You are hereसंत-महात्म्यांची पुण्यतिथी महत्वाची का? / संत-महात्म्यांची पुण्यतिथी महत्वाची का?

संत-महात्म्यांची पुण्यतिथी महत्वाची का?


संतमहात्म्यांची पुण्यतिथी त्यांच्या जन्मतिथीपेक्षा अधिक महत्वाची का?
सद्‌गुरु, महात्मे यांच्या रुपाने ईश्वर मानवी देहामध्ये अवतरतो. त्यामुळे त्याचा जन्म इतर सर्वसामान्यांप्रमाणेच दिसतो.
दैवी गुणसंपदेमुळे त्यांना लहानपणापासूनच परमात्म्याविषयी ओढ असते. लौकिक-सर्वसामान्य व्यवहारामध्ये त्यांचे मन रमत नाही. योग्य वेळ येताच सद्‌गुरुविषयीची तळमळ त्यांना लागते. सद्‌गुरुप्राप्तीसाठी ते रात्रंदिवस साधना करीत ध्यास घेतात. अहंकाराचा निरास झाला की त्यांना त्यांचे सद्‌गुरु येऊन भेटतात व आपल्या कृपेच्या महासागरामध्ये ते सामावून घेतात. असा हा अवतारी पुरुष सत्‌शिष्य होऊन आपल्या सद्‌गुरुंच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सांगितलेली साधना अत्यंत निष्ठेने व अतीव प्रेमाने व ध्यासाने करतो. अशी साधना करीत असताना, त्याला सद्‌गुरुंच्या अनेक कसोट्यांतून पार पडावे लागते. चढत्या क्रमाचा दिव्यानंद त्याला मिळत जातो. देहाशी असलेले बंधन तुटत जाते.
अशा सत्‌शिष्याची तपस्या पूर्ण झाल्यानंतर सद्‌गुरु व सत्‌शिष्याचे सामरस्य होते. जिवाशिवाचे मिलन होते. असा शिवरूप झालेला सत्‌शिष्य, शिवरूप असलेले सद्‌गुरु एकच होऊन जातात. दोघांमधील द्वैत-भेद संपून अद्वैत सुरु होते. मीच ब्रह्म आहे हे ज्ञान त्याला होते. त्याच्याही पुढच्या अनेक अनुभूति घेत घेत शेवटी सर्वांभूति परमेश्वर अशी तुरीयातीत अवस्था तो अनुभवतो.
परमेश्वर हा सूत्रधार आहे, स्वत:च्याच मायेने अगणित असे आपलेच अंश तो निर्माण करतो आणि एकाच सूत्राने बांधून ठेवतो. प्रत्येक अंश दिसायला वेगळा असतो पण त्याचा आत्मा हा परमात्म्याचाच अंश असतो. या छोट्या बिंदूरुप जिवात्म्याला त्याचे मूळ स्थान म्हणजेच प्रत्यक्ष परमात्मा याची नैसर्गिक ओढ असते. परमात्मा हा आनंदरूप आहे. तो अज आणि अमर आहे. तसेच प्रत्येक जिवात्म्याला आपण अमर असावे, आपण आनंदी असावे याची इच्छा असते. परमात्म्यामध्ये संपूर्णपणे विलीन झाल्याशिवाय तो अनादिअनंत होऊ शकत नाही. असे परमात्म्याशी एकरूप झालेले सद्‌गुरु, परमेश्वरी इच्छेनुसार त्यांच्या आसपास असणार्‍या अज्ञ जीवांच्या महासागराकडे परत येतात व लौकिकात त्यांच्य़ाप्रमाणे राहून, त्यांच्या कुवतीनुसार त्यांना परमात्म्याकडे जाण्याचा मार्ग दाखवतात.
संपूर्ण शरण आलेल्या शिष्याला अनुग्रह देऊन तो मुक्त होईपर्यंत त्याच्याकडून साधना करुन घेण्याची जबाबदारी ते स्वीकारतात. दुःख, कष्टी, आर्त, निराश, वैफल्यग्रस्त जीवांविषयी त्यांना अपार सहानुभूती वाटते. आपल्या अंतरंगातली शांति आणि परमानंदाच्या महासागराचा ठेवा ते मुक्त हस्ताने लुटत रहातात.
त्यांचा द्वेष करणार्‍या, त्यांच्याशी वैर करणार्‍या माणसांमध्येही त्यांना परमेश्वर दिसतो. त्यांच्याकडे आलेल्या प्रत्येकाची सेवा ते परमेश्वराची सेवा म्हणून ते करतात.
केलेल्या कामाचे सर्व श्रेय ते परमेश्वरालाच देतात. त्यांच्या वागण्यावरुन ते नेमके कसे आहेत हे इतर सामान्य लोकांना समजणे अशक्य असते. त्यांच्या विषयी काहीजणांना असूया, द्वेष, मत्स, तिरस्कार, संश, अविश्वास वाटू शकतो.
