You are hereतिसरे पाऊल / तिसरे पाऊल
तिसरे पाऊल
“संकटे कोसळली, अडचणी आल्या, अन्तराय उद्भवले, म्हणजे न डगमगता आनंदित व्हावयाचे असते, हा अखेरचा वस्तुपाठ तू शिकली आहेस का?
“तुझ्यापुढे हे प्राणसंकट उभे आहे; केवळ ह्या प्राणसंकटामुळे तुझे योजना-चातुर्य दसपटींने वाढणार आहे याचे तुला ज्ञान व निश्चय आहे का?”
- अग्नियोग, पान ४७
----------------------------
माझ्या आत्मसंगीतामध्ये मी इतकी गुंग झाले होते की, माझी पावले कशी व कोठे पडत आहेत, इकडे माझे लक्ष नव्हते.
एकदम मी किंचाळले. माझा एक पाय दुसर्या पायाच्या तळव्याला झालेली जखम कुरवाळू लागला होता. माझ्या लक्षातच आले नाही - पायांखालची वाट आता पानाफुलांची, मऊमऊ हिरवळीची अन् तृणशय्येची राहिली नव्हती. जेथे मी उभी होते, तेथून उभाच उभा, माझ्या पायाशी जवळजवळ काटकोन करून खडा असलेला असा एक शिलामार्ग मला भेडसावीत उभा होता. फत्तराच्या त्या काळ्याकभिन्न सुळ्यांकडे मी पाहिले.
मला भयंकर राग आला होता; अगदी वैताग आला होता. हिरण्य-पुरुषाने माझ्याकडे एक दृष्टिक्षेप केला. त्या दृष्टिक्षेपात मन्द उपरोध होता अन् वात्सल्यपूर्ण हास्यही होते.
तो म्हणाला, “पुढे न पाहतांही पाऊल टाकणे सर्वथैव शक्य असते, पण त्याला अजून अवकाश आहे. तुला ते इतक्यात जमणार नाहीं. आणि हे पहा, स्वत:ला खरचटलं म्हणून दगडधोंड्यांना दोष देणे योग्य आहे का? तसं पाहिलं, तर तू कृतज्ञताच व्यक्त केली पाहिजेस. ते दगडधोंडे जर तीक्ष्ण, तिरपे आणि ओबडधोबड नसते, तर तुला वर चढणे अशक्य होते. ते ओबडधोबड आहेत, म्हणूनच तुला त्यांचा आधार घेता येईल.”
मला माझीच लाज वाटली. त्या विचार-शृंखलेचे पुढील दुवे माझ्या ध्यानात येऊ लागले. त्या शिला-मार्गाला जर अणकुचीदार कपर्या नसत्या, खडबडीत कोने नसते, तर मी पाय कोठे ठेवले असते; अन् हातांच्या बोटांना पकड तरी कशी घेता आली असती?
निदान माझ्यासारख्या दुबळ्या व्यक्तीला वर चढण्यासाठी या खडबडीत कोन-कपार्यांनी हा सोपानमार्ग सिद्ध केला आहे.
गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावामुळे मी किती दुबळी अन् पंगु झाले आहे! त्या आकर्षण-शक्तीच्या पलीकडे जोपर्यंत मी गेले नाही, तोपर्यंत हा शिलासोपान मला आवश्यक - नव्हे, अटळ नाही का?
मोठ्या दक्षतेने आणि हळूहळू मी वर चढू लागले. मधूनमधून मी थांबत असे; कारण मला श्वास सावरावा लागे. पाऊलवाटेच्या दोन्ही भागांना प्रचंड खडक होते. त्या खडकांत मधूनमधून पोकळ जागा असे. तेथे शेवाळ, नेचा वगैरे मृदुमधुर, गोड हिरवळ हातास लागे. त्यांचा शीतल सुखस्पर्श अनुभवीत मी एकेका पावलाने वर चढत होते.
माझ्याजवळून अचानक एकादी गांधिलमाशी जिवन्त अण्वस्त्रासारखी सोसाट्याने निघून जात असे. केव्हा केव्हा उडत्या पतंगाच्या पंखांतून लख्खन् निसटलेल्या प्रकाशाचा सोनेरी ठिपका माझ्या दृष्टीला वेड लावीत असे.
एकदा, एक गुणगुणणारा पक्षी एकाद्या हेलिकॉप्टरप्रमाणे माझ्या चेहेर्याच्या इतक्या जवळ आला की, त्याच्या चमकत्या बुबुळांकडे मी माझी स्थिर दृष्टी लावू शकले.
“लाडक्या लहानग्या, ये. तुझे स्वागत असो. मला तू शिकवतोस का? पंखांवर कसं तरंगायचं, ते मला सांग ना! अन् हे बघ, मला उडता आलं, तर मी या पर्वताच्या शिखरावर अलगद जाऊन बसेन.”
“होय.” सुवर्ण-पुरुष म्हणाला, “पण मग तेथे पोहोचण्याचे काहीच महत्त्व राहिले नसते. वर चढताना कष्ट होतात, विविध प्रकारचे अनुभव येतात. त्यामुळेच तुला शिखर गाठण्याचे महत्त्व वाटत आहे. तुझ्या प्रयत्नांची आन्तर-उत्कटता, तुला येणार्या अनुभवांची तीव्रता, विशेषत: दु:खाच्या अनुभवांना असलेली बोच - या गोष्टी तुझ्या प्रज्ञेला आणि चैतन्याला एक प्रकारची धार देतात. गिरिशिखरावरचे वातावरण अतिशय सूक्ष्म व विरल असते. तुझ्या प्रज्ञेला जर तशी धार नसेल, तर कदाचित् तेथे तुला स्वत:च्या अस्तित्वाचेदेखील भान राहणार नाही.”
“आपण काय म्हणता ते माझ्या ध्यानात येत आहेसे वाटते. पण या पशूची ही ब्याद माझ्यामागे नसती, तर किती छान झाले असते? माझ्या या यात्रेमध्ये या जड पशूला मी माझी छाया कशी समजू? हा तर एक लोखंडाचा गोळा आहे, लोहशृंखला आहे.” मी बोलले.
“ते अगदी साहजिक आहे.” तो म्हणाला, “तो पशु तुझा एक भाग आहे, अंश आहे, त्याला खाली पडण्याची, अधोगतीची विलक्षण ओढ आहे. तुम्ही ज्याला गुरुत्वाकर्षण म्हणता, ते आकर्षण ह्या घन-जड पशूला सारखे खाली खेचीत असते. तुझा प्रत्येक अंश, जड अंश वर वर धवल-गिरीवर न्यावयाचा आहे. असा एक क्षण अवश्य येईल. त्या वेळी, माझ्या म्हणजे तुझ्या आत्मतत्त्वाच्या आकर्षणशक्तीची, तुला जाणीव होईल. त्यानंतर तुझ्या छायेची, तुला खाली खेचण्याची शक्ती पूर्णपणे नष्ट होईल. तुला त्या पशूच्या अस्तित्वाचे ज्ञान राहणार नाही, आणि अगदी त्या क्षणी त्या पशूचे अस्तित्व विराम पावेल.”
“अय्या!” मी स्वत:शीच मोठ्याने चीत्कारले. इतक्यात पुनश्च मला आकाशवाणी ऐकू आली.
“मला जर कोणी वर घेतले, तर मी सर्व माणसांना माझ्याबरोबर वर घेईन.”
मी अनुभवीत असलेल्या अवस्थेशी या आकाश-वाणीचा काही संबंध असेल काय ? आणि मी सहज माझ्या कर्मपशूकडे पाहिले. त्याची जीभ बाहेर लोंबत होती. त्याला तहान लागली होती; आणि तो अगदी थकून गेला होता.
‘थोडा धीर धरला पाहिजे. अगदी माझ्या माथ्यावरच्या बाजूस खड्या व कठीण चढणीचा शेवट होत आहे. नंतर आपण पाण्याची व्यवस्था करू. तेथे जवळपास कोठेतरी पाणी असलेच पाहिजे.’ त्या कर्मपशूची तहानलेली जिव्हा पाहून माझ्या मनात हे विचार आले.
मी नजर वर केली आणि एका वटवृक्षाची एक पारंबी धरली. हा वृक्ष दोनतीन दगडांच्या कपारींमध्ये आपली पाळेमुळे खोवून मोठ्या डौलाने ताठ उभा होता. ती पाळेमुळे सकस व जोरदार होती. त्याची पकड घेऊन, माझे पाय एकमेकांत गुंतविले आणि नंतर पाठीकडून वर चढण्याचा प्रयत्न केला. त्या झाडाची लांबवर पसरलेली पाळेमुळे डाव्या उजव्या हाताने पकडता आली. पाठीचा चढण्यासाठी उपयोग होऊ शकतो, हे आज प्रथमच माझ्या लक्षात आले.
माझी पाठ वरवर सरकत असताना वरच्या बाजूचे मोठमोठे दगड व ढेकळे खाली कोसळू लागली. माझी छाती धडधडू लागली. असलाच एकादा अजस्र दगड झाडाच्या मुळावर वरून आदळला तर ते झाड आणि झाडाबरोबर मीही ... छे! कल्पनाच करवत नाही. माझ्या ठिकर्या ठिकर्या झाल्या असत्या. पण पुढे मला ही भीती राहिली नाही. मी पाठीने सरकत सरकत वरच्या कडेला सुखरूप पोहोचले होते. थोड्या वेळाने माझ्या हृदयाची धडपड थांबली. नाडीचा वेग मंद झाला. विसाव्यासाठी, क्षणभर मी आडवी झाले. क्षितिजाकडे आणि वरती विस्तारलेल्या निळ्या आकाशाकडे माझे लक्ष गेले.
नभाचा भव्य-दिव्य नीलिमा वस्तुमात्राला व्यापून राहिला होता. सुन्दरतेची परिसीमाच ती! असे हे दिव्य दृश्य या क्षणापूर्वी मी कधीच पाहिले नव्हते. आकाशाचा रंग इन्द्रनील रत्नासारखा चमकत होता.
इतक्यात माझ्या कानांवर एक वृन्दगीत आले. ते दूर कोठेतरी प्रकट होत असावे. पण माझा वृन्दगीत ऐकण्याचा हा आनंद क्षणभंगुर ठरला. कारण माझ्या त्या उग्र कर्मपशूने आपले थंड थंड नासिकाग्र माझ्या चेहर्यावर फिरविण्यास सुरूवात केली.
“अरे होय, होय”, मी म्हटले, “माझ्या लक्षात आले. आपण पाणी शोधले पाहिजे.” बिचार्याला फार तहान लागली होती. मला स्वस्थ चित्ताने आडवी झालेली पाहून त्याला वाटले की, पाणी शोधणे या गोष्टीचा मला पुरा विसर पडला असावा.
त्या विशालरम्य, सुन्दर वनस्थलीच्या एका टोकावर, सीमेवर मी बसले होते. तेथील दृश्य तर अगदी घरच्यासारखेच होते, मनात आले, माझ्या बागेत उमलणार्या निळ्या-जांभळ्या गोकर्णीच्या फुलांसारखी फुले येथेही सर्वत्र दिसत आहेत. मात्र ही फुले आकाराने पुष्कळ मोठी आहेत. आणि त्यांचे रंगदेखील अधिक गर्द आहेत. “येथील प्रत्येक वस्तु भव्यतेने आणि दिव्यतेने चमकत आहे, नाही का?” मी पृच्छा केली.
“अर्थातच.” हिरण्य-पुरुष उद्गारला. फुलांनी डंवरलेल्या एका झुडपाजवळ तो बसला होता. निसर्गाने स्वत: गुंफलेले गुच्छ त्या झुडपावर, वायुलहरींबरोबर नाचत होते.
तो पुढे म्हणाला, “येथली सारीच सृष्टी भव्यतेने, दिव्यतेने भरलेली आहे. जीवनाच्या, चैतन्याच्या, प्रज्ञेच्या एका उच्चतर श्रेणीवर आता तू येऊन पोहोचली आहेस. येथे आल्यावरदेखील, तू पूर्वी पाहिलेल्याच वस्तू दिसत आहेत; पण फरक एवढाच, की येथील प्रत्येक वस्तू, सहस्त्रगुणित वेगाने स्पन्दित होत असते. येथल्या वस्तूंचे परमाणू सहस्त्रगुणित वेगाने धावत असतात. येथे आलेल्या जीवांची चेतना, प्रज्ञादेखील तशीच वेगवती असते. मन्द्र, मध्य, तार अशी स्वर-सप्तके निरनिराळी असली, तरी स्वर एकच असतो. त्याच सुराचे स्पन्दन, सुराची गति मात्र भिन्न असते, कितीतरी पटीन वाढलेली असते.
“यालाच शास्त्रीय परिभाषेत अधिक गतिमान ‘पौन:पुन्य (Frequency)' असे म्हणतात.''
त्याचे हे भाषण ऐकत असताना, माझा सर्व देह, देहातला अणुरेणू आनन्दाने पुलकित झाला होता. आनन्दाच्या लाटांवर लाटा उंचावत येऊन माझ्या जीवाला अमृताभिषेक करीत होत्या्!
