You are hereपृथ्वीपर्यटनाची फ़लश्रुती / पृथ्वीपर्यटनाची फ़लश्रुती

पृथ्वीपर्यटनाची फ़लश्रुती


पृथ्वीपर्यटनाची फ़लश्रुती
(१)

    पृथ्वी स्वत:भोवती फ़िरते, पण तसे करताना ती सूर्यनारायणालाही प्रदक्षिणा घालते.
    मानवाने देखील स्वत:चे अर्थ, स्वार्थ साधता साधता एखाद्या महान, श्रेष्ठतम, परम-अर्थाभोवती प्रदक्षिणा घालीत राहिले पाहिजे.
    स्वत:भोवती फ़िरणे हे पाप नव्हे. पण एकाच ठिकाणी, स्वत:भोवती फ़िरत राहिल्यास थोड्या वेळानंतर मूर्छा, अध:पतन व कदाचित मरणही क्रमप्राप्त होते.
    पण स्थानबद्ध न रहाता, केवळ स्वत:च्याच स्वार्थला थोडे गतीमान ठेवणे, स्वत:भोवतीच्या गिरकीबरोबर फ़िरत्या पावलांनी दुसरे एखादे गतीचक्र किंवा चक्रगती निष्पन्न करणे, हे शक्य झाल्यास, नव्हे झाले तरच अध:पात व अपघात टळू शकेल.
    स्वार्थ आणि परम-अर्थ; स्व-इष्टी, समेष्टी व परम-इष्टी या त्रयीमध्ये परस्पर विरोध नाही.
    किंबहुना, हे त्रि-विक्रम नृत्य, त्रिविध पदक्षेप, प्रस्थान-त्रयी व प्रगमन-त्रयी, स्वभावत: एकमात्र व एकस्वरूपच आहे.
    परमार्थ दृष्टीशिवाय ईश्वरनिष्ठा व ईश्वरनिष्ठेशिवाय समाजसेवा किंवा मानव्यसेवा, सुघटित व सुव्यवस्थित होत नाही.
    प्रथम स्वार्थ, नंतर समाज व शेवटी परमार्थ हा अनुक्रम चुकीचा होय.
    ही तीनही उद्दीष्टे, हेतू एकतालातच साधता येतात व आली पाहिजेत.
    तीनही एकदम न साधली तर एकही साधत नाही व जीवनात अनंत विकृती निर्माण होतात.
    मी, समाज व देव; व्यष्टी, समष्टी व परमेष्टी ही तत्वत: एकस्वरूप आहेत. ती एक त्रिपदा गायत्री आहे.
    या सत्याची ओळख ही माझ्या जागतिक प्रवासाची व अभ्यासाची मुख्य फ़लश्रुती होय.

(२)

    युरोप दोन युद्धजन्य आघातांनी मृतप्राय झाला आहे.
    रशिया मात्र गेल्या युद्धाने विशेष प्रमाणात शक्तिसंपन्न झाला आहे. त्याचे कारण तेथील समत्त्वनिष्ठ, प्रगमनशील व सहानुभावप्रधान तत्त्वज्ञान. मात्र या तत्त्वज्ञानाच्या प्रयोजनपद्धतीत काही हिंसाप्रधान आगंतुक दोष आले आहेत.
    ऑस्ट्रेलियाला युद्धजन्य परिस्थितीची झळ तितकीशी लागली नाही.
    अमेरिकेला दुसर्‍या महायुद्धाने सर्वसंपन्न व सर्वश्रेष्ठ करून ठेवले आहे.
    आफ़्रिका खंडात साम्राज्यशाही व लोकशाही, श्वेतवर्णीय व कृष्णवर्णीय, यंत्रयुग व कृषियुग या द्वंद्वांचा संघर्ष अधिकाधिक गंभीर व तीव्र स्वरूपाचा होत आहे.
    आशिया खंडात भारत, ब्रह्मदेश, सयाम, चीन, अतिपूर्वेकडील जपान, फिलिपिना इत्यादी प्रदेश, या सर्व राष्ट्रांत, दुसर्‍या महायुद्धाने लोकशाहीच्या तत्त्वांचा बीजारोप केला आहे.
    आशिया खंडात एका नव्या उष:कालाची किरणे दिसू लागली आहेत.
    पश्चिमेकडे मावळत जात असलेला सूर्य जणू काय पूर्व क्षितिजावर पुन्हा उदित होत आहे.

