१९८३ सालानंतर शांतिमंदिरमध्ये जुनी कागदपत्रे यांचा शोध घेत असताना एका लाकडी पेटीमध्ये काही जुने बिन आखलेले कागद मला सापडले. या कागदांवर पेन्सिलने लिहिलेले, वळणदार, सुस्पष्ट, सुंदर अक्षरांतील हजारो श्लोक मला दिसले. त्यात १९३८,३९,४०,४२,४५ या काळात महर्षि विनोद सरदार मेहेंदळयांना श्लोक सांगताना आलेल्या उत्कट अनुभवाचा संदर्भ मला सापडला. काही विशिष्ट दिवशी, विशिष्ट वेळी, पुण्यातील सरदार मेहेंदळेंच्या घरी महर्षि विनोद जात असत आणि अतीन्द्रिय अवस्थेमध्ये स्फुरलेल्या काव्यपंक्ती टिपून घ्यायला ते रावसाहेब मेहेंदळेंना सांगत असत. त्याचे विलक्षण वर्णन श्रीज्ञाननाथजी रानडेंनी कथन केले आहे.