शंकराने जसे हलाहल विष पचवले तसेच सद्‌गुरु-संत-सत्पुरुष दुष्ट प्रवृत्ती असलेल्या लोकांच्या मनामधील हे तीव्र हिंसात्मक भाव करुणामय अंतःकरणाने सोसत असतात.
अशा लोकांचे वाईट व्हावे अशी सूडाची भावना त्यांच्या मनामध्ये क्षणभरसुध्दा येत नाही. असा हिंस्र भाव जाऊन त्या जागी परमेश्वराविषयीची प्रीति कशी निर्माण करता येईल याचाच ते विचार करीत असतात.
असे काम करता करता शेवटी शरीर रोगजर्जर होऊन जाते व त्यांच्या अवतारसमाप्तीची वेळ जवळ येते.
आपल्या अंतरंगातील व्यक्तींना ते पूर्वसूचना हळुवारपणे देऊन ठेवतात. देह ठेवल्यानंतर शिष्य व भक्तगणांचे मन कसे स्थिर राहिल, शोकावेगामध्ये ते अस्थिर होणार नाहीत याची ते काळजी घेतात.
त्यांच्या मागे त्यांचे कार्य पुढे कसे चालावे याचीही व्यवस्था ते लावून देतात.
मग ठरलेल्या वेळी शांत चित्ताने ते परब्रह्मामध्ये विलीन होऊन जातात. त्यावेळी त्यांचा प्राण कवटीमध्ये असलेल्या ब्रह्मरंघ्रांतून निघून जातो. त्यांच्या चेहेर्‍यावरचा आनंद आणि तेज बराच काळ टिकून रहाते. अशा रीतिने त्यांचा मृत्यू हा सर्वसामान्य माणसाच्या मृत्यूपेक्षा संपूर्ण वेगळा असतो.
सर्वसामान्य माणसाचा मृत्यू होत असताना त्याच्या जिवात्म्याला देह सोडताना अतिशय यातना होतात. पैशाअडक्यामध्ये, सत्तेमध्ये, जवळच्या माणसांमध्ये त्याचे मन अडकून रहाते. त्याच्या अपुर्‍या राहिलेल्या वासना त्याच्या सोबत येतात. त्यामुळे चार देहांपैकी फक्त स्थूल देह इतर तीन देहांपेक्षा वेगळा होतो. त्याचा अहंकार-मन-अतृप्त वासना यांचे गाठोडे बरोबर घेऊन त्याचा सुक्ष्म देह स्थूल शरीरापासून बाजूला होतो व राहिलेल्या वासना पूर्ण करण्याकरीता तो पुढचा जन्म घेतो. अशा तर्‍हेने तो युगानुयुगे लक्षावधी देह बदलत आनंद आणि शांतिच्या शोधार्थ फिरत रहातो.
संत-सत्पुरुषांच्या वासनेचे बीज त्यांच्या साधनेने व गुरुकृपेने केव्हांच जळून गेलेले असते. त्यांचा अहंकार केव्हाच विसर्जित झालेला असतो. कर्म करूनही ते अकर्मी असतात. त्यामुळे मृत्यूच्या क्षणी शेवटपर्यंत जागे राहून, ते स्वप्रयत्नांनी स्वत:चा प्राण परतत्वामध्ये विलीन करू शकतात.
यासाठी हा निर्वाणाचा दिवस - हा क्षण इतरांना उद्‌बोधक ठरू शकतो. त्यांच्या मृत्यूपासून स्फूर्ति घेऊन कितीतरी जण आपल्या साधनेची तीव्रता, सखोलता वाढवू शकतात.
आपले सद्‌गुरु या देहापुरते सीमित नव्हते. देहामध्ये असूनही सर्वव्यापी होते. देह सोडल्यावर ते अधिक मुक्तपणे आर्त साधकांना मार्गदर्शन करु शकतात.
आपल्या हृदयातच त्यांचे अस्तित्व असते. हे शोकाकूल साधकांना समजणे आवश्यक असते. आपल्यावर आपल्या सद्‍गुरुंची कृपा निरंतर आहे याविषयी त्यांना विश्वास वाटणे गरजेचे असते.
तरच ते गुरुंनी सांगितलेली साधना यथाशक्ती करू शकतात.
हे सर्व ध्यानात घेतल्यानंतर आपण महर्षींचे पुण्य-स्मरण कसे करावे, त्यांच्या कडून स्फूर्ति कशी घ्यावी, आनंद आणि शांतिच्या वाटेवर त्यांच्या कृपाछत्राखाली कसे चालावे हे अधिक चांगल्या पध्दतीने समजणे सोपे जाईल.
....

Facebook page

We have a page on facebook "Maharshi Vinod Publications.
You can join us.

श्रीगुरुपादुकोदयस्तोत्रम्


आज मुहूर्तवूं या एक नित्योत्सव।
अद्वैत आमोदें, जेणे फुलेल हें विश्व।
क्षणोक्षण प्रभातेल नवोनव महापर्व।
प्रसादचिन्ह श्री-श्री-श्रीविद्येचें।।१।।

परा, परापरा, अपरा।
श्रीगुरूपुजा ही त्रिशिरा।
विमर्शा माऊलीची ही स्तनदुग्धधारा।
ओष्ठविण्याचा समय हा।।२।।

‘अपरा’ आराधनेंत भेद-ग्रह-स्थिती।
‘परापरा’ अवस्थेंत भेद-अग्रह-वृत्ती।
‘परा’ अवस्थानांत अभेद-स्फूर्ती।
श्रीगुरूपुजेची पादुका ही।।३।।

आदिभान हें परात्परगुरुबीज।
विमर्शशक्ती श्रीशिवा गुरूविद्येची गुह्यशेज।
जीवूजीवूचा पहिला परिव्राज।
गुरूपादुकेचें आलोचन ।।४।।

एक उफराटे अ-कुल ब्रह्मपद्म।
तेथ निष्कलेचे निजशक्तीधाम।
निर्झरले व्यापिनीचे श्यामव्योम।
अमृतमेघ वोसंडला।।५।।

चतुष्कोणी देवतात्म्यांचे उगमस्थान।
बिंदुस्थली अमृतसिद्धीचें अनुभावन।
यथाक्रम आंतर अनुभवांचें अनुस्थापन।
श्रीगुरूविद्येचा सहजाचार हा।।६।।

‘विमर्श’ म्हणजे आदिभानस्थित चित्शक्ती।
पादुकोदय म्हणजे शिवशिवेची साम्यरसस्थिती।
गुरूकृपयैव या भाग्यश्रीची समवाप्ती।
‘गुरूकृपा’ ये नामें जीवू जीवूचें निरवस्थान।।७।।

‘चार’ म्हणजे सोपचार आराधन।
‘राव’ म्हणजे विमर्शशक्तीचें उपयोजन।
‘चरू’ म्हणजे द्रव्यगुणांचे संयोगीकरण।
‘मुद्रा’ या नांवे प्रतीकाचा प्रत्यंगभाव।।८।।

चित्गगन-चंद्रिकेची फेसाळली जान्हवी।
श्रीगुरूकृपेची वेल्हाळली की पान्हवी।
प्रकटली वा नीलाब्जाची श्रीसुषमा अभिनवी।
श्रीपादुकोदय स्तोत्र हें ।।९।।

श्रीनवशुक्तिकांचा सम्यक् समुल्लेख।
येथ दशोपनिषद्रहस्याचे महावार्तिक।
आदिकृपेचा जणुं संतताभिषेक।
श्रीगुरूपादुकोदयस्तोत्रम्।।१०।।

।।इति श्री गुरूपादुकोदय स्तोत्रम्।।
------------------------------

You may keep up to date with our updates by subscribing to RSS feed of this website. RSS Feed is available at www.maharshivinod.org/rss.xml