(३)

    आजच्या मानवमात्राने काही सत्ये आत्मसात करणे आवश्यक आहे.
    (१) आपण राष्ट्रवादाच्या व वर्गवादाच्या मर्यादा ओळखल्या पाहिजेत.
    (२) आंतर-राष्ट्रीय जीवन व जीवनात अध्याहृत असलेली मूल्ये व मन:स्थिती या गोष्टी आता कल्पनासृष्टीत राहिल्या नसून वास्तवतेत उतरल्या आहेत व अधिकाधिक प्रमाणात उतरत रहाणार.
    (३) अणुविज्ञानाच्या प्रगतीने मानवी संस्कृतीचा सर्वस्वनाश प्रत्यक्ष कधीही होणार नाही; याबद्दल अनेक प्रमाणे व गमके आज उपलब्ध आहेत. अणुशक्तीचा उपयोग विधायक पद्धतीने व सर्वोदयाला पोषक असाच यापुढे केला जाईल.
    (४) अतिमानसशास्त्र (Para-Psychology) मनुष्यमात्राच्या ठिकाणी प्रसुप्त, अ-विकसित व अ-स्फ़ुटित असलेल्या अनेक शक्तींना प्रकट करून, मनुष्यमात्राच्या आंतरसिद्धी शतगुणित करणार आहे.
    (५) वर्गवाद व राष्ट्रवाद या मानव कुटुंबाच्या अविभाज्य एकतेकडे नेणार्‍या सांस्कृतिक अवस्था आहेत. विशिष्ट मर्यादेपलिकडे त्यांची अतिव्याप्ती व अतिचार झाल्यास मानवकुलाचा आत्मसंहार होऊ शकेल.
    (६) युद्धनिर्मूलन हे शक्यतेच्या कक्षेत आहे.
    (७) जगत्‌-शांतीचा उदय मानवमात्राने स्वत:चा हृदयपालट व क्रियापालट केल्याशिवाय होणार नाही. हा हृदयपालट प्रत्यक्ष प्रतीके व साक्षात उदाहरणे निर्माण झाल्याने होऊ शकेल. शाब्दिक प्रचार व वाक्यवार्तिके हा परिणाम घडावून आणण्यास असमर्थ ठरतील.
    (८) विशुद्ध विचार करता आल्याशिवाय उदात्त उदाहरणांची, प्रत्यक्ष प्रतीकांची ओळख व अनुकार होत नाही. मूल्यदर्शन व महत्त्वमापन, विशुद्ध वि-चिकित्सेशिवाय संभवनीय नसते.
    (९) प्रज्ञा, प्रतिभा व प्रतीक यांच्या समन्विन उपाययोजनेत मानवी संस्कृतीच्या शांतीनिष्ठ पुनर्रचनेची बीजशक्ती आहे.

(४)

    अमेरिकेची कर्तृत्त्वशक्ती, रशियाची समत्त्वनिष्ठा व भारताचा प्रज्ञानप्रखर शांतीपाठ या तिहींच्या समन्वयात मानवतेच्या भविष्य कालाचे भाग्यविधान आहे.
    जगाला मानव्याच्या अंत:स्वरूपाचे ज्ञान एक भारतच देऊ शकेल.
    विश्वशांतीची संहिता व संविधान भारतातच पुन:पुन: अवतीर्ण झाली आहेत.
    आजच्या जगातील सर्व मानवांच्या अडीचशे कोटी कंठांतून शांतीपाठाचे सामसंगीत भारतीय नेतृत्त्वानेच प्रकट होणार आहे.
    स्पेन, पोर्तुगाल व इटालियाच्या गूढ व गाढ धर्मश्रद्धेत, स्वित्झर्लंडच्या तटस्थतेत, इंग्लंडच्या राजकीय प्रतिष्ठेत, फ़्रान्सच्या स्वातंत्र्यप्रीतीत, जर्मनीच्या यंत्रविधानात जगत्‌शांतीची काही बीजे आढळली. अमेरिकेच्या ओजस्वी आवेगात, हवाई बेटांच्या भव्य सौंदर्यात, जपानी लोकांच्या आत्माहुतीत, हाराकिरीत व राष्ट्रनिष्ठेत भावी जगत्‌शांतीची प्रसादचिह्नेच मला आढळून आली.
    ब्रह्मदेशमधले शांतीब्रह्म, सयाममधला प्रशांत संयम व फ़िलिपिनाच्या सप्तसहस्र द्वीपांमधले शांतीदीप, प्रत्येक राष्ट्रात, लोकसमूहात, अद्यतन व पुरातन संस्कृतीदर्पणातून, भावी विश्वशांतीचे किरण बागडताना मला दिसले.
    सर्वसामान्य जनतेला युद्धे नको आहेत. काही महत्त्वाकांक्षी राक्षसांना, उन्मत्त अहं-विशिष्टांना युद्ध हवे असते.
    लोकशाहीला, सर्वसामान्य जनता-जनार्दनाला विश्वशांती, युद्धनिर्मूलन व सर्वोदय हीच सर्वदा व सर्वथैव इष्ट असतात.

(५)

    उत्तर ध्रुवाच्या उच्चतम बिंदूवर आरूढल्यावर क्षुद्रवृत्ती, मर्यादित क्षितिजे आपोआप नाहीशी होतात.
    प्रथमत: तेथेच, आज उपलब्ध असलेल्या श्रुतीतले शांतीपाठ अवतीर्ण झाले.
    त्या शांतीपाठाचे प्रतिध्वनी युगायुगांतून झिरपत येऊन माझ्या श्रुतीपथावर प्रकट झाल्यासारखे मला वाटले.
    शांतीपाठाच्या स्वरांत उद्याचे अर्थकारण, राजकारण व समाजकारण प्रगट झाले पाहिजे व होईलच. मात्र आज प्रत्येकाने व सर्वांनी सर्वोदयाचा शांतीदीप स्वत:चे अंत:करणात उजळला पाहिजे.
    या दीपांची दीपावली वैदिक द्रष्ट्यांच्या शांतीपाठांनी प्रथमत: सुरू केली.
    त्या तेज:स्वरूपात व शांतीस्वरांत यंदाची व भविष्यकालची प्रत्येक दिवाळी मानवसमाजाने साजरी करणे युक्त ठरेल.

ॐ ॐ ॐ

Facebook page

We have a page on facebook "Maharshi Vinod Publications.
You can join us.

श्रीगुरुपादुकोदयस्तोत्रम्


आज मुहूर्तवूं या एक नित्योत्सव।
अद्वैत आमोदें, जेणे फुलेल हें विश्व।
क्षणोक्षण प्रभातेल नवोनव महापर्व।
प्रसादचिन्ह श्री-श्री-श्रीविद्येचें।।१।।

परा, परापरा, अपरा।
श्रीगुरूपुजा ही त्रिशिरा।
विमर्शा माऊलीची ही स्तनदुग्धधारा।
ओष्ठविण्याचा समय हा।।२।।

‘अपरा’ आराधनेंत भेद-ग्रह-स्थिती।
‘परापरा’ अवस्थेंत भेद-अग्रह-वृत्ती।
‘परा’ अवस्थानांत अभेद-स्फूर्ती।
श्रीगुरूपुजेची पादुका ही।।३।।

आदिभान हें परात्परगुरुबीज।
विमर्शशक्ती श्रीशिवा गुरूविद्येची गुह्यशेज।
जीवूजीवूचा पहिला परिव्राज।
गुरूपादुकेचें आलोचन ।।४।।

एक उफराटे अ-कुल ब्रह्मपद्म।
तेथ निष्कलेचे निजशक्तीधाम।
निर्झरले व्यापिनीचे श्यामव्योम।
अमृतमेघ वोसंडला।।५।।

चतुष्कोणी देवतात्म्यांचे उगमस्थान।
बिंदुस्थली अमृतसिद्धीचें अनुभावन।
यथाक्रम आंतर अनुभवांचें अनुस्थापन।
श्रीगुरूविद्येचा सहजाचार हा।।६।।

‘विमर्श’ म्हणजे आदिभानस्थित चित्शक्ती।
पादुकोदय म्हणजे शिवशिवेची साम्यरसस्थिती।
गुरूकृपयैव या भाग्यश्रीची समवाप्ती।
‘गुरूकृपा’ ये नामें जीवू जीवूचें निरवस्थान।।७।।

‘चार’ म्हणजे सोपचार आराधन।
‘राव’ म्हणजे विमर्शशक्तीचें उपयोजन।
‘चरू’ म्हणजे द्रव्यगुणांचे संयोगीकरण।
‘मुद्रा’ या नांवे प्रतीकाचा प्रत्यंगभाव।।८।।

चित्गगन-चंद्रिकेची फेसाळली जान्हवी।
श्रीगुरूकृपेची वेल्हाळली की पान्हवी।
प्रकटली वा नीलाब्जाची श्रीसुषमा अभिनवी।
श्रीपादुकोदय स्तोत्र हें ।।९।।

श्रीनवशुक्तिकांचा सम्यक् समुल्लेख।
येथ दशोपनिषद्रहस्याचे महावार्तिक।
आदिकृपेचा जणुं संतताभिषेक।
श्रीगुरूपादुकोदयस्तोत्रम्।।१०।।

।।इति श्री गुरूपादुकोदय स्तोत्रम्।।
------------------------------

You may keep up to date with our updates by subscribing to RSS feed of this website. RSS Feed is available at www.maharshivinod.org/rss.xml