You are hereवरितील निर्वाण, शांति-ब्रह्म / वरितील निर्वाण, शांति-ब्रह्म
वरितील निर्वाण, शांति-ब्रह्म
प्रमादांची शय्या, नीतिवालेसाठीं।
तसें धर्मापोटी, रक्तपात ॥
उषेच्या पूर्वी हा, काळोख पाहणें।
भक्तिला साहणें, विरह-दु:ख ॥१॥
जेथ-तेथें बोंचे, अशी अपूर्णता।
कधीं अनंतता, मिळे मजला ॥
अफाट या नभीं, एक इवला पंख।
पाहतांच हरिख, मना वाटे ॥२॥
वनांत निर्जन, झोंपडी एकली।
अशी कां राहिली, खडी तेथें ॥
पापात्मा मी असा, तरी इच्छा एक।
मारिते कां हाक, अनंततेला ॥३॥
पाथेय गीतांचें, सवें घेऊनी यां।
मार्ग चालावया, लागलों मीं ॥
परीं हे वाढते, गीतांचें वैभव।
आणि आत्म-देव, असंतुष्ट ॥४॥
संपेल जेव्हां तें, तेव्हांच हे प्राण।
वरितील निर्वाण, शांति-ब्रह्म ॥
करितात आशा या, सदा लंगडधीन।
पाऊलें पुढें न, परि त्यांचीं ॥५॥
जागच्या जागींच, वरी खाली पाय।
करुनीया काय, प्राप्त होई ॥
सांत-तेचे माझ्या, इवलेंसें अंगण।
तेथ लंगडधीन, असें चाले ॥६॥
- प्रतिसाद देण्यासाठी सहभागी व्हा अथवा सदस्य बना
पुस्तकाचे चॅप्टर्स
संपूर्ण पुस्तक वाचण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा.