोहण्याचे शास्त्र शिकावयाचे, तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘श्रद्धा’. प्रथम पाणी तुम्हाला तारील, बुडविणार नाही, ही श्रद्धा पाहिजे. ही जलदेवतेवरील श्रद्धा जागृत करावयाची असेल तर, पुन्हा मानवावर श्रद्धा ठेवण्यास शिकले पाहिजे. जे पोहणारे आहेत, ज्यांना त्याचा अनुभव आहे, आणि जे म्हणतात की, पोहणे शक्य आहे, त्यांचे म्हणणे मान्य केले पाहिजे.
“या जलदेवतेवरील श्रद्धेत अर्धवटपणा उपयोगी नाही. तुमच्या शरीरासारखे पाणी हे घन-जड नाही. तरल, विरल आहे. तुम्ही भिता कामा नये. भीतीने तुम्ही ताठरून जाल. तुमचे अंगप्रत्यंग सैल राहणार नाही. भीतीने तुम्ही गोठून जाल; आणि देह गोठला की, तो तळाशीच जाणार. तेव्हा पाण्यावर पूर्ण विश्वास ठेवा.
“जलदेवतेबद्दल, तिच्या संरक्षक शक्तीबद्दल निष्ठा बाळगा. नन्तर तुम्हाला चमत्कार दिसेल. अगदी संथपणे, सहजतेने हातापायांचे चलनवलन केले, त्यांना थोडी गती दिली की, पाण्यावर तुम्ही मोठ्या मजेने तरंगू शकाल. अगदी तुमच्या पाठीवर, उत्तान स्थितीत, हात लांब सोडून तुम्ही मोठ्या आनन्दाने या सरोवरात तरंगत राहाल.”
नंतर माझ्याकडे थोडे वळून तो दलदल-दोस्त म्हणाला, “आता अंधार पडत चालला. आपण पुष्कळसा प्रवास करून आलो आहोत. या प्रवासाने आपल्या सर्व शक्ती क्षीण झाल्या आहेत. याच तीरावर सकाळपर्यंत आपण विश्रान्ती घेऊ आणि सकाळी लवकरच पुढे जाऊ. कसे वाटते तुम्हाला? पटते का तुम्हाला हे?”
“ठीक आहे”, मी संमति दर्शविली. हिरण्य-पुरुषाकडे एक नजर टाकली. त्याला हा विचार मान्य आहे अशी माझी खात्री झाली. त्याचे संमतिदर्शक स्मित पाहून, मी वालुकातीरावर ऐसपैस बसले; सर्वजणही बसले.
आता कोठे प्रथमच माझ्या मनात एक-दोन प्रश्न डोकावले, ‘आम्ही सर्वजण आहोत तरी किती? आम्ही कसे काय दिसत असू?’ मी मोजून पाहिले. सर्वजण मिळून आम्ही नऊजण होतो. पाच पुरुष आणि चार स्त्रिया. तीस ते पासष्ठच्या दरम्यान आम्हा सर्वांचे वयोमान होते. एकही अगदी बाल्यावस्थेत किंवा अगदी वृद्धावस्थेत नव्हता.
‘हा प्रवास या सर्वांना चांगलाच कटकटीचा, त्रासदायक वाटला असेल’, माझ्या मनात आले.
“आता आपण सर्वजण एकदम झोपून जाऊ या”, मी सुचविले, “आपला पुढचा प्रवास खूप मोठा आहे. आपल्याला पुष्कळ वेळ एकत्र मिळेल असे वाटते. तेव्हा आपण एकमेकांची ओळख करून घेऊ. एकमेकांना माहिती देऊ, घेऊ. उरलेली यात्रा मोठी मजेत होणार, असे दिसते!”
एवढे बोलून मी आडवी झाले. काठावरच्या लव्हाळ्यांनी सूर्यनारायणाची मावळती किरणे आत्मसात् केली होती. आणि अणकुचीदार टोके असलेली त्यांची पाने, त्या संध्या-प्रकाशातल्या गडद रंगामुळे अधिकच खुलली होती.
पश्चिमेला शुक्राची चांदणी एका अलौकिक नवतेजाने लकाकत होती. या तीरावर असलेल्या यात्रिकांसाठी जणू ती आपला चन्देरी झोत इकडे फेकीत होती.
काळवंडणार्या क्षितिजाकडे, मी माझी नजर दूरवर लावली होती.
तार्यामागून तारा उदित होत होता.
मुरलीचे आर्द्रमधुर सूर मी ऐकत होते. “माझा हिरण्य-पुरुष माझे आत्मगीत वाजवीत आहे”, मी स्वत:शी गुणगुणले.
मुरलीतून उमटणारा प्रत्येक सूर हा एक तारा होता; आणि आकाशात दिसणारा प्रत्येक तारा हा एक मुरलीचा सूर होता.
आणि मी निद्रिस्त झाले!
-------------------
ध्यान-बीज (४)
उद् बुध्यध्वम्, समनस: सखाय:।
- ऋग्वेद (१०, १०१, १)
भावार्थ:
मित्रांनो! उठा, जागे व्हा. तुमची सर्व मानसिक शक्ती एकवटू द्या.
---------------------------------------
आरोहणम् आक्रमणम् जीवतो जीवतो अयनम्।
- अथर्व-वेद (५। ३० । ७)
भावार्थ:
वर चढणे, पुढे पाऊल टाकणे, ही जीवमात्राची सहज गती आहे.
- प्रतिसाद देण्यासाठी सहभागी व्हा अथवा सदस्य बना
पुस्तकाचे चॅप्टर्स
संपूर्ण पुस्तक वाचण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा.