You are hereहरिपाठ सुबंध / हरिपाठ सुबंध

हरिपाठ सुबंध


पुस्तकाचे नाव: हरिपाठ सुबंध
लेखक: ह.भ.प. प्रह्लादबुवा सुबंध
प्रस्तावना: महर्षी विनोद

-१-

हरिपाठ हा नामयोगातला एक अद्भु्तरम्य वस्तु्पाठ आहे. नामयोगाच्या मधु्विद्येची मूलतत्त्वे या अमर शब्ददेहांत अवतीर्ण झाली आहेत.
श्री ज्ञानमाऊलीच्या आंतर आकाशात लकाकलेल्या सत्तावीस तेजोबिंदूंच्या या नक्षत्रमालेने अध्यात्ममार्गाला एक कायमचा उजाळा दिला आहे.
विविध साधकांच्या पाऊलवाटेवर जणू काय एकेका नक्षत्राने आपल्या मंद-मधुर प्रकाशाचा झोत फेकला आहे.

-२-

नाम शब्दाची व्युत्पत्ति, निरक्तकारांनी अशी दिली आहे.
‘नमति आख्यातार्थं प्रति स्वार्थविशेषणत्वेन इति नाम।’ - नाम हे आख्यात अर्थाचे विशषण आहे. ईशनाम, ईशवस्तूचे ज्ञापक, विशेषणभूत आहे. हे नाम विशेष्यापुढे, ज्ञात्यापुढे, ईश वस्तू्पुढे, जणू काय नमलेले आहे (नमति).
अतएव, ‘नाम’ हे भगवंताचे व भक्ताचेही प्रतीक आहे; भक्त भगवंतापुढे नमलेला, नामही भगवंतापुढे नमलेले! नामात भक्त व भगवंत या दोघांचे अद्वैत स्वत:सिद्ध नमलेले!
नामात जीवशिवाचा, बिंदू-सिंधूचा साक्षा्त्कार सहज प्राप्त आहे! नाम घेणे म्हणजे साक्षात् अद्वैत-सिद्धीचाच अनु्भव घेणे होय.
जगदीश भट्टा्चार्यांनी, शब्दशक्ती प्रकाशिकेमध्ये, नाम शब्दावर असे व्याख्यान केले आहे.
‘स्वार्थ मुखविशेषणं बोधं उत्पादयति य: शब्द: स: नाम इति।’ - विशेषाचा बोध, आपल्या अर्थाने जो शब्द करतो तो नाम होय.
नाम शब्दाचा ‘संज्ञा’ असाही अर्थ आहे. ‘संज्ञा’ म्हणजे सम्यक अथवा संपूर्ण ज्ञानाचे उपकरण उगम, प्राकट्य, संभावना इत्यादी अनेक अर्थच्छटांचेही सूचन नाम शब्दाने होते.
ईशनाम ईशत्वाचा बोध करते - नामाचे लक्ष्यार्थाने नामीशी ऐक्य असते. नामनामी हे एकच, हा महा्राष्ट्र संतांचा सिद्धांत सर्वथैव शास्त्रपूत आहे. हे निरक्तकार व जगदीश भट्टा्चार्य यांच्या विवेचनावरून स्पष्ट होत आहे.

-३-

हरिपाठाचे तत्त्वशास्त्र श्री ज्ञान माऊलीने एका शब्दांत सामावले आहे. ‘अद्वैत-कुसरी’ (अभंग १५) हा एकच शब्द उपयोजून जणू काय अध्यात्मशास्त्रावरील कोटिग्रंथांचा संकोच त्यांनी करून दाख्रविला आहे. अद्वैत ही एक कुसरी कला आहे. जड शब्दशास्त्राचा व जटिल तर्क प्रक्रियेच्या पलीकडे गेल्याशिवाय अद्वैताचा आढळ होत नाही. जाणीव-नेणीवेच्या उत्त्क्रियेत एक स्पंद, एक उच्चार, उदित होत असतो - त्या ‘उच्चारणी पाही मोक्ष सदा’ (अभंग २५). भगवंती, भगवंताचे ठिकाणी जाणीव नाही व नेणीव नाही, केवळ उच्चारण स्फुरण आहे.
नाम हे स्फुरण आहे, कारण ते नामीचे स्मारक आहे व नामी स्फुरणरूप आहे. हा तर श्री ज्ञानेश्वरनाथांचा आद्य सिद्धांत आहे.
नामाने निजवृत्ती (अ. २७) निपजली पाहिजे - तरच तो नामयोग ‘समाधि-संजीवक’ होऊ शकेल. नामयोगाने एक विशिष्ट लय साधावी लागते. हा तर जड सिद्धांतांच्या विनियोगाने,
तो साधला जात नाही. म्हणून, अद्वैत सिद्धी ही एक कला्कृती आहे. तेथे भावनेचा, नामप्रेमाचा कलाविलास आवश्यक आहे.

-४-

ह.भ.प. प्रह्लादबुवा सुबंध हे स्वत: नामयोगी आहेत. माझा त्यांचा कित्येक वर्षांचा स्नेह आहे. हरिपाठात म्हटल्याप्रमाणे, सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला - या प्रल्हाद बुवांच्या ठिकाणीही, पौर्वदैहिक संस्कारामुळे, ईशनामाचा उच्चार, सत्वर म्हणजे अल्प वयातच बिंबला. नामप्रेमाने त्यांचे जीवन पुनीत झाले आहे. अद्वैत सिद्धांताचे ते एक मराठी भाष्यकार आहेत. हरिपाठावरील त्यांचे भाष्य स्फूर्तिजन्य व त्यामुळे स्फूर्तिप्रद वठले आहे; त्यांच्या विवेचनात सोज्ज्वलता व विद्वता यांचा मनोज्ञ संगम झाला आहे.
त्यांचे हार्दिक अभिनंदन करून व श्री ज्ञानमाऊलीच्या मायभू्मीत अवतरलेल्या प्रत्येक पुरुषाला वैदिक द्रष्ट्याचा एक आशीर्वाद उद्धृत करून हा पुरस्कार संपवितो.
‘उद्यानं ते पुरुष, नाचया्नम्।’ - ‘तुझे उद्यान, तुझा आध्यात्मिक उत्कर्ष होवो - तुझी अधोगती कधीही न व्हावी.’
- धुं.गो. विनोद
आषाढ शुद्ध दशमी १८६४.

ॐ ॐ ॐ

Facebook page

We have a page on facebook "Maharshi Vinod Publications.
You can join us.

श्रीगुरुपादुकोदयस्तोत्रम्


आज मुहूर्तवूं या एक नित्योत्सव।
अद्वैत आमोदें, जेणे फुलेल हें विश्व।
क्षणोक्षण प्रभातेल नवोनव महापर्व।
प्रसादचिन्ह श्री-श्री-श्रीविद्येचें।।१।।

परा, परापरा, अपरा।
श्रीगुरूपुजा ही त्रिशिरा।
विमर्शा माऊलीची ही स्तनदुग्धधारा।
ओष्ठविण्याचा समय हा।।२।।

‘अपरा’ आराधनेंत भेद-ग्रह-स्थिती।
‘परापरा’ अवस्थेंत भेद-अग्रह-वृत्ती।
‘परा’ अवस्थानांत अभेद-स्फूर्ती।
श्रीगुरूपुजेची पादुका ही।।३।।

आदिभान हें परात्परगुरुबीज।
विमर्शशक्ती श्रीशिवा गुरूविद्येची गुह्यशेज।
जीवूजीवूचा पहिला परिव्राज।
गुरूपादुकेचें आलोचन ।।४।।

एक उफराटे अ-कुल ब्रह्मपद्म।
तेथ निष्कलेचे निजशक्तीधाम।
निर्झरले व्यापिनीचे श्यामव्योम।
अमृतमेघ वोसंडला।।५।।

चतुष्कोणी देवतात्म्यांचे उगमस्थान।
बिंदुस्थली अमृतसिद्धीचें अनुभावन।
यथाक्रम आंतर अनुभवांचें अनुस्थापन।
श्रीगुरूविद्येचा सहजाचार हा।।६।।

‘विमर्श’ म्हणजे आदिभानस्थित चित्शक्ती।
पादुकोदय म्हणजे शिवशिवेची साम्यरसस्थिती।
गुरूकृपयैव या भाग्यश्रीची समवाप्ती।
‘गुरूकृपा’ ये नामें जीवू जीवूचें निरवस्थान।।७।।

‘चार’ म्हणजे सोपचार आराधन।
‘राव’ म्हणजे विमर्शशक्तीचें उपयोजन।
‘चरू’ म्हणजे द्रव्यगुणांचे संयोगीकरण।
‘मुद्रा’ या नांवे प्रतीकाचा प्रत्यंगभाव।।८।।

चित्गगन-चंद्रिकेची फेसाळली जान्हवी।
श्रीगुरूकृपेची वेल्हाळली की पान्हवी।
प्रकटली वा नीलाब्जाची श्रीसुषमा अभिनवी।
श्रीपादुकोदय स्तोत्र हें ।।९।।

श्रीनवशुक्तिकांचा सम्यक् समुल्लेख।
येथ दशोपनिषद्रहस्याचे महावार्तिक।
आदिकृपेचा जणुं संतताभिषेक।
श्रीगुरूपादुकोदयस्तोत्रम्।।१०।।

।।इति श्री गुरूपादुकोदय स्तोत्रम्।।
------------------------------

You may keep up to date with our updates by subscribing to RSS feed of this website. RSS Feed is available at www.maharshivinod.org/rss.xml