अप्रकाशित अभंग विखुरलेले

तुझे स्मरण होता चित्त हे नाचतें।
आणि धांव घेते तुझ्यामागे ॥
मनोमूर्ती सुद्धा तुझी ही चंचल।
किती तू अचपळ अनंतते ॥१॥

सहज वृत्ति माझी सरल हें चारित्र्य।
हृदय हे पावित्र्य मूर्तिमंत ॥
पारदर्शी माझा वर्तनाचा क्रम।
असें हे निष्काम प्रेम माझें ॥२॥

चित्तांत आलेला विचार तत्क्षणीं।
-आणि तो वर्तनी सर्वदा मीं ॥
दिसाया मोहक असें जो केवळ।
आचार ठाऊक - न तो मला ॥३॥

तेवढेच माझ्या वाचेत येईल।
सत्य जे असेल - अंतरात ॥
एकदां ही केली नसे मीं वंचना।
फसविले न कोणा आजवेरी ॥४॥

मनाची नीचता सर्वदा आठवे।
हेतू क्षुद्रता लाज आणी ॥
झांकिले न केव्हा कलंक माझे हे।
ह्यामुळेच जीवा समाधान ॥५॥

पाप हें इतुके दुटप्पी आचार।
वर्तनी विचार - नसे जेथे ॥
स्वैरता - अस्थैर्य - वक्रता - नीचता।
ही न माझ्या चित्ता बोचणार ॥
अ नीती अक्षम्य - कृत्रिमाचार तो ।
मला वाटे शिष्टता अधर्म्य ॥६॥

कमल - पुष्पामध्ये वैभवाच्या गेला।
- आणि हा तडफडला - जीवभृंग ॥
उडूंद्या तयाला बाहेर स्वच्छंद -।
बरे तें दारिद्रय बंधहीन ॥७॥

आत्महत्याच ती - नको अनुकार ।
स्वकीय आचार - आदरावा ॥
स्वत:ची कल्पना सदां उच्चारावी।
वृत्ति अनुसरावी - स्वत:चीच ॥८॥

परमोच्च पूज्य जें अनुभवीं आढळे।
सत्यता मजकळे - त्यामुळेच मूल्य? ॥
मूल्यतेंच सांगे ईश्वराचे नांव।
अनंतेचा / अनंततेचा भाव सांतलेला ॥९॥

पाहिलेंस तेज परी तो तारक।
तुला न ठाऊक - व्हावयाचा ॥
मनी ठेविलीस सौरभाची भूल।
फुले काठें फूल - परी सांग ॥
ऐकिलेस माझे जरी प्रेमगीत।
हृदय हें अज्ञात असो तुला॥१०॥