You are hereकैवल्य म्हणजे वृत्ती-राहित्य. / कैवल्य म्हणजे वृत्ती-राहित्य.

कैवल्य म्हणजे वृत्ती-राहित्य.


(११)
बुद्ध व जीझस, सॉक्रेटिस व प्लेटो, तसेच लायब्नीज, इमर्सन्‌, एरिक फ्राम्म इत्यादी धर्म-ज्ञ व तत्त्व-ज्ञ, वासना-विजय हे मोक्षाचे, अल्पाधिक प्रमाणात मुख्यांग समजतात. भारतीय दर्शनकारांची मोक्षविषयक भूमिका अत्यंत सु-स्पष्ट, प्रज्ञाप्रधान व पूर्णत: विधायक स्वरूपाची आहे.
सांख्यदर्शनकार कपिल मुनि ‘नि:श्रेयस् म्हणजे मोक्ष’ असे म्हणतात.‘आत्यंतिक-कर्ममोक्षणं मोक्ष:।’ असे जैनांचे ‘अर्हत दर्शन’ म्हणते.
शांकरवेदान्तात, ‘अविद्या अस्त-मयो मोक्ष:।’ असा मोक्षाचा अर्थ दिलेला आहे.
पायांना डोळे असणारे अक्षपाद अर्थात न्यायदर्शनाचे प्रणेते गौतम यांनी मोक्षाचा सर्वोत्कृष्ट अर्थ सांगितला आहे. ते म्हणतात, ‘स्वातन्त्र्यं मोक्ष:।’ सर्वांगीण व आत्यंतिक स्वातंत्र्य हाच मोक्ष होय.
भगवान पतंजलींनी कैवल्यावस्थेचा अर्थ दोन प्रकारांनी सांगितला आहे. पुरुषार्थशून्य झालेल्या सत्त्व, रज, तम या तीन गुणांचे प्रयोजन संपल्यामुळे ते त्यांच्या उत्पादन-कारणात विलीन होतात, म्हणजे प्रकृतीत विलीन होतात व त्यांच्या अभावी प्रकृतीही पुरुष-तत्त्वात, मूळ चैतन्यात समरस होते. ‘पुरूषार्थ शून्यानाम् गुणानाम् प्रतिप्रसव:।’
दुसर्‍या प्रकारात, कैवल्य म्हणजे वृत्ती-राहित्य. अज्ञानबंध नाहीसा झाल्यामुळे किंवा अविद्येचा अस्त झाल्यामुळे चितिशक्ती, अथवा मूळ चैतन्य, स्वत:च्या मूल-स्थितीत, अविकृत अशा नित्य स्थितीत असणे, म्हणजे कैवल्य! स्वरूप-प्रतिष्ठा व चितिशक्ती:
मला स्वत:ला, पतंजलींचे व अक्षपाद गौतमांचे विवेचन अतिशय स्पष्ट, उद्बोधक व विमोचक वाटले.
ही अवस्था, किंवा खरोखर अवस्था-राहित्य, एकदा प्राप्त झाल्यावर स्थिरत्वाने ते तसेच राहत असेल, असे मला वाटत नाही. पण तो अनुभव एकदाही आला, तरी नंतर उद्भवणार्‍या सर्व वृत्ती मात्र, आगळया स्वरूपाच्या व वेगळया सुगंधाच्या असतात.
‘धवल-गिरी’च्या अन्त्य शैलावरून परतल्याचा अनुभव तो हाच. निवृत्तीनाथांची अनुभूती ती हीच. अनुभवामृत तेही हेच. या अवस्थेत ज्ञान असते. पण त्या ज्ञानाच्या स्थलकालादी मर्यादा व बन्धने लुप्त् झालेली असतात.

पुस्तकाचे चॅप्टर्स

संपूर्ण पुस्तक वाचण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा.

You may keep up to date with our updates by subscribing to RSS feed of this website. RSS Feed is available at www.maharshivinod.org/rss.xml

श्रीगुरुपादुकोदयस्तोत्रम्


आज मुहूर्तवूं या एक नित्योत्सव।
अद्वैत आमोदें, जेणे फुलेल हें विश्व।
क्षणोक्षण प्रभातेल नवोनव महापर्व।
प्रसादचिन्ह श्री-श्री-श्रीविद्येचें।।१।।

परा, परापरा, अपरा।
श्रीगुरूपुजा ही त्रिशिरा।
विमर्शा माऊलीची ही स्तनदुग्धधारा।
ओष्ठविण्याचा समय हा।।२।।

‘अपरा’ आराधनेंत भेद-ग्रह-स्थिती।
‘परापरा’ अवस्थेंत भेद-अग्रह-वृत्ती।
‘परा’ अवस्थानांत अभेद-स्फूर्ती।
श्रीगुरूपुजेची पादुका ही।।३।।

आदिभान हें परात्परगुरुबीज।
विमर्शशक्ती श्रीशिवा गुरूविद्येची गुह्यशेज।
जीवूजीवूचा पहिला परिव्राज।
गुरूपादुकेचें आलोचन ।।४।।

एक उफराटे अ-कुल ब्रह्मपद्म।
तेथ निष्कलेचे निजशक्तीधाम।
निर्झरले व्यापिनीचे श्यामव्योम।
अमृतमेघ वोसंडला।।५।।

चतुष्कोणी देवतात्म्यांचे उगमस्थान।
बिंदुस्थली अमृतसिद्धीचें अनुभावन।
यथाक्रम आंतर अनुभवांचें अनुस्थापन।
श्रीगुरूविद्येचा सहजाचार हा।।६।।

‘विमर्श’ म्हणजे आदिभानस्थित चित्शक्ती।
पादुकोदय म्हणजे शिवशिवेची साम्यरसस्थिती।
गुरूकृपयैव या भाग्यश्रीची समवाप्ती।
‘गुरूकृपा’ ये नामें जीवू जीवूचें निरवस्थान।।७।।

‘चार’ म्हणजे सोपचार आराधन।
‘राव’ म्हणजे विमर्शशक्तीचें उपयोजन।
‘चरू’ म्हणजे द्रव्यगुणांचे संयोगीकरण।
‘मुद्रा’ या नांवे प्रतीकाचा प्रत्यंगभाव।।८।।

चित्गगन-चंद्रिकेची फेसाळली जान्हवी।
श्रीगुरूकृपेची वेल्हाळली की पान्हवी।
प्रकटली वा नीलाब्जाची श्रीसुषमा अभिनवी।
श्रीपादुकोदय स्तोत्र हें ।।९।।

श्रीनवशुक्तिकांचा सम्यक् समुल्लेख।
येथ दशोपनिषद्रहस्याचे महावार्तिक।
आदिकृपेचा जणुं संतताभिषेक।
श्रीगुरूपादुकोदयस्तोत्रम्।।१०।।

।।इति श्री गुरूपादुकोदय स्तोत्रम्।।
------------------------------