You are hereपहिले पाऊल / पहिले पाऊल

पहिले पाऊल


पहिले पाऊल:
------------------
उत्तिष्ठत जाग्रत,
प्राप्य वरान् निबोधत।
क्षुरस्य धारा, निशिता, दुरत्यया
दुर्गं पथस्तत् कवयो वदन्ति ।।
कठ उपनिषद्, अध्याय १, वल्ली ३, मन्त्र १४.
------------------
उठा, जागे व्हा!
श्रेष्ठ, आत्मज्ञानी सत्पुरुषांच्या सान्निध्यात जा।
आत्मबोध मिळवा!
वस्तर्‍याच्या तीक्ष्ण धारेवरून चालणे दु:खद असते.
आत्मज्ञानाच्या मार्गावरील चाल ही तशीच दु:खद, खडतर आहे.
सर्व मेधावन्त पुरुष हेच सांगतात.
कठ उपनिषद् , अध्याय १, वल्ली ३, मन्त्र १४.
------------------
“आमच्या जीवनयात्रेच्या मध्यकाली एका काळ्याकभिन्न अरण्यात मी माझा रस्ता चुकलो आणि माझ्या स्वत:जवळ आलो.
मी त्या अरण्यात कसा शिरलो, हे निश्चितपणे सांगणे कठीण आहे. माझा खरा मार्ग सुटला, तेव्हाचा क्षण माझ्या लक्षात नाही. मी गाढ झोपेत होतो.”
- इटालिअन महाकवी डाण्टे
----------------------------
सूर्य प्रकाशत होता. आकाशाचा अथांग नीलिमा ‘देवी अनंत-ते’चा साक्षात्कार घडवीत होता. इतक्यात, दक्षिण क्षितिजावर तरंगत असलेला लहानसा शुभ्र मेघ आनंदाने हसत असताना दिसला. ते हास्य पाहून माझ्या आनंदालाही एक रुपेरी किनार मिळाली.
मित्रमैत्रिणींसमवेत अगदी आनंदात, मोठ्यामोठ्यानं खिदळत, मी धावत चालले होते. माझ्या नसानसांत उल्हासाची कारंजी नाचत होती; आणि मनही त्याच जीवनानंदाने बहरून, ओसंडून गेले होते. जीवनातल्या प्रत्येक क्षणाचा पुरेपूर उपभोग घ्यावा; प्राप्त सुखाची फळे मोठ्या चवीने चाखावीत अशी मला ओढ लागली होती. माझ्या जीवनात यशस्वितेचे, सुखासीनतेचे समाधान मला लाभले होते.
त्या बेहोषीत गाणे गात, धुंद होऊन मी टेकडीवरून उतरत होते. माझ्या समोर दृष्टीच्या सीमेपार पसरलेल्या समुद्राच्या उंच उंच लाटा, हेलकावत होत्या; सूर्याच्या प्रकाशात चमकत होत्या. तिकडे मला जायचे होते.
... पण हे काय ! मी दचकून एकदम जागी झाले. एका प्रचंड वृक्षाच्या मुळाला अडखळून मी धाडकन् जमिनीवर आपटले. त्या वेदनेने विव्हळतच मी डोळे उघडले. माझ्या मित्रांचे हसरे चेहरे, सूर्यप्रकाशात न्हालेली ती टेकडी, ... कशाचाच तेथे मागमूससुद्धा नव्हता. मी पुन्हा डोकं चोळलं.
एका घनदाट, काळ्याकभिन्न अरण्याच्या अगदी अन्तर्भागात मी येऊन पडले होते. भयाने आणि थंडीने थरथर कापत होते. निराधार, अगदी एकटी, मी त्या अरण्यात अडकले होते.
तशीच धडपडत मी उठले; रस्ता शोधण्यासाठी खुळ्यासारखी पायाखालच्या, एकमेकांत गुरफटलेल्या दाट झुडपांच्या जाळ्यांतून, पळण्याचा प्रयत्न करू लागले.
पण जसजशी मी जास्त धडपडू लागले, तसतशी तेथल्या काटेरी झुडपांनी, मोठमोठ्या वृक्षांच्या बुंध्यांनी माझी कातडी ओरबाडून काढली; शरीर रक्तबंबाळ केले.
‘मी या अरण्यात आले तरी कशी ? पण ज्या अर्थी मी इथे प्रवेश केला, त्या अर्थी आत येण्याची एक तरी वाट असलीच पाहिजे; आणि त्याच वाटेने मला बाहेरही पडता येईल.’ या विचाराने पुन्हा मी झुडपांच्या गुंतागुंतीतून चालण्याचा प्रयत्न करू लागले.
पण थोड्याच वेळात मी अगदी थकून गेले; क्षणभर खाली बसले. माझ्या डोक्यातली विचारचक्रे फिरू लागली. पण जसजशी मी विचार करू लागले तसतसा माझ्या मनातला गोंधळ वाढू लागला.
मी इथे कशी आले, जिथून मी धावत होते ती टेकडी, तिच्यावरचा तो रस्ता, कुठे अदृश्य झाला; कशाचाच मला उमज पडेनासा झाला. उलट या गोंधळामुळे मला अधिकच शीण आला. काही सुचेना.
अखेरीस मी विचार थांबविला; मन एकाग्र करून, हात जोडले; आणि देवाची प्रार्थना करण्याचा प्रयत्न करू लागले. त्या क्षणी माझ्या मनात प्रश्न उभा राहिला, ‘संकट समोर उभे राहिले की, आपण प्रार्थना करू लागतो; आणि एरवी आपल्याला प्रार्थनेची का बरे आठवण होत नाही? हं. सुखाचा पाठलाग करीत असताना, आपल्याला वेळ कुठे असतो प्रार्थना करायला?’
प्रार्थना करू लागल्यावर माझ्या हृदयाची धडधड शान्त झाली. श्वासोच्छ्वासाचा वेग पूर्वस्थितीला आला; आणि मी मोकळेपणाने श्वास घेऊ लागले. माझी भीति थोडीशी कमी झाली.
माझ्या केसांवरून, मायेचा उबदार करस्पर्श होऊन गेला; आणि तोच स्पर्श माझ्या थिजलेल्या गात्रांवरून हळुवारपणे ओघळत राहिला.
मी एकदम वर पाहिले. मी जिथे बसले होते तिथेच, वरच्या झाडीतून एक सूर्याचा सुवर्ण-किरण तिरक्या गतीने येऊन पडला होता.
“परमेश्वराची कृपाच म्हणायची ही” मी म्हणाले, “सूर्याचे किरण इथे प्रवेश करू शकतात तर! सूर्य उगवला असला पाहिजे आणि बहुतेक तो बराच वरही आला असेल; त्याशिवाय या अन्धकारमय दरीच्या बाजूची उंच टेकडी ओलांडून त्याचे किरण येथवर पोचले नसते.”
‘या रवि-कराच्या साहाय्याने मी या जंगलाच्या बाहेर पडू शकेन. अंधार्‍या रात्री समुद्रातली जहाजे जशी दीपस्तंभाच्या प्रकाशात मार्ग काढतात, तशी मी आता या आंधळ्या अरण्यातून या चिमुकल्या प्रकाशलेखेपाठोपाठ, तिचा हात धरून वाट काढीन.’
या विचाराने मी झट्कन उठले आणि त्या किरणाचा मागोवा घेऊ लागले. माझ्या पावलाच्या पुढेच पडलेल्या त्या एकाकी किरणावर दृष्टी ठेवून मी चालू लागले आणि काय आश्चर्य ! पुढे पडणार्‍या माझ्या प्रत्येक पावलाबरोबर समोरची झाडे दुभागत होती; पायांखालची झुडपं वाकत होती; इतकेच नव्हे तर बाजूला सरत होती.
‘अशाच काही कृपाप्रसादामुळे, ईश्वरी चमत्कारामुळे इस्त्रायलची प्रजा तांबड्या समुद्रातून न भिजता पार गेली असावी.’
चालता चालता मी गुणगुणूही लागले. माझी मनोवृत्ती चण्डोलासारखी आकाशात तरंगू लागली. मला धाव घ्यावीशी वाटली; पण पुढचा मार्ग अजून माझ्या दृष्टीच्या कक्षेत, पूर्णपणे आलेला नव्हता. मी पावलापुढे पाऊल टाकीत होते. मला चीनच्या यात्रिकांचीही या वेळी आठवण झाली.
प्रसिद्ध चिनी तत्वज्ञ ला-ओट्ज्झे म्हणत असे, ‘सहस्त्र योजनांचा प्रवासदेखील पहिल्या एकाच पावलानं सुरू होतो.’
या सूर्यकिरणाला अनुसरीत असताना, ते अरण्य हळूहळू विरल होत चालले, हे माझ्या लक्षात आले. पसरत चाललेले ऊन जास्तच प्रखर वाटत होते. जमिनीवर झुडपांच्या दाट गुंफणीची जागा आता तृणांकुरांनी, छोट्याछोट्या रानफुलांनी घेतली होती.
सहसैव, अचानक मला पक्ष्यांची किलबिल ऐकू आली. ते सूर कानी पडताच माझ्या नेत्रांतून आनंदाश्रु ओघळू लागले.
आता मला एकलेपणा जाणवत नव्हता. माझ्या हृदयात उमलणार्‍या संगीताचे स्वर माझ्या ओठांवर येऊन एका गूढ कृतज्ञतेची भावना व्यक्तवू लागले.
सेन्ट फ्रॅन्सिसने अशाच एका प्रसंगी सूर्यसंहिता म्हटली होती. त्या गीताची मला आठवण झाली. “पक्षी हे माझे बान्धव आहेत; कलिका माझ्या भगिनी आहेत; वायू आणि पर्जन्य हे तर माझे सहोदर; आणि सूर्यनारायण हा माझा श्रेष्ठ भ्राता आहे.”
डान्टेच्या सुप्रसिद्ध उक्तीची मला आठवण झाली, ‘मानवमात्राला सरळ मार्गानं नेणारा अन्तराळातला ग्रहगोल म्हणजे सूर्य होय. आणि हा सूर्य ज्याचे प्रतीक आहे, तो महासूर्य म्हणजे प्रत्यक्ष भगवान् नारायण होत.’
माझी पावले पुढे चालली होती. अजून मला उमज पडला नव्हता की या गूढ-गहन, घोर अरण्यात मी का व कशी आले होते! सूर्याचा किरण मला कोठे खेचून नेत होता याचाही मला अजून पत्ता नव्हता. पण माझ्या अंत:करणात मात्र एक अढळ निष्ठा होती. ‘मी योग्य मार्गावर आहे. त्या तिथे, सूर्याच्या निरभ्र प्रकाशात कोठेतरी माझे इष्ट स्थल आहे, हे निश्चित.’
आतापर्यन्त मी सरळ, सपाट भूमीवरून चालले होते. कोठेही चढ किंवा उतार नव्हता; पण आता माझ्या ध्यानात आले, की मी एका विशिष्ट पाउल-वाटेवरून चालत आहे; ही वाट हळूहळू चढत गेली आहे; आणि माझ्या उजव्या हाताला ती वळण घेणार आहे.
‘केवढं आश्चर्य!’ मी विचार केला, ‘हा तर मळलेला रस्ता दिसतो. माझ्या पूर्वी अनेक वाटसरू येथून गेलेले असावेत. एकाद्या परित्यक्त विश्वातली मी एकली एक यात्रिक नाही. माझ्यापुढे अनेक व्यक्ती या मार्गाने गेल्या आहेत; आणि आता त्याच मार्गाने जावयास मला कोणती हरकत आहे?’
पण नन्तर, अगदी दुसऱ्याच पावलाला त्या वाटेवर माझे शरीर बधिर झाले; थिजून गेले.
तेथे माझ्यासमोर, रस्त्यात आडवा पडलेला एक हिंस्र, हिडिस पशू नजरेत आला. इतका भयानक प्राणी मी माझ्या दु:स्वप्नात देखील पाहिला नव्हता. त्याच्या अंगावरचे धूसर केश अत्यंत गलिच्छ होते. आपली शेपटी तो धाडधाड आपटीत होता. मधूनमधून तो गर्जना करी. त्याच्या विक्राळ जबड्यातून लाळेचे पाट वाहात होते.
क्षणाचाही विचार न करता मी एकदम तोंड फिरविले. पण मागे पाहिले तो ते कृष्णारण्य व काटेरी झुडुपे माझ्या पोटरीपर्यंत येऊन धडकली होती. आता तेथे सूर्यकिरण दिसत नव्हता.
मी मागे वळणार कशी; आणि जाणार कुठे? मी पुढे सरकू शकत नव्हते, मागे जाऊ शकत नव्हते; आणि उभी होते, तिथे स्थिर राहाणेही अशक्य होते, कारण त्या अक्राळविक्राळ राक्षसाचा पंजा व तोंडाचे भगदाड माझ्या बाजूला, पुढे पुढे सरकत होते.
“आता हाच शेवट.” मी हताश, अगतिक होऊन उद्गारले, “या प्रसंगातून सुटकेची आशा नाही”
पण अशा स्थितीतही, अनपेक्षितपणे इटालिअन कवि डान्टेचे अनुभव एकाएकी माझ्या स्मृतीत चमकले. डान्टेलादेखील, एक भीषण पशू त्याच्या मार्गावर पडलेला दिसला होता. अगदी असाच. त्याचा मार्ग जेव्हा उजव्या हाताला वळून, नन्तर चढण सुरू होणार होती, अगदी तेथेच त्यालाही एक असा भयानक पशू दिसला होता. या मार्गावर आणि या स्थितीत असलेल्या प्रत्येक व्यक्तीला हे दृश्य दिसणे क्रमप्राप्तच असेल काय?
आता मला पुढील मार्ग थोडासा दिसू लागला होता. तोदेखील, नेहमीचा, पायाखालचा मार्ग असावा.
या भीषण राक्षसाला चुकविण्याची एखादी युक्ति असेल काय? का मी त्याला ठार करू? पण कशी मारणार? माझ्याजवळ शस्त्र नव्हते; एखादी काटकी देखील नव्हती. भीतीने झालेल्या थरकापामुळे मी जागच्या जागी खिळून, थिजून, गेले होते. मला वाटले मी मूर्च्छित होणार.
पण इतक्यात, माझा तोल सुटत असतानाच, एका तेजस्वी महापुरुषाची मुद्रा माझ्या दृष्टीत भरली. त्या राक्षसी पशूच्या शेजारीच अगदी निकट ती महनीय व्यक्ति उभी होती. पण त्या राक्षसी पशूच्या अस्तित्वाची त्याला लवभरही जाणीव नव्हती.
तो महापुरुष एक तरूण युवक असावा असे मला प्रथम वाटले. पण मी अधिक न्याहाळून पाहिल्यावर माझी कल्पना बदलू लागली.
त्याच्या व्यक्तित्वात यौवन व वार्धक्य यांचा मनोज्ञ संगम झाला होता. पवित्रतेचे, उदात्ततेचे, निर्मलतेचे ते एक चैतन्यचित्र होते!
सुवर्ण-प्रकाशाच्या एका वस्त्रात त्याचे अंग झाकले होते. पण तो प्रकाश त्याच्या देहातूनच बाहेर सांडत होता. बाहेरचे, दुसरे एकादे, प्रकाशमय वस्त्र त्याने परिधान केले असावे असे जरादेखील वाटत नव्हते.
या हिरण्य-पुरुषाच्या दर्शनाने मी एवढी विस्मित झाले की, माझ्या मनातील भीती मी पूर्ण विसरूनच गेले. भ्यावयाचेदेखील कसे विसरले जाते, याचा हा विलक्षण, व मला तर प्रथमच अनुभव आला.
“तू कोण? इथे कसा आलास? आणि या भीषण पशूची तुला भीती कशी वाटत नाही ?” मी म्हटले.
“मी तुझंच अन्त:स्वरूप आहे. तुझा खराखुरा ‘स्व’ आहे. माझं स्वरूप म्हणजे तुझ्यात असलेल्या तुझ्याच ‘मी’ चे मूलस्वरूप.
“त्या क्षुद्र, य:कश्चित् पशूची मला भीति वाटत नाही, कारण तोदेखील तुझाच भाग आहे.”
हिरण्य-पुरुषाचे हे भाषण ऐकून मला आश्चर्य वाटले असे म्हणणे, म्हणजे वस्तुस्थितीचे यथार्थ वर्णन करणे नव्हे. खरोखर माझ्या त्या वेळच्या अन्त:स्थितीचा निदर्शक असा शब्द कोणत्याही भाषेत आढळणार नाही.
“छे, छे, छे, हे अगदी अशक्य! हा भयंकर राक्षस, आणि तो माझा अंश? आणि तू, तुझा हा दिव्य देह, हा तरी माझा अंश कसा असणार? माझ्या ठिकाणी तुझे सौंदर्य, तुझी शुचिता, केव्हाही नव्हती. मी एक सर्वसामान्य व्यक्ति आहे. माझी वाट मी चुकले आहे. या क्षणापर्यंत सूर्यप्रकाशाचा एक किरण मला मार्ग दाखवीत होता. पण या भयाण ठिकाणी आल्यावर, मृत्यू, सर्व-विनाश एवढा एकच पर्याय शिल्लक आहे. मला मरावं असं वाटत नाही. तेवढी माझी तयारीही नाही, मला या मार्गावर अजून पुढं जावं, प्रगत व्हावं असं सारखं वाटत आहे.
“या उजव्या हाताच्या वळणानन्तर पुढं काय असेल? या पर्वताच्या शिखरावर मी आरूढ होऊ शकेन काय? मुख्यत: हीच जिज्ञासा, मला अधिक जगण्याची इच्छा व शक्ति देत आहे.
त्या पर्वताचं शिखर मला येथून दिसतसुद्धा नाही; पण तिथं पोचण्याची इच्छा मात्र प्रबल आहे. तिथं त्या शिखरावरून सभोवतालचा नजारा व क्षितीजे फारच सुंदर दिसत असतील. आणि सूर्यप्रकाश तरी तिथं किती लख्ख पडला असेल! ऊन किती प्रखर असेल!
“पण या समोरच्या भयाण रेड्याला, मी मारू कशी? माझ्याजवळ शस्त्र नाही. आता मलाच तो मारणार हे स्पष्ट आहे. आता मी करू तरी काय?”
तो हिरण्य-पुरुष सस्मित म्हणाला, “हे पहा, तू क्षणभर अगदी स्वस्थ रहा. शान्तपणे ऐक, मी तुला गत-गोष्टींची स्मृति देणार आहे. नन्तर तुझ्या ध्यानात येईल व या सर्व संभ्रमाची उकल होईल.
“त्या शिलेवर क्षणभर बैस कशी. हं, जरा कलंडलीस तरी चालेल. अगदी मोकळेपणाने बैस, मी तुझ्या शेजारीच बसतो. आपण जोपर्यन्त सम्भाषण करीत आहोत, तोपर्यन्त तू सु-रक्षित आहेस. त्या क्षुद्र पशूची तुला अणुमात्र त्रास देण्याची प्राज्ञा नाही. खरे पहाशील तर तुला त्रास देण्याचा त्याचा जरादेखील हेतू नव्हता. त्याच्या त्या भयानक हालचाली केवळ तुझं लक्ष वेधण्यासाठी होत्या. तुला छळण्याचं, प्रत्यक्ष मारण्याचं त्याच्या मनात केव्हाच नव्हतं.”
त्या हिरण्य-पुरुषाच्या वरील विधानांतला एक शब्ददेखील मला खरा वाटत नव्हता. तथापि, मी खाली बसले, बसले म्हणण्यापेक्षा त्या शिलेच्या एका काठावर जराशी टेकले. कारण केव्हा उडी घ्यावी लागेल कोणास ठाऊक! काही वेळाने मला धीर आला. नंतर, मी नीट बसले आणि कलंडलेदेखील. नि:स्तब्ध राहण्याचा मी प्रयत्न केला.
नंतर हिरण्य-पुरुष म्हणाला, “आपण तिघेही या क्षणी इथं आहोत, याचं कारण तू आम्हाला बोलावलंस. आता याच गोष्टीचं तुला विस्मरण झालं आहे. याच स्थानावर भेटण्याचं आपण कित्येक वर्षांपूर्वी ठरविलं होतं, ते तुला आठवतं का? वस्तुत: आपण तिघेही या मार्गावर बरोबरच प्रवास करीत आहोत, पण तू आम्हाला आजपर्यंत पाहूच शकली नाहीस. केवळ बाह्य आभासावरच तुझी दृष्टि खिळलेली होती. तुला एक प्रकारचं अंधत्वच आलं होतं.”
माझ्या अन्त:श्रुतीला दूरवरून एक आवाज ऐकू आल, “डोळे आहेत, पण ते पाहू शकत नाहीत.”
“नेत्र असती परि दिसत त्यास नाही.”
“आता,” माझा सोन-सखा पुढे म्हणाला, “तुझी दृष्टि अन्तर्मुख झाली आहे खरी; तरी, अजूनही तुझे डोळे केंदस्थ झाले नाहीत. तुला अविभक्त गोष्टी विभक्त दिसतात. तुला मी, तू व क्षुद्र पशू अशा तीन व्यक्ती दिसतात, याचं कारण तुझ्या दृष्टीमध्ये अद्याप एक व्यंग आहे; या व्यंगामुळे एका वस्तूऐवजी त्याच ठिकाणी अनेक वस्तू दिसतात. मी, तू व तो या तीन प्रतिमा त्यांच्या एकत्वात पाहण्याची शक्ती तुला मिळविली पाहिजे”
“नन्तर जे सुरम्य चित्र तू पाहाशील त्याला चार कक्षा Four Dimensions असतील. सध्याचं तुझं दर्शन त्रि-कक्षात्मक आहे. आपण ज्याला जीवात्मा म्हणतो, त्याच्या ठिकाणी ही, विविधातले एकत्व, द्वैतातले अद्वैत पाहण्याची शक्ति असते.
“मी तुझा अन्तर्यामी आहे; अन्तरात्मा आहे. माझ्या चक्षूंनी जेव्हा तू पाहू लागशील, आणि ज्या वेळी, तू पूर्ण जाणीवेच्या जागृतीचा अनुभव घेऊ शकशील, त्या वेळी तुला वस्तूंचे यथार्थ ज्ञान होईल; आणि सर्वत्र ‘एकमेवाद्वितीय’ असं अद्वैत तुझ्या प्रत्ययास येईल.”
त्या हिरण्य-पुरुषाशेजारी मी बसले; अन् त्याचे शब्द सगळ्या देहाचे कान करून ऐकू लागले. त्याच्या अन्त:करणातून एक विलक्षण उष्णिमा बाहेर स्रवत होती. या उष्णिमेचा स्पर्श माझ्या हृदयाला झाल्याबरोबर मला एक अपूर्व सुखसंवेदना झाली. माझ्या हृदयातून या सुखसंवेदनेच्या लहरी सर्व शरीरभर पसरू लागल्या. येवढ्यांत मी पुन्हा एक आवाज ऐकला. एकाद्या दूर, सुदूर, निघणार्‍या प्रतिध्वनीसारखा मला तो आवाज भासला.
ती आकाशवाणी अशा अर्थाची होती:
“मी देवाची प्रार्थना करीन. देव तुला एक मित्र देईल. तो मित्र तुझ्याजवळ चिरकाल राहील.”
या नादामुळे मी एकदम भानावर आले. मी कोठच्या कोठेच भरकटले होते. काहीशी लाजून मी हिरण्य-पुरुषाकडे पाहिले. तोही माझ्याकडे सस्नेह व प्रश्नपूर्ण नजरेने पाहात होता. मी म्हटले, “मला या सर्व अनुभवांतला जरादेखील अर्थ समजत नाही. तरीही मला वाटतं की, हे सत्य आहे. तुमचं अक्षरन् अक्षर खरं होणार आहे; आणि याच श्रद्धेनं मी पुढं जात आहे.”
“उत्तम!” तो म्हणाला, “तुझ्यापासून दुसरी कोणतीच अपेक्षा नाही. भगवान् बुद्धांनीसुद्धा आपल्या अन्तेवासी शिष्यांना असंच सांगितलं नव्हतं का?
“तुम्हाला जे जे कोणी सांगेल, त्यावर एकदम विश्वास ठेवू नका; अगदी मी स्वत: सांगितलं, तरीदेखील सहसैव विश्वास ठेवू नये. तुमची स्वत:ची खात्री पटली पाहिजे. तुम्हाला स्वत:ला निश्चिती आली पाहिजे. तुम्हाला स्वत:ला निश्चिती आली पाहिजे. ‘अध्यवसाय:’ असा एक न्यायपरिभाषेतला शब्द, या निश्चयपूर्ण अवस्थेचा वाचक आहे. महत्त्वाची गोष्ट एवढीच आहे की, केवळ तुझ्या अज्ञानामुळं, तुला कळत नाही म्हणून, काही घटना, काही अनुभव असंभाव्य आहेत, अशक्य आहेत असं तू म्हणू नयेस. तुझ्या ज्ञानात अधिक भर पडल्यावर या अनुभवांची शक्यता व यथार्थता तुझ्या ध्यानात येईल.”
क्षणभर थांबून तो पुढे बोलू लागला, “तुझ्या प्रवासातला हा क्षण अत्यंत महत्त्वाचा आहे.
“हा तुझा प्रवास अनन्त कालापासून सुरू आहे. गेल्या जन्मीदेखील या प्रवासमार्गावरच तू होतीस. तुझं जीवन मागच्या व पुढच्या अनन्त कालात तरंगणारं आहे. तुला पुन्हा अनन्त जन्म घ्यावयाचे आहेत. या पूर्वीही, भूतकालात तू अनन्त जन्म घेतले आहेस. तुझ्या जीवाला, तुझं आणि माझंही अस्तित्व प्रतीत होऊ लागलं आहे. म्हणूनच मी म्हणतो, की तुझ्या जीवनातल्या महायात्रेतला हा क्षण, हा बिन्दु, अतीव महत्वाचा आहे.
“यापूर्वी तुला माझ्या अस्तित्वाचं भान नव्हतं. मी नेहमी तुझ्या जवळच होतो. तुझाच उत्तमांश व उत्तमांग होतो. पण या सत्याची तुला जाणीव नव्हती.
“माझं अस्तित्व कालातीत आहे. मी भूत, वर्तमान व भविष्य या कालगणनेच्या पलीकडे, चिरंतनतेत सदैव राहात असतो.
“कालपुरुष हा अ-विभाज्य आहे. तो स्वयंपूर्ण व एकजिनसी आहे. अतीत, अनागत व वर्तमान हे विभाग आपण आपल्या सोयीसाठी, या एकजिनसी काल-तत्वावर, आरोपित करीत असतो. पण या सनातन, कालातीत भूमिकेवरून तुझ्याशी न बोलता मी तुझ्या नेहमीच्या सवयीच्या, कालपरिमाणानंच तुझ्याशी बोलेन. म्हणजे सहज तुला सर्व काही समजेल.
“खरं सांगू का ? या तर्‍हेच्या असल्या अनुभवांतून, तू अन् मी अनेक वेळा, अनन्त वेळा दोघंही बरोबरच गेलो आहोत. जीवनाच्याच नव्हे, तर मृत्यूच्याही अनुभवात व अवस्थेत तुला माझी साथ होती. कोट्यवधी जीवने व मृत्यू आपण एकमेकांच्या साहचर्यात, बरोबरीनं अनुभवले आहेत.
“ज्याला जीवन आणि मृत्यू तू म्हणतेस, ही एकाच सत्याची किंवा ईश्वरी सत्तेची दोन वेगवेगळी रूपं आहेत; दोन अवस्था आहेत. जागृति आणि सुषुप्ति या जशा तुझ्या दोन अवस्था आहेत, अगदी तशाच, जीवन व मृत्यू या दोन अवस्था आहेत.
“एखादी भूमिका हुबेहूब वठविणारा नट, योग्य वेळी रंगभूमीवर जातो, स्वत:ची भूमिका रंगवून दाखवितो; आणि परत पडद्याआड होतो; नाटकातील आपले कपडे उतरवून ठेवतो. ही आपल्याला अगदी सहज-सामान्य गोष्ट वाटते. मग केवळ या दृश्य अवस्थेतून, जगाच्या रंगभूमीवरून, मानव अंतर्हित होतो, अंतर्धान पावतो; या रंगभूमीपुरतं धारण करावयाचं नेपथ्य दूर करतो, काढून टाकतो, या क्रियेला विनाश असं कसं म्हणतां येईल? त्याचं अस्तित्वच नाहीसं झालं असं कसं म्हणता येईल?
“आपली भूमिका पार पाडल्यावर नट विश्रांतीसाठी, झोप घेण्यासाठी जातो. आपल्या भूमिकेच्या परिणामकारकतेचा विचार करतो. पुन्हा तेच काम, तेच व्यक्तित्व सरस, अधिक परिणामकारक कसं होईल? अंगोपांगानी आपलं काम परिपूर्ण कसं होईल, याचं तो मनन करतो. किंवा, आपल्या नेहमीच्या भूमिकेपेक्षा अगदी वेगळी, भिन्न व्यक्तित्व प्रकट करणारी दुसरीच एकादी भूमिका आपण घ्यावी की काय, याचा तो विचार करतो.
“अगदी याच पद्धतीनं तू अनेक जन्म, अनेक भूमिका, या जगताच्या रंगभूमीवर पार पाडल्या आहेस. जन्मानुजन्मांच्या या मालिकेतून जात असतांना, प्रत्येक वेळेचा आयुष्यक्रम, प्रत्येक वेळेची भूमिका, मागच्यापेक्षा अधिक गुंतागुंतीची, विविध भावांनी, प्रसंगांनी, नवीन विचारप्रवाहांनी नटलेली होती; आणि म्हणूनच ती अधिकाधिक अर्थपूर्ण, चटकदार व वैचित्र्यपूर्ण होत गेली.
“पूर्वजन्मींच्या विविध अनुभवांतून मिळालेल्या ज्ञानाचा पुरेपूर उपयोग तुला नवीन भूमिका सजविताना करावा लागला आणि तुला गोंधळात टाकणार्‍या, पूर्वी कधीही न भेटलेल्या, विचित्र वाटणार्‍या परिस्थितीशी जुळवून घेताना, तुला नवनवीन युक्त्या शोधून काढाव्या लागल्या. तुझ्या प्रतिभाशक्तीला, योजकतेला भरपूर ताण द्यावा लागला.
“या बदलत्या परिस्थितीतून, विविध अनुभवांतून, सुखदु:खातून, तू आणि मी, अगदी बरोबरच चाललो होतो. माझ्या अस्तित्वाशिवाय तू यापैकी कोणताच अनुभव घेऊ शकली नसतीस, एखादी क्षुल्लक भूमिकासुद्धा तुला करता आली नसती.”
माझ्या मनात जणू वीज चमकून गेली, आणि माझ्या डोळ्यांपुढे वेदांतली एक पंक्ति नाचू लागली; पण, तिचा अर्थ?
‘माझ्याशिवाय तू काहीही करू शकत नाहीस, श्वाससुद्धा घेऊ शकत नाही!’
‘छे!छे!’ मी विचार केला, ‘हा त्याचा अर्थ नसावा. मग जे वाक्य मी आताच पाहिले, त्याचा अर्थ तरी काय?’
पण हिरण्य-पुरुष माझ्या मनातले विचार ओळखू शकला व हसत हसत म्हणाला, “होय, होय. अगदी तू पाहिलेले वाक्य म्हणजे माझ्या शेवटच्या विधानाचा स्पष्ट अर्थ होय. पण ती गूढ रहस्ये, तू जसजशी पुढं जाशील तसतशी तुला पूर्णपणे उकलू लागतील. “या सर्व अनुभवांमधून तुला माझी साथ होती. खरोखर मीच तुझा खरा आत्मा आहे. म्हणजे मीच तुझा खरा ‘मी’ आहे.
“मीच तुझ्या सर्व भूमिका निवडल्या होत्या; आणि माझ्यामुळंच तुला योग्य प्रमाणात व योग्य जातीची क्रिया-शक्ति उपलब्ध झाली आहे. या क्रिया-शक्तीशिवाय तुझ्याकडून त्या भूमिका वठल्या नसत्या.
“मी अत्यंत दक्षतेनं तुझ्या कर्मकौशल्याचं निरीक्षण केलं आहे. विशेषत:, तुझं आचरण वृत्तिसाकल्यानं म्हणजे अगदी अंत:करणपूर्वक करण्याचा तुझा प्रयत्न असतो, हे माझ्या लक्षात आलं आहे. काही भूमिका तू खरोखरच उत्कृष्ट वठविल्यास.
“पण काही कामात तू कुचराई केलीस; विशेष नेट धरला नाहीस. काही गोष्टी तू उडवून लावल्यास, मुद्दाम डोळ्याआड केल्यास, टाळल्यास. समोर कुंपण आले की, घोडा जसा अडतो, मागं फिरतो, तशी तू प्रयत्नांपासून परावृत्त होण्याचा, ती गोष्ट प्रथम अंगाबाहेर टाकण्याचा प्रयत्न केलास. त्यामुळं ती एकच गोष्ट, ते एकच काम, तुला पुन:पुन: करावं लागलं. त्याचा स्वीकार करावा लागला, इतकंच नव्हे, तर अखेरीस त्यात आपल्या सर्व शक्ति ओताव्या लागल्या. तेच काम तुला अंत:करणपूर्वक करावं लागलं.”
माझ्या जीवनावरचे त्याचे हे भाष्य आश्चर्यचकित होऊन ऐकत असताना पुन: माझ्या कर्णरंध्रात अज्ञातातून झरणारे ते सूर निनादू लागले. जिवाचे कान करून मी ते हृदयात साठवू लागले.
“तुझं कर्तव्यकर्म, तू हसतमुखानं आणि अत्यंत परिश्रमपूर्वक केलं पाहिजेस. त्यात पूर्णता आणण्याचा आटोकाट प्रयत्न करणं आवश्यक आहे. स्वकर्मणा तम् अभ्यर्च्य सिद्धिं विन्दति मानव:।”
हिरण्य-पुरुषाच्या मुखावरून प्रकाशाच्या कवडशासारखे हास्य चमकून गेले. तो क्षणभर थांबला आणि पुन: बोलू लागला,
“या जगताच्या रंगभूमीवर तू एकटीच काही काम करीत नव्हतीस. दीर्घच दीर्घ स्वगत भाषण म्हणजे संपूर्ण नाटक होत नाही. जसजसा तुझा अनुभव सखोल आणि विशाल होऊ लागला तसतसा तुझा अधिकाधिक अभिनेत्यांशी संबंध येऊ लागला. एकंदर नाट्यप्रसंग अधिकाधिक जटिल होऊ लागले. यामुळं नाटकातल्या इतर पात्रांबरोबर कसं वागावं, हे समजणं तुला अगदी आवश्यक झालं.
“तुझ्या ध्यानात येऊन चुकलं की, आपापसात जेवढा सहभाव ठेवावा, तेवढी भूमिका यशस्वी वठेल. तुम्ही सर्व एकमेकांवर अवलंबून होता, तुमचा सहयोग यशस्वी नाट्यर्निर्मितीला अत्यंत आवश्यक, अपरिहार्य होता.
“पण याचा बोध व्हावयास, तुला अनेक जन्म घ्यावे लागले. नंतरच तुझ्या लक्षात आलं की, तुझं व सर्वांचं जीवन हा एक सहयोग आहे.
“पुष्कळ वेळा तू काय करीत असस: रंगभूमीवर गेल्यावर प्रवेशाचं सर्व महत्त्व आपणाकडे घेत असस. जणू काही दुसरी पात्रं सर्वथा अनावश्यकच आहेत. प्रवेशाचा मध्यबिंदु तू स्वत:च आहेस असं तुला वाटे. पण दुसऱ्या एखाद्या अभिनेत्यानं स्वत:कडे असं महत्त्व घेतलं तर मात्र तुझा जीव कासावीस होत असे. त्या व्यक्तीचं महत्त्व, त्या व्यक्तीचा अभिनय फिका पडावा म्हणून तू वाटेल ते अडथळे निर्माण करण्यास कमी केलं नाहीस. कुठून तरी त्याची भूमिका बिघडावी, त्याचं काम नीरस वठावं असा प्रयत्न, अशी धडपड करण्यात तुला जरादेखील दिक्कत वाटली नाही.”
या उल्लेखाने मला स्वत:ची फार लाज वाटली. पण त्याकडे लक्ष न देता त्याने आपले बोलणे पुढे चालू केले,
“काही वेळा तू आपली स्वत:ची भूमिका टाकून दुसऱ्याचीच आपणांवर ओढून घेण्याचा प्रयत्न केलास. कारण ती भूमिका प्रसिद्धीच्या प्रकाशात चमकण्याचा जास्त संभव होता. किंवा ती विनासायास, फारसे परिश्रम न घेता, जमण्यासारखी होती.”
“केव्हा केव्हा तू अन्ध असूयेनं अत्यंत उन्मत्त होत असस. दुसऱ्या व्यक्तीचं नेपथ्य, सौंदर्य, वैभव व सुदैव तुला जरादेखील सहन होत नसे. साक्षात् मृत्यूच्या दरीत निर्दयपणानं त्या व्यक्तीला ढकलून देण्यात तुला जरादेखील दिक्कत वाटली नाही.”
“म्हणजे मी खूनसुद्धा केले होते काय?” माझ्या हातांनी माझे डोके मी घट्ट आवळून धरले; अन् जोराने स्फुंदू लागले, आक्रन्दू लागले.
“अरे,पण तू का मला थांबविलं नाहीस? अशा क्रूर कृत्यापासून तू का मला परावृत्त केलं नाहीस? तुझ्यापासून मला प्राप्त होणार्‍या शक्तीच्या जोरावरच जर मी ही क्रूर, निर्घृण कृत्ये करीत होते, तर तू का प्रतिबन्ध केला नाहीस?”
माझ्या या मानसिक उद्रेकाकडे, खळबळीकडे जरासुद्धा न पाहता, त्याची दखल न घेता माझा हिरण्य-पुरुष इतक्या शान्त स्वरात उत्तरला, की, त्याच्या त्या थंड वृत्तीने मी चकितच झाले; आणि मान वर करून त्याच्या मुद्रेकडे पाहू लागले.
तो बोलू लागला, “होय. हे सर्वथैव खरं आहे. माझ्यापासून प्राप्त झालेल्या शक्तीच्या बळावर तू ही कृत्ये केलीस. अर्थात् तो त्या सामर्थ्याचा दुरुपयोग होता. पण दुष्कृत्यांपासून तुला परावृत्त करायला मी केवळ असमर्थ होतो. ते माझ्या शक्तीबाहेरचं, कक्षेबाहेरचं होतं.
“तुला वाटत होतं की तू स्वतंत्रतेचा उपभोग घेत आहेस. तोंडात लगाम असूनदेखील तू भरधाव धूम ठोकीत होतीस. वस्तुत: ‘सुखाच्या’ शोधात तू येवढी गढून गेली होतीस की माझा शब्द ऐकण्यासदेखील तुला फुरसत नव्हती. तुला माझ्या अस्तित्वाचं भानच नव्हतं; आणि अशा परिस्थितीत या स्वैरतेच्या पकडीत सापडलं म्हणजे अगदी असंच होतं. संयमाचा शब्द, विवेकाची वाणी ऐकू येत नाही. ऐकू आली तरी आचरणावर तिचा परिणाम होत नाही. शिवाय तुला स्वत:ला, स्व-कष्टानं काही सत्यांची जाणीव व्हायला हवी होती. सत्य पेढ्यासारखं अलगद तोंडात टाकता येत नाही; टाकून ते रुचत नाही; व पचतही नाही.“खरी स्वतंत्रता म्हणजे काय; खरा आनन्द, खरी मुक्ति कशी असते, हे ठेचा लागल्याशिवाय, दु:ख भोगल्याशिवाय, वेदना सहन केल्याशिवाय कळणं शक्य नाही. स्वैरता म्हणजे स्वातंत्र्य नव्हे, हे सत्य सहजासहजी अवगत होत नाही. त्याची भरपूर किंमत द्यावी लागते.
“तुझ्या जीवनाचं चित्र पुरं व्हायला अजून एका गोष्टीचा उल्लेख केला पाहिजे. तू आजपर्यंत केलेल्या सर्व प्रमादांची तुला ओळख पटली पाहिजे, जाणीव झाली पाहिजे. म्हणजे हा अक्राळविक्राळ पशू तुझी वाट अडवून का बसला आहे, आरोहणाच्या पहिल्याच पायरीवर त्यानं तुला अडथळा का केला आहे, हे तुला नीट समजेल.”
त्या पशूच्या उल्लेखाबरोबर, मी एकदम दचकून वळून पाहिले. इतका वेळपर्यंत मला त्याचे पूर्ण विस्मरण झाले होते. पण तो तेथेच होता. माझ्या मार्गातच आडवा पडला होता. माझ्याकडे टक लावून शान्तपणे पाहात होता; मी त्याच्या दिशेने एखादे जरी पाऊल टाकले असते तरी त्या पावलासरशी माझ्यावर धावून यायला, झडप घालायला तो सज्जच होता.
माझा सुवर्ण-सहचर मोठ्या गंभीरतेने पुढे बोलू लागला. त्याच्या बोलण्याचा ओघ अनिवार्य होता.
“काही वेळा तू स्त्रीची भूमिका पत्करलीस, स्त्रीची वेषभूषा अंगावर चढवलीस; पण मागून तुला ती आवडली नाही. तुला पुरुषाची भूमिका हवीशी वाटू लागली. तू पुरुष व्हायचा प्रयत्न केलास, आणि पुरुषच आहेस अशा तर्‍हेनं वागू लागलीस. उलट जेव्हा तुला पुरुष भूमिका मिळाली तेव्हा तुला स्त्रीच्या भूमिकेचं आकर्षण वाटूं लागलं.
“त्यामुळं तुझ्या व्यक्तिमत्वाचा तोल गेल्यासारखा झाला. ते दुभंगलं आणि तुझ्या विचारांचा, कृतीचा मेळ बसेनासा झाला; यामुळं तुझ्या जीवनाची घडी विस्कटून गेली; गोंधळ होऊ लागला. पात्रांचा सर्वच संच त्यामुळं विस्कटला.”
ही कल्पना सहन न होऊन मी त्याला थांबवीत म्हटले, “छे, छे! आत्ता तू बोलत असताना क्षणभरदेखील मला हे कबूल करवत नाही. तुला असं म्हणायचं आहे का की, काही जन्मांत मी स्त्री होते, अन् काहींत पुरुष?”
“अर्थात्! त्याशिवाय मानवी जीवनाच्या सार्‍या अवस्थांचं, सगळ्या छटांचं, अंगोपांगांचं ज्ञान कसं झालं असत”? तो उत्तरला. “त्याशिवाय सध्या तू घेतलेली अत्यंत महत्त्वाची भूमिका वठविण्याची पूर्वतयारी कशी झाली असती?”
“कोणती भूमिका?” मी एकदम उद्गारले.
“अनेक गूढ जीवन-रहस्यांपैकी तेही एक रहस्य आहे; किंबहुना, सर्वांत महत्त्वाचं गूढांतलं गूढ आहे ते! तू ती भूमिका करायला प्रारंभ केलास म्हणजेच तुला ते कळेल. तोपर्यंत या बाबतीत तू अन्धारातच राहशील.” त्याचे उत्तर.
त्याच्या बोलण्यात वारंवार येणार्‍या या गूढ, रहस्य या शब्दांमुळे मी अगदी अस्वस्थ झाले. त्याचा स्पष्ट निषेध मी करणार, तितक्यात तो पुढे बोलू लागला,
“काही भूमिका करताना तू अतिरेक केलास; विशेषत: ज्या प्रवेशांत स्त्री-पुरुष-प्रेमाचे प्रसंग होते, ते प्रवेश तू इतके लांबवीत होतीस की यामुळं नाट्यवस्तु, कथावस्तु, कुठच्या कुठंच अन्धारात पडून जाई. दुसरे काही अनुभव घेण्यांत तू अतिशय दीर्घसूत्रीपणा दाखवीत होतीस; उदाहरणार्थ, खाणं, पिणं, सुखोपभोग घेणं, द्रव्य मिळविणं व ते सांभाळणं.
“या सर्वांचा अपरिहार्य तोच परिणाम झाला. तू आजारीच पडलीस, किंवा एकदम निराश झालीस; आणि या ना त्या तर्‍हेनं तुझं काम करण्यास तू सर्वथैव असमर्थ होऊन बसलीस ! जी दुसरी कामं तू करू शकली असतीस, त्याबद्दल तुला तिरस्कारच उत्पन्न होई. व्यवस्थासमितीला, नाट्य-लेखकाला, किंवा जो समोर असेल त्याला नाना तर्‍हांनी दोष देणं, तक्रारी करणं असला अवखळपणा करून तुला न आवडणार्‍या भूमिकांचं सर्व सौंदर्य व अर्थवत्ता तू उध्वस्त करून टाकलीस. तुझ्या एक गोष्ट लक्षात राहात नसे की, या सर्व भूमिका तू स्वत:च निवडल्या होत्यास. त्या उत्कृष्टपणे वठवणं तुझ्या हिताचं होतं, तुझ्या विकासाला आवश्यक होतं. अगदी क्षुल्लक भूमिकादेखील अर्थपूर्ण करणं, सुन्दरतेनं वठविणं यामुळेच व यामध्येच तुझा, व कुणाचाही विकास शक्य होतो.”
मीं नाखुषीने त्याच्या म्हणण्यातला सत्यांश कबूल केला आणि म्हटले, “हे सर्व अनुभव पुसटपणे, अंधुकपणे मला आठवत आहेत. पण मला त्यांचा, या क्षणापर्यंत, असा पूर्ण विसर तरी कसा पडला?”
तो म्हणाला, “तू लगेच विसरतेस! तुझी स्मृति अत्यंत दुबळी आहे. पाच वर्षांपूर्वीच्या किंवा गेल्या वर्षीच्या १२ जानेवारीला तू काय केलेस सांग पाहू ! तू सांगू शकणार नाहीस, याचं कारण काय, माहीत आहे? तू त्या वेळी पूर्णपणे जागृत नव्हतीस. ते अनुभव घेताना तुझी जाणीव अगदीच मंद झाली होती. अनुभव घेताना तू त्यांचा अर्थ व अंत:स्वरूप न ओळखता, तुझा स्वत:चा भूतकाळ, भविष्यकाळ यांबद्दलच विचार करीत राहिलीस. भूतकाळातल्या अतृप्त वासना व विषाद, भविष्य-कालातल्या भीति व आशा यांमध्ये तुझे अंत:करण व्यग्र राहिल्याने तुला त्या क्षणाची थोरवी, महती व अर्थपूर्णता ध्यानात आली नाही. वर्तमान क्षणात अतीव एकाग्रतेने राहणे तुला जमतच नसे आणि त्यामुळे तुझे सर्व अनुभव अर्धवट, अस्पष्ट असत. त्यांची आठवण तुला राहणार कशी? तुझ्या स्वप्नांबद्दलच पहा ना, तुला पडलेली अनेक स्वप्ने अत्यंत अर्थपूर्ण, हेतुपूर्ण, तत्वपूर्ण अशी होती, तुझ्या ती कोठे लक्षात राहिली आहेत? तसे पाहिले तर वस्तुत: आपणांला कसलीच विस्मृति होत नाही. प्रत्येक अनुभव कर्मपटलावर कायमचा कोरला जातो. मात्र पडद्यावरील सूक्ष्म आलेख वाचण्याची शक्ति आणि युक्ति आपल्या ठिकाणी जागृत असावी लागते, जागृत करावी लागते.
“यासाठीच चित्तवृत्तीचा निरोध करावयास शिकले पाहिजे. यालाच भगवान पतंजलि योग म्हणतात. या योगसामर्थ्याने आपला संपूर्ण भूतकाल चित्रपटासारखा अंतश्चक्षूंपुढे उभा राहू शकतो.”
“हे पहा, माझे अनुभव म्हणजे एक प्रमादांची रांगच आहे. प्रमादांशिवाय माझ्या भूतपूर्व जीवनांत तर मला काहीच दिसत नाही. या माझ्या चुकांची, प्रमादांची, अपयशांची पुन: एकदा आठवण व्हावी, असं मला मुळीच वाटत नाही. त्याच पटलावर माझ्या यशाचे, आनंदाचे, विजयाचे असे काही ठसे, काही मुद्रा, असण्याचा संभव नाही का?” हा प्रश्न विचारताना मला माझ्या निराशेची भावना असह्य झाली होती.
“अर्थातच”, तो म्हणाला, “कित्तीतरी चांगले अनुभव, आनंदाचे, यशस्वितेचे क्षण यांचीही नोंद ह्या कर्मपटलावर झालेलीच आहे. त्या पुण्य क्षणांची परिणती, परिपाक म्हणून आपण तिघे, आज येथे भेटलो.
“ते तुझे पुण्यक्षण होते; कारण तेव्हा तू जीवननाट्यातल्या दुसर्‍या पात्रांना साह्य केलं होतंस; सहानुभूतीनं, आत्मीयतेनं त्यांना मदत केली होतीस. त्या पुण्याईमुळंच तू मला आज भेटू शकलीस.
“तसेच तुझे प्रमाद, तुझ्या चुका, तुझं अपयश सर्व तू सहन केलंस, त्यामुळं तुला एक प्रतिकारशक्ति निर्माण झाली आहे. तो राक्षसी पशू तिथं तुला दिसत आहे, याचं कारण त्याला बघण्याचं, त्याचा प्रतिकार करण्याचं सामर्थ्य तुझ्या ठिकाणी सिद्ध झालं आहे. तुझ्या पुण्य-क्षणांमुळं मी तुला दृश्य झालो, दिसू शकलो. तुझ्या पापक्षयामुळे तुला तो पशू दिसू शकला. हीं दोन्ही दर्शनं व्हावयास प्रचंड पूर्वतयारीची, तपश्चर्येची आवश्यकता होती.”
“क्षणभर थांबा”, मी मध्येच म्हटले, “अरे पण दुसरे लोक, दुसरी पात्रं, दुसरे अभिनेते यांचा तू वारंवार उल्लेख करीत आहेस, पण ते आहेत कुठं? या क्षणी ते कुठं असतील? त्या कृष्णारण्यात मी वाट चुकले त्या क्षणापर्यंत ते माझ्या बरोबरच होते. त्यांचं झालं तरी काय?”
“तुझी त्यांची पुन्हा भेट होईल. पण जीवनाच्या महायात्रेतील हा मार्ग एकट्यानंच आक्रमावयाचा असतो. इथं कर्म-पशूची भेट व्हावयाची असते. या दिव्यातून मानवमात्राला एकट्यानंच जायचं असतं. या कर्मराक्षसाला पाहता पाहताच, त्या व्यक्तीला अन्तरात्म्याचं, माझं, दर्शन व्हावयाचं असतं.” हिरण्य-पुरुष बोलला.
एवढ्यात, मी त्या राक्षसाकडे पाहण्याच्या प्रयत्नात असताना, हिरण्य-पुरुष पुढे बोलू लागला,
“या पशूला आपण द्वारपाल असं म्हणतो. ही तुझीच र्निर्मिती आहे. याला तू जन्म दिला आहेस; इतका प्रचंड, हिडिस होईपर्यंत पोसला आहेस. तू केलेल्या सर्व प्रमादांचा तो एक ढीगच आहे. ज्या चुका तू निस्तरल्या नाहीस, त्यांची ही एक रास आहे.
“या मार्गावरून आरोहणाला प्रारंभ करण्यापूर्वी हे ऋण तुला मान्य केलं पाहिजे; डोळसपणे त्याची पूर्ण ओळख करून घेतली पाहिजेस. आता तुझ्या लक्षात आलं असेल की याला टाळणं, याला दूर सारून पुढं जाणं केवळ अशक्य आहे. हा पशू म्हणजे तुझाच, तुझ्या व्यक्तिमत्वाचा अभिन्न, अविभाज्य भाग आहे. तू त्याला यथार्थतेनं जाणलं पाहिजेस; इतकंच नव्हे तर त्याचा खुशीनं स्वीकार केला पाहिजेस.
“खरं सांगायचं म्हणजे, तू त्याला स्वत:बरोबर वागविलंच पाहिजेस, तसं वागवून घेणं अपरिहार्य आहे, अटळ आहे.”
“छे, छे!” भयभीत होऊन मी त्याचा निषेध केला आणि म्हटले, “त्याला माझ्याबरोबर घेणं अगदी अशक्य आहे.”
“मुळीच अशक्य नाही.” तो तितक्याच जोराने उत्तरला; “आणि का म्हणून तू त्याला बरोबर घेऊ नयेस? आजपर्यंत सतत, प्रतिक्षणी तो तुझ्या पाठोपाठ येत होता. फक्त तू त्याला पाहिलं नाहीस, आणि आता तो तुझ्या डोळ्यासमोर दिसतो आहे, म्हणून तू त्याला झिडकारण्याचा प्रयत्न करतेस?
“त्याच्याकडे पाहा, आपण दोघं बोलत असताना त्यानं तुला जरासुद्धा त्रास देण्याचा, तुला दुखापत करण्याचा प्रयत्न केला नाही. तुझ्या मनातली ती भीती आणि घृणा या भावनांचा जोर कमी कर. तुझ्या हृदयातल्या सहानुभूतीचे किरण त्याच्यावर टाकण्याचा प्रयत्न कर; आणि पहा काय परिणाम होतो. मात्र त्याच्याकडे अपांग दृष्टिक्षेप, भेदरट कटाक्ष टाकून भागणार नाही. निर्भयतेनं, सरळ, त्याच्या नजरेला नजर दे; डोळ्याला डोळा भिडवून पाहा.”
हिरण्य-पुरुषाच्या या सूचनेमुळं मी जास्तच भयभीत झाले, माझं रक्त, धमन्यांतून गोठत आहे की काय, असा मला भास झाला.
“या भयंकर, अस्ताव्यस्त प्राण्यावर प्रेम! याच्याबद्दल प्रेम उत्पन्न होणं शक्यच नाही. आणि उत्पन्न झालं तरी माझ्या अन्त:करणात मी त्याला जागा देणार नाही. अशा प्रकारच्या आसुरी, रानटी प्राण्याच्या बाबतीत, त्याला ठार मारणं, नष्ट करणं येवढी एकच गोष्ट करण्यासारखी आहे.”
“छे! पण ही गोष्ट केवळ असंभवनीय आहे. त्याच्या हिंसेचा विचार तू मनातून एकदम काढून टाक. कारण जे ‘सत्’ म्हणजे अस्तित्वात आहे, त्याचा अभाव कधीही होणार नाही. जे अस्तित्वात आहे, ते कालत्रयीही नष्ट होणार नाहीं, ‘असणं’ ही त्याची अविनाशी अवस्था आहे. नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत:।
“अर्थात आन्तरिक आणि बाह्य परिणामांमुळं वस्तूच्या, त्या विशिष्ट अस्तित्वाच्या स्वरूपात बदल होतो. हे रूपान्तर घडवून आणता येतं. वस्तूचा अन्तर्बाह्य काया-पालट घडवून आणता येतो.
“हेच सत्य, हाच सिद्धांत तुला तुझ्या वैयक्तिक अनुभूतींतून पारखायचा आहे. त्याशिवाय या पर्वताच्या वाटेवर एक पाऊलसुद्धा टाकणं तुला शक्य नाही. या सत्याचा अनुभव तुला फक्त एकाच पद्धतीनं घेतां येईल. तू स्वत:मध्येच क्रमाक्रमानं स्थित्यंतर घडवून आणण्याचा प्रयत्न केला पाहिजेस.
“या परिवर्तनाला, विकासाला, पशूच्या रूपात प्रकट झालेल्या या तुझ्या स्वत:च्या घृणास्पद अंशापासून प्रारंभ कर, प्रथम तुझ्याच त्या अवनत अंगाला उच्च, उदात्त स्वरूप दे.”
“याला कसं बदलणार मी?” मी घाबरत घाबरत विचारले. त्या पशूच्या नजरेला नजर भिडवण्याचा मी यत्न केला. पण छे!
“ही किमया घडवून आणायला केवळ एकच शक्ति समर्थ आहे. प्रेम, शुद्ध प्रेम; दया, सहानुभूती, आत्मीयता, कळवळा या सार्‍या भावनांना सामावून घेणारी ही प्रीती, चराचराला व्यापून राहिलेली ही प्रीतीच हा चमत्कार घडवू शकेल.” तो म्हणाला.
“होय! पण या हिडिस टोणग्यावर मी प्रेम कसं करू? मला शक्य नाही हे.” मी वैतागाने उद्गारले.
पण प्रयत्न तरी करशील की नाही ? पुन्हा एकदा त्याच्या नजरेत पहा. देवाचं नाव घे. त्याच्या कृपेनं या जगात कोणतीच गोष्ट अशक्य राहात नाही. त्याच्या कृपेनंच सर्व काही चाललं आहे. परमेश्वर तुझा स्फ़ूर्तिदाता, शक्तिदाता आहे, पण तू स्वत: धावा केल्याशिवाय तुला त्याची कृपा मिळणार नाही.
“परमात्म्याचं प्रत्युत्तर तुला अवश्य मिळेल. त्याच्याकडून तुला दिव्य-शक्ति व दिव्य-चक्षु अवश्य प्राप्त होईल. त्याची तुझ्यावर परम कृपा होईल. पण तू माझा, तुझ्या जीवात्म्याचा आवाज ओळखला पाहिजेस; आदेश ऐकला पाहिजेस.”
त्याच क्षणी मला पुन: तो दूर-ध्वनि ऐकू आला. दुरून ऐकू येणाऱ्या मंदिरातल्या घंटेच्या आवाजासारखा तो नादमधुर आणि स्पष्ट होता.
‘परमेश्वर प्रेमस्वरूप, प्रेममय आहे. प्रेमानं सर्व जिंकता येतं. प्रेमाला कधीही अपयश नाही.’ ह्या संदेशाबरोबरच माझ्या हृदयात एक प्रशान्त, स्नेहपूर्ण ज्योती उदित झाली.
“या जगाच्या रंगभूमीवर वावरत असताना, प्रेमाचा मी कितीतरी वेळा अनुभव घेतला; आनंद उपभोगला; या प्रेमतत्वाचे संपूर्ण ज्ञान मला झाले; या भावनेत जाणावयाचे काहीच शिल्लक राहिले नाही; असा माझा समज होता पण आज पूर्णपणे अपरिचित, अननुभूत अशा एका निराळ्याच प्रेमशक्तीशी माझी ओळख होणार आहे की काय? मला तर या नव्या प्रेमशक्तीचे जराही ज्ञान नाही.”
“नाही कसं?” तो म्हणाला, “तुला या दैवी, पवित्र व सर्वस्पर्शी अशा प्रेमशक्तीचं ज्ञान आहेच. तुला ज्या तर्‍हेच्या प्रेमाचे अनुभव आले, जी वैयक्तिक आकर्षणं तुला प्रतीत झाली ते अनुभव, ती आकर्षणं म्हणजे एका दिव्य, निरुपचार आणि निरपेक्ष अशा ईश्वरी प्रेमसंगीताचे पूर्वपाठ होते. निर्मळ व निर्हेतुक असं व्यक्तिनिष्ठ प्रेम हे ईश्वरी प्रेमाचंच एक पूर्व-रूप आहे. ईश्वरी प्रेम म्हणजे ईश्वरविषयक प्रेम! तसं पाहिलं तर ईश्वर प्रेमस्वरूप असल्यामुळं कुठलंही प्रेम, ईश्वरांशच असतं; पण ईश्वरी प्रेम या शब्दाचा दुसरा अर्थ ईश्वराचं भक्तांवरील प्रेम असाही आहे. ईश्वरी प्रेम म्हणजे केवळ स्वार्थमूलक आसक्ति नव्हे. ईश्वरी प्रेमात त्याग असतो.
“व्यक्तिनिष्ठ प्रेमाचे भव्योत्तम अनुभवसुद्धा त्या दिव्य, निरुपम आणि निरुपचार अशा ईश्वरी प्रेमाची केवळ अस्पष्ट व विकृत प्रतिबिंबं होत. त्या ईश्वरी प्रेमातली स्वातंत्र्य, आनंद व सहजता वैयक्तिक प्रेमात कशी अवतरणार?
“समजलं का, व्यक्तिनिष्ठ प्रेम हे तारतम्य-प्रधान, पंक्ति-प्रपंच करणारं, निवड करणारं आणि विशिष्ट व्यक्तीशिवाय इतरांना वगळणारं असं असतं.
“प्रेमाला पात्र बनलेल्या वस्तूशिवाय, व्यक्तीशिवाय बाकी सर्व जीवांकडे ते तिरस्काराच्या किंवा द्वेषाच्या भावनेनं पहात नसले तरी त्यांच्याबद्दल कोणत्याही तर्‍हेची आत्मीयता, आपुलकी वाटत नाही. इतरांच्या बाबतीत मनुष्याची पूर्ण उपेक्षाबुद्धि असते. पण दिव्य प्रेमाच्या कक्षेत सर्व जीवांचा अंतर्भाव होतो. कुणीही आणि काहीही या दिव्य प्रेमाला वर्ज्य वाटत नाही. दैवी प्रेमाचा हा स्वभावच आहे की, ते सर्वस्पर्शी आहे. या विश्वातील कोणतीही वस्तू, कोणतीही व्यक्ती त्या प्रेमाला त्याज्य नाही, तिरस्करणीय नाही. ते विशाल प्रेम सर्वांना आपल्या शीतल मधुर छायेत सामावून घेतं.
“भगवान् सूर्यनारायण जसा सर्व बाजूंना, सर्व दिशांना, आपली किरणे समर्पण करीत असतो, अगदी त्याचप्रमाणं दिव्य, ईश्वरी प्रेमाची शक्तीदेखील कोठलाही तरतमभाव न बाळगता, पंक्तिप्रपंच न करता अत्यंत कनिष्ठ, भयप्रद हिंस्त्र प्राण्यांनादेखील संपूर्णपणे, आपल्या आश्रयाखाली आणि आश्वासनाखाली, घेऊ शकते.
“सर्व-स्पर्शित्त्व हा त्याचा स्वभावच आहे. सर्व विश्वाला चेतना आणि धारणाशक्ती देणारं असं हे प्रेमतत्त्व आहे.
“या प्रेमतत्त्वाने सारं विश्व वेढलं आहे. प्रेम हेच मूलतत्त्व आहे; काही लोक त्याला ‘परमेश्वर’ संबोधतात. या प्रेमतत्त्वाने पृथ्वीवर कृष्णाच्या रूपानं, जीझसच्या व बुद्धाच्या रूपानं जन्म घेतला; आपले पूर्ण स्वरूप त्यांच्या जीवनात व्यक्त केलं; त्यांनाच आपण ‘प्रेम-स्वरूप परमेश्वर’ म्हणतो, याच प्रतीकाला आपण भगवान् मैत्रेय असेही संबोधतो.”
मंत्रमुग्ध होऊन त्याची ही विधाने ऐकत असताना मला तो दूरध्वनी पुन: ऐकू येऊ लागला; पण आता तो किंचित् जवळून ऐकू आल्यासारखा वाटला.
‘श्रीकृष्णामध्ये, जीझसमध्ये, धर्मतत्त्वाची साक्षात् परिपूर्ती म्हणून ईश्वराचे मानवावरील प्रेम साकार झाले आहे.’
“माझ्या हिरण्मय सोबत्याने थोड्या वेळापूर्वी उल्लेखलेली सर्वोच्च भूमिका ती हीच का? अशा दैवी प्रेमाचा अनुभव घ्यायला शिकणे, ख्रिस्तासारखे, कृष्णासारखे सर्वांवर निरपेक्ष, विशुद्ध प्रेम करण्याचा प्रयत्न करणे हीच त्या भूमिकेची प्रकट व प्रसिद्ध स्वरूपे आहेत.”
माझे हे विचार फार पुढे धावू लागले आहेत, असे तर माझ्या सुवर्ण-पुरुषाला वाटत नसेल ना? अशा संदेहाने मी त्याच्याकडे झटकन् एक कटाक्ष टाकला, पण त्याची मुद्रा स्मिताने अधिकच उजळली होती. ते दर्शन मला अगदी अपूर्व वाटले. पुन: मला ती आकाशवाणी ऐकू आली.
“तुझं प्रतिबिंब व्हावं, तुझी प्रत्यक्षता, तुझ्याशी संपूर्ण समरसता मला लाभावी ही माझी इच्छा आहे, ती पुरी झाल्यावर मला खरंखुरं समाधान होईल. मी जागा होईन तो हुबेहूब तुझी नवमूर्ती, नवप्रतिमा म्हणूनच. असा जागा होईन तेव्हाच मला ‘धन्य मी’ असं वाटेल.”
जणू काही या आकाशवाणीला प्रत्युत्तर म्हणून मी स्वत:शीच पुटपुटले, “बरं आहे! मी या प्राण्याबद्दल प्रेम जागृत करण्याचा प्रयत्न करते.”
मार्गात पडलेल्या त्या हिडिस प्राण्याकडे मी दृष्टी वळविली. या वेळी मात्र त्याचे अंत:स्वरूप ओळखण्यासाठी मी एकाग्र झाले. माझ्या दृष्टीतला तिरस्कार आणि भय आता लुप्त झाले होते.
“छान”, माझा सुवर्ण-मित्र म्हणाला, “तू प्रारंभ तर अगदी उत्तम केलास. तुझा हा प्रयत्न यथायोग्य आहे. आता तुझ्या ध्यानात येईल की, हा प्रचंड प्राणी म्हणजे केवळ एक छाया आहे. खरोखर तुला त्याच्याबद्दल केवढी कृतज्ञता वाटली पाहिजे; केवढे उपकार त्याने तुझ्यावर केले आहेत, हे आता तुला उमगेल. प्रथम तुला हा प्राणी - ही छायाच दिसली नसती तर, प्रकाशाकडे पाहण्याची प्रेरणा, दृष्टी तुला मिळाली असती का? तू माझ्याकडे पाहिलंच नसतंस आणि तुझ्यातील ‘अहंभाव’ हा तुझ्या प्रकाशमार्गातील अडथळा आहे याचीही तुला जाणीव झाली नसती.”
त्याच्या त्या शब्दाबरोबर माझी भीती नष्ट झाली. भास्कराच्या एका किरणाबरोबरच धुक्याचे ढग वितळून जावेत तशी माझी भीति हृदयातून नाहीशी झाली; आणि त्या पशूबद्दल अगदी अननुभूत, अपूर्व प्रेमाची लाट माझ्या मनात उचंबळून आली, आणि सार्‍या देहाच्या अणुरेणूंत ती पसरली. त्या लहरीने त्या हिडिस प्राण्यालाही कवेत घेतले. दिव्य प्रेमाची ती लाट, स्वत:च्या मार्गातील प्रत्येक वस्तूला, व्यक्तीला संपूर्णपणे कवटाळल्याशिवाय राहिली नाही.
मला पुनश्च आकाशवाणी ऐकू आली.
“तू स्वत:वर करतेस तसेच शेजार्‍यावर प्रेम कर.”
अगदी खरे. शेजार्‍यावर योग्य तर्‍हेने प्रेम करण्यापूर्वी स्वत:वर योग्य प्रेम कसे करावे हे मी शिकले पाहिजे. मी विचारमग्न झाले पण पुन: मी माझ्या कुवतीपलीकडे सूक्ष्म विचारांच्या महोदधीत पोहू लागले आहे, हे माझ्या ध्यानात आले. त्यापेक्षा माझ्या मार्गावरचे पुढचे पाऊल टाकलेले बरे नव्हे का?
मी माझ्या हिरण्मय स्नेह्याकडे एक कटाक्ष टाकला. त्याच्या सान्निध्याची स्वत:शी निश्चिती केली; शिलेवरून मी झटकन् उठले आणि माझे बाहू पसरले; माझ्या पुढे असलेल्या त्या गलिच्छ प्राण्याच्या अगदी जवळ गेले. निमिषार्धात माझ्या लक्षात आले, स्वत:ला आणि स्वत:च्या शत्रूला, दोघांनाही नि:शस्त्र करण्याचा, अहिंसक बनविण्याचा हा एकच मार्ग आहे; शत्रूला प्रेमाने कवटाळणे.
आणि चमत्कार पहा! तो हिंस्त्र पशु एकदम शांत झाला. त्याचे उभारलेले, ताठरलेले केस एकदम खाली पडले, त्याचा फूत्कार थांबला; मोठ्या आनंदाने त्याने एक उडी मारली आणि शेपटी लडिवाळपणे हलवीत तो माझ्या जवळ व पुढे येऊ लागला. मोठ्या विस्मयाने मी स्वत:शीच म्हटले, “अरे वा! परिणाम झाला की; दुष्टत्वाचा प्रतिकार दुष्टत्वाने करून काय उपयोग? त्यापेक्षा खर्‍या सौजन्याने, प्रेमशक्तीने, दुष्टत्वावर विजय मिळवावा, मात करावी, हे बरे.”
त्या पशूच्या डोक्यावर वात्सल्याने हात ठेवण्यास मी थोडी वाकले. एकाद्या मांजरासारखे आपले शरीर त्याने माझ्या पोटर्‍यांवर घासले. मला हसू आल्याशिवाय राहिले नाही, कारण ‘लेडी एन्ड युनिकॉर्न’ या मध्ययुगीन गालिच्यावरील चित्रात एक सिंह रेखाटलेला असतो; अगदी तसाच हा पशू त्या क्षणी मला दिसत होता. आणि त्या विद्रूप पशूच्या चेहर्‍यावर निर्भेळ निर्बुद्धता पसरलेली आढळली. अगदी असलाच चेहरा, गालिच्यावरल्या त्या जुन्या चित्रात मी कितीतरी वेळा पाहिला होता. “बिच्चारं!” त्याच्या उभारलेल्या कानांना कुरवाळीत मी म्हटले, “तुझी बौद्धिक सामग्री बघितली तर तू दाखविलंस एवढं प्रेम मला पुरं आहे. मला क्षमा कर. मीच तुला एवढं विद्रूप केलं आणि पुन: मी तुझा द्वेष केला; कारण तू विद्रूप. माझ्या स्वत:च्याच कृतीला, म्हणजे तुला - मी कित्ती भ्याले! आणि तुला मी माझी ओळखदेखील दिली नाही; तुला पूर्णपणे विसरले. आता मला उमगलं. तू धारण केलेलं हे भयानक हिडिस रूप केवळ माझं लक्ष वेधण्यासाठी होतं. खरोखर, मला जागृत केल्याबद्दल, माझ्या हिरण्मय मार्गदर्शकाची म्हणजे माझ्या आत्म्याची जाणीव करून दिल्याबद्दल, मी तुझी सदैव ऋणी राहीन.
“ये! आता माझ्या पायांपाशी उभा राहा. छाया ही नेहमी पायांजवळच असते, नाही का? जर प्रकाशाकडे पाठ असेल तर मात्र छाया पायांजवळ राहात नाही.
“पण, यापुढे मी तुला एक कामगिरी सांगते, मी जर तुला विसरले, मार्गात जे जे भेटतील त्यांना मी सहानुभूती व सौजन्य दाखविले नाही, तर, मला डिवचायला, मला आठवण करून द्यायला तू मात्र चुकू नकोस. तू थोडासा भुंकलास किंवा माझ्या पायांना ओरबडलंस तरीदेखील चालेल.
“चला, आता आपण येथून जाऊ या. कितीतरी वेळ आपण इथं थांबलो आहोत. आपण दोघेही बरोबरच चालू या, पुढचा मार्ग शोधू या. तो थेट सूर्यप्रकाशाकडेच जात आहे.”
आम्ही तेथून निघणार तोच, मुरलीचे आर्द्र श्रुतिमधुर सूर माझ्या कानावर पडले; एक दिव्य गीत त्यांतून स्रवत होते; मी वर पाहिले, माझा तो सुवर्ण-सखा माझ्यासाठी थांबला होता. पर्वताच्या चढणीच्या वळणावर उभा होता; व खूण करून मला बोलावीत होता. मन्द-मधुर हास्य त्याच्या मुखावर चमकत होते.
पुन: मला एक दिव्य वाणी ऐकू आली. पण ती इतक्या जवळून, की ती जणू माझ्या स्वत:च्या हृदयातूनच स्फुरली होती!
“जाग आल्यावरी माहेरा जाईन.”
-----
ध्यान-बीज
हिरण्मये परे कोशे।
विरजं ब्रह्म निष्कलम्।।
तच्छुभ्रं ज्योतिषाम् ज्योति:।
तत् यत् आत्मविदो विदु:।।
- मुण्डक उषनिषत, मुण्डक २, खंड २, मंत्र १०
भावार्थ:
हिरण्यमय अशा आनन्द-कोशामधून प्रकाशमान होणारे ब्रह्म हे निष्कल म्हणजे पूर्ण आहे.
ते धवल - निरंजन ब्रह्म तेजांचे तेज, ज्योतींची ज्योती, होय.
ते ब्रह्म म्हणजे आत्मतत्त्व होय.
आत्मज्ञानी पुरुषाला त्याच आत्मतत्त्वाचे ज्ञान होते.

पुस्तकाचे चॅप्टर्स

संपूर्ण पुस्तक वाचण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा.

You may keep up to date with our updates by subscribing to RSS feed of this website. RSS Feed is available at www.maharshivinod.org/rss.xml

श्रीगुरुपादुकोदयस्तोत्रम्


आज मुहूर्तवूं या एक नित्योत्सव।
अद्वैत आमोदें, जेणे फुलेल हें विश्व।
क्षणोक्षण प्रभातेल नवोनव महापर्व।
प्रसादचिन्ह श्री-श्री-श्रीविद्येचें।।१।।

परा, परापरा, अपरा।
श्रीगुरूपुजा ही त्रिशिरा।
विमर्शा माऊलीची ही स्तनदुग्धधारा।
ओष्ठविण्याचा समय हा।।२।।

‘अपरा’ आराधनेंत भेद-ग्रह-स्थिती।
‘परापरा’ अवस्थेंत भेद-अग्रह-वृत्ती।
‘परा’ अवस्थानांत अभेद-स्फूर्ती।
श्रीगुरूपुजेची पादुका ही।।३।।

आदिभान हें परात्परगुरुबीज।
विमर्शशक्ती श्रीशिवा गुरूविद्येची गुह्यशेज।
जीवूजीवूचा पहिला परिव्राज।
गुरूपादुकेचें आलोचन ।।४।।

एक उफराटे अ-कुल ब्रह्मपद्म।
तेथ निष्कलेचे निजशक्तीधाम।
निर्झरले व्यापिनीचे श्यामव्योम।
अमृतमेघ वोसंडला।।५।।

चतुष्कोणी देवतात्म्यांचे उगमस्थान।
बिंदुस्थली अमृतसिद्धीचें अनुभावन।
यथाक्रम आंतर अनुभवांचें अनुस्थापन।
श्रीगुरूविद्येचा सहजाचार हा।।६।।

‘विमर्श’ म्हणजे आदिभानस्थित चित्शक्ती।
पादुकोदय म्हणजे शिवशिवेची साम्यरसस्थिती।
गुरूकृपयैव या भाग्यश्रीची समवाप्ती।
‘गुरूकृपा’ ये नामें जीवू जीवूचें निरवस्थान।।७।।

‘चार’ म्हणजे सोपचार आराधन।
‘राव’ म्हणजे विमर्शशक्तीचें उपयोजन।
‘चरू’ म्हणजे द्रव्यगुणांचे संयोगीकरण।
‘मुद्रा’ या नांवे प्रतीकाचा प्रत्यंगभाव।।८।।

चित्गगन-चंद्रिकेची फेसाळली जान्हवी।
श्रीगुरूकृपेची वेल्हाळली की पान्हवी।
प्रकटली वा नीलाब्जाची श्रीसुषमा अभिनवी।
श्रीपादुकोदय स्तोत्र हें ।।९।।

श्रीनवशुक्तिकांचा सम्यक् समुल्लेख।
येथ दशोपनिषद्रहस्याचे महावार्तिक।
आदिकृपेचा जणुं संतताभिषेक।
श्रीगुरूपादुकोदयस्तोत्रम्।।१०।।

।।इति श्री गुरूपादुकोदय स्तोत्रम्।।
------------------------------