अदृश्य तव मूर्ति - तशीच राहूं दे।
तुझी दिव्य कांति कशी साहूं ॥
निर्विकार मुद्रा नेत्रीं परकेपणा।
भेवडावी मना सदा माझ्या ॥
कधी सुद्धां नको नेत्रनेत्रा भिडणें।
नको भेट होणें तुझी माझी ॥४८॥/
तुझी हास्ये अथवा कटाक्ष हे सारे।
आणिती हे वारे इथे आज ॥
आनंद हास्याने - कटाक्षें वेदना
जशा होती मना - सदा माझ्या ॥
तशाच दोन्ही त्या अनुभवांची स्मृती।
वारी कां जागृती - वायू - भेट ॥४९॥ करी /
व्यक्तित्व पेहराव माझ्याच साठीं ना ।
करुनीया देव अवतरे हा ॥
क्षुद्र या मर्यादा सुखाने सोसून।
भक्ति ओळखून येथ आला ॥
जेजे अपेक्षित तयांचे वास्तव्य।
सहज सिद्ध होय अचानक ॥१५७॥
आत्म-विरोधाचे एकलें हें पाप ।
जीवास संताप - सदा देते ॥
तोचि एक आत्मा अनीतीचा वाटे ।
बोचतात काटे मनीं त्याचे ॥१५८॥
ध्येय आणि कृति यांचा उभयान्वय ।
कसा सिद्ध होय मला सांगा ॥
मूर्ति आणि ध्यान विचार, वर्तन ।
एक हे तन - मन - असो माझें ॥१५९॥
जमिनीच्या पोटी उद्भवली आस।
आकाश राजास - चुंबिण्याची ॥
अशक्यता याची आली कळूनिया।
ऊर भरुनिया सवे आला ॥
मानवांचे शोक निमिषजीवी ।
सृष्टीच्या दु:खांना आयु दीर्घ ॥
तसाच राहिला ऊर पृथ्वीचा या।
हिमालय जया दिले नांव ॥
तिच्याच शोकाच्या ह्या ही गंगा यमुना।
अश्रु कां म्हणा ना पृथ्विचे ते ॥२१॥
तुझ्या माझ्या जीवां कां वेड लागावे।
काय मी सांगावे - मला, तूं हीं ॥
तुझ्या सुद्दा चित्तीं असणार ते काय।
(माझेच ना हृदय तुझ्या देही) ॥
आणि तैसे तुझे धडपडे हें येथे ।
जया आत्मगीतें - साथ देती ॥२२॥
चालण्यास पाय (काठी) - लिहितांना टांक।
बोलविण्या हाक जैशी लागे ॥
पहाण्यास नेत्र ऐकण्यास कान।
तुझें तैसें ध्यान जीविता या ॥
तुझी मुर्ती पुढें जरी ही असेल।
दुजी ना उरली मनीं इच्छा ॥१३२॥