“किती सुन्दर! किती आश्चर्यकारक!!” उड्डाण करण्यापूर्वी क्षणभर स्थिरावलेला चण्डोल जसा दिसतो व असतो, अगदी तसाच माझा देह हलका झाला होता.
“आता आपण जाऊ या. या बिचार्या पशूला तहान लागली आहे. आपण पाणी शोधले पाहिजे. आणि ते मधुर वृन्दगीत कोठून ऐकू येत आहे, याचाही शोध घेतला पाहिजे. आपला हा मार्ग त्याच दिशेने जात आहे ना?” मी विचारले.
“होय.” हिरण्य-पुरुष म्हणाला, “आपण ही वनस्थली ओलांडली, की, दुसरे कित्येक यात्रिक आपणांस भेटतील. त्यांनादेखील तेच गिरिशिखर गाठावयाचे आहे. अजून तुला ते दिसत नसेल. घनकृष्ण मेघावलीत ते आच्छादलेले आहे. वृन्दगीत गाणार्या व्यक्ती एका सरोवराच्या तीरावर बसल्या आहेत.”
‘या स्थानावर येण्यासाठी जे मी अपरंपार प्रयत्न केले, ते फुकट गेले नाहीत. येथे पोचल्यावर तर, ते श्रम अगदीच यत्किंचित् वाटत आहेत.’ वनस्थलीवरून पुढे जाताना हा विचार माझ्या मनात आला.
पाकोळ्या आपल्या पंखांवर तरंगत होत्या. दुरून कुठून तरी उड्या घेत घेत लक्षावधी रातकिडे त्यांचे अखंड गीत गुणगुणत होते. पावलापावलागणिक विविध प्रकारच्या तृणपुष्पांचा, मधुर नेच्यांचा, सूक्ष्म सुगन्ध मनाला खुलवीत, डुलवीत व सुखवीत होता.
ओरखडलेले पाय, दुखावलेली बोटे आणि आतापर्यंत टाकलेल्या धापा ... हा सर्व त्रास झाला खरा; पण या दिव्य अनुभवामुळे त्या त्रासाचे परिमार्जन झाले. सहज एका श्रुतीची आठवण झाली. मला ती आवडत नसे; व पूर्वी कधी ती समजलीही नव्हती. ती अशी:
“वेदनांचा पाणसडा घालीत तो दिव्य आनन्द मला शोधीत आला.”
हिरण्य-पुरुष पुढे बोलू लागला, “मी काय म्हणतो हे आता तुझ्या लक्षात आले. तुझ्या जीवनातल्या सर्व पूर्वीच्या क्रिया, प्रक्रिया आणि प्रतिक्रिया या प्रदीर्घ प्रयत्नामुळेच इतक्या तीव्र, सखोल व उत्कट झाल्या. तुझ्या प्रयत्नांशिवाय ती तीव्रतेची धार तुझ्या जीवनक्रमाला आली नसती. आता तुला जे अनुभव येत आहेत, त्यांच्याबद्दल तू पूर्ण जागृत आहेस. तुझी सर्व जीवन-यंत्रणा आता एका उच्च कोटीला गेली आहे, आता तुला ज्या प्रतीती येतात, त्या वरच्या स्वर-सप्तकांतून निर्माण होतात. त्यांचा स्पन्दवेग सहस्त्रगुणित झाला आहे.
“या अवस्थेत तू एक गोष्ट लक्षात घे. तुला जो ‘मी’ वाटतो, ते एक साधन, एक उपकरण आहे. अगदी यथार्थ बोलावयाचे, तर तुझा ‘मी’ म्हणजे माझे उपकरण आहे. तुझा अहंभाव, हे तुझ्या जीवात्म्याचे, आत्मतत्त्वाचे एक साधन आहे. तुझा अहंभाव म्हणजे एक आदानप्रदान प्रयोग आहे.
“तुझ्या या अहंभावावर अनेक प्रकारचे परिणाम होत आहेत; संस्कार होत आहेत. आणि हे परिणाम पुन: तू दुसर्यांकडे समर्पण करीत आहेस. तुझा अहंभाव अविरतपणे दुसर्यांकडून अनेक संवेदना घेतो; आदान करतो व त्याचे रूपांतर करून दुसर्यांना देतो - प्रदान करतो.
“जे संस्कार तुझ्याकडून केले जात असतात, दिले जात असतात, ते तुझे गीत आहे. काही सायं-कीटक जसे स्वानन्दात, स्वत:चे गाणे गात असतात, अगदी तसेच तूही तुझे गाणे स्वानन्दात गात असतेस.
“तुझे गाणे एका ठराविक आर्ततेच्या पट्टीवरून गायिले जात असते. आर्ततेच्या ज्या सप्तकात तुझ्या वीणेची तार पिळली असेल, त्यातील सुरावरून तुझ्या किल्लीची जाती ठरत असते. तुझे स्वर-क्षितिज तोकडे किंवा विस्तीर्ण असणे, तुझ्या अनुभवाच्या संपन्नतेवर अवलंबून असते. तुझ्या प्रज्ञेची जी गुणवत्ता, तुझ्या चैतन्याची जी जाती, तीच तुझ्या नादाची, आवाजाची जाती व गुणवत्ता.
“व्हायोलिन व व्हायोलिन-वादक यांचे उदाहरण पहा. व्हायोलिनची तार जितकी घट्ट पिळली असेल, आर्ततेच्या ज्या सुरावर ती पिळली असेल, त्यावर व्हायोलिनचा सूर अवलंबून असतो. त्या तारेचा हा मौलिक सूर असतो. कलाकार वादन-पटु आपल्या अंगुलीचा जेथे स्पर्श करील, जसा स्पर्श करील, त्या प्रमाणात उच्चतर, भव्यतर असा दुसरा सूर त्या तारेतून निघतो. हा सूर मौलिक नव्हे. अंगुलीच्या जादूने मौलिक सुरावर चढविलेली ही एक नवी कमान असते.
“या स्पर्शक्रियेमुळे तारेला थोडा बाक येतो. स्पन्दनाचा वेग वाढतो; आणि वरचा, आर्ततेचा टप्पा गाठला जातो. ही तार लांब असते, जाड असते; व्हायोलिनचा आकार लहान मोठा असतो, या सर्व गोष्टींवर त्या सुराची कक्षा (Range) ठरत असते.
“या स्वर-कक्षेमध्ये सर्व प्रकारचे सूर, स्पन्द अन्तर्भूत होतात. यातील प्रत्येक सूर मौलिक, मूलभूत सूर बनतो; कारण त्यावर ऊर्ध्वनाद आणि अधोनाद (Overtones and Undertones) यांची गुंफण झालेली असते. यातील अन्तरालाच ‘स्वर-कक्षा’ असे म्हणतात. हे सूक्ष्म सूर, सामान्य मानवाच्या श्रवणशक्तीला उपलब्ध होत नाहीत. तरीही सुरांच्या तेजस्वितेला आणि संपन्नतेला त्या श्रवणातीत लहरींमुळे एकप्रकारचे वैभव प्राप्त होते.
“तथापि या स्वर-संगतीच्या (Harmonies) निर्मितीसाठी मौलिक सूर हा विशुद्ध असावा लागतो. त्याच्या स्पन्दाचा वेग निश्चित असला पाहिजे. एकदम अनेक प्रकारचे वेग एकत्र येता कामा नयेत. नाहीतर आपल्याला संगीत ऐकू येणार नाही. तो एक बेताल गोंगाट होईल.” सुवर्ण-पुरुष या दीर्घ भाषणानंतर स्तब्ध झाला.
“आपण केलेले विवेचन फार आकर्षक आहे, यात शंका नाही. पण मी कोणत्याही अर्थाने संगीत-ज्ञ नाही; व्हायोलिन-वादक तर नाहीच नाही. आपल्या या विवेचनाचा माझ्या जीवनाशी निकटचा असा कोणता संबंध आहे, हे माझ्या लक्षात येत नाही. माझ्याशी म्हणजे माझ्या देहाशी. माझा देह म्हणजेच मी, ही माझी भावना अजून तरी स्थिर आहे.”
असे म्हणून मी माझे हात चेहर्यावरून, बाहूंवरून आणि पायांवरूनदेखील अलगद फिरविले. सगळी कर्मेंद्रिये जागच्या जागीच आहेत, याचे प्रमाणपत्रच जणू काय, मला या माझ्या कृतीने मिळाले.
“तू स्वत:चे हातपाय चाचपडलेस खरे”, सुवर्ण-पुरुष म्हणाला, “पण तू म्हणजे जर केवळ तुझे हातपाय आणि देह असता, तर ‘तुझा’ देह आणि ‘तुझे’ हातपाय हे ‘तुला’ कळले तरी असते का? ‘माझे हात’, ‘माझा देह’ या शब्दप्रयोगांतला ‘मी’ म्हणजे कोण?
“तो ‘मी’, हात आणि पाय यांच्याहून वेगळा, अलग असला पाहिजे. देह म्हणजे मी हा प्रमाद, हा संभ्रम सर्वसामान्य आहे. ही इन्द्रिये खरोखर तुझी साधने आहेत. त्यांनाच तू ‘मी’ म्हणून समजतेस. तुझी सर्व ज्ञानेंद्रिये ही तुझी उपकरणी होत. त्या ज्ञानेद्रियांमुळे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या प्रतीती तुला येतात. पण या प्रतीतींचा अर्थ लावणारा, समन्वय साधणारा, उपभोक्ता आणि उपमन्ता जो तुझा आत्मा, तो सर्वस्वी निराळा आहे. या विविध प्रतीतींना निरनिराळ्या प्रतिक्रिया तुझ्या या आत्मतत्त्वामुळे होत असतात. तुझ्या जीवात्म्याला पूर्वी जे अनुभव मिळाले असतील, त्याचा भूतकाल ज्या स्वरूपाचा असेल त्या स्वरूपाचा परिणाम तुझ्या आताच्या प्रतिक्रियेवर होत असतो.
“स्मृति आणि आशा यांच्या आडव्या-उभ्या धाग्यांत तुझ्या प्रतिक्रियांचे महावस्त्र विणले जाते. तुझे प्रज्ञान म्हणजे तू, प्रज्ञान हा शब्द ऋग्वेदांतला आहे. ‘प्रज्ञानम् ब्रह्म’ हे ऋग्वेदातले महावाक्य आहे. प्रज्ञान हेच आत्मतत्व व हेच परब्रह्म. मी ज्याला व्हायोलिन-वादक म्हणतो, ते हे ‘प्रज्ञान’ होय. शरीर, कर्मेंद्रिये, हे सर्व एक व्हायोलिन आहे. तुझा मेन्दू म्हणजे या व्हायोलिनमधली तार आहे. तुझ्या मेन्दूच्या लहरींच्या स्पन्दनाचा वेग ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे.
“तुझ्या संगीताचे सूर कोठल्या प्रतीचे, श्रेणीचे आहेत, ते या वेगामुळे ठरले जाते. तुझ्या गाण्याच्या स्वरांची कक्षा किती व्यापक आहे हे कसे ठरते, माहीत आहे का? तुझा मेन्दू स्पन्दनाची कमीत कमी आणि अधिकात अधिक, किती वर्तुळे निर्माण करू शकतो, त्यावर तुझे स्वर-क्षितिज, स्वर-विस्तार अवलंबून आहे. यालाच शास्त्रीय परिभाषेत ‘स्पन्दाचे पौन:पुन्य’ म्हणतात.
“हे पौन:पुन्य, ही पुनरावृत्ति, तुझ्या चित्तैकाग्य्रावर अवलंबून आहे. तुझे चित्तैकाग्र्य म्हणजे व्हायोलिन वाजविणार्या कलाकाराची अंगुलि होय. या अंगुलीच्या स्पर्शामुळे तारेला बाक येतो, तार छोटी अथवा मोठी होते. तिचे आकुंचन होते. अंगुलि-स्पर्श असेपर्यंत ती तार तेवढ्यापुरती लहान होते. या अंगुलि-स्पर्शाने स्वराची आर्तता व उंची निश्चित होत असते.
“तुझ्या व्यक्तिमत्वाची जाती कुठली, श्रेणी कुठली, हे कशावरून ओळखावयाचे, सांगू का? ज्या विषयावर तुला एकाग्रता हवी असेल, तेथे तुझे मन अचल राहिले, तर तुझ्या प्रज्ञानाची जागृत स्थिती अधिकाधिक तीव्र होत राहते. तुझ्या सुरांची गुणवत्ता, जाती ही कशावर अवलंबून आहे हे सांगू का?
“तुझ्या प्रज्ञानामध्ये (Consciousness) मूळ सुरावर, जे नवे ऊर्ध्वनाद (Overtones) निघतात, त्यांच्या भव्यतेवर व सम्पन्नतेवर, तुझ्या सुराची जाती, गुणवत्ता व सम्पन्नता अवलंबून आहे. संगीतकार जसा आपले व्हायोलिन वाजवायचा क्रमाक्रमाने, हळूहळू, अभ्यास करीत असतो, अगदी तशीच ही शक्ति क्रमाक्रमाने, अभ्यासाने प्राप्त होते.”
पर्वताच्या वनस्थलीवरून चाललेला आमचा प्रवास कोठपर्यंत आला, अजून किती चालावयाचे आहे, यापैकी कशाचेच मला भान नव्हते.
‘देह म्हणजे एक व्हायोलिन आहे. माझा जीवात्मा, आत्मतत्त्व हा संगीतकार आहे. माझा मेन्दू ही व्हायोलिनची तार, अन् या तारेतील संघटक अणूंच्या वेग-परिमाणावर, माझ्या संगीताची जाती, दिव्यता, भव्यता व सम्पन्नता अवलंबून आहे.’
वरील विचार माझ्या मनात थैमान घालत होते. माझ्या जीवन-तत्त्वांची उकल इतकी मूलग्राही, इतकी समाधानकारक पूर्वी कधीच झाली नव्हती. पण आता मी त्या समाधीतून जागी झाले होते.
या वनस्थलीवर फुललेली वन्य फुले गालिच्यावर काढलेल्या नक्षीसारखी, कशिद्यासारखी खुलून दिसत होती. तिथल्या तृणांकुरांवरून छोटे छोटे कीटक, काही लहानलहान ससेसुद्धा उड्या मारीत होते. हरणे धावपळ करीत होती. त्यांनी तोंडात खूपसे धान्य भरून घेतले होते. हिवाळ्यासाठी कोठेतरी ती धान्याचा साठा करून ठेवीत होती. हिरवळीमधून इन्द्रधनूच्या सप्तरंगांनी चमकणारे काही सर्पही अगदी संथपणे व शांतपणे सरपटत चालले होते.
या सर्व नाट्य-चित्राला, रातकिड्यांचे संगीत व माशांची गुणगुण साथ देत होती ... आणि अशा वेळी माझ्या अन्तकरणात एकदम दिव्य ज्ञानाची एक ज्योत प्रकट झाली.
‘हे सर्व वस्तुजात, ही फुले, हे गवत, ही सर्व पृथ्वीदेखील एक दिव्य ‘उद्गीथ’ गात आहे. प्रत्येक वस्तू, प्रत्येक तत्त्व स्वत:चा सहज-स्वभाव प्रकट करण्याचा स्वानन्द उपभोगीत आहे. अंत:स्वभावाचे प्रकटन, बीजभूत शक्तींचा विकास हेच खरे संगीत आहे.’
“होय”, हिरण्य-पुरुष म्हणाला.
मला मोठा अचंबा वाटला. माझे विचार माझ्यापेक्षाही या हिरण्य-पुरुषाला अधिक समजावेत याचा अर्थ काय? तो पुढे म्हणाला:
“ब्रह्मविद्या पूर्णपणे अवगत असलेले प्राचीन कालातले ज्ञाते व द्रष्टे यांची वचने आहेत: ‘ही अनंत विश्वे एका संगीत-तज्ज्ञाने तयार केली आहेत. हे विश्व म्हणजे त्या विश्वेश्वराचे एक सामगायन आहे.’”
“वा! सुंदर! पण यापूर्वी हे माझ्या लक्षात कसे आले नाही? ही वचने तर मी अभ्यासिली होती.” माझे उद्गार.
“यात नवल कसले? तुला ते संगीत कसे ऐकू येणार? तुझी तयारी कोठे होती? पण एक गोष्ट लक्षात ठेव.” हिरण्य-पुरुष जरा जोर देऊन म्हणाला, “एकापलीकडे दुसरे - अशी अनन्त सप्तके आहेत. त्या महान् संगीताचे केवळ पहिले सूर या क्षणी तू ऐकत आहेस.”
“असे काय?”, विस्मित होऊन मी विचारले, “मला तर ते सर्वच्या सर्व ऐकण्याची इच्छा आहे. त्यातला एकही सूर चुकविण्याची, निसटू देण्याची माझी इच्छा नाही.”
“पण त्याला तपश्चर्या लागते”, हिरण्य-पुरुष म्हणाला, “कोणतेही वाद्य वाजवायला शिक्षण लागते, खूप खूप मेहनत घ्यावी लागते. नाद-ज्ञ कलाकाराने स्वत:च्या वाद्याच्या मर्यादा व क्षमता यांचे पूर्ण ज्ञान करून घ्यावे लागते. त्या सीमेमध्ये, त्या क्षितिजापर्यंत त्या वाद्याचा उपयोग करण्यास त्याने समर्थ झाले पाहिजे. स्वत:चे मन, अन्तकरण, स्वत:ची अंगुली, किंबहुना स्वत:चे सम्पूर्ण व्यक्तिमत्त्व, एका विशिष्ट साधनेने कार्यक्षम केले पाहिजे.
“ही साधना अत्यंत एकाग्रतेने करावी लागते. महान् स्वर-संयोजकांनी कागदावर काही चिन्हे उतरविलेली असतात. पण तेवढे गृहीतकृत्य घेऊन, स्वत:च्या वाद्याचा उपयोग करून संगीत-ज्ञ वादनपटु, सुरम्य स्वर-विश्वे निर्माण करू शकतो. यांतले प्रत्येक स्वरविश्व, विविधतेने, वैचित्र्याने सम्पन्न असते. प्रत्येक संगीत-ज्ञाला प्रतीत होणारे स्वर-विश्व म्हणजे विश्वेश्वराच्या महागीताच्या आविष्काराची एक लकेर असते.”
“पण मी संगीत-ज्ञ नाही. या आपल्या विवेचनाचा माझ्या जीवनाशी नेमका संबंध काय?”, मी कुरकुरले.
हिरण्य-पुरुष म्हणाला, “तू संगीत-ज्ञ नाहीस, हे मला माहीत आहे. सर्वसामान्य अर्थाने तू संगीत-ज्ञ नाहीस. पण मी सांगितलेले रूपक अगदी समुचित आहे. तू - तुला भावना आहेत, तू पाहतेस, ऐकतेस व विचार करतेस; अशी ही तू - तुझ्या देहाला, सर्व इन्द्रियग्रामाला, एक उपकरण समजले पाहिजेस; तरच तुला या उपकरणाची, या साधनाची खरी योग्यता समजेल; आणि नन्तर तू त्याचा पुरेपूर उपयोग करून घेऊ शकशील.
“या कलेची एक स्वतंत्र प्रक्रिया आहे, पद्धती आहे. प्रत्येक कलेला एक स्वतंत्र प्रक्रिया असते, नव्हे का? या प्रक्रियेला आम्ही ‘ध्यान’ म्हणतो. अनेकानेक वर्षे या ध्यानाचा प्रयोग करावा लागतो; साधना करावी लागते. ‘ध्यान’ हे ‘दुसरा स्व-भाव’ होऊन चालत नाही. तो ‘पहिला स्वभाव’ किंबहुना, तो एकमात्र ‘स्वभाव’ झाला पाहिजे. खरोखर तो तुझा स्वभाव आहेच. तेथेच तुझ्या जीवनाचे नैसर्गिक वातावरण आहे. तरीदेखील अभ्यास लागतो; आणि अभ्यास असेल, तरच तुला या सत्याचे ज्ञान होते, व भान राहते”, हिरण्य-पुरुष थांबला.
“अस्सं, आता माझ्या लक्षात आलं. पण सुरूवात कोठून करू? हे ध्यान मला कोण शिकवील? त्या गुरुदेवांचं दर्शन मला होईल काय?”, मी विचारले.
“मीच तुझा आद्य गुरु आहे. अन्त्य गुरुही मीच आहे. दुसरे अनेक मार्गदर्शक, उपदेष्टे, शिक्षक तुला उपलब्ध होतील. हे सर्व साहाय्यक तुला पुष्कळ मदत करतील. जितकी मदत देणं शक्य आहे, तितकी ते अवश्य देतील.”
“पण, हे शिक्षक कोण? उपदेशक कोण?”, मी विचारले.
“त्यांना अनेक विशेषणे आहेत. कोणी त्यांना ‘स्वामी’ म्हणतात, कोणी ‘स्थितप्रज्ञ’ म्हणतात”,
हिरण्य-पुरुष बोलू लागला, “मानव-वंशाचे ‘ज्येष्ठ भ्राते’ अशीही त्यांना संज्ञा दिली जाते. या ज्येष्ठ भ्रात्यांनी या अवस्थेतील साधना संपविलेली असते, पूर्णपणे आत्मसात् केलेली असते. इतरांना त्यांच्या अनुभवाचा फायदा मिळावा, म्हणून ते आपले ज्ञान धाकट्या भावंडांना देत असतात. ते, खरोखर फार थोडे सांगू शकतात. या लहान भावंडांना त्यांचे सर्व ज्ञान समजावून घेण्याची पात्रता नसते; कारण त्या जातीचे अनुभव त्यांना पूर्वी कधीच आलेले नसतात. ‘ज्येष्ठ भ्रात्या’च्या विवेचनावर त्यांचा कधीही विश्वास बसत नाहीं. हे ज्येष्ठ भ्राते इतरांच्या ग्रहणशक्तीच्या कक्षा विस्तृत करण्यासाठी प्रथम त्यांना योग्य मार्गदर्शन करीत असतात.”
“अशा एकाद्या महापुरुषाशी माझी गाठ तरी केव्हा पडेल?”, मी मोठ्या उत्सुकतेने विचारले.
“तुझी तयारी झाली, तुझ्या ठिकाणी पात्रता आली, की त्या क्षणीच”, त्याने उत्तर दिले.
“पण मी प्रथम काय करू? तयारी करणे म्हणजे काय? पण चला, त्या निर्झराच्या काठावर आपण बसू या. त्याचा मर्मरध्वनि मला ऐकू येत आहे. तेथे आपण मला पहिला पाठ द्यावा ना आज!”
“ठीक, आपण जाऊ या. पण या पठाराच्या टोकाला काही यात्रिक गाणे म्हणत आहेत; तेथे आपण प्रथम जाऊ. त्या सर्व यात्रिकांनी हे शिक्षण घेतलेले आहे. त्यांची तयारी चांगली आहे. तपश्चर्याही प्रदीर्घ आहे.
“शिवाय एकाकी माणसाने हा ध्यानयोग शिकण्यापेक्षा एखाद्या मोठ्या समूहाने तो शिकणे अधिक हितकर.”
“ठीक आहे”, मी सहमत झाले. “पण त्या निर्झराजवळ आपण जाऊ या की. काही वेळापूर्वी या माझ्या कर्मपशूला पाणी पाजण्याचे मी कबूल केले आहे. या वनस्थलीच्या दुसर्या टोकाला असलेल्या सरोवरापर्यंत जाणे त्याला कसे शक्य आहे?”
हिरण्य-पुरुषाने माझ्याकडे एक तीक्ष्ण कटाक्ष टाकला.
एवढ्यात मला आकाशवाणी ऐकू आली.
‘मी दिलेले पाणी जो पिईल, त्याला पुनश्च तहान लागणार नाही.’
“पण”, विरोध दर्शवीत मी म्हटले, “हा प्राणी केवळ एक पशू आहे. त्याला खरेखुरे पाणी हवे आहे. त्याला रूपक नको आहे, काव्यरस नको आहे.”
“होय, तुझे म्हणणे बरोबर आहे. त्याला साधे पाणी हवे आहे, हे खरे. हा एक पशू आहे, हेही खरे. पण तुझ्या बोलण्यातला ‘केवळ’ शब्द मी वापरणार नाही.”
“तो पशु असला तरी या विश्वातली प्रत्येक गोष्ट जशी रहस्यमय आहे, आश्चर्यमय आहे, तसे त्याचे पशुत्वही एक मोठे आश्चर्य आहे; एक गूढ रहस्य आहे. या जगातली प्रत्येक वस्तू, प्रत्येक जातमात्र विश्वाच्या विशाल अस्तित्वाचा एक भाग नव्हे का? आपण सर्वच एकमेकांशी संबद्ध आहोत, सर्वांचेच सर्वांशी नाते निकटचे आहे. प्राणिज-सृष्टी, उद्भिज-सृष्टी आणि खनिज-सृष्टी यांच्याशी आपला निकटचा व प्रत्यक्ष संबंध आहे; आणि म्हणून आपण सर्व, हे अखिल विश्वजात, सह-योगाने उन्नत व अधोगत होत राहणे साहजिक नव्हे का?”
“अर्थातच”, मी विचार केला, “ही सर्व सृष्टी एकाच दु:खाने, एकाच वेदनेने सुस्कारे टाकीत आहे.” हिरण्य-पुरुषाने संमतिदर्शक मान हलविली व तो पुढे बोलू लागला:
“विश्वातल्या सर्व वस्तू अनंत त्रिज्यांप्रमाणे एका केंद्रातून उगम पावत आहेत; उन्नत होत आहेत. याच महा-केन्द्राला ‘ईश्वर’ असे सामान्यत: म्हणतात. गीतेमध्ये भगवंत म्हणतात -
“मया ततमिदं सर्वं जगदव्यक्त मूर्तिना।”
हे एक विलक्षण महा-वर्तुल आहे. ज्याचे केंद्र सर्वत्र आहे, पण परिघ कोठेच नाही, असे ते एक वर्तुळ आहे. त्या वर्तुळासारखे किंवा केंद्रासारखे अन्तिम सत्यतेचे स्वरूप असणार.
“क्षणभर थांबा”, विरोध दर्शवीत मी उद्गारले, “आता माझी बुद्धी कुंठित होत चालली. माझ्या ज्ञानाची अखेर-सीमा झाली. आपण मागे फिरू या; आणि या तहानल्या जीवाला थोडंसं पाणी देऊ या.”
नंतर आम्ही डाव्या बाजूला वळलो. तेथे एक पाऊलवाट होती. त्या पाऊलवाटेने वनस्थलीतून पुढे गेल्यावर आम्ही एका ओढ्याजवळ आलो. सूर्यप्रकाशामुळे त्या ओढ्याचे पाणी चन्देरी रंगाने अधूनमधून चमचमत होते. प्रवाहात पडलेल्या वेतांच्या छायेमुळे तेच पाणी काळेनिळे दिसे.
माझा कर्मपशू अन् मी, दोघांनीही मनसोक्त जलपान केले. जवळच एक मासा, ओढ्याच्या काठावरील झाडांच्या मुळांमधून धाडकन् प्रवाहात पडला, आणि एक माशी त्याने गिळंकृत केली. “काय नवल आहे!”, मी स्वत:शीच म्हटले, “याने माशी खाल्ली, दुसरा मोठा मासा, किंवा प्राणी किंवा आमच्यासारखी माणसे या माशाला खातात. निसर्गातला व्यवहार हा असा आहे. ‘जीवो जीवस्य जीवनम्!’ आम्ही सर्वच्या सर्व ईश्वराचे अंश आहोत, हे जर खरे; तर निसर्गात चाललेले हत्याकांड योग्य आहे काय? गव्हाचे बीज, मासा, प्राणी ही सर्व आपापले अन्न खातात आणि वाढतात. वाढल्यानन्तर ती दुसर्या कोणाचे तरी अन्न होतात. मानवाने जगावे, मानव्याचा विकास व्हावा म्हणून ही सारी मृत्यूमुखी पडतात काय?
“शिवाय दुसरी माणसे जगावी म्हणून काही मानवदेखील मृत्यूमुखी पडले आहेत. स्वत:चे बलिदान करून मानवी स्वातंत्र्याला, मानवी विकासाला, मानवी शान्ति-निर्मितीला हातभार लावणारी माणसे इतिहासाला माहीत आहेत. असाच एक मानवपुत्र जन्मला, जगला आणि मेला. मरून पुनश्च जीवमान झाला. त्याचे नाव ‘जीझस’ असे होते. मृत्यू पावून पुनर्जन्म घेणार्या जीझसने हेच सिद्ध केले नाही का?
“मृत्यू ही एक अवस्था आहे. मृत्यू म्हणजे विनाश नव्हे. जीवन चिरन्तन आहे. शरीराला मृत्यू आहे; आत्म्याला नाही. मृत्यू म्हणजे केवळ अवस्थान्तर आहे.”
माझी विचारचक्रे अत्यंत वेगाने फिरत होती. ‘सर्व प्रणिजात, एका ईश्वराच्या देहाचे अनन्त अंश आहेत. एका अंशाने दुसर्या अंशाची सेवा केली, असाच अर्थ लावायचा का? माशी मेली, मत्स्य जगला; मत्स्य मेला, मानव जगला. सगळे ईश्वराचेच अंश. मत्स्याच्या देहत्यागाने मानवाचा देह पुष्ट झाला. एकाच्या मृत्यूमुळे दुसर्याचे जीवन समृद्ध झाले.’
जीझसच्या मनात हाच अर्थ असेल काय? जीझसने भाकरी घेतली, तिचे तुकडे केले आणि म्हटले, “हा माझाच देह आहे. तुमच्यासाठी या देहाचे हे तुकडे केले आहेत. माझ्या या देहत्यागाचे चिन्तन करा, स्मरण करा आणि तुम्हीही तसे करा.”
“खरोखर आम्ही ही आज्ञा पाळली, त्याच्या देहत्यागाचे स्मरण केले तर काय होईल? आमचा विकास होईल? पण ‘विकास’ या शब्दाचा अर्थ तरी काय? ‘विकास’ कोणत्या अवस्थेस म्हणावयाचे? विकास अनन्त आहे का? विकासाला पूर्णतेची अवस्था, परिपूर्ती आहे की नाही?”
दुरून आकाशवाणीचा प्रतिध्वनि आला.
“ईश्वराची पूर्णता हीच विकासाची पराकोटी, अतिसीमा.”
मी माझ्या विचारांत गुंग होते. त्या निर्झराच्या जलप्रवाहाबरोबर वरवर चढत होते; पण माझी पहिली पाऊलवाट आता माझ्या पायाखाली नव्हती. इतक्यात हिरण्य-पुरुषाचा आवाज मी ऐकला.
“तुझी विचारसमाधि भग्न करण्याचा माझा हेतू नव्हता; कारण त्या विचारांचे स्फ़ूर्तिस्थान मीच होतो. मी तुझ्या अन्त:करणात त्या विचारांची ज्योती तेवत ठेवली होती. पण या ओढ्याच्या काठाकाठाने तू जात राहिली असतीस, तर त्या सरोवराच्या तीरावर पोहोचण्यास आपल्याला भलताच उशीर लागला असता. आपण आपल्या सरळ रस्त्याला लागणे, हेच मला योग्य वाटले.”
“होय, अर्थात्. पण माझी ही विचार-परंपरा तुमच्या स्फूर्तीमुळे जागृत झाली, ती कशी काय? बरे, माझा निर्णय, माझा सिद्धान्त बरोबर होता काय?
“’मृत्यूने जीवन समृद्ध होते’, हे म्हणणे बरोबर आहे ना?”, मी पृच्छा केली.
या भीषण विधानाने मला भयचकित केले. अधिकाधिक मनन केल्यावर हा सिद्धान्त मला अगदी अटळ, अपरिहार्य वाटला. माझ्या मनात वीज लकाकल्यासारखा लख्ख प्रकाश पडला. ‘हा सिद्धान्त सत्य आहे, इतकेच नव्हे तर तो शिव-सुन्दर आहे.’
‘मृत्यूमुळेच जीवन समृद्ध झाले आहे. मृत्यूने जीवनाला मांगल्य दिले आहे.’
“आणि ते खरे आहे”, हिरण्य-पुरुष म्हणाला, “त्या वाक्याच्या अर्थाचा हा एक भाग आहे. मी विचार-परंपरेची स्फ़ूर्ती दिली, याचा अर्थ हा की, केवळ माझ्यामुळेच तुला विचारशक्ती प्राप्त झाली आहे. तुला आठवतात ना आकाशवाणीचे ते शब्द ‘माझ्याशिवाय तू काहीच करू शकत नाहीस.’ पण वस्तुत: ‘तुझ्या या विचारपरंपरेचे स्फ़ूर्तिस्थान मीच आहे’, यात थोडा श्लेष आहे. आपण ध्यानयोगाबद्दल बोलत नव्हतो का? त्या ध्यानयोगासाठी तू कितपत पात्र आहेस, याचा अंदाज मी घेतला. ही विचारपरंपरा त्या गहन ध्यानयोगाची एक पूर्वतयारी आहे. तुझ्या ठिकाणी हे विचारचक्र मी हेतुपूर्वक उदित केले होते. कारण, ही ध्यानाची प्रक्रिया आहे.
“नीट ध्यानात घे. एकाद्या विचाराचे बीज घ्यावयाचे; नन्तर ते बीज मनोभूमीत रुजवावयाचे, वृद्धिक्षम करावयाचे; परस्परांशी सुसंगत, सुसंबद्ध असणार्या विविध कल्पनांना त्या विचाराभोवती गुंफीत बसावयाचे.
“बीजाशी असंबद्ध असणार्या, विसंगत असणार्या, सर्व दुसर्या कल्पनांना दूर ठेवावयाचे, बाजूला सारावयाचे, ही ध्यान-साधना सुरू करताना, दोन तत्त्वे लक्षात ठेवली पाहिजेत; एक बीज, व दुसरे संबद्धता. वटवृक्षाच्या बीजातून एक विशाल वटवृक्ष निर्माण होतो; आणि लहानग्या मुलाचा एक भव्य पुरुष होतो. लहानग्या मुलाचा विशाल वटवृक्ष झाल्याचे तू पाहिले आहेस का? किंवा वटवृक्षाच्या बीजातून, पुढे एकादा महापुरुष निर्माण झाल्याचे ऐकले आहेस का?
“बीज-शक्तीचे हे स्वरूप लक्षात ठेव. ही बीज-शक्ति प्राण्याची, वनस्पतीची किंवा कल्पनेचीसुद्धा असू शकते. पण बीज-शक्तीचा परिपोष, परिस्फुटता, तिच्या स्वभावानुरूप झाली पाहिजे. प्रत्येक बीजामध्ये असणार्या सर्व सुप्त शक्ती प्रगट झाल्या पाहिजेत.
“या परीक्षेतून, या दिव्यातून तू उत्कृष्टपणे पार पडली आहेस”, त्याने हसत हसत आपला अभिप्राय व्यक्त केला.
या वेळेपर्यंत मी पुष्कळ शहाणी झाले होते. हिरण्य-पुरुषाच्या निरनिराळ्या अद्भुत पद्धतींशी माझा चांगलाच परिचय झाला होता. स्थल आणि काल यांची बन्धने त्याला वाटेल तेव्हा झुगारता येत असत; आणि म्हणून मला आश्चर्य वाटले नाही. वास्तविक तसे वाटावयास पाहिजे होते; कारण आम्ही त्या विशाल वनस्थलीच्या दुसर्या टोकाला जाऊन पोचलो होतो; त्या सरोवराच्या अगदी निकट आलो होतो.
“हा तर एक महोदधीच आहे”, मी उद्गारले. मला त्या सरोवराचे परतीर दिसत नव्हते आणि आमचा तो पर्वतदेखील आता दिसेनासा झाला होता. मला वाटते, तो मेघांनी आच्छादित झाला होता.
“आरोहणापूर्वीच हा समोरचा महोदधी आम्ही ओलांडायला पाहिजे की काय”, मी एकदम उद्गारले.
हिरण्य-पुरुषाचा अभिप्राय ऐकण्यापूर्वी काही व्यक्तींचा समूह दिसू लागला. मला जे वृन्दगीत ऐकू येत होते, ते गाणारा हाच समूह होय.
ते सर्वजण जमिनीवर बसले होते. एका उंच आणि भव्य महापुरुषाभोवती, वर्तुळ रेषेत, ते आनन्दाने गात आहेत, असे मला दिसले. त्या महापुरुषाशी माझ्या हिरण्य-पुरुषाचे विलक्षण साम्य होते; पण त्याच्या मुद्रेभोवतीचे तेजोवलय थोडे अधिकच भव्य, दिव्य होते. त्याच्या सुवर्णप्रकाशाला एक अलौकिक तीव्रता, तीक्ष्णता व तेजस्विता होती.
“हे पहा”, मी कुजबुजले, “ते एका इन्द्रधनूच्या मध्यभागी उभे आहेत, ते कोण आहेत?”, मी विचारले.
“ते श्रीगुरुदेव आहेत”, सुवर्ण-पुरुष म्हणाला.
“त्यांच्याभोवती बसलेल्या समूहात आपल्याला बसता येईल काय?”, मी विचारले.
“आपल्या येथपर्यन्तच्या यात्रेचा तोच उद्देश आहे”, हिरण्यपुरुषाने निश्चयात्मक स्वरात सांगितले.
-------------------
ध्यान-बीज (३)
“सस्यमिव मर्त्य: पच्यते
सस्यमिवाजायते पुन:।”
- कठोपनिषद् १.१.५-६
भावार्थ:
“मनुष्य हा, दाण्याप्रमाणे नष्ट होतो, मृत्यूमुखी पडतो आणि दाण्याप्रमाणेच पुन: जन्मास येतो.
----------------------------
“अथ खलु आहु: काममय एव अयं पुरुष इति।
स यथाकामो भवति तत् ऋतु: भवति।
यत् ऋतु: भवति तत् कर्म कुरुते।
यत् कर्म कुरूते तद् अभिसंपद्यते।”
- बृहदारण्यक उपनिषद् ४.४,३-५
भावार्थ:
“’हा पुरुष काममय आहे’, असे द्रष्टे म्हणतात. जशी त्याची इच्छा असते, वासना असते, तसा त्याचा निश्चय (ऋतु) होतो.
निश्चयानुरूप कर्म घडते. कर्मानुसार फल मिळते.”
- प्रतिसाद देण्यासाठी सहभागी व्हा अथवा सदस्य बना
पुस्तकाचे चॅप्टर्स
संपूर्ण पुस्तक वाचण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा.