You are hereदुसरे पाऊल / दुसरे पाऊल
दुसरे पाऊल
“आध्यात्मिक विकासाची प्रत्येक अवस्था बिकट परिस्थितीच्या आघातांची फलश्रुति असते. एक पुरातन नवलथा आहे. तिचा आशय असा आहे :-
‘पृथ्वीमोलाची रत्ने मानवी अश्रूंतून निर्माण होत असतात.’
वस्तुस्थिती ही अशी आहे.
मी म्हणतो, माझ्या शिरावर मला तुमचे ओझे घेऊ द्या. खरोखर यात स्वार्थत्याग नाही. माझी आत्मशक्ती मी शतगुणित करण्याच्या प्रयत्नात आहे.”
- हायरार्की, पान २९
----------------------------------
मला सतत सोबत करणार्या, पाठराखण करणार्या त्या छायेला घेऊन, मार्गावरचे पहिले पाऊल मी उचलले; पण त्याच क्षणी माझा हिरण्य-पुरुष मला दिसेनासा झाला. वळणापलीकडे तो अंतर्धान पावला होता. त्याच्या मुरलीचे सूर आता इतके अस्पष्ट झाले होते, की मला ते नीट ऐकू येईनात.
“चल लवकर, मला त्वरेने त्याच्या पाठोपाठ गेले पाहिजे. नाहीतर मी त्याला कायमचीच गमावून बसेन. पुन: त्याला मी कोठे शोधू?” असे म्हणत असतानाच, क्षणार्धात माझ्या मनात वीज चमकून गेली. त्या क्षणी मला एक गोष्ट नि:संशय पटली: या सोनसख्याशिवाय मला एक क्षणभरदेखील माझे हे जीवन कंठणे असह्य आणि अशक्यच आहे.
ह्या प्रतीतीचा प्रभाव इतका विलक्षण होता, की जणू एक प्रचंड लाट माझ्या डोक्यावरून, सर्व व्यक्तिमत्त्वावरून पुढे गेल्याचा भास झाला. पण त्या लाटेने मला खाली पाडले नाही; तिने मला अलगद वर उचलले आणि स्वत:ची यत्किंचितही हालचाल न करता मी एकदम पुढे जाऊन पोहोचले; माझ्या इष्ट स्थली पोहोचले. हे स्थल गाठणे माझे कित्येक दिवसांचे स्वप्न होते.
त्या पर्वताच्या स्कंधाला वळसा घालून पायवाट जेथे ऊर्ध्व दिशेने जाऊ लागते, तेथे जाऊन पोहोचावे असे मला वाटत होते. अगदी एकच पाऊल माझ्यापुढे तो हिरण्यपुरुष एकदम दृष्टीस पडला. मला एवढा आनंद झाला की, माझ्या मनाने स्वत:भोवती गिरकीच घेतली.
पुनश्च एकदा माझ्या सर्व व्यक्तिमत्त्वातून ह्या हिरण्यपुरुषाकडे, त्या माझ्या आत्मतत्त्वाकडे माझ्या हृदयातली प्रेमगंगा वाहू लागली. ही प्रेमगंगा माझ्या हृदयातून बाहेर पडताच, त्या गंगाजलात मोठमोठाली वर्तुळे निर्माण होऊ लागली.
विस्तीर्ण जलाशयात एकादा दगड टाकला म्हणजे एकामागून एक वलये उद्भवत राहतात, हे तुम्ही पाहिले आहे ना? अगदी तसाच प्रकार त्या प्रेमरूप गंगाजलातील वर्तुळांचा होता. मला केवढी आनंदोर्मी आली; माझे सर्व शरीर धुक्यासारखे हलके झाले! पंख फुटल्यासारखेच मला वाटले. अशा रीतीने आणि या वेगाने हा पर्वत चढून जाणे, म्हणजे एक गंमतच आहे. एकदम शिखरावर मी आरोहण करू शकेन. माझ्या पायाला पंख आहेत, भुर्रकन् उडून जावयाचे! त्यात कठीण काय? ही शक्ति, हा आनंद माझ्यातून निघालेल्या प्रेमगंगेचा परिणाम आहे, हे माझ्या ध्यानात राहिले पाहिजे. त्या हिरण्मय पुरुषाकडे माझ्या हृदयातली गंगा सदैव वाहत राहिली पाहिजे.
“पण माझे लक्ष अशा तर्हेने भटकत राहिले तर ते ठीक नव्हे. वाटेत मला कोणीही भेटो, काहीही दिसो, माझी एकाग्रता बिघडता कामा नये.”
या विचारांत मी पावले टाकीत असतानाच माझ्या डाव्या बाजूने एक आवाज मला ऐकू आला. त्या आवाजात भीती, काळजी, शंकाकुल वृत्ती अशा अनेक सूक्ष्म छटा प्रतिबिंबित झाल्या होत्या. मी तिकडे पाहिले. मला एका माणसाचे डोके तेथे दिसले. त्याची मुद्रा दु:खाने काळवंडली होती. हरित तृणांचे झुबके मोठ्या नेटाने पकडण्याचा तो प्रयत्न करीत होता. कारण एका खड्ड्यातल्या दलदलीत, तो रुतून गेला होता. अगदी खांद्यापर्यंत रुतला होता.
“धावा, धावा!” कातर स्वरांतली त्याची किंकाळी ऐकू आली, “या गवताच्या काड्या मला आधार देऊ शकत नाहीत; पायाखालचा चिखल मला खाली-खालीच खेचीत आहे. आणि क्षणार्धात माझे डोके या चिखलात अदृश्य, लुप्त होईल.” किंकाळी मारणार्या माणसाची तुटक तुटक वाक्ये मला ऐकू आली.
“तुम्ही कोणीही असा, या अभाग्याला जीवदान द्या. मला, मला वाचवा.”
“किती दुर्दैवी जीव! आणि मीही किती दुर्दैवी! आताच, पर्वताच्या आरोहणाला मी सुरुवात करणार, आणि हे अरिष्ट येथे उभे! या दीन जीवाला मदत करायला मी थांबले तर माझा तो हिरण्यपुरुष एवढा दूर जाईल की, मी त्याला कधीच गाठू शकणार नाही. शिवाय हा गृहस्थ येथे चिखलात पडला आहे, रुतला आहे, तो त्याच्या स्वत:च्याच प्रमादाने. त्याला नीट पायवाटेवरून चालण्यास काय हरकत होती? बरे! ही पाऊलवाट सोडून त्याला वर काढण्यासाठी बाजूला गेले, तर मीही त्या दलदलीतच पडेन. मी आणि तो, दोघेही मृत्यूच्या जबड्यात जाऊ.”
“छे, छे, त्याला येथेच सोडणे बरे. हे त्याने स्वत:वर ओढवून घेतलेले दुर्दैव आहे. त्याचे फळ त्यानेच भोगले पाहिजे. मी माझ्या मार्गाने पुढे जाणे बरे.”
पण माझे पाय जड झाले, जणू काही लोखंडाचेच. माझ्या पुढल्या वाटेवर एक, एकही पाऊल टाकणे मला अशक्य झाले. माझ्या अन्तकरणातला सर्व आनन्द नाहीसा झाला होता. माझे मन असे जड, निरुत्साही व दुबळे झाले की, मी स्वत:च त्या दलदलीत बुडत चालले आहे असा मला भास झाला.
आणि एवढ्यात माझ्यामागून गुरगुरणे मला ऐकू आले. मी मागे पाहिले, तो माझे ते कर्मश्वान, तो हिडिस पशु माझ्या पोटर्यात आपल्या घाणेरड्या तीक्ष्ण दातांचे सुळे खुपसण्याच्या बेतात होता.
मी मोठ्याने ओरडले, “खाली बैस. पामर जीवा, खाली बैस. तू मला दुखवू शकत नाहीस. काही झाले तरी तू माझी नि:सत्त्व, निर्जीव छाया आहेस.”
एकदम मी मोठमोठ्याने हुंदके देऊ लागले. शरमेने मान खाली घातली; कारण माझी स्मरणशक्ति जागी होऊ लागली होती.
“क्षमस्व, पशुदेवा, तू केवळ तुझे कर्तव्य करीत आहेस. काही क्षणांपूर्वी मीच तुला सांगितले होते. आता मला आठवले; ‘माझ्या मार्गावर कोणीही दु:खित, व्यथित, संकटग्रस्त भेटला, आणि मी जर त्याला सहानुभूति दाखविली नाही, तर तू माझ्यावर भुंक; मला चावासुद्धा घे. निर्घृण, निष्प्रेम, निर्दय असे माझे आचरण कधीही आणि कोणाशीही होता कामा नये. अशा वेळी तूच माझा त्राता आहेस. माझे पतन होऊ लागले, तर तू मला मार, चावा घे, लचका तोड, काय वाटेल ते कर.’ अरेरे मला, स्वत: मीच केलेल्या विनन्तीचे, एवढ्यातच विस्मरण व्हावे ना?”
आणि मी मागे वळून पाहिले, माझे हृदय भीतीने थरथरत होते. ‘दलदलीतला मनुष्य पूर्ण बुडाला तर नसेल?’
“देवा, तुझे कसे आभार मानू? त्या अभाग्याचे डोके अजून थोडे बाहेर दिसत आहे; आणि दोन्ही हातदेखील थोडे थोडे मोकळे आहेत. त्याची स्वत:ची चूक म्हणून तो आत पडला असला तरी, मला शक्य असेल तर मी त्याला बाहेर काढणे, हेच माझे कर्तव्य नव्हे का? या कृष्णारण्यात मी माझा रस्ता चुकले, हादेखील माझाच दोष नव्हता का? दोष कुणाचा हा प्रश्न या परिस्थितीत सर्वथैव अप्रस्तुत असतो.”
ही विचारमालिका क्षणार्धात माझ्या मनात चमकून गेली. तत्क्षणीच मी त्या अभागी जीवाकडे, दलदलीकडे जाऊ लागले. मी स्वत: त्याच चिखलात पडेन या क्षुद्र विचाराचा आता मला पूर्ण विसर पडला होता.
“धीर धर, धीर धर. ही मी आलेच.” माझे दोन्ही हात त्याच्याकडे पसरून मी मोठ्याने उद्गारले.
आणि अगदी याच क्षणी आनंदाचा तो पूर, ती दिव्य शक्ति माझ्या हृदयात पुन: संचार करू लागली. मला वाटले, मी चालत नसून माझे पंख मी पालवीत आहे. मी बुडले तर नाही ना? पण माझे पाय जमिनीला स्पर्शदेखील करीत नव्हते. तेथे जे गवत उगवले होते त्या हिरव्यागार गालिच्यावरून मी अगदी अलगद पुढे सरकत होते.
आणि दुसर्याच क्षणी दलदलीत रुतलेल्या त्या अभागी जीवाला मी घट्ट पकडून धरले. माझा आधार घेऊन तो सुखरूप वर आला. त्याच्या आणि माझ्या नेत्रांतून अश्रूंचे पूर वाहू लागले! तो आणि मी धन्य झालो!!
“पंख पालवीत येणे हे ठीक आहे. मी हवेवर चालत आले खरी, पण हवेपेक्षा अधिक घन, जड असा आधार माझ्या पायांखाली असल्याशिवाय तो जरी वर आला तरी उभा कसा राहील? कोठे राहील? माझ्या पायांखाली आहे तरी काय? नंतर माझ्या ध्यानात आले की माझ्या पायांखाली एक प्रचंड, घन, जड शिलाखंड होता. दलदलीच्या जागीदेखील कठिण जागा, खडक आपणास आढळत नाही का? तो गवत आणि माती यांनी बनलेला एक मजबूत खडकाळ भू-भाग होता.
नंतर माझ्या लक्षात आले की, तसाच एक कठिण भूमिभाग दलदलीच्या कडेला होता. मी त्या बुडत्या, अभागी जीवाला थोडेसे वर खेचल्याबरोबर त्याच्या हाताला हा दुसरा आधार सहज लागला असता. मी त्याला तो खडकाळ भाग दाखविला आणि एक दीर्घ श्वास घेते न घेते, तोच अचानक तो त्या खडकावर येऊन बसलासुद्धा!
तो थकला होता, स्वत:चा श्वास शोधीत होता. त्याच्या कपड्यांतून घाणेरड्या पाण्याचे बिंदू ठिबकत होते आणि त्या दुर्गंधीने त्याचे अंग शहारत होते.
तो जरा स्वस्थ झाल्यावर मी विचारले, “अरे, तू या दलदलीत पडलास तरी कसा?”
तो म्हणाला, “त्याचं असं झालं, संध्याकाळ झाली होती; मी एकटाच होतो. याच वाटेवरून पुढे मी एका काळ्याकुट्ट, भयप्रद अरण्यात प्रविष्ट झालो असतो. कभिन्न अंधारात, त्या अरण्यातून जाणे मला योग्य दिसेना. मी विचारात होतो, तेवढ्यात मला काही व्यक्ती, तुम्ही ज्या मार्गावरून जात होता, त्याच मार्गावरून चालत असलेल्या दिसल्या.
“तुम्ही चालला होता, अगदी तोच मार्ग. त्यावरून जाणार्या त्या मानवी जीवांना पाहून, मला अत्यंत हर्ष झाला. मी पायाखाली पाहिलेच नाही. एकदम त्या यात्रिकांकडेच धाव घेतली.
“या क्षणी जर तुम्ही आला नसतात, तर या घाणेरड्या खाईत, मी यावेळी गतप्राण झालो असतो. पायाखाली न पाहता चालल्याचा हा परिणाम! तुमचे आभार कोणत्या शब्दात मानू? माझी कृतज्ञता कशी व्यक्त करावी, हेच मला समजत नाही. आता आपण त्या तुमच्या मार्गावर जाऊ, तो पर्वत बरोबरच चढू. कदाचित् माझे तुम्हांला साहाय्य होईल. निदान साहाय्य व्हावे, अशी माझी इच्छा आहे, प्रार्थना आहे.”
“तसे झाले तर फारच छान.” मी उत्तरले. “पण मला ते शक्य दिसत नाही. हे बघ, मला एकटीला हे शक्य झालेच नसते. ती दलदल कशीबशी ओलांडणे आणि तुला वर ओढून घेणे! केवढे ते दिव्य!
“मीपण त्या काळ्याकभिन्न अरण्यामध्ये वाट चुकले होते. पण जाऊ दे, तुला ती सर्व कथा सांगून काही उपयोग नाही.
“एका व्यक्तीचा अनुभव दुसर्या व्यक्तीला उपयोगी पडतोच असे नाही. शिवाय माझ्या सांगण्यावर तुझा विश्वासदेखील बसणार नाही. मला वाटते, तू परत जावेस हे चांगले. त्या अरण्यातून तू स्वत:च मार्ग काढला पाहिजेस, एवढे तरी तुला कळले हे तुझे भाग्य नव्हे का?
“मी स्वत: त्या अरण्यात जाऊन आले. आणि माझ्यापूर्वी अनेकजण, तेथून गेले आहेत. मला आणि त्या सर्वांना पुढील मार्ग सापडला, त्या अर्थी तुलाही सापडेल. मला तर या अरण्यातून पुढे मार्ग आहे, मार्ग सापडेल अशीही खात्री नव्हती. या अरण्यातून बाहेर निघण्याची शक्यता जर मला वाटली असती, तर मला तेवढी भीती वाटली नसती. माझ्या अनुभवामुळे, माझ्या सांगण्यावरून तुला पुढील मार्गाबद्दल भीती किंवा शंका उरणार नाही.” निराशेची एक आकस्मिक लहर माझ्या मनात उद्भवली. मी हा परोपदेश करीत आहे, पण त्या दलदलीच्या दरीत, पुनश्च सापडल्याशिवाय त्या पलीकडच्या रस्त्यावर मी कशी जाणार? आणि तो हिरण्यपुरुष मला कसा दिसणार? तो आता अर्धा पर्वत चढूनही गेला असेल!
मी एकदम वर पाहिले आणि बेहोष होऊन उद्गारले, “अरे! तो तर येथेच आहे! माझ्यापुढे चारच पावले! मी व तो दलदलीतला पुरुष एका बाजूला, आणि आमच्यापुढे चार पावलांवर तो हिरण्मय पुरुष, जरा पलीकडे तर तो रस्ता!”
माझ्या नव्या सहचराला मी दाखविले व म्हटले, “तो पहा, तो तेजस्वी तरुण पुरुष! पाहिलेस का त्याचे दिव्य तेज! तोच आता आपणाला मार्ग दाखवील.”
“कोण? आपण कोण म्हणता? मला इथे कोणीच दिसत नाही.” माझा नवा सहचर म्हणाला.
“होय, खरेच, तुला तो कसा दिसेल? निदान काही कालपर्यंत तरी तो तुला दिसणार नाही, पण हे बघ, तू माझ्यामागे ये. अगदी माझ्या पावलावर पाऊल टाक. पण एक मात्र लक्षात ठेव, माझ्या छायेवर तुझे पाऊल पडता कामा नये. हा जो विद्रूप पशु माझ्या मागून येत आहे तो माझ्या छायेसारखा आहे, तो तुला दुखविणार नाही. पण त्याच्यावर पाऊल पडलेले त्याला आवडणार नाही.”
तो नवस्नेही म्हणाला, “तू किंवा मी, कोणीतरी एक संभ्रमात आहे, हे निश्चित. मला तर तो विद्रूप पशू कोठेच दिसत नाही. अगदी कुठेही दिसत नाही.”
“दिसत नाही? अस्सं, अस्सं. नसेल दिसत तुला. पण लवकरच दिसेल.” मी उत्तर दिले. त्या नवसहचराने थोडा खांदा उडविला. विस्मयरेषा त्याच्या चेहर्यावर उमटत होत्या. मी आणि माझ्यामागे तो दलदलीवरून आमची छोटी मिरवणूकच निघाली. मी निर्धास्तपणे पुढे चालले होते. तितक्याच निर्धास्तपणे माझ्या पावलांवर त्याची पावले पडत होती. तेवढ्यात वरून आकाशवाणी ऐकू आली. युगायुगांच्या अनेक घुमटांमधून, जणू काही, ती वाणी घुमत येत होती. त्या वाणीचे शब्द हे होते;
“माझ्याकडे येण्याचा मार्गदेखील मीच आहे. मार्ग व मी यामध्ये द्वैत नाही, साधर्म्य आहे.”
मी उद्गारले, “अरे वा, हा त्याचा अर्थ आहे का?” इतक्यात, हिरण्मय पुरुषाने मागे मुरडून एक हास्यलकेर माझ्याकडे भिरकावली.
त्या दलदलीच्या दुसर्या कडेला आम्ही पोहोचलोदेखील. आमच्या पायांखाली सपाट, घनजड भूमी लागत होती. आता पाण्याने भरलेला एकच खड्डा ओलांडायचा उरला होता. आम्ही एक उडी घेतली आणि त्या डबक्याच्या पलीकडे गेलो. अगदी तेथूनच त्या घनदाट अरण्यात जाण्याचा मार्ग सुरू झाला होता. येथपर्यंतच्या चालण्याबोलण्यामुळे तो नवसहचर जरा ताजातवाना झाला. त्याच्या अंगातली हुडहुडी नाहीशी झाली होती. तो अत्यंत गलिच्छ दिसत होता हे खरे; पण आता त्याचे कपडे वाळले होते, आणि पुढील मार्ग-क्रमणासाठी जरूर ते धैर्य त्याच्या ठिकाणी उत्पन्न झाले होते.
“यापुढे माझ्याबरोबर तुम्ही येणार ना?” त्याने विचारले.
“तुमच्याबरोबर यायला मला जमेलसे वाटत नाही. कारण, या महामार्गाचा बराचसा भाग एकट्यानेच आक्रमावयाचा असतो.” मी उत्तरले.
आणि हिरण्मय पुरुषाकडे माझ्या विधानास पुष्टि मिळेल, या अपेक्षेने मी पाहिले व म्हटले, “खरं ना? मला त्या काळ्याकभिन्न अरण्यात पुनश्च जाण्याची आवश्यकता आहे काय? या पर्वतपथावर चढण्यासाठी, पुनश्च त्या अरण्यात जावयास नको ना?”
हिरण्मय पुरुष म्हणाला, “नको, नको. पण त्याचे कारण मात्र अगदी निराळे आहे.
“या दलदलीतल्या माणसाला मदत करावी, की करू नये, असा तुझ्या मनात संशय उत्पन्न झाला तो क्षण महत्त्वाचा, निर्णायक होता. त्या तुझ्या परीक्षेची ती वेळ होती. सुदैवानं तू योग्य तोच निर्णय घेतलास. जर तू त्याला सोडविण्यासाठी शक्तिसर्वस्वानं प्रयत्न केला नसतास, तर मला हरवून बसली असतीस. निदान काही काल मी तुझ्या दृष्टिआड राहिलो असतो. तुला दिशादेखील उमगली नसती. त्याच त्या मार्गावरून तू प्रदक्षिणा घालीत राहिली असतीस; आणि पुनश्च त्या कृष्णारण्यात येऊन तू थडकली असतीस. पण आता मात्र मी तुझ्याबरोबर राहू शकेन.”
आमचे हे संभाषण चालू असताना माझा नवा सोबती मात्र गोंधळल्यासारखा दिसत होता.
नि:शब्द संभाषण आणि तेसुद्धा अदृश्य व्यक्तीबरोबर! शेवटी मोठ्या प्रयत्नाने तो एकाग्र झाला व त्या कृष्णारण्याकडे त्याने तोंड फिरविले.
“मी स्वत:च्या मार्गावर असलेला बरा.” तो म्हणाला, “तुम्ही माझ्यावर जे उपकार केले त्यासाठी मी तुमचा चिरकाल ऋणी राहीन. मला वाचविण्यासाठी तुम्ही आपल्या जीवावर उदार झाला. त्या समोरच्या पर्वतावर पुनश्च आपली भेट होईल अशी मला आशा आहे. पण मी आपणापासून किती तरी मागे पडणार! पुन: तुमची गाठ पडण्याची शक्यता दिसत नाही.”
“गाठ पडणारच नाही, असे काही मला निश्चितपणे वाटत नाही. हा पर्वत काही निराळाच आहे! या पर्वतावर अशक्य असे काहीच नाही. शिवाय मला एका वचनाचे स्मरण होत आहे:
‘पहिल्या रांगेत येऊन बसतात, ते शेवटी राहतात.
शेवटल्या रांगेत असतात, त्यांना प्रथम प्रसाद मिळतो.’
“ते काही असो. एक गोष्ट मात्र निश्चित आहे. शिखरावर पोचलो की, आपण अवश्य भेटू.”
आम्ही हस्तांदोलन केले. मोठ्या निश्चयाने तो पावलापुढे पाऊल टाकू लागला. मी त्याच्याकडे काही वेळ पाहत राहिले. त्याने मात्र एकदाही वळून पाहिले नाही. मी स्वत:शीच म्हटले, ‘झाले हे ठीक झाले. मागे वळून पाहण्यात अनिश्चय दिसतो, त्यात धोका आहे. आपण मागे पाहतो, त्या प्रत्येक क्षणी, तितक्या प्रमाणात आपल्या प्रगतीला अडथळाच होतो आणि अखेरीस आपल्या मार्गावर आपण थिजलेल्या थडग्यासारखे नि:स्तब्ध पडून राहतो. गतकालाचे गुलाम बनतो किंवा भूतकालाची भुते!
“बायबलातली गोष्ट ठाऊक आहे मला. लॉट नावाचा, इब्राहिमचा एक पुतण्या होता. त्याच्या पत्नीने हीच चूक केली. तिने ‘सोडोम’ व ‘गोमोरा’ या दोन शहरांकडे मागे वळून पाहिले, ती दोन्ही शहरे उध्वस्त झाली होती. त्यांच्याकडे पाहणे धोक्याचे होते. तरीही पाहिले तिने. क्षणार्धात ती एक लवण-स्तम्भ बनली. मिठाचा खांब तो, हां हां म्हणता पाण्यात विरघळून गेला.” माझे स्वगत उद्गार!
“वा, वा, सुन्दर! शाबास.” हिरण्य-पुरुष मला म्हणाला. माझे शब्दच नव्हे, तर शब्दांमागचे विचारसुद्धा तो ‘ऐकत’ होता.
“तुझी प्रज्ञा वेगाने विकसित होत आहे. एरवी तुला असल्या गूढ तत्त्वांचे ज्ञान झाले नसते. मागे पाहण्यात आपण गत अनुभूतीबद्दल आसक्ती दर्शवितो. आसक्ती ही केव्हाही वाईट. कारण ते एक बन्धन आहे. पण चल, आता आपण पुढील मार्गावर जाऊ. हा पर्वत चढावयाचा आहे. नन्तर शिखरावर आरोहण करावयाचे आहे.”
“ठीक आहे”, मी म्हटले, “दलदलीवरून तुम्ही स्वत: पुढे झालात की, मीही तुमच्या मागोमाग आलेच.”
“त्याची काय जरूरी आहे?” तो म्हणाला, “मी प्रथम पुढे होण्याची काही आवश्यकता नाही, पाहिलेस का नीट, तेथे दलदलच नाही.”
“अहो, असे कसे होईल? त्या दोस्ताला हनुवटीपर्यंत बुडलेला मी पाहिला. त्याला वर खेचण्यासाठी, मला माझी सर्व शक्ति एकवटावी लागली.” मी मनापासून त्या विधानाचा निषेध केला.
मी नीट पाहते, तो आश्चर्याने मूढ व मुकी झाले. जेथे मला काही क्षणांपूर्वी दलदल दिसत होती, तेथे आता हसर्या फुलांनी विनटलेली वनस्थली दिसली. आणि पायांखालची जमीन तर घन-जड लागत होती.
हिरण्य-पुरुषाची प्रार्थना करून मी विचारले, “हे पहा, कृपा करा. मला खरे काय ते सांगा. मी भयंकर गोंधळात पडले आहे. ती दलदल नव्हती तर होते तरी काय? तो बिचारा कशात तरी बुडत होता हे निश्चित. काही क्षणांनी तो मेलाही असता.”
“खरं सांगू का, ते दाट धुके होते.” हिरण्य-पुरुष म्हणाला, “त्या माणसाच्या पायांखाली, अवतीभोवती चिखल नव्हता, दलदल नव्हती, घनदाट धुके होते. त्याच्या समोर ते भयानक, काळेकभिन्न अरण्य; त्या अरण्याची त्याला इतकी भीती वाटली की, त्याला वस्तुस्थितीचे आकलन झाले नाही. अवास्तव भीतीमुळे नेहमीच असे होते.
“त्याच्या मार्गावरून तो बाजूला सरकला; त्याला ठेच लागली. तो खाली पडला; आणि इतका भयभीत झाला की, त्याचे अर्धांग नव्हे, सर्वांग बधिर झाले. ती नि:शक्त, निर्जीव आणि निर्बुद्ध करणारी भीती आणि त्याची कल्पकता या दोन शक्तींनी तेथे एक दलदल निर्माण केली. त्याला हलतादेखील येईना. चालणे तर दूरच राहिले.
“मनातले हे चित्र इतके वास्तविक, खरेखुरे वाटू लागले - त्याची कल्पकता एवढी प्रबल होती की त्यालाच काय, तुलादेखील त्याच्या भीतीने पछाडले होते. तुलाही ते सर्व चित्र खरेखुरे वाटू लागले.
“पण सुदैवाने, ईश्वरकृपेने, प्रेमाच्या प्रभावी शक्तीचे तुला स्मरण झाले. विशुद्ध, सोज्वळ, निरुपचार प्रेमापुढे कसलीही भीती टिकू शकत नाही; म्हणून तू त्याला मदत करू शकलीस. तो मेला असता हे खरे, पण तो चिखलाच्या दलदलीत पडल्यामुळे नव्हे. चिखलाची दलदल काल्पनिक होती. तो मेला असता, तो त्याच्या भीतीमुळें.
“भीती ही विनाशक शक्ति आहे. प्रीती ही विधायक शक्ति आहे. आपण ज्याला मोह म्हणतो, त्या विकाराचे हे एक सर्वोत्कृष्ट उदाहरण आहे. जेव्हा तुम्ही भीतीच्या किंवा स्वार्थाच्या धुक्यातून जगाकडे पाहता, त्या वेळेस तुम्हाला वास्तवतेचे जग दिसत नाही; खर्या प्रतीती येत नाहीत; यथार्थ जाणीवा होत नाहीत. पण ज्या अवस्थेत मनुष्य असतो, त्या अवस्थेतले त्याचे जग, त्याचा अनुभव, त्याच्यापुरता खराच असतो.”
“ठीक”, मी मान हलवीत बोलले, “जर मला हा अनुभव प्रत्यक्ष आला नसता, तर मी तुमच्यावरदेखील विश्वास ठेवला नसता. पण आता विश्वासाचा प्रश्न कोठे आहे? त्या घाणेरड्या दलदलीच्या ठिकाणी, आता मला एक सर्वसुन्दर वनस्थली दिसत आहे.
भीती हा स्पर्शजन्य रोग आहे, पण हे मला आज समजले. हा खरोखरच एक महारोग आहे, नव्हे का?” मी विचारले.
“होय”, त्याने उत्तर दिले, “भीती ही महान् विकृती आहे. माणसे मागासलेली राहतात, तृतीय श्रेणीत आयुष्य कंठतात, याचे कारण ही भीती. या प्रगतीच्या पर्वताची उन्नत चढण त्यांना आकृष्ट करीत नाही; कारण भीती. पण ज्या व्यक्तीला सर्व तर्हेची भीती निराधार आहे, हे एकदा समजले, त्या व्यक्तीला कोणत्याही तर्हेचा संभ्रम बांधू शकत नाही; त्याच्या सहवासाने, हा संसर्गजन्य रोग झालेले दुसरे जीवही, मुक्त होतात.”
माझ्या हृदयात लख्ख प्रकाश पडला. प्रकाशाचा जणू एक झोतच माझ्या अंगप्रत्यंगाच्या अणुरेणूंत प्रविष्ट झाला होता. खिडकी उघडावी, पडदा बाजूला करावा, आणि प्रकाशच प्रकाश आत लोटावा, अगदी तसे माझ्या मनाचे झाले.
पुनश्च मी एक दिव्य दूरध्वनि ऐकला:
“अहं ब्रह्मास्मि।” हे एक लहानसे महावाक्य मी ऐकले. किती गूढ अर्थ त्यामध्ये सामावले आहेत! त्या अर्थांची प्रतीती घेत, माझे मन किती तरी वेळ निरुपम शान्ती अनुभवीत होते.
येवढ्यात माझ्या लक्षात आले, माझे पाय आता फुलांच्या, तृणाच्या मऊमऊ गालिच्यावरून जात नव्हते. माझ्या पायांखाली टणक, खडबडीत, कठिण असा एक मार्ग होता. आणि आमचे त्रिकूट पुनश्च एके ठिकाणी आले. वळणावळणाच्या त्या मार्गावरून आम्ही चालू लागलो.
माझी स्वामिनिष्ठ छाया - माझे कर्मश्वान - माझ्या पायांजवळ लडिवाळपणे वावरत होते. चार पावले पुढे, माझा हिरण्य-पुरुष, बालसूर्यासारखा प्रकाश टाकीत, मार्ग दाखवीत चालला होता.
“अर्थातच”, मी स्वत:शी गुणगुणले, “मीदेखील एक ज्योति आहे.” आम्ही पुढे चालत असता मला मुरलीचे मधुर सूर ऐकू येऊ लागले.
“काय हे आश्चर्य!” माझ्या मनात विचार आला, “हा मुरलीरव, हे संगीत म्हणजे माझ्या जीवात्म्याचे संगीत आहे. माझे स्वत:चेच संगीत ते. चित्तवेधक असणारच! हे संगीत जर मला अ-खंड ऐकता आले तर!”
“तू अखंड ऐकशील.” हिरण्य-पुरुष म्हणाला. मागे वळत, त्याने माझ्याकडे पाहून स्मित केले, “तू ते आत्मगीत सतत ऐकशील, आणि केवळ तूच नव्हे, तर हे सर्व जीव स्वत:चे संगीत ऐकतील. तुझ्याच पावलावर त्यांची पावले पडणार, तुझ्याप्रमाणे, त्यांचे स्वत:चे आत्मगीत ते ऐकणार, व तुम्ही सर्व धन्य होणार, मुक्त होणार.”
“आत्मतत्त्वाचा जणू काय मी मुरलीधरच!” हा विचार मनात येऊन मला एक विलक्षण आनन्द झाला.
“अगदी बरोबर”, तो म्हणाला, “आणि म्हणून मोक्ष तू व मोक्षमार्गही तूच.”
---------------------------------------------
ध्यान-बीज (२)
एतत् ज्ञेयं नित्यम् एव आत्मसंस्थं।
नात: परं वेदितव्यं हि किंचित्।।
भोक्ता भोग्यं प्रेरितारं च मत्वा।
सर्व प्रोक्तं त्रिविधं ब्रह्ममेतत्।।
- श्वेताश्वतर उपनिषद् १.१२
भावार्थ:
स्वत:च्या अंतरंगात नित्य असणारे जे आत्मतत्त्व, त्याचे ज्ञान करून घेणे आवश्यक आहे. त्या ज्ञानापेक्षा श्रेष्ठतर असे दुसरे ज्ञान नाही.
ब्रह्म हे त्रि-विध आहे असे ज्ञाते सांगतात.
उपभोग घेणारा जीवात्मा, त्याचे उपभोग्य असणारे हे बाह्य वस्तुविश्व व त्या दोहोंना प्रेरणा देणारे चैतन्य ही ब्रह्माची त्रि-विधता होय.
- प्रतिसाद देण्यासाठी सहभागी व्हा अथवा सदस्य बना
पुस्तकाचे चॅप्टर्स
संपूर्ण पुस्तक वाचण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा.